गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

काळ सोकावतो आहे ...........!




काळ सोकावतो आहे .............!

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो मात्र या चौथ्या स्थम्भाला कायम अडचणीत आणण्याचे उद्योग अलीकडच्या काळात होत असल्याचे दिसून येत आहे,बातमीमुळे अफवा पसरली गेली किंवा एखाद्या पोस्टवरून समाजात दुही निर्माण झाली अशी कारणे देऊन पुन्हा एकदा एका पत्रकाराला राज्यात पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागले,झालेली कारवाई चूक की बरोबर यावर वाद विवाद होऊ शकतात मात्र ज्या पद्धतीने सूडबुद्धीने प्रशासन वागत आहे ते पाहता म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो आहे हे वाईट आहे असेच म्हणावे लागेल .

एबीपी माझा चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या एका तथाकथित बातमीमुळे गर्दी जमली अन गोंधळ निर्माण झाला असे तारे सरकार अन प्रशासनाने तोडले आणि राहुलला अटक केली,त्यानंतर बुधवारी दुसरे प्रकरण समोर आले ते बीडला .
गेल्या तीस वर्षांपासून पार्श्वभूमी नावाचे दैनिक चालवणारे संपादक गंमत भंडारी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करीत रात्रभर कोठडीत डांबून ठेवले .काय गुन्हा केला त्यांनी तर एक पोलीस कर्मचारी हा मुंबई भागातून बीड जिल्ह्यात आल्याची आणि त्यांच्यामुळे कोरोना फैलावू शकतो का अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाल्याची चार ओळीची बातमी व्हायरल केली .

हा सगळा प्रकार भंडारी यांनी जाणीवपूर्वक केला होता का तर निश्चितच नाही,त्यामागे दोन समाजात किंवा जनतेत गोंधळ निर्माण व्हावा असा हेतू होता का तर नाही,किंवा आपल्या बातमीमुळे दैनिकाचा खप वाढावा असंही त्यांचं मत नसावं पण तरीदेखील पोलीस प्रशासनाने अशा पध्दतीने कारवाई केली की जणूकाही भंडारी हे अट्टल दरोडेखोर किंवा चोर आहेत .गंमत भंडारी यांना जे लोक ओळखतात त्यांना माहीत आहे की कडक बोलणारा,कडक शब्दात लिहिणारा,जे लोकांना वाटते ते त्यांच्याच शब्दात मांडणारा हा संपादक आहे .
काहीवेळा ते एकांगी लिहितात,स्वतःला न्यायाधीश असल्यासारख्या ऑर्डर सोडतात,नको ते सल्ले देतात हे देखील।सत्य आहे मात्र त्यामागे त्यांचा स्वतःचा काही स्वार्थ नेहमीच असतो असे नाही .
पार्श्वभूमी मध्ये मुख्य बातमी हीच मुख्य आकर्षण असते ,या बातमीत संपादक हे स्वतःच मत व्यक्त करतात त्यामुळे अनेकवेळा ती अतिरंजित वाटते .घटना जशी घडली त्यापेक्षा ती का घडली,रोखण्यासाठी काय करता आले असते,कोणती खबरदारी घेतली गेली किंवा नाही गेली यावर बातमीत जास्त भर दिलेला असतो ,जो अनेकांना खटकतो .बातमी किंवा पत्रकारितेच्या इथिक्स मध्ये हि गोष्ट बसत नाही .मात्र तरीही ती भंडारी यांची स्टाईल झाली आहे त्यामुळे आता त्यांची ओळख निर्माण झाली आहे .पुढारी असो की प्रशासन अथवा सामान्य माणूस अनेकांना पार्श्वभूमी ची ही स्टाईल पचनी पडत नाही .त्यामुळे अनेकदा संपादक हे मोहम्मद तुघलक वाटतात,अतिशहाणे वाटतात,ते संपादक कमी आणि सल्लागार जास्त वाटतात ."अगर मेरी सरकार आयेगी तब भी मै विपक्ष मे  बैठुंगा"हे राम मनोहर लोहिया यांच ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या भंडारी यांनी आपल्या स्वभावामुळे अनेकांचा इसार घेऊन ठेवलेला आहे .
त्यांनी जी बातमी व्हायरल केली त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी मुंबई परिसरातून बीड जिल्ह्यात आल्याचा उल्लेख होता,या बातमीमुळे अफवा पसरली आणि लोक भयभीत झाले असा दावा करून पोलिसांनी भंडारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला,तातडीने त्यांना अटक करण्यात आली .आता हे एवढं आवश्यक होतं का,की समज देऊन अथवा प्रतिबंधात्मक कारवाई करून प्रकरण मिटवता आलं असतं .पण पोलीस कारवाई बाबत आपण काय बोलणार त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं,कायद्यापुढे कोणी लहान मोठं नाही सगळे समान आहेत हे यावरून दाखवून द्यायचं असेल म्हणून सुद्धा ही कारवाई झाली असेल .
