सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

चुनौती बडी लेकीन नामुमकीन नही .........!




पंकजा मुंडे अडचणीत आहेत का ?पंकजा मुंडेंना भीती वाटते का ?पंकजांसमोर धनंजय मुंडे यांचे आव्हान कितपत आहे ?या आणि अशा बातम्यांवर सध्या बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे .वास्तविक पाहता निवडणूक मग ती ग्रामपंचायत ची असो की विधानसभा, लोकसभा .प्रत्येकजण त्यात विजय मिळावा यासाठीच अहोरात्र मेहनत करत असतो .कोणतीही निवडणूक सोपी किंवा एकतर्फी कधीच नसते आणि ती तशी होऊ देखील नये .लोकशाही म्हणल्यावर त्यात आरोप प्रत्यारोप,एकमेकांच्या उकाळ्या पाकळ्या निघणारच .पण परळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे .असे असतानाही पंकजा मुंडे ज्या पद्धतीने राज्यात प्रचारसभा घेत फिरत आहेत ते पाहता त्या आपल्या मतदारसंघात मजबूत आहेत असच म्हणावं लागेल .
लोकसभा निवडणुकी नंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते .देशात मोदींचा करिष्मा चालल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे नेते बिनधास्त होते तर विरोधीपक्ष पुन्हा जमवाजमव करण्यात गुंतला होता .
एकीकडे भाजप शिवसेनेत होणारी इनकमिंग आणि दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ला लागलेली गळती,अशा वातावरणात निकाल काय लागणार हे स्पष्ट होते .तरीदेखील शरद पवार यांनी या निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली अन एकतर्फी वाटणारी ही निवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे .
राज्यात ज्या काही महत्वपूर्ण लढती होत आहेत त्यात सर्वाधिक लक्षवेधी लढत आहे ती बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात .कारण येथे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे या बहीण भावात लढत होत आहे .
यापूर्वी देखील 2014 साली या दोघांमध्ये लढत झाली होती अन त्यात पंकजा यांनी भावाला चितपट केलं होतं .त्यानंतर झालेल्या नगर पालिका अन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत धनंजय यांनी विजय मिळवत विधानसभा निवडणुकीचा वचपा काढला होता .
मात्र गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले .पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे .गेल्या पाच वर्षात पंकजा मुंडे यांनी आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात देखील हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून आणला .गेल्या पंधरा वीस वर्षांत जी काम झाली नाहीत ती मागच्या पाच वर्षात झाली हे सत्य कोणी नाकारू शकत नाही,मात्र तरीदेखील प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय मुंडे यांनी यावेळी टाईट फिल्डिंग लावल्याने धक्कादायक निकाल लागतील की काय अशी चर्चा सुरू आहे .
पंकजा मुंडे या त्यांच्या स्पष्टवक्तेपणा मुळे अनेकवेळा मीडियामध्ये चर्चेत असतात,कोणत्याही मुद्यावरून विरोधक त्यांना अडचणीत आणायची एकही संधी सोडत नाहीत .या निवडणुकीत देखील पंकजा मुंडे या अडचणीत आहेत,त्यांच्यासमोर तगडे आव्हान धनंजय यांनी उभे केले आहे अशी चर्चा सुरू झाली .
गेल्या पाच वर्षात या दोन्ही बहीण भावांनी परळीच्या लोकांसाठी जे काही केले त्याचा लेखाजोखा मांडण्याची ही वेळ आहे ,मात्र नको ते आरोप करून,भावनिक राजकारणाचा आधार घेतला जात असल्याचे चित्र आहे .पंकजा मुंडे या अडचणीत आहेत,त्यांना निवडणुकीची भीती वाटते अशा वावड्या उठवल्या जात आहेत .
वस्तुस्थिती मात्र तशी नसल्याचे दिसते .
पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच परळी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती .लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांनी 25 हजाराचे मताधिक्य घेत विधानसभा निवडणुकीत काय होणार हे दाखवून दिले होते .तब्बल 140 पेक्षा अधिक गावात 25 / 15 असो की मुख्यमंत्री ग्राम सडक योजना,अथवा जलयुक्त शिवार या माध्यमातून त्यांनी थेट लोकांच्या दारापर्यंत विकास नेला आहे,त्यामुळे त्यांच काम बोलत आहे .
लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आता त्यांच्यासाठी मागील दोन महिन्यांपासून प्रीतम मुंडे फिरत आहेत .पंकजा मुंडे यांच नेतृत्व राज्यव्यापी आहे,त्या गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मास लीडर म्हणून पुढे आल्या आहेत .लाखोंच्या सभा गाजवायच्या कशा याच बाळकडू बापाकडून मिळाल्याने त्या तयार झाल्या आहेत .त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सगळ्यात जास्त मागणी आहे ती पंकजा मुंडे यांना .
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूड मध्ये अडकून पडलेले असताना आणि भाजपचे इतर मंत्री आणि दिगग्ज नेते आपल्या मतदारसंघात तळ ठोकून असताना पंकजा मुंडे मात्र राज्यभर प्रचारसभा गाजवत फिरत आहेत .
अगदी राज्यात सभा गाजवणारे आणि हल्लाबोल असो की शिवस्वराज्य यात्रा या माध्यमातून सरकारला सळो की पळो करून सोडणारे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हे देखील आपल्याच मतदारसंघात व्यस्त आहेत .
मला लोकांमध्ये गोपीनाथ मुंडे म्हणजे माझे बाबा दिसतात अस ठणकावून सांगणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या पाठीशी राज्यभरातून जे जनसमर्थन उभे राहत आहे ते पाहिल्यानंतर त्यांना परळीची निवडणूक अवघड आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही .
ज्या नेत्याच्या ऐका हाकेवर सावरगाव सारख्या ठिकाणी लाखो लोक येतात,पक्षाचे प्रमुख अमित शहा येतात,दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याचं आणि त्यांच्या कामाच कौतुक करतात त्या नेत्याला परळीकर जनता धक्का देईल असे आज तरी चित्र दिसत नाही .फाईट तगडी आहे हे खरे आहे,कारण पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेच नव्हे तर अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत .कारण त्यांच्या पाठीशी असलेले जनसमर्थन आहे .अवघ्या पाच वर्षांच्या काळात वडील गेल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने लोकांचा विश्वास संपादन केला तो विरोधीपक्षाला तर सोडाच पण स्वपक्षीयांना देखील धडकी भरवणारा आहे हे स्पष्ट आहे .त्यामुळे त्यांना राज्यभर मिळणारे समर्थन रोखण्यासाठी प्रयत्न होत नसतील तर नवलच आहे .
तरीदेखील पंकजा मुंडे या ज्या पद्धतीने राज्यात प्रचारसभा गाजवत आहेत ते पाहिल्यानंतर ही पोरगी बापापेक्षा चार पावलं पुढं आहे असेच म्हणावे लागेल,कारण गोपीनाथ मुंडे हे दिवसभर राज्यात कुठेही प्रचाराला गेले तरी रात्री परळीत डेरेदाखल व्हायचे ,मात्र पंकजा मुंडे या ज्या पद्धतीने राज्यात बिनधास्त फिरत आहेत त्यावरून नक्कीच वाटते की त्यांना आपल्या मतदारसंघात काय होणार याची नक्कीच खात्री आहे .याला काही लोक कदाचित ओव्हरकॉन्फिडन्स देखील म्हणतील ,मात्र जे आहे ते स्पष्ट आहे की त्या राज्यभर फिरत आहेत अन त्यांच्या सभांना मागणी आणि गर्दी देखील होत आहे .
पंकजा मुंडे यांची सभा म्हणजे विजयाची मुहुर्तमेढ असेच समीकरण झाले आहे त्यामुळेच जिल्ह्यात तर सोडाच पण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ,खान्देश या भागातही त्यांच्या सभांची मागणी होत आहे .निवडणूक जाहीर झाल्यापासून पंकजा मुंडे या पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत आहेत .लोकांच्या मनातलं ओळखून त्यांना काय आवडत याचा त्यांना पक्का अंदाज आला आहे ,त्यामुळे त्यांच्या सभांना तुफान गर्दी होतानाचे चित्र दिसत आहे .
अस असलं तरी परळीवर देखील त्यांचं बारीक लक्ष आहे,निवडणूक म्हणजे एकप्रकारे युद्धच असते त्यात सगळ्याच गोष्टी थेट वार करून मिळवायच्या नसतात तर काही गोष्टी गनिमी कावा करून प्राप्त कराव्या लागतात हे त्यांनी नमिता मुंदडा यांच्या प्रवेशातुन दाखवून दिले तसेच टि पी मुंडे सारखा मोहरा सोबत घेत विरोधकांना जोरदार धक्का दिला . त्यामुळे परळीत जे काही व्हायचे ते 24 तारखेला समजेलच पण आज तरी या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात काटेकी टक्कर आहे हे वास्तव आहे पण शेवटी एवढंच म्हणावं वाटत की चुनौती बडी है लेकीन नामुमकीन नही !
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

