रविवार, ११ डिसेंबर, २०१६

अन प्रिडिक्टेबल पवार

अनप्रिडिक्टेबल पवार !

मागील पन्नास वर्षापेक्षा जास्त राजकारणाचा अनुभव असलेले राज्यातील जे थोडे बहुत राजकारणी आहेत त्यात सर्वात जेष्ठ असा मान असणारे आहेत ते म्हणजे शरद पवार,1967 सालापासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले नाव म्हणजे शरद पवार.आमदार पदापासून ते केंद्रात मंत्रीपदापर्यंत सर्व पदांचा अनुभव घेणाऱ्या या लोकनेत्याला आजही एकच सल असेल ती म्हणजे देशाचे पंतप्रधान पद त्यांना मिळू शकले नाही.अडीच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींचा देशपातळीवर उदय झाल्यानंतर पासून काहीशे अस्वस्थ असणाऱ्या पवारांनी सध्या राज्याच्या राजकारणात विशेष लक्ष घातले असल्याचे दिसते,सध्याचे राजकीय वातावरण पाहता पवारांनी बुद्धिबळाचा डाव मांडून ठेवलाय यात त्यांची चाल यशस्वी होते की पुन्हा एकदा त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.एक मात्र नक्की आहे की पवारांनी डाव टाकला असून ते सत्ताधार्यांना चितपट करण्यासाठी कामाला लागले आहेत.
 घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी अशा पद्धतीने शरद पवार 1985 ते 2014 पर्यंत अनेकवेळा केंद्रीय राजकारणात गेले मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक वेळा ते राज्यात परत आल्याचा इतिहास आहे,वसंत दादांच्या सरकारला हादरा देऊन पवारांनी केलेला पुलोद चा प्रयोग असो की 1987 मध्ये केलेले बंड असो शरद पवार इज ए अन प्रिडिक्टेबल पॉलिटीशियन असं आजही म्हटलं जातं.
पवारांना जे अगदी जवळून ओळखतात ते आजही त्यांच्या मनात काय सुरु आहे,ते कधी काय करतील,कधी कोणाचा गेम (राजकीय) हे सांगता येत नाही असं म्हणतात. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर तिनपेक्षा अधिक वेळा विराजमान होण्याचा मान जसा पवारांना आहे तसाच काँग्रेस ला देखील अनेकवेळा आस्मान दाखवण्याचा मान हि त्यांनाच आहे.पवारांनी वेळोवेळी काँग्रेस विरुद्ध बंड करून आपलेच हित साधल्याचा त्यांच्यावर आरोप होतो तो काही अंशी खरा देखील आहे.1978 चा पुलोद चा प्रयोग असो की 1987 मधील एस काँग्रेस चा विषय,पवारांनी प्रत्येक वेळी आपल्या पदरात काय पडते याकडेच लक्ष दिल्याचे दिसते .
1999 साली पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादीची स्थापना केली मात्र लगेच राज्यात काँग्रेस बरोबर आघाडी करीत  सत्तेचा सोपान चढला,लगोलग त्यांनी केंद्रात देखील आपल्याकडे मंत्रिपद घेण्यात यश मिळवले.
शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात अनेकांना पद दिली,मानसन्मान दिला,लक्ष्मण माने असोत कि लक्ष्मण ढोबळे किंवा ना धो महानोर अथवा जनार्दन वाघमारे अशा कितीतरी अभ्यासू,हुशार लोकांना त्यांनी सभागृहाचा मार्ग दाखवला,शेती असो की सहकार या क्षेत्रात पवारांनी आभाळाएव्हढं काम करून ठेवल आहे हे नक्की .सहकार चळवळीचा पाया भक्कमपणे राज्यात विस्तार करण्यात पवारांचा सिंहाचा वाटा आहे याबाबत कोणी शंका घेणार नाही,दीर्घकाळ सत्तेत राहिल्याचाही हा परिपाक असू शकतो मात्र त्यालाही दानत लागते जी पवारांमध्ये निश्चित आहे हे नक्की .
शरद पवार यांनी एखाद्याचे तोंड भरून कौतुक केले किंवा एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला तर त्याचा कार्यक्रम झाला असे लोक चेष्टेने म्हणतात ,कदाचित ते पवार यांच्या न समजणाऱ्या स्वभावामुळे असावं .कारण पवार कधी  कोठे कसा कोणाचा गेम करतील ते सांगणे कठीण आहे .एकीकडे भाजप च्या विरोधात दंड थोपटणारे पवार बारामती मध्ये नरेंद्र मोदींना पायघड्या घालताना बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या ,अनेकांनी तेव्हा पवार यांचा आता थेट राष्ट्रपती पदावर डोळा असल्याचं म्हटलं होत . पवार सत्तेत असोत कि नसोत त्यांचा शब्द अंतिम असतो हे अनेकांनी अनुभवले आहे .मात्र हेच पवार फार काळ सत्तेबाहेर राहू शकत नाहीत असा देखील अनेकांचा अनुभव आहे .
