मंगळवार, २ एप्रिल, २०१९

जातीयवादावर विकास वरचढ ठरणार !


ज्या बीड जिल्ह्याने रखमाजी गावडे यांच्यापासून ते केशरकाकू क्षीरसागर यांच्यापर्यंत अनेकांना त्यांची जातपात न पाहता लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याच बीड जिल्ह्यात आज जातीयवादाच भयानक विष पेरलं जात असल्याचे चित्र आहे, आपल्या जातीचा उमेदवार अस सर्रास सांगून ग्रामीण आणि शहरी भागात प्रचार सुरू आहे,एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार होणार असेल तर लोकशाही भविष्यात जिवंत आणि सुदृढ राहील का असा प्रश्न निर्माण होत आहे . सत्ताधारी असोत की विरोधक कधीही हा अमुक जातीचा तो तमुक जातीचा अस म्हणून लोकांची काम अडवत नाहीत ,प्रसंगी आपल्या जातीचा म्हणून काही लोक फेवर करीत असतील मग निवडणुकीतच का जात आठवते हे न उलगडणारे कोडे आहे.जातीयवाद काय असतो हे सध्या बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे मात्र त्यासाठी कान आणि डोळे उघडे असणे आवश्यक आहे .

जात नाही ती जात असं म्हणल जातं , कारण नको त्या ठिकाणी माणसाला जात आठवते किंवा जात दाखवायची सवय असते,विशेषतः निवडणुकीच्या काळात ही जात जास्तच प्रकर्षाने जाणवते नव्हे प्रदर्शित केली जाते.निवडणूक मग ती ग्रामपंचायत ची असो किंवा विधानसभा ,लोकसभेची ,प्रत्येकवेळी उमेदवार,त्याच शिक्षण,त्याचं भाषण कौशल्य,त्याची विकासाची भूमिका याकडे दुर्लक्ष करून लोक जातीचा विचार करतात तेव्हा लोकशाही आहे यावरील विश्वास डळमळीत होतो ,सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून बीडसह बहुतांश ठिकाणी जातीय समीकरणावरच भर दिला जात असल्याच चित्र आहे .यावर मतदारांनी लक्ष दिलं पाहिजे हे नक्की .

लोकसभेचा रणसंग्राम जाहीर झाला अन लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात प्रत्येक पक्ष जोशात मैदानात उतरला असल्याचं दिसून येत आहे .राज्यात बहुतांश ठिकाणी दुरंगी किंवा तिरंगी लढती असल्याचं चित्र आहे,भाजप सेना युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी यांच्यात प्रमुख लढत दिसते आहे,काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ने तगडे,लोकसंग्रह असलेले उमेदवार दिल्याने लढत रंगतदार होणार यात शंका नाही .बीड जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी विद्यमान खासदार डॉ प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यातच प्रमुख लढत असल्याचं चित्र आहे .

निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा किंवा वचननामा जाहीर करून मोठं मोठी आश्वासन देतो मात्र प्रचाराच्या काळात मुद्यावरची निवडणूक कधी जातीवर येते हे मतदारांच्या सुद्धा लक्षात येत नाही .बीड जिल्ह्यात एकीकडे पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासावर बोलत असताना विरोधक मात्र जिल्हा भकास केल्याची टीका करीत असताना दिसत आहेत .
आगामी काळात जिल्ह्यात मोठं मोठे प्रकल्प,उद्योग,शैक्षणिक संस्था कशा आणता येतील यावर बोलण्याऐवजी एकमेकांची उणी दुणी काढण्यात पुढारी मग्न असल्याचे चित्र आहे .जातीयवादातून राष्ट्रवाद धोक्यात येऊ शकतो याची फिकीर नसल्याचे दिसत आहे .विशेषतः पंकजा मुंडे यांच्यावर जाणीवपूर्वक मराठा विरोधी असल्याचं चित्र निर्माण केले जात आहे ज्यात फारसं तथ्य नसल्याचं दिसत कारण त्यांनी जातीयवाद केला असता तर वंजारेत्तर गावात विकासकामे किंवा निधी पोहचलाच नसता,आज जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून रस्ते,पाणी,शासकीय इमारती यांची कामे होताना दिसत आहेत,तरीदेखील त्यांच्याबाबत जी ओरड होते आहे ती राजकारणाचा दर्जा किती खालावला आहे याचेच द्योतक आहे .