तुझं ते हि माझंच ...........!

तुझं ते ही माझंच .........!

सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमारच्या एका चित्रपटातील एक प्रसंग जोरदारपणे चर्चेत आहे,यामध्ये अक्षयकुमार हा त्याच्या पार्टनर सोबत पैशाची वाटणी करताना दाखवला आहे,तसेच राऊडी राठोड मध्ये सुद्धा तो अशाच पद्धतीने वाटणी करताना दाखवला आहे,यामध्ये वाटणी समसमान झाल्याचा आणि पार्टनर खुश झाल्याचं दिसत,मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळंच असत,यात फायदा होतो तो अक्षयकुमार याचाच .हे आठवण्याच कारण म्हणजे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांमध्ये झालेलं जागांच वाटप होय .

माझं ते माझं अन तुझं ते ही माझं असा खेळ सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू असल्याचं दिसत आहे.भाजप आणि शिवसेनेच्या यादीवर नजर टाकली तर लक्षात येते की आपल्या पक्षाचे म्हणजे आपल्याला मानणारे लोक तर फडणवीस यांनी भाजपकडून दिलेच पण शिवसेनेच्या यादीत सुद्धा फडणवीस यांना माणणाऱ्यांचा भरणा आहे,एवढंच नाही तर जे मित्रपक्षाकडून उमेदवार म्हणून दिले आहेत ते देखील फडणवीस यांच्याच जवळचे आहेत .काँग्रेस,राष्ट्रवादीकडून ऐनवेळी उमेदवारी मिळवलेले काहीजण सुद्धा फडणवीस यांच्या संपर्कात होते हे विशेष .त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत माझं ते माझ अन तुझं ते ही माझंच असाच खेळ फडणवीस यांनी मांडला आहे .त्यामुळे निकाल काय लागणार हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही हे नक्की .
राज्याच्या विधानसभा निवडणुकी कडे देशाचे लक्ष लागले आहे,देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई आणि राज्यावर आपली हुकूमत असावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . निवडणूक जाहीर होण्याच्या सहा महिने नव्हे वर्ष दोन वर्षे अगोदर पासूनच फडणवीस यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती अस म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही .
काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील असोत की विजयसिंह मोहिते पाटील अथवा जयदत्त क्षीरसागर किंवा ऐनवेळी पक्षात आलेले अनेकजण असोत प्रत्येकाशी फडणवीस यांनी एक वेगळीच लाईन लावून ठेवली होती .पाथरी विधानसभा मतदार संघातून रिपाई ची उमेदवारी मिळालेले मोहन फड हे अपक्ष म्हणून 2014 ला निवडून आले ,नंतर शिवसेना मार्गे भाजपात दाखल झाले आणि वाटाघाटीमध्ये हा मतदारसंघ मित्रपक्ष रिपाईकडे गेल्यानंतर त्यांना रिपाईकडून उमेदवारी देण्यात फडणवीस यशस्वी झाले .त्यांच्याच शेजारच्या जिंतूर मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या मेघना बोर्डीकर यांना देखील फडणवीस यांनी रासपची उमेदवारी मिळवून दिली .
गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये सहभागी झालेल्या विनायक मेटे यांच्या वाट्याला जे तीन मतदारसंघ आले तेथेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलेच शिलेदार उभे केले .लोकसभा निवडणुकीच्या काळात विजयसिंह मोहिते पाटील यांनी तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला .बीड आणि सिल्लोड मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला असल्याने जयदत्त क्षीरसागर आणि अब्दुल सत्तार यांना सेनेत पाठवत फडणवीस यांनी बाजी मारली .लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजेंद्र गावित या विद्यमान भाजप खासदाराला शिवसेनेत पाठवत त्यांना निवडून आणले .
राज्यात यावेळी भाजपकडून जे उमेदवार उभे आहेत आणि ज्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली अशा तब्बल वीस पेक्षा अधिक लोकांची उमेदवारी आणि मतदारसंघ फडणवीस यांनी च फायनल केले आहेत .शिवसेनेच्या वाट्याला ज्या 124 जागा आल्या आणि मित्रपक्षांना ज्या 18 जागा दिल्या गेल्या त्यातील तीस टाक्यांपेक्षा जास्त उमेदवार हे फडणवीस यांना मानणारे आहेत हे विशेष .
महायुतीमध्ये जे मित्रपक्ष सहभागी झाले त्यांना आमच्या कोट्यातून जागा दिल्या जातील हे मान्य करताना फडणवीस यांचा धुर्तपणा कोणाच्याच लक्षात आला नाही . रिपाई असो की रासप अथवा शिवसंग्राम सगळ्यांना जागा तर दिल्या मात्र त्यांचे उमेदवार आपल्या मर्जीतील देताना फडणवीस यांनी त्यांना आपल्याच पक्षाच्या चिन्हावर म्हणजे कमळावर उभे करून आपली खेळी यशस्वी केली .
मित्रपक्ष आणि सत्ताधारी असताना सुद्धा शिवसेनेने  साडेचार वर्ष भाजपच्या विरोधात रान उठवले,फडणवीस यांच्यापासून ते मोदी शहा यांच्यापर्यंत सगळ्यांचा यथेच्छ समाचार घेतला .लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती तुटते की काय असे वाटत असताना शहा आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना अशी काही स्वप्न दाखवली की त्यात त्यांचा विरोध मावळला आणि विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात देखील युती अभेद्य राहिली .
मध्यंतरी एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आमची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फायनल करणार आहेत अशी मिश्किल टिप्पणी केली होती,आज दोन्ही पक्षांसह मित्रपक्षांना दिलेल्या जागा आणि उभे असलेले उमेदवार पाहिल्यास यादी फडणवीस यांनी फायनल केल्याचे दिसून येते .
भाजपमध्ये शिस्त पाळली जाते अस म्हटलं जातं ,यादीवर नजर टाकली तर कॉग्रेसी संस्कृती मध्ये वाढलेल्या आणि अनेक बेशिस्त असणाऱ्यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते .लोकसभा निवडणुकीत देखील शिवसेनेने काही उमेदवार बदलावेत असा फडणवीस यांचा आग्रह होता मात्र सेनेने ती ऐकला नाही अन चार पाच जागांचा फटका त्यांना बसला .कॉग्रेसमुक्त भारत चा नारा नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर फडणवीस यांनी राज्यात राष्ट्रवादी मुक्त नारा दिला ,पण तो पूर्ण करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गजांचा सहारा घ्यावा लागला हे ढळढळीत सत्य आहे .विजयसिंह मोहिते असोत की राणा पाटील अनेक दिग्गजांना आपल्या गळाला लावताना फडणवीस यांनी आपल्या पक्षातील स्पर्धक बनू शकणाऱ्या खडसे,तावडे यांच्यासारख्यांचा पत्ता कापून आपणच किती प्रबळ आहोत हर दाखवून दिले .
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्यासारखा ऐंशी वर्षाचा तरुण मैदानात उतरला असताना राज ठाकरे असोत की राहुल गांधी यांच्यात मात्र तो उत्साह पाहायला मिळत नाही .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे ते भाजप सेनेच्या या दिग्गज लोकांसमोर कितपत टिकतील ही शंकाच आहे .अशावेळी येणाऱ्या 24 तारखेनंतर जे सरकार अस्तित्वात येईल त्यावर देखील फडणवीस यांचाच वरचष्मा असणार हे निश्चित आहे .सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यावयाचे अन कोणाला बाजूला बसवायचे,तसेच कोणाला कोणते खाते द्यायचे याचा मास्टर प्लॅन देखील फडणवीस यांच्याकडे तयार असल्यास आश्चर्य वाटायला नको .मध्यंतरी एका कार्यक्रमात फडणवीस यांना तुम्ही आजच्या काळातले शरद पवार आहात का,तुम्हाला पवार व्हायला आवडेल का अस विचारल्यावर मिश्कीलपणे हसत त्यांनी पवार यांचे दिवस आणि त्यांच राजकारण संपल्याच सांगितलं होतं,तेव्हाच खडसे,तावडे यांनी वाऱ्याचा वेग अन दिशा ओळखायला पाहिजे होती .अबकी बार फडणवीस सरकार असंच त्यांना सांगायचं होत मात्र ते ना स्वपक्षातील लोकांना समजलं ना मित्रपक्षांना .त्यामुळेच आज जी परिस्थिती दिसते आहे ती पूर्णपणे फडणवीस यांना पोषक अशीच असल्याचे जाणवते .त्यामुळेच येणाऱ्या काळात फडणवीस बोले अन मित्रपक्षासह विरोधीपक्ष सुद्धा चाले असे चित्र दिसले तर आश्चर्य वाटायला नको .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