पण अलीकडच्या काळात पत्रकार हे सगळ्यांसाठी सॉफ्ट टार्गेट झाले आहेत,सगळेच पत्रकार लाचखोर,पीत पत्रकारिता करणारे,पुढपुढं करणारे ,पाकीट घेऊन पत्रकारिता करणारे नसतात मात्र सब घोडे बारा टक्के अशा पद्धतीने मानसिकता करून पुढारी,अधिकारी आणि सामान्य माणूस या वर्गाकडे पाहतो .पत्रकारिता पहिल्यासारखी राहिली नाही अस नेहमी म्हणलं जात मात्र अशावेळी पत्रकारांना येणाऱ्या अडचणी कोण समजून घेत का .एखाद्या पुढाऱ्यांविरोधात बातमी दिली की तो पत्रकार जातीयवादी, धर्मवेडा, सरकारच्या किंवा विरोधकांच्या हातचं बाहुल म्हणून बदनाम केला जातो .ज्या पत्रकाराने शरद पवार यांना पदमसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला अन पवार चिडले त्या पत्रकाराची कुंडली सोशल मीडियावर टाकून त्याला बदनाम केलं गेलं,मात्र हे करताना त्याने यापूर्वी अनेक चांगले प्रश्न धसास लावले असतील याकडे दुर्लक्ष केलं गेलं .असच काहीस अनेकवेळा होतं मात्र सगळे पत्रकार हे पैशापुढं आपलं इमान विकणारे आहेत असा समज करून घेतला जातो अन त्यांना त्रास देण्यासाठी संधी शोधली जाते .
राहुल कुलकर्णी असो की गंमत भंडारी या लोकांनी आणि इतरही पत्रकारांनी चांगली काम केलेली आहेत,पण त्यांच्याकडून एक चूक झाली की लगेच प्रशासन त्यांना धडा शिकवण्याची संधी मिळल्यागत काम करतं .मात्र अस जर प्रशासनाकडून झालं तर दिलगिरी व्यक्त करून किंवा चुकून झालं अस म्हणून मुद्दा पुढे ढकलला जातो .कोरोना झालेल्या किंवा निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीच नाव जाहीर करू नये असा आदेश असताना जिल्हाधिकारी बीड यांनी मात्र गुरुवारी नगरमध्ये उपचार घेणाऱ्या पिंपळा येथील रुग्णाचे नाव जाहीर केले,मग पुन्हा सुधारणा केली,अशावेळी ते स्वतःवर कायद्याचा बडगा उगरणार का?हा सवाल कोणी उपस्थित केला तर तो लगेच कायद्याच्या दृष्टीने कायदा मोडणारा म्हणून संबोधित केलं जातं .याचाच अर्थ प्रशासनाने किंवा सरकारने केलेली चूक ही मागे घेता येऊ शकते,माफी मागून प्रकरण सोडून देता येते पण इतरांनी चूक केली तर थेट गुन्हा दाखल केला जातो .एखाद्या मंत्र्याने प्रक्षोभक विधान केले तर किंवा पुढाऱ्यांची जीभ घसरली तर आमचं विधान तोडून मोडून दाखवलं,आम्हाला तस म्हणायचं नव्हतं,आमच्या विधानाचा गैरअर्थ लावला गेला अस म्हणून पांघरून घातलं जात,मात्र पत्रकारांनी काही केलं की लगेच त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं हे कितपत योग्य आहे .
आज जिथं सगळ्या बाजूने सामान्य माणुस हताश झालेला असतो त्यावेळी केवळ पत्रकारिता या क्षेत्राकडून च लोकांना न्यायाची अपेक्षा आहे .पण त्याच वर्गाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय हे देखील दुर्दैवी आहे .राहुल कुलकर्णी आणि गंमत भंडारी यांच्या अगोदर सुद्धा बीडमध्ये महेंद्र मुधोळकर या पत्रकारावर देखील एक पोस्ट केली म्हणून कारवाई केली गेली .मग जर पत्रकारकडून चूक झाली तर कारवाई करणारे प्रशासन त्यांच्या एखाद्या अधिकाऱ्याकडून चूक झाली तर का कारवाई करत नाही हा प्रश्न निर्माण होतो .
मास्क वापरला नाही म्हणून सामान्य माणसाला दंड करणारे अधिकारीच जर स्वतः मास्क लावणार नसतील तर मग त्यांच्यावर कारवाई कोण करणार,जिथं देशात लॉक डाऊन आहे तिथं कोणी अधिकारी जर बांधकाम करत असेल अन त्याला परवानगी आहे अशी सबब दिली जात असेल तर मग या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार .
हे म्हणजे हम करे सो कायदा अस झालं .गंमत भंडारी यांनी जे केलं त्याच समर्थन होऊच शकत नाही पण म्हणून त्यांच्यावर आकसबुद्धीने कारवाई अपेक्षित नाही,ती तशी केली गेली अशी चर्चा होते आहे . वृत्तपत्र असो की इ मीडिया या लोकांमुळे हजारो लोकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत,अनेकांचे संसार उभे राहिले आहेत,सत्ताधारी,विरोधक,प्रशासन यांच्यातील लूप होल्स बाहेर आले आहेत .मीडिया अनेकवेळा अतिरंजित पणा करतो हे मान्य केलं तरी याच मीडियाच्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत हे विसरून चालणार नाही .
मग तरीसुद्धा मीडियाला टार्गेट करून नेमकं काय साध्य करायचे आहे हे न उलगडणारे कोडे आहे .
अनेकदा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ,कर्मचारी हे आपल्या बदल्या,बढती यासाठी तसेच एखाद्या कारवाईत सुटका मिळावी म्हणून पुढाऱ्यांचे उंबरे झिजवताना आपण पाहतो .पुढाऱ्यांच्या हातचे खेळणे असल्यासारखे अधिकारी वागतात पण नियम फक्त सामान्य माणसाला लागू असतात प्रशासनाला नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे .गंमत भंडारी असोत की इतर पत्रकार प्रत्येक बाबतीत कायद्याचा धाक दाखवून उपयोग नसतो,मात्र हे कोण सांगणार . कारण सध्या पत्रकार असो की सामान्य माणूस प्रत्येकाचाच हात प्रशासन आणि सरकार या दोन यंत्रणेखाली अडकलेला आहे,तरीदेखील अशा पद्धतीने होणाऱ्या कारवायांमुळे मनोबल ढासळू शकते हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

राहुल,तुझं चुकलंच .............!


राहुल तुझं चुकलंच ...........!

पत्रकारिता हे सतीचं वाण आहे अस म्हणतात त्याचप्रमाणे पत्रकार सोडून इतर सगळ्यांनी कमरेच सोडून डोक्याला गुंडाळल तरी त्यांना तो अधिकार असतो मात्र पत्रकारांना नसतो असा एक अलिखित नियम आहे,राहुल ,मित्रा गेल्या वीस वर्षाच्या काळात तू संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देश पालथा घातलास, रावापासून रंकापर्यंत अनेकांच्या कहाण्या जगासमोर मांडल्यास मात्र हे करताना तू सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याच्या व्रतामध्ये अनेकांना अंगावर घेतलेस अन त्यातूनच तुझ्यावर कारवाईसाठी टपून बसलेल्या गिधाडांच्या हाती तू सापडलास, त्यामुळेच म्हणतो राहुल तू चुकलास .
पत्रकार हा समाजमनाचा आरसा असतो अस म्हणलं जात,समाजात कुठं काही चांगल ,वाईट घडत असेल तर ते दाखवणं हे आपलं काम आहे,अगदी त्यासाठी आपण आपला जीव देखील धोक्यात घालतो .पत्रकार म्हणलं की दिसतो तो त्याला मिळणारा मान, अधिकारी असोत की पुढारी सगळेच त्याला झुकून सलाम करतात एवढंच सगळ्यांना दिसत. मात्र एक पत्रकार बातमी देण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी किती धडपड करतो हे कोणालाच दिसत नाही .म्हणतात ना माशाचे अश्रू कधीच दिसत नाहीत म्हणून त्याला दुःखच माहीत नाही अस नसतं तसच काहीस आपल्या पत्रकारिता जमातीचं आहे .आजही शहरी,निमशहरी,ग्रामीण भागातील पत्रकार हे कसाबसा चरितार्थ चालवतात,नुसत्या सन्मानाने त्यांचंच काय कोणाचच पोट भरत नाही हो . पत्रकारितेच्या क्षेत्रात चमक धमक खूप आहे पण त्यामागे त्रास किती आहे हे कोणालाच माहीत नाही,अनेकवेळा दिवसेदिवस उन्हा तान्हात, न खतापिता शेकडो मैल एका बतमीसाठी पत्रकारांना हिंडावे लागते,एखादा शब्द चुकला तर पत्रकाराला बोल लावणारे लोक त्या बतमीसाठी त्याने किती मेहनत घेतली आहे याचा कधीच विचार करीत नाहीत .
आज इलेक्ट्रॉनिक मीडिया मुळे अन सोशल मीडियामुळे प्रत्येक जण पत्रकार झाले आहेत,पत्रकारितेला एक सवंगपणा आला आहे.मात्र राहुल तुझी पत्रकारिता ही वेगळी आहे,पानिपत ची लढाई कशी अन कुठून सुरू झाली इथपासून ते अंदमान निकोबार मध्ये सावरकर यांना किती हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या .इथपर्यंत अनेक चांगल्या वाईट गोष्टी तू समाजासमोर मांडल्यास .एवढंच काय पण शरद पवार असोत की इतर राजकारणी यांना आपल्या वेगळ्या आणि अनोख्या शैलीने तू बोलत केलं आहेस .त्यावेळी अनेकांनी तुझं तोंडभरून कौतुक केलं आहे .जिल्ह्याच्या बातमीला राज्य पातळीवरील संदर्भ कसे द्यायचे अन जिल्ह्या जिल्ह्यातून इनपुट घेऊन बातमीच सोनं कस करायचं हे तुझं कसब वादातीत आहे . पांढऱ्या शुभ्र कापड्यावरील एक काळा डाग शोधण्यासाठी तुझी नेहमी धडपड सुरू असते,काही जणांना तो तुझा आगाऊपणा वाटतो, काही जण तुला अतिशहाणा म्हणतात, काही जणांना तू तिरसट वाटतोस पण पत्रकारितेच्या बाबतीत तू वेगळा आहेस हे मात्र खरं आहे .
मात्र दोन दिवसांपूर्वी जे घडलं त्यात तुला दोषी धरून अटकेची कारवाई करून सरकारने आपली मर्दुमकी दाखवून दिली आहे .सरकार किंवा अधिकारी कोणाचंही असो आपल्या अंगाशी आलं की ते त्या माकडीनिप्रमाणे वागतात .आपला जीव वाचवण्यासाठी या लोकांनी तुला बळीचा बकरा बनवलं .एबीपी माझा ने वाधवान प्रकरणात सरकारला जे प्रश्न विचारले ते सरकार आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना चांगलेच झोम्बले .त्या दिवसाचा वचपा काढण्यासाठी संधी शोधणाऱ्यांच्या हातात आयत कोलीत मिळाल .
राहुल कुलकर्णी यांनी बातमी दिली सकाळी नऊ वाजता,अकरा वाजता रेल्वे विभागाने ट्रेन सुरू होणार नाहीत हे स्पष्ट केलं त्यानंतर चार वाजता हा जमाव जमला .मग यात राहुल किंवा एबीपी च्या बातमीचा संबंध येतो कुठे.पण म्हणतात ना सरकार आपलं असल्यावर ओलं आणि वाळल कसंही जळतं. तस काहीस तुझ्या प्रकरणात झालं.
ज्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तुला अटक झाल्याची माहिती तातडीने ट्विट केली त्याच देशमुख यांनी वाधवान प्रकरणात अमिताभ गुप्ता यांचा बोलविता धनी कोण याचा शोध घेण्यासाठी ही तत्परता दाखवली नाही .अधिकारी कितीही मोठ्या पदावर असला तरी तो मनाने शहाणपणा करीत नाही,त्याला या प्रकरणात कोणी ऑफ द रेकॉर्ड आदेश दिले याचा खुलासा देशमुख करणार आहेत का,त्यांनी जर वाढवान आणि गुप्ता यांचे कॉल रेकॉर्ड काढले तर कळून जाईल की गुप्ता कोणाच्या इशाऱ्यावर या प्रकरणात नागवं नाचले ते,मात्र ते करण्यापेक्षा देशमुख यांनी तुला 24 तासात अटक करून जग जिंकल्याचा आव आणला .

आता सरकारवर टीका केल्यावर त्याची किंमत तर मोजवीच लागेल ना .अरे आजही मुंबई असो की दिल्ली शेकडो पत्रकार हे सरकारच्या तुकड्यावर आपला चरितार्थ चालवतात अस हे राजकारणी सर्रास सांगतात,कारण आपलेच अनेक संपादक,ज्येष्ठ पत्रकार यांनी मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट असतील किंवा इतर लाभ मिळवले आहेत,तू मात्र सातत्यानं सरकारच्या विरोधात ,जे चूक आहे ते समोर आणण्यात आपली पत्रकारिता केलीस अन आज त्याचाच फटका तुला बसतो आहे .
राहुल कुलकर्णी यांच्याबाबत जे घडले तेच किंवा कमी अधिक प्रमाणात हे अनेकांच्या बाबतीत नेहमी घडते मात्र इतरवेळी पत्रकारांना सन्मान,खुर्ची देणारे अधिकारी ,राजकारणी आपली 'जात'हा पत्रकार अडचणीत आल्यावर बरोबर दाखवतात .कारण त्यांचा इगो कधी ना कधी त्या पत्रकारकडून दुखावलं गेलेला असतो .आज दिल्ली असो की उत्तर प्रदेश अथवा मध्यप्रदेश किंवा तेलंगणा अनेक राज्यांनी त्या त्या भागातील मजूर,शेतकरी,कष्टकरी अशा श्रमजीवी लोकांना पाचदहा हजार रुपये थेट मदत केली आहे,महाराष्ट्रात मात्र अद्याप तरी केवळ गहू तांदूळ वाटण्यापालिकडे काहीही झालेले नाही,मग अशा बातम्या आपण केल्या की आपण विरोधकांच्या ओंजळीने पाणी पिणारे म्हणून हिनवले जाते .शिवभोजन असो की इतर योजना याबाबत आपण छान छान ,गोडगोड बातम्या केल्या तर आपण ग्रेट पत्रकार अन थोडं विरोधात लिहिलं की लगेच सरकार विरोधी हे अस गणित होवुन बसला आहे .
