मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

जो बिकता है वो दिखता है .........!

 




जो बिकता है वो ही दिखता है .............!

साधारणपणे दिड शतकापूर्वी म्हणजे 1832 मध्ये आराठी वृत्तपत्र सुरू करण्याचा प्रयोग आदरणीय बाळशास्त्री जांभेकर यांनी केला तेव्हा त्यांचा हेतू उदात्त असाच होता,मात्र आज पत्रकारितेच्या नावाखाली जो धंदा मांडला गेला आहे तो पाहिल्यावर त्यांना देखील आपल्या कृतीचा पश्चाताप होत असेल हे निश्चित .वर्तमानपत्र असो की वृत्तवाहिन्या सगळ्यांनीच कमरेच सोडून डोक्याला गुंडाळत कोण किती खालची पातळी गाठू शकतो याची जणू स्पर्धाच लावली आहे .त्यामुळे पत्रकारितेचा स्तर खालावत चालला आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही .आजकालच्या काळातील मोठं मोठ्या शहरातील पत्रकारिता ही राजकारणी किंवा कॉर्पोरेट हाऊस ची बटीक बनल्याचे चित्र आहे,आजच्या दर्पणदिनी तरी हे मान्य करून त्यात थोडाफार बदल करण्याचा प्रयत्न झाल्यास ही एक चांगली सुरवात ठरेल हे निश्चित .
साधारणपणे नव्वदच्या दशकात दुरचित्रवाहिन्या भारतात सुरू झाल्या अन गेल्या वीस वर्षांपासून भारतात शेकडो न्यूज चॅनेल अर्थात चोवीस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या सुरू झाल्या .चोवीस तास दळण दळायच म्हणल्यावर काही ना काही तरी द्यावच लागणार हे ओघाने आलंच, मात्र अलीकडच्या पाच सात वर्षात या वृत्तवाहिन्यांचा दर्जा इतका घसरला आहे की नको ते प्रेक्षकांच्या माथी आपण मारत आहोत याचा विसर त्यांना पडतो .टीआरपी च्या जीवघेण्या स्पर्धेत या वाहिन्यांनी कमरेच सोडून डोक्याला गुंडाळून ठेवलं आहे .टीआरपी साठी जो बिकता है वो ही दिखता है असच काहीसं सध्या तरी चालू आहे किंवा जो बिक सकता है वो ही दिखावो अस धोरण या वाहिन्यांनी स्वीकारलं असल्याचं लाजिरवाणे चित्र सध्या दिसून येत .
गेल्या वीस वर्षापेक्षा जास्त काळापासून मी पत्रकारितेमध्ये आहे .सुरवातीला प्रिंट मीडिया मध्ये काम केल्यानंतर तब्बल पंधरा वर्षे मी वृत्तवाहिनी मध्ये काम केलं,मात्र जो अनुभव आला तो निराश करणारा आहे असेच आज म्हणावं लागेल .अर्थात पत्रकारिता ही समाजोपयोगी होती याचा विसर अलीकडच्या काळात पडल्यामुळे प्रचंड निराशा निर्माण झाली आहे .
डॉ बाबासाहेब आंबेडकर असोत की टिळक आगरकर गोखले ,अगदी बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासूनचा इतिहास पाहिला तर पत्रकारिता हा धर्म आहे अस मानलं गेलं,मराठवाडा दैनिकात स्व अनंत भालेराव उर्फ अण्णा यांनी आणीबाणीच्या काळात विरोध म्हणून संपादकीय न छापता तो कॉलम पूर्णपणे ब्लॅक अर्थात काळा छापला होता .आपल्या शब्दलाच काय पण एका काळ्या शाईला सुद्धा किती मोठी किंमत असू शकते हे त्यावेळी अण्णांनी दाखवून दिले होते .मात्र अलीकडच्या काळात पत्रकारिता म्हणजे धंदा झाली आहे .
