शनिवार, १४ डिसेंबर, २०१९

एक पत्र पंकजा मुंडेंना ...............!


राज्याच्या फायरब्रँड नेत्या पंकजा मुंडे,स.न.वि.वी.

विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून आपल्याशी संवाद साधायचा होता,मात्र योग्य वेळ साधली जात नव्हती .सोशल मीडियाच्या जमान्यात मी आपणास अनावृत्त पत्र लिहीत असल्याबद्दल आपणास देखील आश्चर्य वाटेल,मात्र पत्रावरील मजकूर डिलीट करता येत नाही अन ते पत्र कायम जपून ठेवता येतं त्यामुळे हा पत्रप्रपंच .
लोकसभा निवडणुकीत आपण ज्या पद्धतीने आपल्या बहिणीसाठी मेहनत घेतली आणि दिड लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवले त्यानंतर आपला विधानसभा निवडणुकीत कोणी पराभव करू शकेल अशी शंका देखील येणे शक्य नव्हते .मात्र खरं सांगू का लोकसभा निवडणुकीत जे मताधिक्य मिळाले ना कदाचित त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि आपण स्वतः काहीशा जास्तच हवेत गेलात असं आता वाटू लागलं आहे .तुम्ही म्हणाल पराभव झाल्यावर हजारो कारणं अन चुका यावर उपदेश केले जातात,अस केलं असत तर बरं झालं असतं, तस का केलं नाही,आम्ही सांगत होतो पण आमचं ऐकलं नाही,कार्यकर्त्यांना किंमत नव्हती ना कोणाचा पायपोस कोणाला होता अस .मात्र मला यातलं काहीही म्हणायचं नाही कारण विजयाचे हजारो बाप असतात पराभवाला कोणी वाली नसतो असच काहीस आपल्या बाबतीत झालं आहे .
2009 मध्ये तुम्ही पहिल्यांदा निवडून आलात मात्र आपलं कर्तृत्व दाखवण्याची संधी आपल्याला 2014 मध्ये मिळाली .दुसरी टर्म असताना देखील आपल्याला थेट कॅबिनेट मंत्रिपद दिलं गेलं कारण आपल्या माग वारसा होता गोपीनाथ मुंडे यांचा .नाहीतर चार चार टर्म आमदार असणारे अनेक आहेत आपल्या पक्षात पण त्यांना बाजूला ठेवून आपल्या पक्षानं आपल्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली .आपण त्यासाठी सक्षम नव्हता अस नाही मात्र आपल्यातील सर्व गुणांसोबतच गोपीनाथ मुंडे हे नाव आपल्या मागे असल्याने आपला मंत्रिमंडळात समावेश झाला .ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याच स्व मुंडे यांच स्वप्न घेवून आपण देखील ग्रामविकासची जबाबदारी स्वीकारली .वास्तविक आपल्याला गृह विभाग अधिक आवडला असता मात्र आपण मिळेल त्याच सोनं करायचं म्हणून जबाबदारी घेतली .
गेल्या पाच वर्षात आपण राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो की जलयुक्त शिवार अभियान अथवा 25 /15 किंवा बचतगट चळवळ या माध्यमातून मोठं कार्य उभा केलं .पण हे राज्यभर करताना आपलं आपल्या होमपीचकडं कमालीच दुर्लक्ष झाल .राज्यात आपल्या नावाचा डंका वाजत असताना परळीत मात्र आपली पकड ढिली होत चालली होती .
ग्रामपंचायत पासून ते नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सर्वच निवडणुकीत आपल्या पक्षाला जोरदार धक्के बसत होते .हे छोटे छोटे धक्के म्हणजे भविष्यातील आपल्यासाठी होणाऱ्या मोठ्या भूकंपाची चेतावणी होती .मात्र आपला किल्ला अभेद्य आहे अशा छोट्या धक्यांनी त्याला तडे जातील पण किल्ला शाबूत राहील असा आपला होरा होता,पण आपला अंदाज खोटा ठरला अन आपला किल्ला पुरता जमीनदोस्त झाला .
या भूकंपाचे धक्के बीड,आष्टी,माजलगाव या ठिकाणी देखील बसले अन पाच वरून भाजपचे संख्याबळ थेट 2 वर आले .
आपला पराभव का झाला,काय कारण आहेत,काय करायला पाहिजे होतं, काय चुकलं,कोणाचं चुकलं यावर मला येथे फार लिहायचं नाही कारण पराभवाची कारणमीमांसा करायला आपण सक्षम आहात .एक मात्र नक्की की हा पराभव झाला तरी आपल्याला त्यात भाजप,स्वतः तुम्ही,कार्यकर्ते यांचा फारसा दोष नसल्याचं वाटत नाही हे म्हणजे जरा जास्तच होतंय .पराभव हा पराभव असतो त्यासाठी दोन दोन महिने लोकांपासून दूर राहायचं नसतं पण हे तुम्हाला कोण सांगणार,कारण तुम्ही फटकळ .कोणी सांगायला गेलं तर त्याला काय बोलताल याचा नेम नाही असं आपल्याबद्दल आजही वाटतं.त्यामुळं आपल्या जवळच्या म्हणणाऱ्या कोणीच यावर आपल्यासोबत चर्चा केली नसावी अस प्रकर्षाने जाणवलं .कारण याची जाणीव आपल्याला करून दिली  असती तर आपण आपल्या बाबांच्या कार्यक्रमात जे व्यक्त झालात ते कदाचित बोलला नसतात .याचा अर्थ आपण जे बोलला ते सगळंच चूक होत का तर नाही ,पण त्यात कुठेतरी मी पणाचा दर्प जास्त जाणवत होता .तुमचा पराभव हा परळीच्या जनतेसाठी तर सोडाच पण राज्यातील तुमच्या समर्थकांसाठी
देखील धक्कादायक होता .पण म्हणून तुम्ही त्याच खापर लोकांवर फोडून मोकळं व्हायचं अस होत नाही .किंवा समोरच्या व्यक्तीचा विजय खुजा होत नाही .
राजकारण असो की युद्ध,हारजित होतच असते मात्र ती जास्तकाळ मनाला लावून घ्यायची नसते,आपण गोपीनाथ मुंडे यांच्या पोटी जन्मलात त्यामुळे राजकारणाचं बाळकडू आईच्या पोटातूनच आपल्याला मिळालं यात शंका नाही,पण आपली अवस्था महाभारतामधील अभिमन्यू सारखी झाली,चक्रव्यूहात आपण यशस्वीपणे शिरलात पण बाहेर पडताना आपल्याला मार्गच सापडला नाही अन आपला पराभव झाला,हा पराभव आपल्याला स्वीकारावा लागला अस मी म्हणणार नाही कारण आपण तो अजून मनापासून स्वीकारलेला नाही हे वारंवार दिसून येत .कारण वरवर जरी आपण पराभव झाल्याचं स्वीकारलं अस सांगत असलात तरी मनाच्या एका कोपऱ्यात कुठंतरी आजही मान्य होत नाही हे सत्य आहे अन ते नाकारता येणार नाही .
ज्या गोपीनाथ मुंडे यांनी आपली हयात भाजपसाठी खर्ची घातली त्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना इशारे देण्याएव्हढा हा विषय मोठा नव्हता .पक्षाची काही धोरणे,निर्णय चुकले असतीलच पण त्याची अशाप्रकारे जाहीर सभांमधून चर्चा होणे अपेक्षित नाही .राजकारणातील आपले वयोमान उणेपूरे दहा वर्षाचे आहे,त्यात पाच वर्षे आपली बाबांच्या सानिध्यात गेली अन पाच वर्षे मंत्रिपदाची झुल घेऊन वावरण्यात गेली .त्यामुळे आपण चाळीस पन्नास वर्षे लोकांसाठी झटत आहात अन आपला त्याच लोकांनी पराभव केला अस काही झालेलं नाही .पराभव विसरून आपण कामाला लागणं अपेक्षित होत मात्र आपण हट्ट करून बसलात अन लोकांना दोष देत त्यांच्याकडे पाठ फिरवलीत .