"चूप बैठ नही तो कान काट दुंगा"अशी भूमिका कोणत्याही सत्ताधाऱ्यांची असते .मात्र निरंकुश आणि मदांध झालेल्या सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकारांच असत .आणि त्यांनी त्यांचं काम केलं की त्यांना बदनाम करण्याचा,त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान करण्याचा ,त्यांच्यावर हल्ले करण्याचा उद्योग सत्ताधारी करतात .राहुल तुझ्या बाबत सुद्धा हेच झाले आहे .देशात लॉक डाऊन असताना केवळ पैसा आहे ,राजकारणी लोकांच्या ओळखी आहेत म्हणून वाढवान कुटुंबाला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली,सामान्य माणूस घराबाहेर भाजीपाला घ्यायला पडला तर त्याच्या पार्श्वभागावर सटके देणारे पोलीस वाढवान सारख्या धनाढ्य लोकांना मात्र कमरेत वाकून मुजरा करतात .जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राबविण्याची जबाबदारी असणाऱ्या एस पी सारख्या अधिकाऱ्याने लॉक डाऊन च्या काळात घराचे बांधकाम काढले तर कलेक्टर सारखे अधिकारी सुद्धा काहीवेळा पाठराखण करतात अन याचा जाब विचारायला गेलं तर पत्रकार कुठं अडचणीत आणता येतो का याची संधी शोधली जाते .हा सगळा प्रकारचं किळसवाणा आहे .
लोकांनी मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये अन्यथा एक हजार रुपये दंड केला जाईल अस सांगणारे जिल्हाधिकारी जर मास्क न घालता रस्त्यावर येत असतील तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार अन हे विचारणाऱ्या पत्रकाराला मात्र दमदाटी होत असेल तर दाद मागायची कोणाकडे हे देखील अनुत्तरीत असे प्रश्न आहेत .

राहुल कुलकर्णी यांनी जर चूक केली असेल तर त्यांना शिक्षा व्हायला हरकत नाही मात्र सरकार आणि  गृह विभाग आपल्या निष्क्रियतेवर पांघरुन घालण्यासाठी हे असले उद्योग करत आहे .रेल्वेचा अपघात झाला म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या मंत्रिपदाचा तेव्हा राजीनामा दिला होता .आज ही नैतिकता दाखवून अनिल देशमुख हे वाढवान प्रकरणात गृह विभागाचा गलथानपणा मान्य करून राजीनामा देण्याची हिंमत दाखवतील का,तर उत्तर आहे नाही .कारण अलीकडच्या काळात नैतिकता हा शद्बच राजकारणातून हद्दपार झाला आहे,मग अशा लोकांकडून सूडबुद्धीने कारवाई होण्याशिवाय दुसरी काय अपेक्षा करणार .
राहुल कुलकर्णी यांनी जी बातमी दिली त्यामागे त्यांचा हेतू राज्यात हजारो लोक एकत्र यावेत ,पॅनिक निर्माण व्हावे,गोंधळ उडावा असा नक्कीच नव्हता याची जाणीव सगळ्यांनाच आहे पण तरीही तातडीने मुंबईवरून पोलीस येऊन अटकेची कारवाई करतात म्हणजे यामागे राजकीय सूड आहे हे दूध पित्या लेकराला सुद्धा कळेल .जर राहुल यांच्या बातमीमुळे एवढं सगळं घडल अस सरकार म्हणत असेल तर मग सरकारच्या बुद्धीची करावी तेवढी कीव थोडीच आहे .
या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने दिसून आली ती म्हणजे एबीपी माझाची संपूर्ण टीम राहुलच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली,इतर चॅनेलच्या प्रतिनिधींबाबत अस घडलं असत तर मॅनेजमेंट ने हात झटकले असते कदाचित,पण राजीव खांडेकर यांनी सुद्धा या आपल्या सहकाऱ्यांची जी सत्य बाजू मांडली ती कौतुकास्पद आहे .
हे सगळं असलं तरी राहुल तू चुकलासच अस मी अजूनही म्हणेल कारण टिळक,आगरकर,अत्रे,भालेराव यांची पत्रकारिता आता राहिलेली नाही रे,जे दिसतंय ते दाखवायचं नाही तर जे विकतंय ते दाखवायचं,राजकारणी,पुढारी,अधिकारी यांच्या पूढेपुढे करायचे,टीका टिप्पणी,शिवराळ भाषा वापरायची नाही,सरकारला जाब विचारायचा नाही,म्हणजे मग तुम्ही आम्ही ग्रेट नाहीतर तुरुंग थेट .असो पण सरकारच्या या तुघलकी कारभाराचा एक पत्रकार म्हणून मी निषेध करतो .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404 .