शरद पवार हे अजातशत्रू नेतृत्व आहेत हे त्यांनी अनेकवेळा दाखवून दिले आहे,राज्याच्या बाहेर हि त्यांनी देवेगौडा असोत कि ममता अथवा लालू प्रसाद यादव किंवा नितीशकुमार यांच्याशी कायम सख्य ठेवले आहे त्यामुळेच केंद्राच्या राजकारणात त्यांचा कायम दबदबा राहिलेला आहे,पवार यांनी राज्यात देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मैत्रीचे बंध कायम जपले आहेत हे सर्वश्रुत आहे .एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी स्नेह जपणारे पवार हे त्याचं वेळी नागपुरात जाऊन नितीन गडकरी यांच्याशी देखील मैत्री जपताना महाराष्ट्राने पाहिले आहे .त्यामुळे पवार कोणाशी कधी कसे वागतील आणि कोणाशी त्यांची मैत्री जमेल याबाबत सांगणे कठीण आहे . " एक बार उपर वाले के दिल में क्या है यह बताया जा सकता है किंतु पवार साहब के दिल में क्या है यह बताना मुश्किल है  " असं जाणकार म्हणतात .ते अगदी खरं आहे .
गेल्या दोन वर्षात राज्यातील देवेंद्र सरकार चा कारभार पाहता काय करावे हा यक्ष प्रश्न पडलेले पवार मध्येच पेशवे आणि छत्रपती यांच्याबाबत बोलून राजकारणात काही घडते का याचा अंदाज घेताना दिसतात तर मध्येच राज्यभर निघणारे मराठा मोर्चे हे सरकार विरोधातील असंतोष असल्याचे सांगून सरकार ला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात .
पाऊणशे वयोमान पार केलेल्या पवारांना हे बोलण्याची किंवा राज्यात पुन्हा लक्ष घालण्याची काय गरज असा प्रश्न अनेकांना पडू शकतो मात्र उत्तर एकच आहे की  " पवार पावर कर बिना नही रह सकते ".ऍट्रॉसिटी रद्द करा म्हणून बोलणारे पवार दुसऱ्याच दिवशी त्यात सुधारणा करण्याचा यू टर्न घेताना दलित समाज आपल्यापासून दूर जाणार नाही याची काळजी घेताना दिसतात . पूर्वी छत्रपती पेशव्यांना जहागिऱ्या वाटायचे आज उलटे होत आहे हे त्यांचे भाष्य असो की  भाजप हा शेटजी भटजींचा पक्ष आहे हे वक्तव्य यातून पवारांना राज्यातील सत्तेवरून देवेंद्र फडणवीस यांना हटवायचे आहे हेच दिसून येते.
कोपर्डी च्या घटनेच्या पार्षवभूमीवर निघणाऱ्या मराठा मोर्चाचे पवारांनी समर्थन करताना सरकार अडचणीत कसे सापडेल याची पुरेपूर काळजी घेतली मात्र त्याच वेळी दलित आणि ओबीसी समाजाने देखील आपल्या अस्तित्वासाठी मोर्चे काढल्याने पवारांचा प्लॅन (राजकीय लाभ घेण्याचा ) फसल्याचे चित्र आहे .
राज्यात पूर्वीपासून मराठा समाजाचे स्व शंकरराव चव्हाण यांच्यापासून ते   विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेक मराठा नेते झाले ,आहेत मात्र महाराष्ट्र आणि मराठा समाज म्हटलं की शरद पवार यांचेच नाव समोर येते .त्याच शरद पवार यांनी यावेळी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात लक्ष घातले आहे,सारीपाटाचा डाव टाकला आहे आता त्यात ते कोणत्या प्याद्याचा वापर करून कोणत्या नेत्याला अडचणीत आणतात कि पुन्हा एकदा नवा डाव मांडतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे .
एकवेळ सागराचा तळ समजू शकतो किंवा आभाळाची उंची मोजता येईल मात्र शरद पवार यांच्या मनाचा थांग पत्ता लागणे कठीण आहे अशा या  महान व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
लक्ष्मीकांत रुईकर,झी मीडिया रिपोर्टर ,बीड
9422744404

बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

अम्मा..........!