आर्थिक उदारीकरणाचा स्वीकार आपण केला अन या वृत्तवाहिन्या आपल्या मानगुटीवर बसल्या .बर यात प्रिंट मीडियाचा गळा घोटला जाईल असं वाटत होतं मात्र प्रिंट मीडियाने देखील आपलं रुपडं कालानुरूप बदललं आणि मथळ्याची, हेडलाईनची ,पहिल्या पानांची जागा जाहिरातीच्या पानांनी घेतली अन गंदा है पर धंदा है ही म्हण मीडियामध्ये सुद्धा लागू झाली .
प्रिंट मिडियामध्ये काही बंधने असल्याने थोडा विश्वास बाकी आहे मात्र इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये मात्र फक्त अन फक्त धंदा बघितला जातो हे वारंवार समोर येत आहे.
चोवीस तास बातम्या दाखवायच्या म्हणून कुकरी शो पासून ते ट्रॅफिक अपडेट पर्यंत अनेक विषय या वाहिन्यांनी हाताळले .नाटक,सिनेमा, साहित्य,डिबेट शो,आरोग्य,कॉलेज कॅम्पस,क्रीडा,क्राईम ,धर्म असे एक ना अनेक विषय अर्धा अर्धा तास लोकांच्या माथी मारले जाऊ लागले .कोणतीही नवी असो की जुनी वृत्तवाहिनी बातम्या त्याच त्याच असतात मात्र आमच्याकडे सर्वात आधी आहे अस म्हणून गळे फाडून प्रत्येक जण सांगत असतो .लोकांना काय हवे आहे,त्यांना काय द्यायला पाहिजे यापेक्षा या वाहिन्यांच्या एसी रूममध्ये लाखो रुपयांचा गलेलठ्ठ पगार रिचवणारे तथाकथित संपादक अन त्यांचे बगलबच्चे हे आपली अक्कल पाजळत लोकांचा जीव घेण्याचा कायम प्रयत्न करत असतात .
काडीची अक्कल नसलेले अन कवडीची किंमत नसलेले लोक संपादक म्हणून आपला कंडू जिरवण्यात धन्यता मानतात .देशासमोरील अनेक प्रश्न आ वासून उभे असताना हे दीड शहाणे संपादक अन त्यांचे चव्वे पावभाजी किंवा पार्थ पवार,सुशांतसिंग राजपूत,श्रीदेवीचा मृत्यू असे विषय चघळत बसलेले असतात .
गेल्या आठ महिन्यात कोणतीही वृत्तवाहिनी सुरू केली की त्यावर कोरोना बाबत नको त्या अतिरंजित बातम्या दिसून येतात .अनेकांनी तर या बातम्यांमुळे कोरोनाची भीती वाढल्याचे टिपण केले आहे .मात्र कोण काय म्हणतो ,काय नाही,आम्हाला काही देणंघेणं नाही,आम्ही आमचा दुकानं चालवणार अस या लोकांनी ठरवलेलं असतं .अन ते कार्य ते अव्याहतपणे सुरू ठेवतात .
कोरोनाच्या अगोदर महाराष्ट्रात सरकार स्थापणेवरून जो काही रातचा गोंधळ सुरू होता त्यावर वाहिन्यांनी जे वृत्तसंकलन केले ते किळसवाणे होते .कोण कुठं गेला,काय बोलला,कुठून निघाला इथपासून ते कोणाला परसाकड लागली हे सांगायला सुद्धा या वाहिन्यांनी माग पुढं पाहिलं नाही .त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अक्षरशः काही पत्रकार (?) यांना तुम्ही अशाप्रकारे आमचा पाठलाग करणार असाल तर मला तुमच्या वरिष्टना बोलावं लागेल,आम्हला जगू द्या अन काही घडलं तर आम्ही कळवू पण हा पिच्छा करणं थांबवा अस सांगावं लागलं होतं यातच सगळं आलं .आपण काय दाखवतोय,लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे याचा हे लोक कधीच विचार करीत नाहीत हे मी जवळून पाहिलं आहे .काही वर्षांपूर्वी मुंबई वरून एका स्पेशल स्टोरीसाठी आलेल्या एका सहकाऱ्याने मला विचारलं होत की  "तुम्हारे बीड मे कुछ धमाकेदार नही होता क्या,कुछ एक्सक्लुसिव्ह चाहीये,"मी सांगितले की जिल्ह्यात सहा महिने पाच लाख लोक स्थलांतरित होतात ,त्यांच्या समस्या बाबत स्पेशल अर्धा तासाची स्टोरी होऊ शकते,तेव्हा दिलेलं उत्तर मला आजही स्मरणात आहे ."टीव्ही चॅनेल पर जो बिकता है वो दिखता है"कुछ धमाकेदार होगा तो जायेगा नही तो नही जायेगा .
