जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला अस नेहमी म्हणलं जातं मात्र हे काही लोकांच्या बाबतीत खोटं ठराव अस नेहमी वाटतं त्यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सुषमा स्वराज,साधारण वीस वर्षांपासून पत्रकारिता करताना त्यांची अनेक भाषणे टी व्ही वरून ऐकण्याची संधी मिळाली होती,गेवराईत एका कार्यक्रमात त्यांना जवळून पाहता आलं आणि त्यांचं भाषण याची देही याची डोळा बघता आणि अनुभवता आलं.ओघवत वक्तृत्व काय असतं नव्हे वक्ता दशसहस्त्रेशु म्हणजे काय हे मी स्वतः बघितलं अन अनुभवलं आहे .
देशाच्या इतिहासात इंदिरा गांधीनंतर परराष्ट्र खात यशस्वीपणे सांभाळणाऱ्या म्हणून त्यांचा उल्लेख कायम होईल,तब्बल सात वेळा संसद सदस्य आणि तीन वेळा विधानसभा सदस्य म्हणून त्यांची कारकिर्द कायम लक्षात राहील अशीच आहे .हरियाणा सारख्या प्रदेशातून येणाऱ्या सुषमा जी यांच्याकडे पाहिल्यावर एक प्रसन्न हास्य कायम चेहऱ्यावर दिसायचं .हिंदी,इंग्रजी सह संस्कृत भाषेचा गाढा अभ्यास त्यांचा होता,वेदपूरणातील दाखले त्यांच्या भाषणात नेहमी असायचे,कपाळावर मोठं कुंकू किंवा टिकली,भांगेत सिंदूर,फुल बाह्या असलेले ब्लाउज आणि भरजरी साडी,त्यावरून त्याला मॅचिंग होईल असे स्वेटर हा पेहराव आजही अनेकांना आठवत असेल .
जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या लढवय्या नेत्याच्या बोटाला धरून राजकारणात आणि समाजकारणात प्रवेश केलेल्या सुषमा जी सुपर मॉम म्हणून सुद्धा ओळखल्या जात होत्या,परराष्ट्र खात सांभाळताना त्यांनी अनेकांना केवळ एका ट्विट वर मदत केल्याचे दाखले देणारे हजारो लोक आज हळहळले असतील .
स्व अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्यांनी संसदीय कार्यमंत्री असो की दुरसंचारमंत्री अथवा मागच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून जे काम केलं ते कायम स्मरणात राहील यात शंका नाही .कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत त्यांनी जी ठोस भूमिका घेतली होती त्यामुळे आयर्न लेडी म्हणूनही त्या नावजल्या गेल्या .
गेवराई बाजार समितीच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन भाजपचे आमदार अमरसिंह पंडित यांच्या आग्रहावरून गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत सुषमा स्वराज गेवराई येथे आल्या होत्या ,निवडणुकीच्या काळात त्या काहीवेळा परळीला ही आल्या मात्र त्या व्यतिरिक्त त्या गेवराईत आग्रहपूर्वक आल्या होत्या. या ठिकाणी देखील त्यांनी जे भाषण केले होते ते खूप प्रभावी होते राजकारणातील एक सु सभ्य सत्शील आणि चारित्र्यवान महिला म्हणून त्यांचा नेहमी उल्लेख व्हायचा त्या भाषणाला उभ्या राहिल्या की संपूर्ण सभागृह त्यांचे शब्द कानात साठवून घेण्यासाठी शांत असायचे. सभागृहात पिन ड्रॉप सायलेन्स काय असतो हे त्यांच्या भाषणाच्या वेळी अनुभवायला यायचे परराष्ट्र खात्याची जबाबदारी सांभाळताना सुषमा सगळ्यात जास्त सोशल मीडियाचा पॉझिटिव वापर करून घेतला .ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी परदेशात अडचणी आलेल्या अनेक भारतीयांना तातडीने मदत केली आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा नेहमीच खुले होईल. स्वपक्षीय यांसोबतच विरोधी पक्षातील लोकांच्या मताचा देखील आदर करावा लागतो आणि त्यांना सन्मानपूर्वक बोलावे लागते आणि त्यांचे ऐकून घ्यावे लागते ही शिकवण जयप्रकाश नारायण यांच्या कडून मिळाल्यामुळे सुषमा जींनी नेहमीच विरोधी पक्षातील लोकांच्या अडचणी देखील समजावून घेतल्या . विरोधी पक्षात असताना सुषमा स्वराज यांनी 1996 मध्ये एच डी देवेगौडा यांच्या सरकारने दाखल केलेल्या विश्वास प्रस्ताव विरुद्ध जे घणाघाती भाषण केले होते ते तत्कालीन सदस्य असलेल्या चंद्रशेखर यांच्यापासून ते सोमनाथ चॅटर्जी शरद पवार यांच्यासह तत्कालीन उपसभापती नितीश कुमार यांच्या देखील कायम स्मरणात राहण्यासारखेच होते .सुषमा जींनी त्यावेळी विरोधी पक्ष म्हणजे कौरव आणि आम्ही म्हणजे पांडव आहोत , आम्हाला वनवासात पाठवण्यासाठी समोर कितीतरी मंथरा आणि शकुनी बसले आहेत असा दाखला देत स्वपक्षीय सहित विरोधी पक्षातील नेत्यांची देखील वाहवा मिळवली होती, त्यांच्या भाषणात व्यत्यय आणणाऱ्या अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांना चंद्रशेखर यांनी स्वतः उठून शांत केले होते हाच दबदबा आणि आदर होता सुषमा जींचा .त्यामुळेच विरोधी पक्षात सुद्धा त्या पॉप्युलर होत्या 2019 च्या निवडणुकीच्या अगोदर पुन्हा मोदी सरकार येईल की नाही अशी चर्चा सुरू झाली आणि सर्वमान्य पंतप्रधान म्हणून ज्या तीन चार नावांवर मीडियामधून चर्चा सुरू होती त्यात सुषमा जींचे नाव आघाडीवर होते. एक स्त्री असतानाही त्या आपल्या निर्णयावर ज्या पद्धतीने ठाम असायच्या अनेक कठीण प्रसंगात देशहितासाठी त्यांनी ज्या पद्धतीने खंबीर राहून निर्णय घेतले त्यामुळे त्या आयर्न लेडी म्हणून परिचित झाल्या होत्या, गेल्या काही महिन्यांपासून सुषमा जी या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे राजकारणापासून दूर होत्या मात्र त्या एवढ्या अकाली जातील असे कोणालाही वाटले नव्हते .
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीर मधून कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला दोन्ही सभागृहांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि त्यानंतर अवघ्या काही वेळात म्हणजे साडेसात वाजण्याच्या दरम्यान सुषमा स्वराज यांनी ट्विट करून मोदीजी हाच दिवस पाहण्यासाठी मी जिवंत होते असे सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यांच्या या शेवटच्या ट्वीटनंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या जाण्यामुळे भारतीय राजकारणा मधील एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल आहे. त्यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहीत आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हळहळले असून एक लढवय्या विचारांची महिला, राजकारणातील रणरागिनी, राजकारणातील वाघीण गमावल्याचं अनेकांनी स्पष्ट केलं .सुषमा स्वराज यांची आठवण केवळ भाजपलाच नव्हे तर तमाम भारतीयांना कायम येत राहील हे निश्चित त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
लक्ष्मीकांत रुईकर,बीड,9422744404


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा