सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

शब्दावाचून कळले सारे .............!



शब्दावाचून कळले सारे ..........!
भरतनाट्यम म्हणजे भाव ताल आणि रागाचा संगम,यामाध्यमातून दक्षिणेत ही कला जोपासली गेली,भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित असलेली ही नृत्यशैली असून या नृत्यपद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे .या नृत्यशैलीच्या माध्यमातून बीडमध्ये एक सांस्कृतिक वातावरण तयार होत आहे,साई नृत्यालयाच्या अनुराधा चिंचोलकर यांनी गेल्या 19 वर्षात ही परंपरा जपली आहे .कोणत्याही संवादाशिवाय मनातले भाव व्यक्त करण्याचं एक उत्तम साधन म्हणजे भरतनाट्यम अस म्हणलं तर वावगं ठरणार नाही .याचा प्रत्यय बिडकरांनी रविवारी अनुभवला .साई नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यनाटिकेद्वारे सर्वांना मंत्रमुग्ध केले .
21 व्या शतकाकडे झेपावणारा भारत देश,संगणकीकरणाचा झालेला विस्फोट,ग्लोबलायजेशनमुळे एक वैश्विक खेड बनत असलेलं जग,मोबाईल,इंटरनेट मुळे घरापर्यंत नव्हे तर बेडरूममध्ये इंग्रजी संस्कृतीचा झालेला शिरकाव पाहता डी जे च्या तालावर बेधुंद होणारी तरुणाई पाहिल्यानंतर भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होऊन परकीय संस्कृतीच आक्रमण पुन्हा होत की काय अशी शंका येते,गणपती असोत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी होणारा धांगडधिंगा पाहिल्यानंतर मन विषन्न होत,मात्र कोणत्याही संवादाविना केवळ हावभाव,नेत्रकटाक्ष,हस्तमुद्रा आणि अप्रतिम पदलालित्य याद्वारे समोरच्यांशी थेट बोलता येत,आपल्या मनातल्या भावना व्यक्त करता येतात आणि ते माध्यम म्हणजे भरतनाट्यम होय .

दक्षिण भारतातून उदयास आलेल्या भरतनाट्यम या नृत्यप्रकाराने आज जगात आपला वेगळा ठसा उमटवला आहे .स्वातंत्र्यपूर्व काळात दादासाहेब फाळके असोत की चार्ली चॅप्लिन यांनी मुकचित्रपटाद्वारे रसिकांचे मनोरंजन केलं,नंतरच्या काळात संवादातून सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना  चित्रपट आणि नाटकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला .या चित्रपटांमध्ये नायक नायिकांच्या प्रेमाची खलबत नृत्य आणि गीताच्या माध्यमातून व्यक्त करण्यास सुरुवात झाली .90 च्या दशकापर्यंत संगीत नाटकांनी देखील रसिकांच्या मनावर गारुड घातलं होत .अलीकडच्या काळात व्यावसायिक रंगभूमीला मोठे महत्व प्राप्त झाल्याने संगीत नाटकांकडे रसिकांनी आणि निर्माता,दिग्दर्शकांनी देखील पाठ फिरवली .
या सगळ्या उलथापालथी मध्ये आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं ते भरतनाट्यम या नृत्यप्रकाराने .
बीडच्या नाट्यगृहात साई नृत्यालयाच्या वतीने आयोजित द्वैवार्षिक कार्यक्रमात जे कलाप्रकार सादर केले गेले ते डोळ्यांचे पारणे फेडणारे होते .
पार्वतीचे वडील राजा दक्ष यांनी आयोजित केलेल्या यज्ञाचे निमंत्रण आपले पती भगवान शंकर यांना नसल्याचे समजल्यानंतर पार्वतीने वडिलांकडे धाव घेऊन जाब विचारला तेव्हा त्या गोसावड्याला,अंगाला राख फासून फिरणाऱ्याला मी निमंत्रण देणार नाही अस सांगत दक्ष राजाने पार्वती आणि शंकर यांचा अवमान केला,क्रोधीत झालेल्या पार्वतीने यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली ,ही वार्ता भगवान शंकरांना समजल्यानंतर त्यांनी तांडव करीत उपासना केली अन पार्वती पुन्हा गौरीच्या रुपात प्रकट झाली, ही आख्यायिका साई नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी ज्या सहजपणे सादर केली ती अवर्णनीय होती,कोणताही संवाद नसताना ही नृत्य नाटिका केवळ आपल्या हावभावातून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहचवण्याचं कसब थक्क करणारं होतं .ही नाटिका सादर करणाऱ्या विद्यार्थिनींच जेवढं कौतुक आहे तेवढंच यासाठी मेहनत घेणाऱ्या अनुराधा चिंचोलकर यांचंही आहेच .
या संपूर्ण कार्यक्रमात मुलींनी शारदास्तवन,श्लोकम, शिरोदृष्टी,पुष्पांजली,अलारीपू, मधुराष्ट्कम, पदम,तिल्लना,आडावं असे विविध नृत्य प्रकार सादर केले .हे सगळे नृत्यप्रकार म्हणजे बीडकर रसिकांसाठी मोठी पर्वणीच होती .
कोणताही संवाद नसताना केवळ भावमुद्रा आणि हावभाव याद्वारे रसिकांच्या काळजाला हात घालण्याचा हा प्रकार म्हणजे शब्दवाचून कळले सारे,शब्दांच्या पलीकडले अशी अनुभूती देणारा होता .
भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यप्रकाराबाबत केवळ ऐकून असणाऱ्या श्रोत्यांना देखील या नृत्यसादरीकरणाने खिळवून ठेवले यातच याचे यश सामावले आहे .गेल्या 19 वर्षापासून सौ अनुराधा चिंचोलकर या किती मेहनत घेत असतील अन काय काय द्राविडी प्राणायाम त्यांना घालावे लागत असतील हे दिसून येत होते .अत्यन्त शांत,संयमी कुठलाही बडेजाव पणा अंगी न बाळगता त्या भगवान नटराजाची सेवा  करीत आहेत त्या किती श्रद्धेने करतात हे रविवारी दिसून आले .
आपल्या शिष्याने नाव कमावलं आणि दिलेली शिक्षा प्रत्यक्षात उतरवल्यानंतर गुरूच्या चेहऱ्यावर जो कृतार्थतेचा भाव असतो तो नक्कीच चिंचोलकर ताईंच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला .
या संपूर्ण कार्यक्रमात मनाला भावलं ते सती झाली गौरी ही नृत्यनाटिका,खरोखर हा जो काही प्रकार या मुलींनी सादर केला त्यांना शतशः नमन .मनातल्या भावना व्यक्त करण्याचं संवाद हेच एकमेव साधन नाही तर चेहऱ्यावरील हावभाव,नेत्रकटाक्ष, हस्तमुद्रा याद्वारे तसेच त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी आपल्या मनातल्या भावना पदम च्या माध्यमातून कशा मांडल्या असत्या याच सादरीकरण आणि पदलालित्य एकमेवाद्वितीय असंच होत .त्यामुळेच ते मनाला भावलं अन रसिकांची दाद मिळवून गेलं .शब्दही जिथे अपुरे पडतात किंवा शब्दांची गरज जिथे पडत नाही त्यालाच कदाचित भरतनाट्यम म्हणत असावेत .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड .
9422744404

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...