तीस हजार लोकांनी आपल्याला मतदान न केल्यानं आपण पराभूत झालात मात्र 92 हजार लोकांनी आपल्याला मतदान केलं हे आपण का विसरता आहात .त्यांचा काय दोष मात्र तुम्ही सगळ्यांनाच वाऱ्यावर सोडून दोन महिने लांब राहिलात .निवडणूक प्रचारात झालेल्या आरोपांमुळे व्यथित होत आपण राजकारणातून मुक्त होण्याची भाषा केली मात्र हा विषय आता काढून उपयोग नाही .मुक्त होता येईल एवढं हे क्षेत्र आता पवित्र राहिलेलं नाही .गंदा है पर धंदा है अशी म्हण आहे काहीस राजकारणाबाबत असच म्हणावं लागेल .तुम्ही कितीही ठरवलं तरी लोक तुमच्याकडे येतच असतात अन अपेक्षा ठेवतच असतात .त्या पूर्ण करण्याच काम आपल्याला करावंच लागतं त्याऐवजी त्रागा करून जमत नसतं .पण हे तुम्हाला कोण सांगणार ?
गेल्या पाच वर्षात तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की परळी मतदारसंघ म्हणून तुम्ही कितीवेळ लोकांना दिला,मला माहित आहे एक महिला म्हणून तुम्हाला काही बंधन आहेत पण परळीतील लग्नकार्य,सुख दुःख,लोकांच्या अडचणी यामध्ये आपण प्रत्यक्ष कितीवेळा धावू  गेलात,आता तुम्ही म्हणाल की विरोधक काय रोजच लोकांचे दार झाडत होते का,तर नक्कीच नाही पण विरोधक काय करतात यापेक्षा आपल्याला काय करता येईल यावर लक्ष दिले तर जास्त सोयीचं होत अन नेमकं इथंच आपलं गणित बिघडलं .
'मेरी कमीज से तेरी कमीज सफेद कैसी 'या प्रयत्नात आपण आपल्याकडे अन आपल्या माणसांकडे दुर्लक्ष करीत गेलो .आजही दोन महिन्यांनी आपण परळीत आलात त्यानंतर किती लोकांना आपण भेटलात,त्यांच्या अडचणी समजून घेतल्यात किंवा दोन महिन्यात आपल्या मागेपुढे फिरणाऱ्या पदाधिकारी असोत की कार्यकर्ते यांनी लोकांना विचारलं आहे .आपण आलात की आपल्या गाडीच्या मागेपुढे करायचे अन आपलं हेलिकॉप्टर उडाल की अंबाजोगाई,लातूर,पुणे ,औरंगाबाद कडे निघायचं हा आपल्या जवळच्या लोकांचा नित्यक्रम आहे .हे आपल्याला देखील माहीत नाही अस नाही पण आपण त्याकडे दुर्लक्ष केलं अन बगलबच्यानी  देखील सामान्य लोकांकडे दुर्लक्ष केलं .
आपण हजारो कोटी रुपये आणले अन विकास केला मात्र कम्युनिकेशन गॅप भरून काढता आला नाही .आजही आपण केलेलं काम ठासून लोकांना सांगण्यासारखे कार्यकर्ते,ब्लॉक लेव्हल चे लीडर,तालुका,जिल्हा पातळीवरील नेते आपल्याकडे नाहीत.आहेत ते सगळे खुसमस्करे अन तोंडपूजे आहेत .कुठेही जा तेच दहा पाच लोक आपल्या भोवती असणार किंवा दिसणार .सामान्य कार्यकर्ता,माणूस आपल्या गाडीत कधी बसला का हो,सामान्य माणूस आपल्याला कधी थेट भेटला का हो .नक्कीच नाही कारण आपल्या बाजूला जमा झालेली ही बडव्यांची जत्रा .हो हो बडव्यांची जत्रा,आजही लोक तुम्ही रस्त्याने जाताना दिसलात तर स्व गोपीनाथ मुंडे दिसल्याचा भास होऊन हात जोडतात,पण तुम्हाला ते दिसत नाही किंवा दिसू दिलं जात नाही .त्यामुळेच तुमचा जनसंपर्क कमी झाला अन पराभव पदरी पडला .
गेल्या दहा बारा दिवसापासून म्हणजे 1 डिसेंबर पासून तुम्ही अस्वस्थ आहात अस चित्र दिसून आलं,ते मीडियाने रंगवल अस आपण आज म्हणत असलात तरी मीडिया बातम्या करत असताना आपणही कुठेच स्पष्ट भूमिका घेतली नाही .