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

सरणावर जायची एवढी घाई कशाला ..........!


सरणावर जायची एवढी घाई कशासाठी .............!

माझ्या लाडक्या बीड वासीयांनो,लाडक्या एवढ्यासाठी म्हणलं की माझा जीव आहे बीडवर अन इथल्या माणसांवर,मात्र आज मला मी बीडकर असल्याची लाज वाटली,खरंच लाज वाटली,अरे ज्या महा भयंकर रोगापासून सुटका मिळावी म्हणून सगळं जग लढत आहे,लहानापासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सगळे घरात रहा,सुरक्षित रहा हे सांगत आहेत,तिथं आम्ही मात्र सगळी लाज नाकाला गुंडाळून मोक्कार वळू सारखे रस्त्यावर फिरत आहोत,त्यामुळे आज मला मी बीडकर असल्याचीच लाज वाटू लागली आहे .
तुम्ही म्हणाल तू आम्हाला शिकवणारा कोण शहाणा लागून गेलास,तू किती पथ्य पाळतोस,तर एक स्पष्ट सांगतो की या संकटाचा सामना करण्यासाठी मी माझ्या परीने जे शक्य आहे ते करतो आहे .मी पत्रकार असल्याने माझं कर्तव्य करतो आहे .मात्र बीडकर म्हणून तुम्ही जे वागताय ना ते योग्य नाही हे मात्र तितकंच खरं आहे .
कोरोना कोण आहे,तो कोणाचा भाऊबंद आहे का,की तो अमुक एका धर्माचा जातीचा आहे का,तर निश्चितच नाही,तो एक विषाणू आहे जो जग गिळंकृत करायला निघाला आहे .जगावर अधिराज्य गाजवण्याचं स्वप्न पाहणारी अमेरिका असो की चीन हे मोठं मोठे बलाढ्य देश या संकटासमोर गुडघे टेकवत आहेत,तिथं तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती. या आजारावर अजूनपर्यंत कोणताही ठोस असा इलाज सापडलेला नाही मात्र घरात राहून,ठराविक अंतर ठेवून,हात पाय धुवून,स्वतःच्या शरीराची स्वछता ठेवून आपण त्यापासून स्वतःचा बचाव करु शकतो .
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वीस दिवसात अनेकवेळा मीडियाच्या माध्यमातून जनतेला घरात राहण्याच आवाहन करत आहेत,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत की आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सगळे तुम्हाला आम्हाला रिकामचोट वाटले का .देशासमोर आज अनेक प्रश्न आ वासून उभे असताना अचानक आलेल्या या मोठ्या संकटाच्या विरोधात सरकार असो की विरोधक सगळेच हातात हात घालून लढत आहेत,कोणत्याही देशावर जेव्हा संकट येत तेव्हा एक देशवासीय म्हणून आपलं कर्तव्य असतं की आपण सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे .
आज देशात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे,मृत्य होणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे,या आजारावर मात करण्यासाठी अमेरिका सारखा देश इतर देशाकडे मदत मागत आहे,सुदैवाने अजून भारतात याचे प्रमाण आटोक्यात आहे मात्र ते वाढणार नाही याची कोणीच खात्री देऊ शकत नाही .
बीड जिल्ह्यात देखील प्रशासनाच्या सजगतेमुळे कोरोना अजून आत शिरकाव करू शकलेला नाही मात्र उस्मानाबाद असो की नगर अथवा हिंगोली ,औरंगाबाद अशा सगळ्याच जिल्ह्यात म्हणजे बीडच्या वेशीवर कोरोना येऊन ठेपला आहे .
आपण मात्र गाव जलो हनुमान बाहेर या मानसिकतेतून बाहेर पडायला अजून तरी तयार नाहीत .बीड जिल्ह्यात नाकाबंदी मोडून दाखल झालेल्या काही लोकांच्या संपर्कात आलेल्या पोलीस बांधवांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सगळ्या बिडवासीयांनी आनंद व्यक्त केला .कारण हा आजार संपर्कातून जास्त वाढतो ,हे तुम्ही आमही सगळेच जाणतो .
मात्र जे कळतं ते वळत नाही अशी आपली अवस्था सध्या झाली आहे .निव्वळ कमरेच सोडून डोक्याला गुंडाळल्यानंतर कोण काय बोलणार .
लॉक डाऊन नंतर आज चौदा दिवस झाले आपण घरात आहोत,मात्र जणूकाही चौदा वर्षापासून आपण वनवासात आहोत अस वागू लागलो आहोंत,विचार करा प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवासात कसे राहिले असतील,घरदार ,आई वडील आणि प्रजेला सोडून .राम जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा ते राजपुत्र होते मात्र चौदा वर्षाच्या वनवासानंतर ते प्रभू श्रीराम झाले .आपण मात्र त्यांना देव मानत असताना चौदा दिवस घरात राहू शकत नाहीत का,बर काय नाही आपल्याजवळ ,सगळं जग तुमच्या हातात आहे,मोबाईल मुळे आणि टिव्हीमुळे जगात काय सुरु आहे हे तुम्हाला एक सेकंदात कळतंय,बायका पोरं, आई वडील,सगळे तर जवळच आहेत,मग बाहेर झकमारी करण्याची एवढी गरज आहे का ?