जातीवाचक उल्लेख कितपत योग्य ?

धनंजय मुंडे यांच्या मतदार संघात कदाचित ब्राम्हण मतदार नसावेत किंवा ते ज्या राज्यात राहतात तेथे सुद्धा त्यांच्या पक्षाला ब्राम्हणांची मत मिळत नसावीत त्यामुळेच ते अनाजी पंत ,अनाजी पंत असं बोलत फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत,एखाद्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या जातीचा हीन भाषेत उल्लेख का करावा हे न कळणारे आहे,अनाजी पंत ही प्रवृत्ती आहे मात्र मुंडे त्याला जातीची जोड देऊन वातावरण अधिक दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत,शेवटी त्यांच्या नेत्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक पुणेरी पगडी, फुले पगडी,पेशवे छत्रपतींना जहागिरी देऊ लागले अशी वक्तवे करून ब्राम्हण द्वेष दाखवून दिला होता .

कोणताही माणूस कोणत्या जातीत जन्माला यावा हे कोणाच्या हातात नसते मात्र तरीही त्याला तो ठराविक जातीत जन्माला आला म्हणून दोष देणे योग्य नाही .
अनाजी पंत ज्या पद्धतीने कारभार करीत होते तसा फडणवीस यांनी केला का,त्याची काही उदाहरणे आहेत का,जेव्हा छत्रपती उदयनराजे हे काँग्रेस मधून राष्ट्रवादी त आले आणि गेली दहा वर्षे शरद पवार ,अजित पवार आणि सगळ्याच पवार समर्थकांनी त्यांना सहन केले तेव्हा राजेंना जो मानसन्मान दिला तो कोणत्या अधिकाराने दिला हे सांगावे,पवार असोत की मुंडे यांनी काहीही वक्तव्य केले तर ते सेक्युलर आणि इतरांनी कोणतेही कृत्य केले की ते धर्मांध हा काय प्रकार आहे .

निवडणुका येतात अन जातात ,मात्र प्रचाराचा दर्जा इतका खाली जावा हे योग्य नाही,बरं ते ज्या फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत त्यांनी स्वतःच्या जातीला खूप काही मिळवून दिल आहे असंही नाही,उलट कटाक्षाने त्यांनी आपल्या स्वजातीयांच्या कार्यक्रमांना किंवा स्टेजवर जाणे टाळले आहे मग तरी हा पोटशूळ का .
मुंडे यांना पुरस्कार मिळाला किंवा कार्यक्रम असला की बंजारा महिलांनी त्यांचे पारंपरिक वेशात स्वागत केले तर चालते,शरद पवार यांना मराठा म्हणून जाणता राजा ही पदवी दिली तर चालते,छगन भुजबळ असोत की महादेव जानकर अथवा राम शिंदे यांना  त्यांच्या जातीच्या नावावर मोठमोठी पदे,संस्थान दिली तर कोणीच आक्षेप घेत नाही मात्र एक फडणवीस त्याच्या कर्तृत्वावर आणि पक्षनिष्टेवर जर मुख्यमंत्री पदावर पोहचला असेल तर त्यात त्याचा काय दोष .
आपण टीका करताना समोरच्या माणसाच्या मनाला भोक पडतील अस बोलू नये हा साधा संकेत आहे,मात्र राजकारणात सगळेच संकेत पायदळी तुडवले तरच आम्हाला साहेबांच्या दरबारात किंमत मिळते हा समज असलेल्या धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना हेच प्रिय वाटले तर आश्चर्य वाटायला नको .मुंडे हे अत्यन्त चांगले वक्ते,अभ्यासू राजकारणी आहेत,परखड टीका करणारा स्व गोपीनाथ मुंडे यांच्या नंतरचा नेता म्हणून त्यांनी नाव कमावले आहे .त्यामुळे त्यांनी या पद्धतीने भाषा वापरून काय साध्य करावयाचे आहे हे ठरवावे .
राजकारणात आम्ही जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करतो ,आमच्या साहेबांनी गवई, आठवले,कवाडे,प्रकाश आंबेडकर यांना खुल्या जागेवरून निवडून आणलं हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर जी एक स्वाभिमानाची लकेर उमटते ना त्यानंतर ते जेव्हा फडणवीस यांचे नाव न घेता टीका करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील छद्मी हावभाव खूप काही सांगून जातात .
राजकारण हे समाजाच्या उद्धारासाठी,उत्थानासाठी असावं असं म्हटलं जातं मात्र धनंजय मुंडे यांना कदाचित त्याचा विसर पडला असावा .मी एका ठराविक जातीचा आहे आणि मला राग आला म्हणून मी हे लिहितो आहे असं नाही,कारण मी पत्रकारिता करताना जात धर्म याहीपेक्षा पैसा या गोष्टीला कधीच महत्व दिले नाही.
मात्र ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक हे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की फडणवीस म्हणजे ब्राम्हण,मोदी म्हणजे तेली,शहा म्हणजे गुजराती, मुंडे म्हणजे वंजारी,पवार म्हणजे मराठा ,राऊत म्हणजे माळी याचा खरच विचार झाला पाहिजे .
छत्रपती शिवाजी महाराज असोत की जिजामाता अथवा राजे संभाजी हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत याबद्दल कोणाला काहीच अडचण असण्याचे कारण नाही,त्या छत्रपतींनी कधी जातीभेद पाहिला नाही त्यांच्या वंशजांबद्दल बोलताना जर जाणीवपूर्वक असा जातीवाचक उलेलख जात असेल तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा आहे .

