रविवार, २ ऑगस्ट, २०२०

मित्र माने इत्र ............!



मित्र म्हणजे इत्र ..........!

अस म्हणतात की जी गोष्ट आपण आई वडील,भाऊ बहीण,गुरुजन यांना मनमोकळ्या पध्दतीने सांगू शकत नाहीत ती गोष्ट आपण सहजपणे ज्याच्याजवळ बोलून मोकळं होतो ती व्यक्ती म्हणजे मित्र .मी आणि इतर किंवा त्रयस्थ यांना जोडणारा म्हणजे मित्र .मित्र हा आरशासारखा असतो तुम्ही जे आहात,तुमच्यातले गुण दोष सगळं सगळं जसच्या तस दाखवतो,अन तो सावलीसारखा देखील असतो,जो कितीही कठीण प्रसंग येवो तुमची साथ सोडत नाही .
हा मित्र कोणत्याही वयाचा,कोणत्याही जाती धर्माचा,कोणत्याही वर्गाचा असू शकतो .मैत्रीला वयाच किंवा जाती धर्माच,गरीब श्रीमंती च बंधन नसतं. वर्षानुवर्षे एकाच कार्यालयात शेजारी शेजारी काम करणारे दोघे चांगले मित्र असतीलच असे नाही .कारण एका क्षणात मैत्रीचे सूर जुळतात अन आयुष्याचे जीवणगाने गुणगुणायला सुरवात होते . मैत्रीला जस जात,धर्म,पैसा, संपत्ती याच बंधन नसतं तसच मैत्रीत लिंगभेदाला सुद्धा फार किंमत नसते .दोन पुरुष हे चांगले मित्र असतात तसेच स्त्री आणि पुरुष सुद्धा चांगले मित्र असू शकतात .
मैत्रीमध्ये नेहमी कृष्ण सुदम्याच उदाहरण दिलं जातं कारण या दोघांमधील सामाजिक अन आर्थिक अंतर हे पृथ्वी अन आकाश एवढं मोठं होतं पण म्हणून त्या दोघांच्या मैत्रीत कधी अंतर निर्माण झाले नाही .मैत्री ही कर्ण अन दुर्योधनाची देखील होती .जिथं स्वार्थ किंवा मतलब नसतो तिथंच मैत्रीची बीज अंकुरतात अन त्याला समाधानाची फुले अन फळे लगडतात .मैत्री हे अस झाडं आहे ज्याला केवळ दुसऱ्याच दुःख वाटून घेत आनंद पसरवणे माहीत असतं .
शक्यतो माणसाच्या आयुष्यात शालेय जीवनातील मित्र कायम स्मरणात राहतात किंवा त्या वयात जी मैत्री होते ती चिरकाल टिकते कारण त्या वयात माणसाला गरीब श्रीमंत, जात पात हे भेद माहीत नसतात .व्यवसाय किंवा नोकरीमुळे देखील अनेक मित्र जोडले जातात,मैत्रिणी जोडल्या जातात मात्र ते रिलेशन लिमिटेड असते,लहणपनी झालेली मैत्री अनलिमिटेड असते .या मैत्रीला कोणत्याही प्रकारे एक्सपायरी नसते .मनातला कोलाहल न सांगता सुद्धा ज्याला केवळ आपल्या डोळ्यातून किंवा हलचालीतून कळतो तो खरा मित्र असतो .या मैत्रीची अनेक रूपे आहेत .पृथ्वीवर असा एकही व्यक्ती नसेल ज्याला मित्र नाही .स्वार्थ अन परमार्थ यातील अंतर सहजपणे पार करून एका वेगळ्या भावविश्वात सुखद अनुभूती देणारा म्हणजे खरा मित्र .बर हा मित्र पैशाने विकत घेता येत नाही अन देता सुद्धा येत नाही .
मैत्री ही खळाळत्या झऱ्या प्रमाणे असते, त्याचा तळ स्पष्टपणे दिसतो अन चव देखील गोडच लागते .अडचणीत मदतीला येतो तोच खरा मित्र अस म्हणतात मात्र अडचणी येणारच नाहीत यासाठी छातीचा कोट करून उभा राहतो तो खरा मित्र अस मी मानतो .कारण अडचणी प्रत्येकाला असतातच त्यावर जो तो आपापल्या परीने मार्ग शोधून मात करतो पण यात मार्ग दाखवण्याच काम देखील एक सच्चा मित्रच करतो .
रक्ताची नाती ही जन्माने मिळतात तर मानलेली नाती मनाने जुळतात मात्र जिथं रक्त अन मान दोन्ही वेगळं असूनही सूर जुळतात, मन जुळतात ती नाती म्हणजे मैत्री होय .कोणी कितीही मोठ्या पदावर,हुद्यावर गेला तरी त्याला भेटल्यानंतर एक सणसणीत शिवी तोंडातून बाहेर पडते अन गच्च मिठीत घेतल्यावर सगळ्या तक्रारी दूर होतात तो असतो मित्र .मैत्रीत अहो जाओ, आपपर भाव नसतो,थेट काळजाला हात घालणारी अरे तुरे ची साद असते .हजार शत्रूशी सामना करण्यासाठी एक सच्चा मित्र खूप झाला .बुडत्याला काडीचा आधार अस जे म्हणतात त्याच पद्धतीने रोजच्या जगण्या मरण्यांच्या रेसमध्ये जो खंबीरपणे सोबत उभा असतो,ऊन वारा वादळ भूकंप काहीही होवो जो आपला हात सोडत नाही तो खरा मित्र .
आयुष्यात जेव्हा केव्हा अडचणी येतात ,आयुष्याची चार्जिंग संपत जाते ,नात्याचे चार्जर जेव्हा काम करत नाही तेव्हा पॉवर बँक बनून जो मदतीला धावून येतो तो म्हणजे मित्र .या मैत्रीच्या अनेक कथा कहाण्या आहेत पण आयुष्याच्या स्क्रिप्ट मध्ये अथ पासून इति पर्यंत जो सोबत असतो ना तो म्हणजे मित्र होय .
मित्र माने इत्र असंही काहीजण म्हणतात,कारण ज्याच्या सहवासाने आपलं आयुष्य दरवळून  जात तो म्हणजे मित्र .या मित्रामुळे आपल्या बेचव आयुष्याला एक खमंगपणा येतो,ज्याप्रमाणे कितीही सुगरण स्त्रीने अतिशय सुंदर स्वयंपाक केला पण त्यात मिठच नसेल तर तो स्वयंपाक बेचव लागतो तसच आयुष्यात मित्र नसेल तर आयुष्य निरस, बेचव होतं .मित्र म्हणजे ऑक्सिजन आहे,माणसाचा श्वास थांबू न देण्याच काम ऑक्सिजन करतो तसच आपल्या आयुष्यात कधीच कोणतीच बाधा येऊ नये यासाठी मित्र धडपडत असतो . मोबाईल अन इंटरनेट च्या जमान्यात आज जो तो धावपळीत अन घाईगडबडीत आहे मात्र अशाही वेळी एक निवांत क्षण,किंवा एक विसाव्याच ठिकाण म्हणजे मित्र होय .या मित्रांसाठी एक दिवस निश्चितच पुरेसा ठरणार नाही,ज्याने आपल्या आयुष्यात अविभाज्य अशी जागा मिळवली आहे त्याला एक दिवस शुभेच्छा देऊन कसे भागेल .तरीही आजच्या मैत्री दिनानिमित्त माझ्या सर्व मित्रांना सस्नेह शुभेच्छा !

