सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

शब्दावाचून कळले सारे .............!



शब्दावाचून कळले सारे ..........!
भरतनाट्यम म्हणजे भाव ताल आणि रागाचा संगम,यामाध्यमातून दक्षिणेत ही कला जोपासली गेली,भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित असलेली ही नृत्यशैली असून या नृत्यपद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे .या नृत्यशैलीच्या माध्यमातून बीडमध्ये एक सांस्कृतिक वातावरण तयार होत आहे,साई नृत्यालयाच्या अनुराधा चिंचोलकर यांनी गेल्या 19 वर्षात ही परंपरा जपली आहे .कोणत्याही संवादाशिवाय मनातले भाव व्यक्त करण्याचं एक उत्तम साधन म्हणजे भरतनाट्यम अस म्हणलं तर वावगं ठरणार नाही .याचा प्रत्यय बिडकरांनी रविवारी अनुभवला .साई नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यनाटिकेद्वारे सर्वांना मंत्रमुग्ध केले .
21 व्या शतकाकडे झेपावणारा भारत देश,संगणकीकरणाचा झालेला विस्फोट,ग्लोबलायजेशनमुळे एक वैश्विक खेड बनत असलेलं जग,मोबाईल,इंटरनेट मुळे घरापर्यंत नव्हे तर बेडरूममध्ये इंग्रजी संस्कृतीचा झालेला शिरकाव पाहता डी जे च्या तालावर बेधुंद होणारी तरुणाई पाहिल्यानंतर भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होऊन परकीय संस्कृतीच आक्रमण पुन्हा होत की काय अशी शंका येते,गणपती असोत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी होणारा धांगडधिंगा पाहिल्यानंतर मन विषन्न होत,मात्र कोणत्याही संवादाविना केवळ हावभाव,नेत्रकटाक्ष,हस्तमुद्रा आणि अप्रतिम पदलालित्य याद्वारे समोरच्यांशी थेट बोलता येत,आपल्या मनातल्या भावना व्यक्त करता येतात आणि ते माध्यम म्हणजे भरतनाट्यम होय .