अम्मा.........!

भारत हा लोकशाही प्रधान देश आहे हे खरे असले तरी या देशात व्यक्तिपूजा देखील मोठ्या प्रमाणात केली जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत,देशातील जनतेने आपल्या लाडक्या नेत्यांना एक सन्मान म्हणून टोपणनावाने उपाधी दिल्याचे अनेक वेळा दिसून आले,मोहनदास करमचंद गांधी यांना बापू हि उपाधी देणे असो की बाळ गंगाधर टिळक यांचे लोकमान्य हे नाव असो अथवा विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्यवीर असो तेव्हा पासून सुरु झालेला हा सिलसिला आजही कायम आहे .महाराष्ट्रात सुद्धा अनेकांना जाणता राजा,दादा,भैय्या,अण्णा,तात्या,साहेब अशा नावाने संबोधले जाते मात्र त्यांचा आवाका हा त्या त्या राज्यापुरता किंवा पक्षा पुरता लिमिटेड राहिल्याचे आपण सर्वांनीच पाहिले आहे मात्र याला अपवाद ठरल्या आहेत त्या जे . जयललिता अर्थात अम्मा.1983 पासून ते 2016 पर्यंत आपल्या राजकीय प्रवासात जयललिता यांची ओळख देशभर अम्मा या नावानेच झाली.
रील लाईफपासून ते रियल लाईफपर्यंत चा अम्मा चा प्रवास थक्क करणारा असाच आहे,वयाच्या सोळाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या जयललिता यांनी तब्बल 140 पेक्षा अधिक तामिळ चित्रपटातून काम केलं,तामिळनाडू जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जयललिता या एमजी रामचंद्रन यांच्या मुळेच चित्रपट क्षेत्रात आणि नंतर राजकारणात यशस्वी झाल्या.
1984 साली सर्वात प्रथम राज्यसभेवर निवड झालेल्या जयललिता या कधी तामिळनाडू च्या जनतेच्या अम्मा झाल्या हे त्यांनाही कळले नाही,एमजीआर यांच्या निधनावेळी अपमानित व्हावे लागलेल्या जयललिता यांनी आपल्या आयुष्यात एमजीआर यांनाच आपले गुरु मानले.
एमजीआर यांच्या नंतर एआएडिएमके ची सूत्र जयललिता यांच्याकडे आली मात्र त्यांना तामिळनाडू विधानसभेत अपमानित करून बाहेर काढले गेले तेव्हाच या महिलेने शपथ घेतली की आता येथे मुख्यमंत्री म्हणूनच प्रवेश करायचा आणि अवघ्या काही वर्षात त्या मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्या,आपल्या 37 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री पद भूषवल .
तामिळनाडू च्या जयललिता यांचा जन्म ब्राह्मण अय्यर कुटुंबात झाला होता,तामिळनाडू राज्याला द्रविड  संस्कृती ची पार्श्वभूमी आहे म्हणजे येथे नास्तिक लोकांचा प्रभाव जास्त होता मात्र अशा परिस्थितीत जयललिता यांनी या भागात आपला प्रभाव वाढवला नव्हे चार दशकं कायम ठेवला,मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी ज्या योजना तयार केल्या त्या लोककल्याणकारी होत्या,अम्मा मिनरल वॉटर,अम्मा कँटीन,अम्मा मोबाईल अशा एक ना अनेक योजना मधून त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात घर केलं . जनतेच्या मनावर आपल्या व्यक्तिमत्वाचे गारुड कायम करणाऱ्या अम्मा यांना उत्पनापेक्षा जास्त संपत्ती जमविल्याच्या आरोपावरून कारागृहात देखील जावे लागले ,त्यावेळी जयललिता यांच्याकडे पडलेल्या छाप्यात एक दोन नव्हे तर दहा हजार साड्या, पंचवीस किलो सोने,हिरे,जवाहिर सापडले होते मात्र  यावर मात करीत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर कब्जा केला,