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404




शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

आठवणीतला पाऊस .........!

आठवणीतला पाऊस ..........!

लक्ष्मीकांत रुईकर ,बीड

9422744404

मित्रा वर्षातले आठ महिने मी तुझी वाट पाहत असतो,का म्हणून काय विचारतोस वेड्या,तू आलास की ती माझ्याजवळ येऊन घट्ट मिठीत विसावते,अरे हो खरच सांगतोय,हसू नकोस लबाड,तुझी शपथ,तू आलास ना की तुझ्या प्रत्येक थेंबात मला तिची आठवण ओलं चिम्ब करते,आमच्या प्रेमाचा पहिला वहिला साक्षीदार आहेस तू,मी असाच एकट्याने रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक तू आलास अन ओला चिम्ब होत मी तुझ्याशी गप्पा मारत मारत मनमुराद भिजलो,अस म्हणतात की पावसात भरपूर रडून घेतलं तरी चालत कारण आपले अश्रू दुःख कोणाला दिसत नाही,पण हे त्या दिवशी साफ खोटं ठरलं,जेव्हा तू धो धो कोसळत होतास,मी मनमुराद भिजत होतो अन मनातलं दुःख लपवत होतो,तेव्हा एक गोड आवाज कानावर आला अन अचानक भानावर आलो तेव्हा लक्षात आलं की कोणीतरी पाठीमागून मोठ्याने आवाज देत आहे,अरे वेड्या तो आवाज अनोळखी होता,मात्र त्यात आपलेपणा होता,अन मी वळून पाहिल्यानंतर पडत्या पावसात सुद्धा कोरडाठाक झालो,कारण जिला रोज स्वप्नात पहात होतो,ती माझी सखी माझ्यासमोर उभी होती,अन माझ्या हाताला धरून मला तुझ्यापासून दूर नेत होती
तुही किती खट्याळ मित्रा,काहीवेळ विश्रांती घेतलीस अन जणू काही मला इशारा केलास की जा आता उद्या भेटू
आजही आभाळकडं नजर गेली की तू आठवतोस कारण आमच्या पहिल्या भेटीचा साक्षीदार होतास तू,मित्रा आयुष्यात तो दिवस अन त्या दिवशीचा तू कधीच नाही विसरू शकत मी,त्यामुळंच म्हणतो जेव्हा जेव्हा तू येतोस तेव्हा तेव्हा ती मला बिलगून असते अन आम्ही दोघंही पुन्हा तुला अन त्या दिवशीच्या भेटीला आठवत रमून जातो

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...