मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

लोकनेत्याचे वारसदार ..............!


लोकनेत्याचे वारसदार .............!
राजकारण असो की समाजकारण कोणतंही नेतृत्व घडायला किंवा तयार व्हायला एक कालावधी जावा लागतो,टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण मिळत नाही तर माणसाला मान ,मरातब,जगन्मान्यता कशी मिळेल .कोणतंही नेतृत्व हे वारसा हक्कानं मिळण्यासारखं नसत,ती काही वडिलोपार्जित संपत्ती नाही की जी मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आपोआप येईल मात्र काही लोकांना नेतृत्व देखील वारसा हक्कांनच मिळत आणि ते त्यासाठी लायक असतात असं म्हणावं लागेल ,असच एक वारसाहक्काने तयार झालेलं नेतृत्व म्हणजे पंकजा मुंडे .वडिलांच्या वाट्याला आलेला संघर्षाचा असो अथवा रंजल्या गांजल्या लोकांची सेवा करण्याचा वारसा असो , पंकजा यांना हा वारसा वडील गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनच मिळाला आहे हे मात्र खरं .
राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर लोकनेते म्हणून मान्यता मिळालेले किंवा जनतेने ज्यांना लोकनेता म्हणून स्वीकारले असे फार थोडे लोक आहेत ज्यात स्व गोपीनाथ मुंडे यांच नाव सर्वोच्च शिखरावर आहे .महाविद्यालयीन जीवना पासून ते शेवटच्या श्वासापर्यंत गोपीनाथ मुंडे यांच्या नशिबी संघर्षच आला ,त्यानंतर तो संघर्ष पंकजा मुंडे यांच्या वाट्याला आला .सुखाचे अन सत्तेचे दिवस आलेले असताना अचानक पितृछत्र हरपल्यानंतर कोलमडून न पडता पंकजा यांनी स्वतःसह जनतेला देखील सावरलं आणि संघर्षाची वाट यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला .
आजच्या राजकारणी मंडळींमध्ये संघर्ष करण्याची तयारी फार कमी दिसून येते,आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारांची संख्या वाढत असताना पंकजा यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे .ज्या जनतेनं गोपीनाथ मुंडे यांना लोकनेते हे बिरुद लावलं त्याच लोकांनी पंकजा यांना देखील ताईसाहेब ही नवी ओळख दिली आहे .
राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्याचा वारसा पंकजा मुंडे सक्षमपणे चालवताना दिसतात .मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पंकजा यांनी त्यांचं नाव लोकांच्या कायम लक्षात राहील पाहिजे यासाठी गोपीनाथ गडाची निर्मिती केली .
एरव्ही कितीही मोठा नेता असला तरी दोन चार ठिकाणी पुतळे,दोन चार शाळा कोलेजना नावं या पलीकडे त्या नेत्याचं अस्तित्व दिसत नाही .मात्र माझे बाबा जरी हे जग सोडून गेले असले तरी मी त्यांनी दाखवून दिलेली वाट सोडणार नाही अन त्यांचा विसर लोकांना पडू देणार नाही असं सांगत पंकजा यांनी आपल मार्गक्रमण सुरू ठेवल आहे .
गोपीनाथ मुंडे यांची स्मृती कायम राहावी म्हणून परळी येथे भव्यदिव्य अशा गोपीनाथ गडाची निर्मिती करण्यात आली,अवघ्या वर्षभरात हा गड उभा राहिला,गड ऊर्जेचा गड प्रेरणेचा म्हणून आज या गडावर लाखो लोक नतमस्तक होतात .

पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या प्रमाणे पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे हे नाव जनमानसात कायम राहील यासाठी गेल्या तीन वर्षात सातत्याने धडपड केली आहे .गडाची निर्मिती केली म्हणजे झालं असं न मानता त्यांनी या गडाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांना सक्षम करण्याबरोबरच शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जाण्यासाठी शेकडो गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे .
गोपीनाथ रावांच्या पुण्यतिथी आणि जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर लाखो लोक एकत्र येतातच मात्र एरव्ही सुद्धा त्यांचं नाव कायम लक्षात रहावं यासाठी पंकजा मुंडे यांचा मदतीचा यज्ञ कायम सुरू आहे .
 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा '
या उक्ती प्रमाणे पंकजा यांनी लोकनेत्याचा वारसा चालवला आहे .
पंकजा यांची चालण्याची,बोलण्याची लगबग पाहिल्यानंतर अनेकांना गोपीनाथ मुंडे हेच समोर असल्याचा भास होतो,निर्णय घेण्याचे क्षण असोत की लोकांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची वेळ असो पंकजा यांच्यात लोकांना कायम साहेब दिसतात .ग्रामीण भाग आणि या भागातील लोकांचा विकास हेच मुंडे यांच स्वप्न होतं, त्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला त्यांचं हे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच पंकजा यांनी राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून प्रयत्न चालवल्याचे दिसून येते .
अंगणवाडी असो की महिला बचत गट अथवा ग्रामीण भागातील बालकांच्या कुपोषणाचा विषय प्रत्येक विषयात खोलवर अभ्यास करून उपाय योजना करण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षात पंकजा यांनी केल्यानेच खुद्द पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा गौरव केला .
राजकारणात मी पैसा कमविण्यासाठी आलेले नाही तर माझ्या बाबांचं कार्य आणि त्यांचं नाव लोकांच्या मनात कायम रहावं यासाठी आलेले आहे हे पंकजा मुंडे सातत्याने सांगत असतात ते किती खरं आहे हे त्यांच्या काम करण्याच्या स्टाईल वरून लक्षात येत .
ज्याचं जेवढं नाव मोठं त्याच्या नशिबी संघर्षही तेवढाच मोठा हा निसर्गाचा नियमच आहे,त्यामुळे लोकनेते पदाचा वारसा मिळाल्यानंतर त्यासोबत येणारा संघर्षही पंकजा यांना सहन करावा लागला आणि त्यांनी तो केला हे विशेष .
मुंडे यांची पोरगी म्हणून त्यांना राज्याच्या सत्तेत मानाचं पान मिळालं असत यात शंका नाही मात्र आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यातला आपला स्वभाव नाही हे दाखवून देत विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी संघर्ष यात्रा काढली आणि त्या माध्यमातून आपलं नेतृत्व सिद्ध केलं .राज्याच्या राजकारणात आज जे काही बोटावर मोजण्याएव्हढे ओबीसी नेते आहेत त्यात पंकजा यांचा क्रमांक सर्वात वरचा आहे .ओघवत्या अन तेवढ्याच कडव्या शब्दात आपलं म्हणणं जनतेला पटवून देत लाखोंच्या सभा गाजवण्याचं कसब त्यांना वारश्याने मिळालं आहे हे त्यांनी नेहमी सिद्ध केलं आहे .
केवळ राज्यातच नव्हे तर मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश,कर्नाटक,तेलंगणा या भागात जाऊन पंकजा मुंडे जेव्हा लाखोंच्या सभा गाजवतात तेव्हा गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही .
'गुरू ने दिला ज्ञानरुपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा 'या प्रमाणे आपल्या वडिलांना च आपले राजकारणातील गुरू मानणाऱ्या पंकजा मुंडे यांनी त्यांचा संघर्ष अन जनसेवेचा वारसा पुढे चालवला आहे त्यामुळेच त्यांना आज लोकनेत्याची वारसदार ओळखले जाऊ लागले आहे .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...