देव ,देश अन धर्मापायी प्राण हाती घेणारे छत्रपतींचे मावळे कुठं अन फुटकळ सत्तेतील पद मिळावीत म्हणून स्वतःला एखाद्या व्यक्तीच्या चरणी लिन करून मावळे म्हणवून घेणारे धनंजय मुंडे यांच्यासारखे किंवा इतर तथाकथित पुढारी,कार्यकर्ते कुठं .
हा सगळा जो प्रचाराचा दर्जा घसरतो आहे तो बुद्धीला न पटणारा आहे,निवडणूक येते अन जाते मात्र त्यामुळे मनभेद होता कामा नयेत,पत्रकारितेत एखाद्या बातमीमुळे कोणाचे आयुष्य बरबाद होणार असेल तर ती बातमी टाळलेली बरी किंवा त्यातील भाषा सौम्य वापरलेली बरी असं साधं इथिक्स शिकवलं जातं तस राजकारणात देखील टिका टिप्पणी करताना भाषेचा समतोल राखला पाहिजे हा साधा संकेत आहे,मात्र तो संकेत पायदळी तुडवण्यासाठीच असतो हा समज मुंडेंसारख्या नेत्यांमुळे अलीकडच्या काळात रूढ होऊ लागला आहे .
अनाजी पंत ज्या पद्धतीने वागले किंवा त्यांनी जी कारस्थान केली त्यामागे त्यांचा हेतू काय होता,परिस्थिती काय होती,त्यांनी का अशा पद्धतीने निर्णय घेतला हे त्यांनाच माहीत परंतु ते एका जातीचे आहेत म्हणून संपूर्ण जातीला दोष देत साप साप म्हणून भुई धोपटणे किती योग्य आहे याचा विचार ज्याचा त्याने करावा एवढीच अपेक्षा .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

शब्दावाचून कळले सारे .............!



शब्दावाचून कळले सारे ..........!
भरतनाट्यम म्हणजे भाव ताल आणि रागाचा संगम,यामाध्यमातून दक्षिणेत ही कला जोपासली गेली,भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित असलेली ही नृत्यशैली असून या नृत्यपद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे .या नृत्यशैलीच्या माध्यमातून बीडमध्ये एक सांस्कृतिक वातावरण तयार होत आहे,साई नृत्यालयाच्या अनुराधा चिंचोलकर यांनी गेल्या 19 वर्षात ही परंपरा जपली आहे .कोणत्याही संवादाशिवाय मनातले भाव व्यक्त करण्याचं एक उत्तम साधन म्हणजे भरतनाट्यम अस म्हणलं तर वावगं ठरणार नाही .याचा प्रत्यय बिडकरांनी रविवारी अनुभवला .साई नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यनाटिकेद्वारे सर्वांना मंत्रमुग्ध केले .
21 व्या शतकाकडे झेपावणारा भारत देश,संगणकीकरणाचा झालेला विस्फोट,ग्लोबलायजेशनमुळे एक वैश्विक खेड बनत असलेलं जग,मोबाईल,इंटरनेट मुळे घरापर्यंत नव्हे तर बेडरूममध्ये इंग्रजी संस्कृतीचा झालेला शिरकाव पाहता डी जे च्या तालावर बेधुंद होणारी तरुणाई पाहिल्यानंतर भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होऊन परकीय संस्कृतीच आक्रमण पुन्हा होत की काय अशी शंका येते,गणपती असोत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी होणारा धांगडधिंगा पाहिल्यानंतर मन विषन्न होत,मात्र कोणत्याही संवादाविना केवळ हावभाव,नेत्रकटाक्ष,हस्तमुद्रा आणि अप्रतिम पदलालित्य याद्वारे समोरच्यांशी थेट बोलता येत,आपल्या मनातल्या भावना व्यक्त करता येतात आणि ते माध्यम म्हणजे भरतनाट्यम होय .