दक्षिण भारतातून उदयास आलेल्या भरतनाट्यम या नृत्यप्रकाराने आज जगात आपला वेगळा ठसा उमटवला आहे .स्वातंत्र्यपूर्व काळात दादासाहेब फाळके असोत की चार्ली चॅप्लिन यांनी मुकचित्रपटाद्वारे रसिकांचे मनोरंजन केलं,नंतरच्या काळात संवादातून सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना  चित्रपट आणि नाटकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला .या चित्रपटांमध्ये नायक नायिकांच्या प्रेमाची खलबत नृत्य आणि गीताच्या माध्यमातून व्यक्त करण्यास सुरुवात झाली .90 च्या दशकापर्यंत संगीत नाटकांनी देखील रसिकांच्या मनावर गारुड घातलं होत .अलीकडच्या काळात व्यावसायिक रंगभूमीला मोठे महत्व प्राप्त झाल्याने संगीत नाटकांकडे रसिकांनी आणि निर्माता,दिग्दर्शकांनी देखील पाठ फिरवली .
या सगळ्या उलथापालथी मध्ये आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं ते भरतनाट्यम या नृत्यप्रकाराने .
बीडच्या नाट्यगृहात साई नृत्यालयाच्या वतीने आयोजित द्वैवार्षिक कार्यक्रमात जे कलाप्रकार सादर केले गेले ते डोळ्यांचे पारणे फेडणारे होते .
पार्वतीचे वडील राजा दक्ष यांनी आयोजित केलेल्या यज्ञाचे निमंत्रण आपले पती भगवान शंकर यांना नसल्याचे समजल्यानंतर पार्वतीने वडिलांकडे धाव घेऊन जाब विचारला तेव्हा त्या गोसावड्याला,अंगाला राख फासून फिरणाऱ्याला मी निमंत्रण देणार नाही अस सांगत दक्ष राजाने पार्वती आणि शंकर यांचा अवमान केला,क्रोधीत झालेल्या पार्वतीने यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली ,ही वार्ता भगवान शंकरांना समजल्यानंतर त्यांनी तांडव करीत उपासना केली अन पार्वती पुन्हा गौरीच्या रुपात प्रकट झाली, ही आख्यायिका साई नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी ज्या सहजपणे सादर केली ती अवर्णनीय होती,कोणताही संवाद नसताना ही नृत्य नाटिका केवळ आपल्या हावभावातून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहचवण्याचं कसब थक्क करणारं होतं .ही नाटिका सादर करणाऱ्या विद्यार्थिनींच जेवढं कौतुक आहे तेवढंच यासाठी मेहनत घेणाऱ्या अनुराधा चिंचोलकर यांचंही आहेच .
या संपूर्ण कार्यक्रमात मुलींनी शारदास्तवन,श्लोकम, शिरोदृष्टी,पुष्पांजली,अलारीपू, मधुराष्ट्कम, पदम,तिल्लना,आडावं असे विविध नृत्य प्रकार सादर केले .हे सगळे नृत्यप्रकार म्हणजे बीडकर रसिकांसाठी मोठी पर्वणीच होती .
कोणताही संवाद नसताना केवळ भावमुद्रा आणि हावभाव याद्वारे रसिकांच्या काळजाला हात घालण्याचा हा प्रकार म्हणजे शब्दवाचून कळले सारे,शब्दांच्या पलीकडले अशी अनुभूती देणारा होता .
भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यप्रकाराबाबत केवळ ऐकून असणाऱ्या श्रोत्यांना देखील या नृत्यसादरीकरणाने खिळवून ठेवले यातच याचे यश सामावले आहे .गेल्या 19 वर्षापासून सौ अनुराधा चिंचोलकर या किती मेहनत घेत असतील अन काय काय द्राविडी प्राणायाम त्यांना घालावे लागत असतील हे दिसून येत होते .अत्यन्त शांत,संयमी कुठलाही बडेजाव पणा अंगी न बाळगता त्या भगवान नटराजाची सेवा  करीत आहेत त्या किती श्रद्धेने करतात हे रविवारी दिसून आले .
आपल्या शिष्याने नाव कमावलं आणि दिलेली शिक्षा प्रत्यक्षात उतरवल्यानंतर गुरूच्या चेहऱ्यावर जो कृतार्थतेचा भाव असतो तो नक्कीच चिंचोलकर ताईंच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला .
या संपूर्ण कार्यक्रमात मनाला भावलं ते सती झाली गौरी ही नृत्यनाटिका,खरोखर हा जो काही प्रकार या मुलींनी सादर केला त्यांना शतशः नमन .मनातल्या भावना व्यक्त करण्याचं संवाद हेच एकमेव साधन नाही तर चेहऱ्यावरील हावभाव,नेत्रकटाक्ष, हस्तमुद्रा याद्वारे तसेच त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी आपल्या मनातल्या भावना पदम च्या माध्यमातून कशा मांडल्या असत्या याच सादरीकरण आणि पदलालित्य एकमेवाद्वितीय असंच होत .त्यामुळेच ते मनाला भावलं अन रसिकांची दाद मिळवून गेलं .शब्दही जिथे अपुरे पडतात किंवा शब्दांची गरज जिथे पडत नाही त्यालाच कदाचित भरतनाट्यम म्हणत असावेत .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड .
9422744404

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

अभाव .....;नियोजनाचा आणि दुरदर्शीपणाचा !



अभाव .....दुरदर्शीपणाचा अन निर्णयक्षमतेचा सुद्धा !

