मंगळवार, २८ जुलै, २०२०

संतोष हे पटलं नाही ...............!


संतोष ,हे पटलं नाही ..........!!

पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोबाईल हातात घेतला अन धक्काच बसला,गेवराईचा पत्रकार ,जिवलग मित्र संतोष भोसले याच्या अकाली निधनाची बातमी वाचली अन दोन मिनिटं पायाखालची जमीन सरकली .खर्जातला जाडा भरडा भारदस्त आवाज,आपल्याच ठेक्यात जय महाराष्ट्र म्हणण्याची पद्धत,बातमी मागची बातमी शोधून त्यावर वैचारिक चर्चा,राजकारण ,समाजकारण,साहित्य याबाबतीत असलेला अभ्यास या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर तरळून गेल्या.
संतोष म्हणजे समाधान ,सुख,शांती या सगळ्या गोष्टीसोबत जिज्ञासा असणारा व्यक्ती म्हणजे गेवराईच्या पत्रकारितेतील एक आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व संतोष भोसले .
संतोष पत्रकार असला तरी तो बाळासाहेब ठाकरे यांचा एक सैनिक म्हणूनच जगला,ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारा हा सैनिक आयुष्याचा सामना मात्र अर्ध्यातच सोडून मृत्यूसमोर शस्त्र खाली ठेवत निघून गेला हे खूप क्लेशदायक आहे .संतोष अन माझा स्नेह तसा वीस वर्षापासूनचा .गेवराईच्या पत्रकारिता क्षेत्रातील मित्र अय्युब बागवान,सुभाष सुतार,मधुकर तौर,सुभाष मुळे, गणेश क्षीरसागर, काझी अमान् या सगळ्यांमध्ये वेगळा असलेला संतोष लगेच लक्षात यायचा .
आपलं मत अत्यंत स्पष्टपणे मांडून प्रसंगी समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करून संतोष आपला मुद्दा त्या व्यक्तीच्या गळी उतरवायचा ही त्याची खासियत होती .बातमी मग ती गेवराईची असो की राज्य अथवा राष्ट्रीय पातळीवरील ,त्याच्यासोबत चर्चा करायला एक वेगळी मजा यायची,प्रत्येक बाबतीत चांगला,वाईट,बाजूने विरोधात विचार करून तो आपलं मत मांडायचा .
कधीही भेट झाली की भारदस्त आवाजात जय महाराष्ट्र घालून काय सर सेवेची संधी द्या,गरीबासोबत चार घास खा असं हक्कानं म्हणून खळखळून हसत आयुष्याची मजा घेणारा संतोष असा अचानक निघून गेला हे बुद्धीला अजूनही पटत नाही .गेवराईत एखादी घटना घडली की बातमी मागची बातमी काय असेल याची खबरबात जाणून घ्यायची असेल तर संतोष ला फोन केला की आपल्या खास शैलीत तो नेमकं का,कसं, कुठं,कधी घडलं हे सांगायचा .
गेवराई तालुक्यातील दोन्ही पंडित अन पवार यांच्यातील राजकीय वैरभाव असो की इतर कोणताही विषय हा माणूस अथ पासून इति पर्यंत खडा न खडा माहिती ठेवून असायचा .त्याची अन माझी भेट सुभाष सुतार सोबत बीडमध्ये व्हायची .ते दोघे आजही अगदी अलीकडच्या काळापर्यंत बीडमध्ये आले की माजीमंत्री  सुरेश नवले यांची भेट घेतल्याशिवाय जात नसतं .
एक वेगळं रसायन होता संतोष,अत्यंत लाघवी स्वभाव,आपलंसं करण्याची कला अवगत असलेला हा पत्रकार त्याच्या अनेक शोध बातम्यांमुळे प्रकाश झोतात आला मात्र त्याचा माज कधी त्याच्या वागण्या बोलण्यातून जाणवला नाही .राजकारणी असो की समाजकारणी प्रत्येक व्यक्तीसोबत त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते .पत्रकारितेत नव्याने आलेल्या तालुक्यातील अनेक पत्रमित्रांचा तो हक्काचा मामा होता .

सामना सारख्या हिंदुत्ववादी दैनिकात वार्ताहर म्हणून काम करीत असताना सुद्धा सर्वपक्षीय नेते अन कार्यकर्ते यांचा तो जवळचा अन लाडका होता .कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर त्याने यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत लेख देखील लिहिला होता अन आज तोच मित्र कोरोनाच्या धास्तीने अचानक सोडून गेला .आयुष्याचा सामना धीरोदात्तपणे अन छातीठोकपणे उभं राहून लढायचा असतो अन जिंकायचा असतो हे इतरांना सांगणारा हा अवलिया मित्र आज मात्र स्वतःच अचानक निघून गेला अन आम्हा पत्रकारांनाच नव्हे तर गेवराईतील अनेकांना पोरकं करून गेला .मित्रा तुझं हे असं अचानक जाणं मनाला काही पटलं नाही बघ .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड.
9422744404


दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...