दक्षिण भारतातून उदयास आलेल्या भरतनाट्यम या नृत्यप्रकाराने आज जगात आपला वेगळा ठसा उमटवला आहे .स्वातंत्र्यपूर्व काळात दादासाहेब फाळके असोत की चार्ली चॅप्लिन यांनी मुकचित्रपटाद्वारे रसिकांचे मनोरंजन केलं,नंतरच्या काळात संवादातून सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना  चित्रपट आणि नाटकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला .या चित्रपटांमध्ये नायक नायिकांच्या प्रेमाची खलबत नृत्य आणि गीताच्या माध्यमातून व्यक्त करण्यास सुरुवात झाली .90 च्या दशकापर्यंत संगीत नाटकांनी देखील रसिकांच्या मनावर गारुड घातलं होत .अलीकडच्या काळात व्यावसायिक रंगभूमीला मोठे महत्व प्राप्त झाल्याने संगीत नाटकांकडे रसिकांनी आणि निर्माता,दिग्दर्शकांनी देखील पाठ फिरवली .
या सगळ्या उलथापालथी मध्ये आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं ते भरतनाट्यम या नृत्यप्रकाराने .
बीडच्या नाट्यगृहात साई नृत्यालयाच्या वतीने आयोजित द्वैवार्षिक कार्यक्रमात जे कलाप्रकार सादर केले गेले ते डोळ्यांचे पारणे फेडणारे होते .
पार्वतीचे वडील राजा दक्ष यांनी आयोजित केलेल्या यज्ञाचे निमंत्रण आपले पती भगवान शंकर यांना नसल्याचे समजल्यानंतर पार्वतीने वडिलांकडे धाव घेऊन जाब विचारला तेव्हा त्या गोसावड्याला,अंगाला राख फासून फिरणाऱ्याला मी निमंत्रण देणार नाही अस सांगत दक्ष राजाने पार्वती आणि शंकर यांचा अवमान केला,क्रोधीत झालेल्या पार्वतीने यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली ,ही वार्ता भगवान शंकरांना समजल्यानंतर त्यांनी तांडव करीत उपासना केली अन पार्वती पुन्हा गौरीच्या रुपात प्रकट झाली, ही आख्यायिका साई नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी ज्या सहजपणे सादर केली ती अवर्णनीय होती,कोणताही संवाद नसताना ही नृत्य नाटिका केवळ आपल्या हावभावातून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहचवण्याचं कसब थक्क करणारं होतं .ही नाटिका सादर करणाऱ्या विद्यार्थिनींच जेवढं कौतुक आहे तेवढंच यासाठी मेहनत घेणाऱ्या अनुराधा चिंचोलकर यांचंही आहेच .
या संपूर्ण कार्यक्रमात मुलींनी शारदास्तवन,श्लोकम, शिरोदृष्टी,पुष्पांजली,अलारीपू, मधुराष्ट्कम, पदम,तिल्लना,आडावं असे विविध नृत्य प्रकार सादर केले .हे सगळे नृत्यप्रकार म्हणजे बीडकर रसिकांसाठी मोठी पर्वणीच होती .
कोणताही संवाद नसताना केवळ भावमुद्रा आणि हावभाव याद्वारे रसिकांच्या काळजाला हात घालण्याचा हा प्रकार म्हणजे शब्दवाचून कळले सारे,शब्दांच्या पलीकडले अशी अनुभूती देणारा होता .
भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यप्रकाराबाबत केवळ ऐकून असणाऱ्या श्रोत्यांना देखील या नृत्यसादरीकरणाने खिळवून ठेवले यातच याचे यश सामावले आहे .गेल्या 19 वर्षापासून सौ अनुराधा चिंचोलकर या किती मेहनत घेत असतील अन काय काय द्राविडी प्राणायाम त्यांना घालावे लागत असतील हे दिसून येत होते .अत्यन्त शांत,संयमी कुठलाही बडेजाव पणा अंगी न बाळगता त्या भगवान नटराजाची सेवा  करीत आहेत त्या किती श्रद्धेने करतात हे रविवारी दिसून आले .
आपल्या शिष्याने नाव कमावलं आणि दिलेली शिक्षा प्रत्यक्षात उतरवल्यानंतर गुरूच्या चेहऱ्यावर जो कृतार्थतेचा भाव असतो तो नक्कीच चिंचोलकर ताईंच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला .
या संपूर्ण कार्यक्रमात मनाला भावलं ते सती झाली गौरी ही नृत्यनाटिका,खरोखर हा जो काही प्रकार या मुलींनी सादर केला त्यांना शतशः नमन .मनातल्या भावना व्यक्त करण्याचं संवाद हेच एकमेव साधन नाही तर चेहऱ्यावरील हावभाव,नेत्रकटाक्ष, हस्तमुद्रा याद्वारे तसेच त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी आपल्या मनातल्या भावना पदम च्या माध्यमातून कशा मांडल्या असत्या याच सादरीकरण आणि पदलालित्य एकमेवाद्वितीय असंच होत .त्यामुळेच ते मनाला भावलं अन रसिकांची दाद मिळवून गेलं .शब्दही जिथे अपुरे पडतात किंवा शब्दांची गरज जिथे पडत नाही त्यालाच कदाचित भरतनाट्यम म्हणत असावेत .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड .
9422744404

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

अभाव .....;नियोजनाचा आणि दुरदर्शीपणाचा !



अभाव .....दुरदर्शीपणाचा अन निर्णयक्षमतेचा सुद्धा !