मी डोक्याला हात लावून घेतला,काय करणार दुसरं,इथं लोकांचे प्रश्न,त्यांच्या दैनंदिन अडचणी ,बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत कोणाला काही देणंघेणं नाही .श्रीदेवी चा मृत्यू झाला तेव्हा एका वृत्तवाहिणीच्या पत्रकाराने ती ज्या बाथ टबमध्ये शेवटच्या क्षणी होती तशा अवस्थेत बाथ टब मध्ये झोपून बातमी दिली होती .विशेष म्हणजे तब्बल 72 तासापेक्षा जास्त काळ त्या चॅनलने दुसरी कोणतीच बातमी दाखवली नाही .
कोरोनाच्या काळात सुद्धा वाहिन्यांनी जो बाजार मांडला तो पाहून कोरोना सुद्धा विचारात पडला असेल की आपण खरच एवढे भयावह आहोत का .सिनेसृष्टीत दबदबा असणाऱ्या अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यानंतर सुद्धा वृत्तवाहिन्यांनी जो काही अतिरेक केला तो अनाकलनीय होता .अमिताभ ला कोरोना झाला तर तो मोठा कोरोना अन चार महिन्यात राज्यात 130 पेक्षा जास्त पोलीस बांधव आणि 15 ते 20 पेक्षा जास्त डॉक्टर लोकांचा मृत्यू झाला तर तो कोरोना चिल्लर असच चित्र वाहिन्यांनी उभं केलं .कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असताना काही वृत्तवाहिन्यांचे सो कोल्ड संपादक आणि अँकर ओरडू ओरडू आणि घसा ताणून सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आपले गळे फाडत बसल्याचे चित्र मनाला विषण्ण करणारे आहे .
मी स्वतः या मीडियामध्ये काम केलं आहे मात्र मीडिया किंवा पत्रकारितेचे काही इथिक्स आहेत याचा कधी विसर पडू दिला नाही .चार महिने कोरोनाबाबत गळे फडणारे अन सुशांत प्रकरणात नको तेवढा इंटरेस्ट घेणारे हे चॅनेल चे पत्रकार राममंदिर भूमीपूजनाच्या दिवशी किंवा चीनने भारताच्या सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यावर किंवा  इतर वेळी कोरोना सुट्टीवर असल्यासारखे वागले .
देशाच्या दृष्टीने महत्वाची असेल अशा घटनेवर कितीही दिवस पाठपुरावा केला तरी काही वाटत नाही मात्र केवळ कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून किंवा कोणाची तरी मर्जी राखायची म्हणून कमरेच सोडून डोक्याला गुंडाळायच याला काय म्हणणार .आम्ही जे दाखवतो तेच सत्य आहे अन आम्ही म्हणू तसच तुम्ही करा असा जो अट्टाहास या वाहिन्यांवरून सुरू आहे तो किळसवाणा आहे .गेल्या चार महिन्यात देशात आर्थिक संकट निर्माण झालं,बेरोजगारी वाढली,अनेक कंपन्या बंद झाल्या ,शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत .मात्र याच्याशी या वाहिन्यांवर वटवट करणाऱ्यांना काहीच देणंघेणं नाही .
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात जो काही नंगानाच या काही लोकांनी चालवला तो पाहून कदाचित सुशांत स्वतः खाली येऊन आता बास करा अन दुसरे विषय लोकांसमोर मांडा अस म्हणला नाही म्हणजे मिळवलं .दूरचित्रवाणी संच जेव्हा भारतात लॉन्च झाला तेव्हा त्याला इडियट बॉक्स म्हणलं गेलं होतं ते आज खर होताना दिसत आहे .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...