एकीकडं अर्धा मराठवाडा दुष्काळामुळे होरपळत असताना दुसरीकडे सांगली सातारा कोल्हापूर अमरावती यासह तब्बल नऊ ते दहा जिल्हे पुराने वेढले गेले आहेत, हे संकट अस्मानी असलं तरी या संकटाला सरकार देखील तेवढच जबाबदार आहे असं म्हणावं लागेल. कारण योग्य नियोजन आणि योग्यवेळी निर्णय घेण्याची क्षमता दाखवली असती तर आज लाखो हेक्टर जमीन ,लाखो लोक आणि हजारो जनावरांचा जीव मेटाकुटीला आला नसता. बैल गेला आणि झोपा केला ही पद्धत प्रत्येकच सरकारची रूढ झाल्यामुळे बळी जातोय तो सर्वसामान्य गरीब माणसाचा.
महाराष्ट्रातील कोल्हापूर ,सांगली ,सातारा, अमरावती, मुंबई-पुणे या भागात न भूतो न भविष्यती असा पाऊस कोसळला पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला रस्ते नद्या नाले ओढे तलाव जलमय झाले. जिथं नजर जाईल तिथे फक्त पाणी आणि पाणी असंच दृश्य गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळते तर दुसरीकडे बीड ,जालना, औरंगाबाद ,उस्मानाबाद, लातूर अर्धा मराठवाडा दुष्काळाच्या दिशेने वाटचाल करतो आहे,पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने उलटत आले तरी देखील मराठवाड्यातील या चार-पाच जिल्ह्यात पन्नास टक्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अद्यापही बहुतांश ठिकाणी चारा छावण्या आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेली मदत केंद्र सुरूच आहेत. टँकरवर आपली तहान भागवण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे .एकीकडे हे दृश्य असताना दुसरीकडे मात्र पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुराच्या पाण्यात वेढले गेले आहे. हे पुराचं पाणी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे ,लोकांचे संसार उघड्यावर पडले ,पुराच्या पाण्याने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. विशेषतः गेल्या पंचवीस-तीस वर्षांत ज्या सांगलीकरांनी कधीच पूर पाहिला नव्हता त्या सांगलीकरांचे दोन-चार मजल्याची घरं पाण्याखाली आहेत लोक घराच्या छतावर जाऊन गेल्या चार दिवसापासून मदतीची वाट पाहत आहेत, शेतकऱ्याला आवश्यक असलेलं पशुधन अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून जाताना पाहून त्याचं हृदय हेलावल आहे मात्र अशाही परिस्थितीत मदतीसाठी उशिरा आलेले मंत्री-संत्री हे आपल्या अकलेचे तारे तोडताना आणि नको त्या ठिकाणी सेल्फी घेत दाताड काढताना पाहून मन विषण्ण होतं. लाज वाटली पाहिजे या मंत्र्याना, तुम्ही मदत करत आहेत म्हणजे उपकार करीत नाहीत लोक अडचणीत आहे तेव्हा ते सरकार म्हणून तुमच्याकडेच आशेने पाहणार, त्यांना मदत करता येत नसेल तर करू नका पण मदतीच्या नावाखाली सेल्फी घेत नाकाला गुंडाळण्याचा अतिशहानपणा तरी किमान दाखवू नका.
एकीकडे महाराष्ट्रातील जिल्हे पुराच्या पाण्यात वेढले गेले असताना दुसरीकडे शिवसेनेची आदित्य संवाद यात्रा सुरू होती तर मुख्यमंत्री सगळी कामधंदे सोडून महाजनादेश यात्रेवर निघाले होते, त्यात कमी की काय म्हणून राष्ट्रवादीने देखील शिवस्वराज्य यात्रा काढून मता चा जोगवा मागायला सुरुवात केली होती .सांगली कोल्हापूरचे लाखो लोक जेव्हा पाण्यामध्ये बुडत होते तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक मात्र मतासाठी दारोदार फिरत असल्याचे चित्र दुर्दैवी होत.
सांगली कोल्हापूर सातारा या भागावर ही वेळ का आली याचा विचार आज तरी कोणी करायला तयार नाही. महाराष्ट्रातील जे पाणी कर्नाटकात वाहून जात ते पाणी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन जर मराठवाडा विदर्भ या भागात वळवल असतं तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती ,एवढेच काय परंतु अलमट्टी धरणातून आज जो 500000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय तोच निर्णय पहिल्याच दिवशी पूरपरिस्थिती निर्माण झाली तेव्हा घेतला असता तर आज लाखो सांगलीकर आणि कोल्हापूरकर यांचा जीव टांगणीला लागला नसता. मात्र वेळेत निर्णय घेईल ते सरकार कसे म्हणायचे, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात आणि नैसर्गिक आपत्तीत भरभरून राज्यातील जनतेला मदत केली ते देखील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडून विदर्भात भाषणे ठोकत फिरताना पाहून महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्रा आता बस कर रे असं म्हणण्याची वेळ आली .