एकीकडं अर्धा मराठवाडा दुष्काळामुळे होरपळत असताना दुसरीकडे सांगली सातारा कोल्हापूर अमरावती यासह तब्बल नऊ ते दहा जिल्हे पुराने वेढले गेले आहेत, हे संकट अस्मानी असलं तरी या संकटाला सरकार देखील तेवढच जबाबदार आहे असं म्हणावं लागेल. कारण योग्य नियोजन आणि योग्यवेळी निर्णय घेण्याची क्षमता दाखवली असती तर आज लाखो हेक्टर जमीन ,लाखो लोक आणि हजारो जनावरांचा जीव मेटाकुटीला आला नसता. बैल गेला आणि झोपा केला ही पद्धत प्रत्येकच सरकारची रूढ झाल्यामुळे बळी जातोय तो सर्वसामान्य गरीब माणसाचा.
महाराष्ट्रातील कोल्हापूर ,सांगली ,सातारा, अमरावती, मुंबई-पुणे या भागात न भूतो न भविष्यती असा पाऊस कोसळला पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला रस्ते नद्या नाले ओढे तलाव जलमय झाले. जिथं नजर जाईल तिथे फक्त पाणी आणि पाणी असंच दृश्य गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळते तर दुसरीकडे बीड ,जालना, औरंगाबाद ,उस्मानाबाद, लातूर अर्धा मराठवाडा दुष्काळाच्या दिशेने वाटचाल करतो आहे,पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने उलटत आले तरी देखील मराठवाड्यातील या चार-पाच जिल्ह्यात पन्नास टक्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अद्यापही बहुतांश ठिकाणी चारा छावण्या आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेली मदत केंद्र सुरूच आहेत. टँकरवर आपली तहान भागवण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे .एकीकडे हे दृश्य असताना दुसरीकडे मात्र पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुराच्या पाण्यात वेढले गेले आहे. हे पुराचं पाणी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे ,लोकांचे संसार उघड्यावर पडले ,पुराच्या पाण्याने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. विशेषतः गेल्या पंचवीस-तीस वर्षांत ज्या सांगलीकरांनी कधीच पूर पाहिला नव्हता त्या सांगलीकरांचे दोन-चार मजल्याची घरं पाण्याखाली आहेत लोक घराच्या छतावर जाऊन गेल्या चार दिवसापासून मदतीची वाट पाहत आहेत, शेतकऱ्याला आवश्यक असलेलं पशुधन अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून जाताना पाहून त्याचं हृदय हेलावल आहे मात्र अशाही परिस्थितीत मदतीसाठी उशिरा आलेले मंत्री-संत्री हे आपल्या अकलेचे तारे तोडताना आणि नको त्या ठिकाणी सेल्फी घेत दाताड काढताना पाहून मन विषण्ण होतं. लाज वाटली पाहिजे या मंत्र्याना, तुम्ही मदत करत आहेत म्हणजे उपकार करीत नाहीत लोक अडचणीत आहे तेव्हा ते सरकार म्हणून तुमच्याकडेच आशेने पाहणार, त्यांना मदत करता येत नसेल तर करू नका पण मदतीच्या नावाखाली सेल्फी घेत नाकाला गुंडाळण्याचा अतिशहानपणा तरी किमान दाखवू नका.
एकीकडे महाराष्ट्रातील जिल्हे पुराच्या पाण्यात वेढले गेले असताना दुसरीकडे शिवसेनेची आदित्य संवाद यात्रा सुरू होती तर मुख्यमंत्री सगळी कामधंदे सोडून महाजनादेश यात्रेवर निघाले होते, त्यात कमी की काय म्हणून राष्ट्रवादीने देखील शिवस्वराज्य यात्रा काढून मता चा जोगवा मागायला सुरुवात केली होती .सांगली कोल्हापूरचे लाखो लोक जेव्हा पाण्यामध्ये बुडत होते तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक मात्र मतासाठी दारोदार फिरत असल्याचे चित्र दुर्दैवी होत.
सांगली कोल्हापूर सातारा या भागावर ही वेळ का आली याचा विचार आज तरी कोणी करायला तयार नाही. महाराष्ट्रातील जे पाणी कर्नाटकात वाहून जात ते पाणी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन जर मराठवाडा विदर्भ या भागात वळवल असतं तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती ,एवढेच काय परंतु अलमट्टी धरणातून आज जो 500000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय तोच निर्णय पहिल्याच दिवशी पूरपरिस्थिती निर्माण झाली तेव्हा घेतला असता तर आज लाखो सांगलीकर आणि कोल्हापूरकर यांचा जीव टांगणीला लागला नसता. मात्र वेळेत निर्णय घेईल ते सरकार कसे म्हणायचे, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात आणि नैसर्गिक आपत्तीत भरभरून राज्यातील जनतेला मदत केली ते देखील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडून विदर्भात भाषणे ठोकत फिरताना पाहून महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्रा आता बस कर रे असं म्हणण्याची वेळ आली .
सरकारने ठरवलं तर काय होऊ शकतो याचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेने किल्लारीच्या भूकंपानंतर घेतला आहे अवघ्या चोवीस तासाच्या आत किल्लारी मध्ये शासकीय मदत घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार पोहोचले होते आज मात्र देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांना पोहोचण्यासाठी पाच दिवसाचा वेळ लागला कारण ते मत मागण्यात मश्गुल होते. सांगलीचे पालकमंत्री असलेले सुभाषबापू देशमुख हे पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीची तयारी कशी करायची हे शिकवत होते तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्र्यांसोबत महाजनादेश यात्रेवर होते. एकीकडे भाजपचा हा प्रकार सुरू असताना शिवसेनेत मातोश्रीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधल्या नाराजांना शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश दिला जात होता हा सगळा प्रकार चीड आणणारा आणि संताप येईलअसाच आहे.
इतर पक्षातील दिग्गज पुढारी मोठमोठे आमदार खासदार यांना पदाची पैशाची आमिषे दाखवून तसेच त्यांच्या मागील चौकशीचा ससेमिरा थांबवण्याच आश्वासन देऊन आपल्या पक्षात घेण्याचा  प्रकार जितका सहज आहे तितकाच महापूर आणि त्यावरील उपाय योजना सोपे आहेत असा कदाचित समज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा झाला असावा आणि त्यामुळेच कोल्हापूर आणि सांगली मधील लोक पाण्‍यात बुडत असताना हे मंत्री महोदय मात्र बोटीत बसून चक्क दात काढून हसत हसत सेल्फी घेत असल्याचं ओंगळवाणे चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आणि या राजकारणामुळे राज्याची मान शरमेनं खाली गेली.
राजकारणी म्हणजे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे असं सहज लोक म्हणतात त्याला असे काही प्रकार कारणीभूत ठरतात असे म्हणायला हरकत नाही .लोकांच्या दुःखामध्ये त्यांना मदतीचा हात पुढे करण्याऐवजी अशा पद्धतीने पाच दिवसानंतर येऊन दुष्काळी पर्यटन किंवा महापूर पर्यटन मंत्री-संत्री करत असतील तर या लोकांना वेळीच वेसण घालणं हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे . जनता पाण्यात बुडत असताना प्रशासकीय यंत्रणा ठप्प झालेली असताना केंद्राकडे मदतीची याचना करण्याबरोबरच राज्यातील सगळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या भागात पोहोचून लोकांना धीर देणे गरजेचे आहे परंतु राजकारणी मात्र एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे.
मराठवाड्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी मिळावं यासाठी अनेक आंदोलन मोर्चे रास्ता रोको झाले मात्र त्या त्या वेळच्या सरकारने केवळ आश्वासने देण्यापलीकडे काहीच केलं नाही .कृष्णा खोऱ्यातील जे पानी मराठवाड्याला दिले जाणार आहे त्याचे नियोजन गेल्या दहा-पंधरा वर्षात केलं गेलं असतं तर पावसाअभावी मराठवाड्याचं होणार वाळवंट आणि महापुरामुळे कोल्हापूर-सांगली सातारकरांची होणारी त्रेधातिरपीट निश्चितपणे थांबली असती. परंतु प्रत्येक गोष्टीत स्वतःचा आणि पक्षाचा फायदा बघणाऱ्या राजकारण्यांमुळे आज महाराष्ट्रात काही जिल्हे पाण्यात आहेत आणि काही जिल्ह्यात थेंबभर पाण्यासाठी लोकांना जीव द्यावा लागत आहे .हे सगळे चित्र पाहिल्यानंतर लाज वाटते की खरंच महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे का ? आणि ते का समजावे ? या राज्यातील पुढाऱ्यांनी कर्नाटक मध्ये जे पाणी सोडायचं होतं त्याचं नियोजन पावसाळ्यापूर्वीच केलं असतं किंवा आठवडाभरापूर्वी तरी त्याबाबत योग्य ते निर्देश प्रशासनाला दिले असते तर आज अब्जावधी रुपयांच झालेलं नुकसान आहे ते टाळता आलं असतं. या महापुरामुळे लाखो हेक्टर जमीन खरडून गेली आहे, व्यापारी, उद्योजक, छोटे छोटे व्यावसायिक रहिवाशी यांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे .या भागातील शेतकरी तर तब्बल दहा ते पंधरा वर्ष मागे फेकला गेला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने दप्तर दिरंगाई न करता तातडीने या भागातील लोकांना भरघोस मदत देऊन आर्थिक आणि मानसिक आधार द्यायला पाहिजे नाहीतर मुंबईत बसलेले बाबू लोक नियम आणि अटी दाखवून या पूरग्रस्तांची कुचेष्टा करण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा या व्हाईट कॉलर बाबू लोकांना निक्षून पणे सांगत सरकारने कोणत्याही अटी आणि शर्ती न घालता शेतकरी व्यापारी उद्योजक छोटे व्यवसायिक मजूर यांना तातडीने मदत देणे आवश्यक आहे
 त्याचबरोबर पुराचे पाणी उतरल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात रोग ,आजार, साथीचे रोग पसरण्याची भीती आहे त्यामुळे जीवित हानी देखील होण्याचा धोका आहे हे वेळीच रोखायच असेल तर याठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि यंत्रणा कामाला लावावी लागेल .कारण योग्यवेळी या उपाययोजना केल्या नाहीत तर हजारो लोकांना साथरोग होण्याची शक्यता आहे आजार झाल्यानंतर त्यावर उपाय योजना करून पाठ थोपटून घेण्यापेक्षा आजार होणार नाही यासाठी काळजी घेणे कधीही चांगलं एकूणच पश्चिम महाराष्ट्रात झोपलेला निसर्ग आणि त्यामुळे निर्माण झालेली महापुराची परिस्थिती आणि मराठवाड्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्माण झालेलं दुष्काळाचं संकट या दोन्ही परिस्थितींना हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं हे खेदाने म्हणावे लागते नियोजन आणि दूरदर्शीपणा चा अभाव असल्यामुळेच हा सगळा प्रकार झाला हे मात्र नक्की.

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९

राजकारणातील वाघीण ...........!


जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला अस नेहमी म्हणलं जातं मात्र हे काही लोकांच्या बाबतीत खोटं ठराव अस नेहमी वाटतं त्यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सुषमा स्वराज,साधारण वीस वर्षांपासून पत्रकारिता करताना त्यांची अनेक भाषणे टी व्ही वरून ऐकण्याची संधी  मिळाली होती,गेवराईत एका कार्यक्रमात त्यांना जवळून पाहता आलं आणि त्यांचं भाषण याची देही याची डोळा बघता आणि अनुभवता आलं.ओघवत वक्तृत्व काय असतं नव्हे वक्ता दशसहस्त्रेशु म्हणजे काय हे मी स्वतः बघितलं अन अनुभवलं आहे .
देशाच्या इतिहासात इंदिरा गांधीनंतर परराष्ट्र खात यशस्वीपणे सांभाळणाऱ्या म्हणून त्यांचा उल्लेख कायम होईल,तब्बल सात वेळा संसद सदस्य आणि तीन वेळा विधानसभा सदस्य म्हणून त्यांची कारकिर्द कायम लक्षात राहील अशीच आहे .हरियाणा सारख्या प्रदेशातून येणाऱ्या सुषमा जी यांच्याकडे पाहिल्यावर एक प्रसन्न हास्य कायम चेहऱ्यावर दिसायचं .हिंदी,इंग्रजी सह संस्कृत भाषेचा गाढा अभ्यास त्यांचा होता,वेदपूरणातील दाखले त्यांच्या भाषणात नेहमी असायचे,कपाळावर मोठं कुंकू किंवा टिकली,भांगेत सिंदूर,फुल बाह्या असलेले ब्लाउज आणि भरजरी साडी,त्यावरून त्याला मॅचिंग होईल असे स्वेटर हा पेहराव आजही अनेकांना आठवत असेल .
जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या लढवय्या नेत्याच्या बोटाला धरून राजकारणात आणि समाजकारणात प्रवेश केलेल्या सुषमा जी सुपर मॉम म्हणून सुद्धा ओळखल्या जात होत्या,परराष्ट्र खात सांभाळताना त्यांनी अनेकांना केवळ एका ट्विट वर मदत केल्याचे दाखले देणारे हजारो लोक आज हळहळले असतील .
स्व अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्यांनी संसदीय कार्यमंत्री असो की दुरसंचारमंत्री अथवा मागच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून जे काम केलं ते कायम स्मरणात राहील यात शंका नाही .कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत त्यांनी जी ठोस भूमिका घेतली होती त्यामुळे आयर्न लेडी म्हणूनही त्या नावजल्या गेल्या .
गेवराई बाजार समितीच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन भाजपचे आमदार अमरसिंह पंडित यांच्या आग्रहावरून गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत सुषमा स्वराज गेवराई येथे आल्या होत्या ,निवडणुकीच्या काळात त्या काहीवेळा परळीला ही आल्या मात्र त्या व्यतिरिक्त त्या गेवराईत आग्रहपूर्वक आल्या होत्या. या ठिकाणी देखील त्यांनी जे भाषण केले होते ते खूप प्रभावी होते राजकारणातील एक सु सभ्य सत्शील आणि चारित्र्यवान महिला म्हणून त्यांचा नेहमी उल्लेख व्हायचा त्या भाषणाला उभ्या राहिल्या की संपूर्ण सभागृह त्यांचे शब्द कानात साठवून घेण्यासाठी शांत असायचे. सभागृहात पिन ड्रॉप सायलेन्स काय असतो हे त्यांच्या भाषणाच्या वेळी अनुभवायला यायचे परराष्ट्र खात्याची जबाबदारी सांभाळताना सुषमा सगळ्यात जास्त सोशल मीडियाचा पॉझिटिव वापर करून घेतला .ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी परदेशात अडचणी आलेल्या अनेक भारतीयांना तातडीने मदत केली आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा नेहमीच खुले होईल. स्वपक्षीय यांसोबतच विरोधी पक्षातील लोकांच्या मताचा देखील आदर करावा लागतो आणि त्यांना सन्मानपूर्वक बोलावे लागते आणि त्यांचे ऐकून घ्यावे लागते ही शिकवण जयप्रकाश नारायण यांच्या कडून मिळाल्यामुळे सुषमा जींनी नेहमीच विरोधी पक्षातील लोकांच्या अडचणी देखील समजावून घेतल्या . विरोधी पक्षात असताना सुषमा स्वराज यांनी 1996 मध्ये  एच डी देवेगौडा यांच्या सरकारने दाखल केलेल्या विश्वास प्रस्ताव विरुद्ध जे घणाघाती भाषण केले होते ते तत्कालीन सदस्य असलेल्या चंद्रशेखर यांच्यापासून ते सोमनाथ चॅटर्जी शरद पवार यांच्यासह  तत्कालीन उपसभापती नितीश कुमार यांच्या देखील कायम स्मरणात राहण्यासारखेच होते .सुषमा जींनी त्यावेळी विरोधी पक्ष म्हणजे कौरव आणि आम्ही म्हणजे पांडव आहोत , आम्हाला वनवासात पाठवण्यासाठी  समोर कितीतरी मंथरा आणि शकुनी बसले आहेत असा दाखला देत स्वपक्षीय सहित विरोधी पक्षातील नेत्यांची देखील वाहवा मिळवली होती, त्यांच्या भाषणात व्यत्यय आणणाऱ्या  अनेक विरोधी पक्षाच्या  खासदारांना  चंद्रशेखर यांनी स्वतः उठून  शांत केले होते हाच दबदबा आणि आदर होता सुषमा जींचा .त्यामुळेच विरोधी पक्षात सुद्धा त्या पॉप्युलर होत्या 2019 च्या निवडणुकीच्या अगोदर पुन्हा मोदी सरकार येईल की नाही अशी चर्चा सुरू झाली आणि सर्वमान्य पंतप्रधान म्हणून ज्या तीन चार नावांवर मीडियामधून चर्चा सुरू होती त्यात सुषमा जींचे नाव आघाडीवर होते. एक स्त्री असतानाही त्या आपल्या निर्णयावर ज्या पद्धतीने ठाम असायच्या अनेक कठीण प्रसंगात देशहितासाठी त्यांनी ज्या पद्धतीने खंबीर राहून निर्णय घेतले त्यामुळे त्या आयर्न लेडी म्हणून परिचित झाल्या होत्या, गेल्या काही महिन्यांपासून सुषमा जी या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे राजकारणापासून दूर होत्या मात्र त्या एवढ्या अकाली जातील असे कोणालाही वाटले नव्हते .
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीर मधून कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला दोन्ही सभागृहांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि त्यानंतर अवघ्या काही वेळात म्हणजे साडेसात वाजण्याच्या दरम्यान सुषमा स्वराज यांनी ट्विट करून मोदीजी हाच दिवस पाहण्यासाठी मी  जिवंत होते असे सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यांच्या या शेवटच्या ट्वीटनंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या जाण्यामुळे भारतीय राजकारणा मधील एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल आहे. त्यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहीत आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हळहळले असून एक लढवय्या विचारांची महिला, राजकारणातील रणरागिनी, राजकारणातील वाघीण गमावल्याचं अनेकांनी स्पष्ट केलं .सुषमा स्वराज यांची आठवण केवळ भाजपलाच नव्हे तर तमाम भारतीयांना कायम येत राहील हे निश्चित त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

लक्ष्मीकांत रुईकर,बीड,9422744404

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

आश्वस्त क्षीरसागर ...........!

आश्वस्त क्षीरसागर ................!