पन्नास तासांच्या संचारबंदी नंतर मंगळवारी बीड,परळी,माजलगाव,अंबाजोगाई या भागात रस्त्यावर जे चित्र दिसले ना ते आपल्या अकलेची दिवाळखोरी दाखवणारे होते .मी म्हणतो तुम्ही आम्ही रोजच भाजी खातो का हो,एरवी आपण रोज दोन भाज्या,भात, वरण, पोळी ,चटणी,लोणचं अस जेवण जेवतो का, नाही ना,मग या लॉक डावूनच्या काळातच एवढी काय खाय खाय सुटली आहे .दुष्काळातून आल्यासारखे आपण वागतो आहोत .आठवड्यात एक दिवस भाजी खरेदी केली तरी चालू शकते,किराणा सामान तर आपण सहसा महिन्यातून एकदाच भरतो ना,मग बाहेर जाऊन एवढं काय करतो आहोत आपण .
रिकामं फिरण्यामध्ये कसली आली आहे मर्दुमकी कळत नाही मला,साला जान है तो जहाँ है हे माहीत असूनसुद्धा आपण का मरणाला आमंत्रण देत आहोत हे न उलगडणारे कोडे आहे .
बीड जिल्ह्यात गेल्या चौदा पंधरा दिवसात रस्त्यावर जी परिस्थिती दिसली ती बीडकर किती मूर्खपणा करू शकतात हे दाखवणारी आहे .
बीडच नव्हे तर जवळपास सगळ्याच शहरात लोक संचारबंदी मोडणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य असल्यासारखे वागू लागले आहेत .
शहरातील,चौका चौकात खाकी कपडे घालून जे लोक बसले आहेत ना त्यांनाही घरदार,लेकरबाळ आहेत,मात्र ते तुमच्या आमच्यासाठी उन्हातान्हात थांबून आपलं काम करत आहेत,आम्ही काय करतोय तर त्यांच्याशी दांडेलशाही करतोय,त्यांनाच भांडतोय .
अरे शहाण्यांनो तुम्ही ज्यांच्या नावाने आज खडे फोडत आहात ना ते जर रस्त्यावर थांबले नाहीत तर तुमच्या वेशीवर आलेला तो कोरोना नावाचा यम केव्हाच तुमच्या दारात येईल हे कळणार सुद्धा नाही . डॉक्टर, आरोग्य सेवेतील सगळा स्टाफ आणि महसूल,पोलीस प्रशासन हे डोळ्यात तेल घालून तुमच्या आमच्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत .आम्ही मात्र त्यांच्या मेहनतीवर भडाभडा पाणी ओतत आहोत,मी तर म्हणेल की बिडकरांचा हा प्रकार म्हणजे खंडीभर वरणात फळाफळा मूतन्या सारखाच आहे .
माफ करा पण आजच बीडच्या लोकांचं वागणं नाही पटलं मला,शहरातील रस्त्यावर किमान एक हजार ते दीड हजार मोटारसायकल,चारचाकी वाहन,टेम्पो,टमटम दिसून आल्या .
एकीकडे जिल्ह्यातील सगळे पेट्रोल पंप सामान्य नागरिकांना बंद केले असताना एवढ्या गाड्या आल्या कोठून,त्यांना पेट्रोल मिळाले कसे हा प्रश्न अनुत्तरित आहे .नियम तोडण्यात आम्हाला खूप फुशारकी वाटते .एवढ्या संचारबंदी च्या काळात सुद्धा आम्ही कसे बाहेर राउंड मारून आलो,पोलिसांच्या डोळ्यात कशी धूळफेक केली याच आम्हाला कोण कौतुक वाटतं, मात्र आपण घराबाहेर पडून,गर्दी करून,रस्त्यावर मोक्कार फिरून पोलीस आणि प्रशासन यांच्या डोळ्यात नाही तर आपल्या स्वतःच्या आयुष्यात माती फेकत आहोत हे आपल्याला का कळत नाही .
आपला मृत्यू दारावर,वेशीवर आ वासून उभा आहे,त्यांच्या अन आपल्या मध्ये जर कोणी उभं असेल ना तर ते आहेत पोलीस,डॉक्टर आणि प्रशासन .