स्व गोपीनाथ मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळात देखील जातीयवाद पसरवून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न झाला होता आणि यावेळी देखील तोच प्रयत्न असल्याचे दिसत आहे .मात्र मागच्यावेळी सुज्ञ मतदारांनी जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती हे विसरून चालणार नाही . बीड जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी मराठा आणि वंजारी असा जातीभेद दरवेळी निर्माण केला जातो हे जाणवत.कोणत्याही जातीचे लोक एकाच पक्षात असतात असे नाही आणि जातीचा म्हणून पक्षभेद विसरून सगळे एकत्र आल्याचे देखील उदाहरण नाही.पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हे दोघे दोन वेगवेगळ्या पक्षात मोठ्या पदावर कार्यरत आहेत .त्यामुळे अमुक एक समाज आमच्याच पाठीशी आहे असा दावा कोणी करण्याची गरज नाही .

राज्यात सर्वाधिक आमदार हे मराठा समाजाचे आहेत मात्र ते एकाच पक्षात आहेत असे नाही,त्यामुळे सध्या बीड जिल्ह्यात जे चित्र निर्माण केले जात आहे त्यात फारसे तथ्य नसल्याचेच जाणवते .राष्ट्रवादी म्हणजे मराठ्यांचा पक्ष आणि भाजप म्हणजे शेटजी भटजी चा पक्ष असे आता राहिलेले नाही.मात्र निवडणूक जिंकायची असेल तर जातीय गणितं हमखास पाहिली जातात हे स्पष्ट आहे .तसे नसते तर संभाजी महाराज यांची भूमिका करणाऱ्या डॉ अमोल कोल्हे यांच्या जातीची चर्चा झालीच नसती किंवा आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागले आहेत असे विधान पन्नास वर्षे राजकारणात असलेल्या शरद पवार यांनी केलेच नसते .

बीड जिल्ह्यातील मतदारांनी कधीच उमेदवारांची जात पाहून मतदान केलेलं नाही अन्यथा अत्यल्प समाज असलेल्या केशरकाकू तीन वेळा बीडच्या खासदार झाल्याचं नसत्या किंवा मारवाडी समाजाचे द्वारकदास मंत्री कधीच खासदार झाले नसते .याच बीड जिल्ह्याने गंगाधर अप्पा बुरांडे यांना तसेच रखमाजी गावडे यांना सुद्धा लोकसभेत पाठवलं आहे .

अलीकडच्या काळात मात्र जातीयवादाच बीज जाणीवपूर्वक पेरलं जात असल्याच चित्र आहे .मुंडे विरुद्ध आडसकर असो की मुंडे विरुद्ध धस या दोन्ही निवडणुकीत मराठा वंजारा वाद निर्माण केला गेला,त्याचा फायदा त्या त्या पक्षांना किती झाला हे सर्वश्रुत आहे .यावेळी देखील हळूहळू जातीय स्वरूप निवडणुकीला दिल जात असल्याच दिसून येत आहे .त्यात सोशल मीडियाची भर पडल्याने वातावरण अधिकच गढूळ होणार अशी शक्यता आहे .कदाचित त्यामुळेच पालकमंत्री पंकजा मुंडे यांना विकास करताना आम्ही जात पाहिली नाही मग मतदान करताना जात का पाहिली जाते असा प्रश्न पडला असावा .पंकजा यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण केल्याचं अनेकवेळा दिसून आलं आहे,मात्र निवडणुकीत बोलायला मुद्दे नसले की समोरच्या उमेदवाराला जातीच्या चौकटीत कसं बसवायचं हे बीडमधल्या काही राजकीय  मंडळींना चांगलच माहीत आहे,त्याचाच वापर सध्या सुरू असल्याचे दिसतं .
मात्र पंधरा वीस वर्षांपूर्वी जसे जातीचे ठेकेदार होते तशी परिस्थिती आज नक्कीच नाही,आज कोणीही छातीठोकपणे माझ्या मागे इतका समाज आहे असे सांगू शकत नाही,तरीदेखील सध्या उमेदवाराची जात हा विषय विशेष चर्चेचा असल्याचे चित्र आहे .

बीड जिल्ह्यात भाजपचे जे सहा आमदार आहेत त्यातील आर टी, धस आणि पवार हे तिघे ही मराठा समाजाचे आहेत तरी देखील या समाजावर अन्याय झाला असे म्हणणे योग्य आहे का ? नक्कीच नाही तरीदेखील काही लोक जाणीवपूर्वक जातीयवाद पसरवून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत,अशा प्रचारापेक्षा विकास,नवनवीन प्रकल्प,उद्योग याबाबतीत चर्चा व्हायला हवी असे वाटते .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...