आपण सस्पेन्स कायम ठेवला अन शेवटी काय केलं तर "खाया पिया कुछ नही गिलास तोडा बारा आणा "अस झालं .एवढा सगळा द्रामा करण्याची काहीच गरज नव्हती .स्व मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त तुम्ही थेट पक्षाला आव्हान देण्याऐवजी किंवा माझ्या बापाचा पक्ष आहे अस सांगण्याऐवजी मी माझ्या पराभवावर मंथन करण्यासाठी काही वेळ घेणार आहे,मला माझ्या लोकांशी त्यांच्या घरात जाऊन बोलायचं आहे,त्यांची सुख दुःख जाणून घ्यायची आहेत,त्यांच्या अडचणी सोडवायच्या आहेत,मी पाच वर्षात त्यांना वेळ देऊ शकले नाही मात्र आता जी संधी मिळाली आहे तीच मी सोनं करणार आहे,त्यामुळे मी पुढची दोन तीन वर्षे मुंबई,पुण्याला न फिरता अन राहता मुक्काम पोस्ट यशश्री निवास,शिवाजी चौक परळी येथेच राहणार आहे अस म्हटलं असत तर ते लोकांना अन पक्षाच्या नेत्यांना अधिक रुचल अन भावलं असतं .
पण तुमचं कसं आहे ना की तुमच्या इगोला कोणी डिवचल की तुम्ही अस्वस्थ होतात अन मग त्या सिंघम मधील जयकांत शिक्रे सारख करून बसतात .तुम्ही त्या दिवशी थेट पक्ष ,संघ,मतदार या सगळ्यांनाच आव्हान दिलंत, मान्य आहे तुम्ही पाच वर्षांपूर्वी मोठा संघर्ष केलात, आपल्या बाबांनी सुद्धा संघर्ष केला मात्र म्हणून पक्ष आपली जहागिरी होत नाही .दीडशे वर्षाची परंपरा असणारा काँग्रेस असो की दहा बारा वर्षांपूर्वीचा मनसे अथवा आप ,हे सगळे पक्ष कोणी ना कोणी स्थापन केले,अनेकांनी ते वाढवण्यासाठी योगदान अन बलिदान दिलं .म्हणून पक्ष त्यांच्या बापाचा होत नाही .
पक्ष हा लोकांचा असतो नेते किंवा आमदार खासदार हे त्याचे फारतर ट्रस्टी असू शकतात,पण त्या ट्रस्टीनी जर पक्ष बळकवण्याची
भाषा सुरू केली तर ते नेतृत्वाला न शोभणार आहे .तुम्ही जिल्ह्यात पक्षवाढीसाठी किती योगदान दिले किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यांनी किती गाव,वाडी,वस्तीवर पक्षाच्या शाखा काढल्या यावर चिंतन करण्याची हीच वेळ आहे मात्र अशावेळी आपण जर पक्षालाच आत्मचिंतन करण्याचा सल्ला देत असाल तर भविष्य अवघड आहे .
तुम्ही नाराज नाहीत हे जरी म्हणत असलात तरी तुमची नाराजी लपून राहिलेली नाही,आपल्याला आणखी मोठ्या संधी मिळू शकतात मात्र त्यासाठी संयम महत्वाचा आहे,यशस्वी राजकारणी हा संयमी असावा लागतो तरच अपेक्षित फळ मिळते हे नक्की .तुम्हाला शून्यापासून सुरवात करायची आहे हे चांगलं आहे मात्र हे करताना समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेण्याची क्षमता ठेवा तरच आपण लांबचा  पल्ला गाठू शकाल .
फार जास्त आणि सविस्तर लिहिलं असलं तरी आपण मजकुरातील भावना समजून घ्याल ही अपेक्षा आहे .शेवटी आपण सुज्ञ आहात अन मोठा पल्ला गाठायचा आहे हे लक्षात ठेवाल असा विश्वास आहे .काही खटकलं असल्यास निश्चित पणे सांगा कारण पत्र लिहिताना कमीजास्त होऊ शकतं .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...