आपण जर चार दोन दिवस भाज्या नाही खाल्या,बाहेर नाही पडलो,तर मरणार आहोत का,नाही आपल्याला बाहेर जाता आले तर जगबुडी होणार आहे का .इथं सगळं जग लॉक डाऊन आहे,एक एक जीव वाचवण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे आणि आपण मात्र अक्कल गहाण टाकल्यासारखं वागत आहोत .हा आजार आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना होऊ नये,यापासून सगळे सुरक्षित राहावेत म्हणून आरोग्य यंत्रणा जीवतोड मेहनत घेत आहे .अख्ख जिल्हा रुग्णालय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिकामं करण्यात आलंय, सगळीकडे भयाण शांतता अन भीतीचं वातावरण आहे,बाहेर गावाहून आलेले लोक म्हणजे दुसरे यम आल्यासारखं त्यांना आपण वागवतोय ,हे का होतय कारण कोरोना होण्याची भीती प्रत्येकालाच आहे,मग तरीही आपण न काळल्यासारखं का करतोय हा खरा मुद्दा आहे .
बीड सारख्या शहरात जर या आजाराची लागण झाली तर सरकारी सोडा खाजगी रुग्णालयात सुद्धा जागा पुरणार नाही,रुग्ण आणि आरोग्य यंत्रणा यांच्यात मारामाऱ्या होतील ,मग हे जर ओढवून घ्यायचं नसेल तर आपण घरात राहील तर बरं होईल ना,मात्र बीडच्या रस्त्यावर रोज जे चित्र दिसत ना ते मन विषण्ण करणार आहे .पोलीस दलाचे कर्मचारी असोत की आरोग्य विभागाचे लोक कोणत्याही संरक्षक साहित्याशिवाय आपलं काम करीत आहेत,आपण मात्र घराबाहेर पडून चौकाचौकात गप्पांचे फड रंगवत आहोत अन त्यात धन्यता मानत आहोत .
जिथं मंदिरातल्या देवांनी स्वतःला क्वारान्टीन करून घेतलंय तिथं तुमची आमची काय कथा,परंतु हे सगळं समजून देखील बीड सेफ आहे,आपल्याकडे पॉझिटिव्ह लोक नाहीत,प्रशासन विनाकारण बाऊ करतंय, असले फालतू विषय चघळत बसण्यात आपण धन्यता माणतोय .
आपण चौकात बसून किंवा शहरभर उंडारत फिरून असा काय देशाचा विकास करणार आहोत का,नक्कीच नाही, उलट घरात बसल्यामुळे लेकरं खुश आहेत,बायको,आईवडील सगळे कितीतरी वर्षांनी एकमेकांच्या आवडीनिवडी जपत आहेत, जुने खेळ,जुने मित्र,मैत्रिणी यांच्या आठवणीत दिवस जात आहेत पण आम्हाला हें नकोय .आम्ही मोदी अन ठाकरे पेक्षा हुशार आहोत त्यामुळे आम्ही त्यांची अक्कल काढण्यात स्वतःला हुशार मानत आहोत .
गेल्या पंधरा दिवसात प्रत्येकाने ठरवलं असत तर निश्चितपणे या दिवसात काय काय अनुभवलं,कोणाचे स्वभाव आवडले,कोणाचं वागणं खटकलं या बाबत छान छान लिखाण करता आलं असत,ज्या आईबापाच तोंड पाहण्यासाठी मुलांना आठवडा लागायचा त्यामुलांच्या सोबत वेळ घालवण्याची संधी जर मिळाली आहे तर तीच सोनं करा ना, पण नाही,सहजासहजी एखादी गोष्ट मान्य करतील ते बीडकर कसले .
समजा तुम्ही बाहेर गेलात अन दुर्दैवाने तुम्हाला हा आजार झाला तर 14 दिवस ते 28 दिवस एकट्याने रुग्णालयात राहावे लागेल ते सोपे नाही मग कशाला विषाची परीक्षा घ्यायची .या जगात जो जन्माला आला तो प्रत्येक जण एक ना एक दिवस मरणारच आहे पण त्या मरणाची तयारी आपण स्वतःच का करा,सरणावर जायची एवढी घाई अन पुंगी वाजवून तो कोरोना नावाचा साप का घरात घुसवून घ्या.
त्यामुळे अतिशहानपणा न करता आयुष्यात कधी तुम्हाला बाहेर पडायला अन खरेदीला जाण्याची संधी मिळालीच नाही असं वागता गपगुमान घरात रहा,आज काही दिवस घरात राहिलात तर या जगात रहाल नाहीतर चांगला होता म्हणायला सुद्धा लोक धजवणार नाहीत,कारण या अशा काळात जर तुम्ही मेलात तर हाताने मस्ती केली ,जाऊ नको,फिरू नको म्हणत होते तरी गेला अन जीवाला मुकला असच लोक बोलतील अन ती वस्तुस्थिती असेल,म्हणून च नम्र विनंती आहे की या संकटकाळात बाहेर पडून आपल्यासोबतच कुटुंब आणो देशवासीय यांचे प्राण धोक्यात घालण्यापेक्षा घरी रहाणं प्रशासन आणि शासनाला सहकार्य करा .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...