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करत मंत्रीपद मिळविल्यानंतर जयदत्त क्षीरसागर हे अधिकच आश्वस्त  झाल्याचे चित्र दिसून येत आहे . राष्ट्रवादी मध्ये असताना होत असलेली घुसमट त्यांच्या चेहर्‍यावर नेहमी दिसून येत होती मात्र शिवसेनेत गेल्यानंतर पासून ते बऱ्यापैकी रिलॅक्स झाल्याचं दिसून येते एवढेच नव्हे तर क्षीरसागर इलेक्शन मोडमध्ये आल्याचे देखील स्पष्टपणे जाणवू लागले आहे .
सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे करून शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर बीड जिल्ह्यात सर्वात उशिरा शरद पवारांसोबत राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता तो केशरबाई क्षीरसागर आणि त्यांच्या परिवाराने . स्वतः शरद पवार यांनी क्षीरसागर यांच्या घरी जाऊन बैठक घेतल्यानंतर त्यांनी पवारांसोबत जाण्याचा निर्णय पक्का केला होता . दरम्यान 1999 पासून ते आजपर्यंत क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून चौसाळा असो की बीड विधानसभा मतदारसंघ उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेत मंत्रिपदही मिळवलं . 1999 ते 2014 या काळात क्षीरसागर कायम सत्तेत होते, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम उपक्रम असो किंवा इतर खाती त्यांनी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी बीड जिल्ह्यासाठी खेचून आणला मात्र हे करत असताना मध्यंतरीच्या काळात त्यांच्या घरात महाभारत सुरू झालं आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी काका विरुद्ध बंड पुकारलं .या बंडाला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच खतपाणी मिळू लागल्यामुळे जयदत्त क्षीरसागर मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झाले होते मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर वारंवार या गोष्टी घातल्यानंतरही त्यावर तोडगा निघत नसल्यामुळे ते देखील हतबल झाले होते. पक्षातील वरिष्ठ नेते तसेच जिल्ह्यातील स्थानिक नेते यांचा विरोध पत्करून मायक्रो मायनॉरिटी असतानादेखील क्षीरसागर राष्ट्रवादीमध्ये भक्कमपणे उभे होते मात्र संदीप च्या रूपाने घरातच फूट पडली आणि क्षीरसागर यांच्या बंगल्याला तडे गेले हा बंगला ढासळतो की काय आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या दिग्गज राजकारणी राजकीय पटलावरून गायब होतो की काय अशी शंका येऊ लागली होती .
नगरपालिका असो की जिल्हा परिषद पंचायत समिती प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने काका आणि पुतण्या मध्ये कुस्ती लावून प्रेक्षक म्हणून टाळ्या वाजवत आनंद घेतला. त्यामुळे क्षीरसागर हे राष्ट्रवादीमध्ये फार काळ राहणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली .लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला आणि जिल्ह्यातील क्षीरसागर समर्थकांना एक मोठा दिलासा मिळाला .गेल्या चाळीस वर्षापासून राजकीय आणि सामाजिक कार्यात कायम कार्यरत असणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांचा राष्ट्रवादीमध्ये होणारा कोंडमारा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दूर झाला .त्यांच्या मनामध्ये जी काही सल होती ती मताच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 22 मे रोजी जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. शिवसेनेच्या इतिहासात एवढ्या लवकर बाहेरून आलेल्या व्यक्तीला मानाचं पान क्वचितच दिल गेल आहे. मात्र क्षीरसागर यांचा राजकारणातील अनुभव आणि पक्षश्रेष्ठींना खुश करण्याची पद्धत कामाला आली आणि त्यांच्या पदरात मंत्रिपद पडल.
 मंत्री झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात आणि विदर्भातही शिवसेनेच्या बांधणीसाठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. सध्या ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ,युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन त्यांनी केल आहे. त्यानिमित्ताने त्यांची भेट झाली तेव्हा ते कमालीचे आश्वस्त असल्याचं जाणवलं लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा-जेव्हा जयदत्त क्षीरसागर यांची भेट व्हायची तेव्हा कुठेतरी ते पक्षावर नाराज असल्याचं ,पक्षाकडून डावलले गेल्याच दिसून यायचं ,थेट तोंडावर आणि स्पष्ट सांगण्याचा क्षीरसागर यांचा स्वभाव नाही. पत्रकारांशी देखील बोलताना ते हातचे राखूनच बोलतात ,त्यांच्या मनात काय चाललं आहे हे त्यांच्या घरच्यांना देखील माहित असतं की नाही असा प्रश्न नेहमी पडतो. कधीच मोकळेपणानं आणि थेट प्रतिक्रिया द्यायला किंवा आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना थेट टीका करायला ते कधीच पुढे येत नाहीत .विकास कामाच्या माध्यमातून मी लोकांच्या समोर जातो, कोणावरही व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा आपल्या कामाच्या माध्यमातून टीकाकारांचे तोंड बंद करणे आपल्याला आवडते असं ते नेहमी म्हणतात.
 दरम्यान शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जुन्या आणि नव्या शिवसैनिकांचा मेळ ते कसा बसवणार असा प्रश्न होताच तो बऱ्यापैकी आजही कायम असला तरी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन करण्यात त्यांना यश आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच महिनाभरावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते शिवसेनेत तरी रिलॅक्स असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं आणि चेहऱ्यावर देखील ते दिसून आलं. "आम्ही रोजच इलेक्शन मूडमध्ये असतो "त्यामुळे निवडणुका तोंडावर आल्या म्हणून फार लोड घेणाऱ्यांपैकी मी नाही" असं सांगण्याचा जयदत्त क्षीरसागर यांचा कॉनफिडन्स कमालीचा उंचावल्या स्पष्टपणे दिसत होतं .
जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेला देखील आगामी काळात बळकटी मिळणार आहे हे निश्चित .कारण बीड जिल्ह्यात आर्थिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या ताकद असणारा माणूस आज पर्यंत शिवसेनेकडे नव्हता.शिवसेनेची अवस्था फारशी आशादायक अशी नव्हती .मात्र क्षीरसागर यांच्यासारख्या दिग्गज राजकारणी अनुभवी व्यक्ती पक्षात आल्यामुळे पक्षाला अच्छे दिन येतील असे म्हणावयास हरकत नाही .कदाचित क्षीरसागर यांच्यामुळे मराठवाड्यातील शिवसेनेला देखील बळकटी मिळेल यात शंका नाही .एकूणच चाळीस-पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ काँग्रेस संस्कृतीमध्ये वाढलेल्या क्षीरसागर यांना शिवसेनेत जाऊन ऍडजेस्ट होता येईल का ही शंका दूर झाली असून क्षीरसागर शिवसेनेत पक्के सेट झाले आणि त्यामुळेच ते भविष्यातील निवडणुकीच्या दृष्टीने कमालीचे आश्वस्त असल्याचं दिसून आलं . निवडणुकीत काय होईल कोणाचा विजय कोणाचा पराभव होईल हे आज सांगणं कठीण आहे .एक मात्र नक्की की राष्ट्रवादी मध्ये असताना क्षीरसागर यांची होणारी घुसमट नक्कीच थांबली असून त्यांनी पाडलेल्या पायवाटेने अनेक दिग्गज चालू लागले असून शिवसेनेकडे येणाऱ्यांची संख्या पाहता आता क्षीरसागर यांच्या रूपाने शिवसेनेकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग अनेकांसाठी खुला झाला आहे असेच म्हणावे लागेल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होणार आहे त्यामध्ये दोघांचे भवितव्य मतदारांच्या हाती असले तरी जयदत्त क्षीरसागर यांचा अनुभव नक्कीच कामाला येईल आणि त्यामुळेच ते आश्वस्त असल्याचं दिसून आलं.
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...