आज देशात अनेक मोठे नेते आहेत,अनेक राज्यात मोठं मोठे पक्ष आहेत मात्र अम्मा एकमेवाद्वितीय म्हणाव्या लागतील,38 लोकसभा जागा पैकी तब्बल 36 जागा जिंकत त्यांनी मोदी लाटेत देखील आपला गड 2014 मध्ये कायम ठेवला होता,त्याला कारण त्यांचे जनतेप्रति असलेलं प्रेम आहे हे नक्की.जयललिता या कारागृहात असताना तत्कालीन मुख्यमंत्री पनिरसेलवम यांनी त्यांच्या खुर्चीवर न बसता कारभार पाहिला होता.
एक विशेष बाब म्हणजे आजपासून तीस वर्षांपूर्वी जेव्हा एमजीआर हे अपोलो रुग्णालयात होते तेव्हा जयललिता यांनी केंद्राला साकडे घालून उपचारवर लक्ष देण्याची मागणी केली होती,"हिस्ट्री रिपीट अगेन्स्ट"असं जे म्हणतात ते अम्मा च्या बाबतीत तंतोतंत खरं ठरलं आहे,सप्टेंबर महिन्यात जेव्हा अम्मा अपोलो रुग्णालयात दाखल झाल्या तेव्हा त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक वावड्या उठल्या तेव्हा जयललिता यांच्या विश्वासू शशिकला यांनी केंद्राला साकडे घातले आणि केंद्राने या प्रकरणात लक्ष घातले.
एकीकडे देशात भाजप,काँग्रेस या सारख्या पक्षांचा बोलबाला असताना तामिळनाडू मध्ये मात्र जयललिता यांनी आपली पकड मजबूत केली होती,देशात आजपर्यंत कोणत्याही पक्षात एवढी व्यक्तिपूजा पाहायला मिळाली नसेल जेवढी तामिळनाडू मध्ये दिसते.इथं सरकार अम्मा,प्रशासन अम्मा,जनजीवन अम्मा असच चित्र पाहायला मिळतं. आपला लाडका नेता रुग्णालयात असताना लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उत्तरल्याचे चित्र फक्त तामिळनाडू मध्येच दिसू शकते,तामिळनाडू मधील लोक कोणत्याही बाबतीत खुपचं इमोशनल आहेत हे दिसून येते मग तो सुपरस्टार रजनीकांत असो की जया अम्मा, जनतेने आपले आयकॉन कोण असावेत आणि ते कसे असावेत हे दाखवून दिलं आहे,
"कौण कहता है के आस्मान में छेद नही हो सकता एक पत्थर तो तबियत से उच्छलो यारो " या प्रमाणे जयललिता यांच्या साठी कोणतीही गोष्ट अशक्य नव्हती,शिकून वकील व्हायचं ठरवणाऱ्या जयललिता यांना अचानक सगळं सोडून सिनेक्षेत्रात यावं लागलं त्यानंतर राजकारणातील त्यांचा प्रवेश देखील इच्छेविरुद्ध असाच होता मात्र त्यांनी येथेही आपली छाप सोडली, राजकारणात महिला यशस्वी होत नाहीत ,त्यांना पुरुषांच्या कुबड्यांचा आधार घ्यावाच लागतो हा इतिहास आहे मात्र हा इतिहास जयललिता यांनी खोटा ठरविला, एक महिला असतानाही त्यांनी तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री पद भूषवल आणि एवढंच नव्हे तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या पासून ते नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत सगळ्यांशी त्यांनी सलोख्याचे संबंध कायम ठेवले,वाजपेयी सरकारला पाठिंबा देण्यावरून वादात सापडलेल्या जयललिता यांनी अचानक पाठिंबा काढून घेत सर्वानाच धक्का दिला,
राजकारण हे चांगल्या माणसाचं काम नाही असं म्हणत नाकं मुरडनाऱ्या व्हाईट कॉलर लोकांसाठी जयललिता यांनी एक आदर्श निर्माण केला आहे,जनकल्याण करायचे असेल तर माध्यम म्हणून राजकारण सुद्धा चालू शकते हे त्यांनी दाखवून दिलं.लोकनेता हा एका दिवसात तयार होत नसतो तर त्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या करावी लागते,त्याग करावा लागतो,समर्पण करावे लागते आणि त्यानंतरच एखादीच जया शतकात तयार होत असते आणि त्यामुळेच रुपेरी पडद्यावरील हि जया करोडो लोकांची अम्मा होऊ शकते.

लक्ष्मीकांत रुईकर,बीड 9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...