सरकारने ठरवलं तर काय होऊ शकतो याचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेने किल्लारीच्या भूकंपानंतर घेतला आहे अवघ्या चोवीस तासाच्या आत किल्लारी मध्ये शासकीय मदत घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार पोहोचले होते आज मात्र देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांना पोहोचण्यासाठी पाच दिवसाचा वेळ लागला कारण ते मत मागण्यात मश्गुल होते. सांगलीचे पालकमंत्री असलेले सुभाषबापू देशमुख हे पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीची तयारी कशी करायची हे शिकवत होते तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्र्यांसोबत महाजनादेश यात्रेवर होते. एकीकडे भाजपचा हा प्रकार सुरू असताना शिवसेनेत मातोश्रीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधल्या नाराजांना शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश दिला जात होता हा सगळा प्रकार चीड आणणारा आणि संताप येईलअसाच आहे.
इतर पक्षातील दिग्गज पुढारी मोठमोठे आमदार खासदार यांना पदाची पैशाची आमिषे दाखवून तसेच त्यांच्या मागील चौकशीचा ससेमिरा थांबवण्याच आश्वासन देऊन आपल्या पक्षात घेण्याचा  प्रकार जितका सहज आहे तितकाच महापूर आणि त्यावरील उपाय योजना सोपे आहेत असा कदाचित समज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा झाला असावा आणि त्यामुळेच कोल्हापूर आणि सांगली मधील लोक पाण्‍यात बुडत असताना हे मंत्री महोदय मात्र बोटीत बसून चक्क दात काढून हसत हसत सेल्फी घेत असल्याचं ओंगळवाणे चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आणि या राजकारणामुळे राज्याची मान शरमेनं खाली गेली.
राजकारणी म्हणजे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे असं सहज लोक म्हणतात त्याला असे काही प्रकार कारणीभूत ठरतात असे म्हणायला हरकत नाही .लोकांच्या दुःखामध्ये त्यांना मदतीचा हात पुढे करण्याऐवजी अशा पद्धतीने पाच दिवसानंतर येऊन दुष्काळी पर्यटन किंवा महापूर पर्यटन मंत्री-संत्री करत असतील तर या लोकांना वेळीच वेसण घालणं हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे . जनता पाण्यात बुडत असताना प्रशासकीय यंत्रणा ठप्प झालेली असताना केंद्राकडे मदतीची याचना करण्याबरोबरच राज्यातील सगळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या भागात पोहोचून लोकांना धीर देणे गरजेचे आहे परंतु राजकारणी मात्र एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे.
मराठवाड्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी मिळावं यासाठी अनेक आंदोलन मोर्चे रास्ता रोको झाले मात्र त्या त्या वेळच्या सरकारने केवळ आश्वासने देण्यापलीकडे काहीच केलं नाही .कृष्णा खोऱ्यातील जे पानी मराठवाड्याला दिले जाणार आहे त्याचे नियोजन गेल्या दहा-पंधरा वर्षात केलं गेलं असतं तर पावसाअभावी मराठवाड्याचं होणार वाळवंट आणि महापुरामुळे कोल्हापूर-सांगली सातारकरांची होणारी त्रेधातिरपीट निश्चितपणे थांबली असती. परंतु प्रत्येक गोष्टीत स्वतःचा आणि पक्षाचा फायदा बघणाऱ्या राजकारण्यांमुळे आज महाराष्ट्रात काही जिल्हे पाण्यात आहेत आणि काही जिल्ह्यात थेंबभर पाण्यासाठी लोकांना जीव द्यावा लागत आहे .हे सगळे चित्र पाहिल्यानंतर लाज वाटते की खरंच महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे का ? आणि ते का समजावे ? या राज्यातील पुढाऱ्यांनी कर्नाटक मध्ये जे पाणी सोडायचं होतं त्याचं नियोजन पावसाळ्यापूर्वीच केलं असतं किंवा आठवडाभरापूर्वी तरी त्याबाबत योग्य ते निर्देश प्रशासनाला दिले असते तर आज अब्जावधी रुपयांच झालेलं नुकसान आहे ते टाळता आलं असतं. या महापुरामुळे लाखो हेक्टर जमीन खरडून गेली आहे, व्यापारी, उद्योजक, छोटे छोटे व्यावसायिक रहिवाशी यांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे .या भागातील शेतकरी तर तब्बल दहा ते पंधरा वर्ष मागे फेकला गेला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने दप्तर दिरंगाई न करता तातडीने या भागातील लोकांना भरघोस मदत देऊन आर्थिक आणि मानसिक आधार द्यायला पाहिजे नाहीतर मुंबईत बसलेले बाबू लोक नियम आणि अटी दाखवून या पूरग्रस्तांची कुचेष्टा करण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा या व्हाईट कॉलर बाबू लोकांना निक्षून पणे सांगत सरकारने कोणत्याही अटी आणि शर्ती न घालता शेतकरी व्यापारी उद्योजक छोटे व्यवसायिक मजूर यांना तातडीने मदत देणे आवश्यक आहे
 त्याचबरोबर पुराचे पाणी उतरल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात रोग ,आजार, साथीचे रोग पसरण्याची भीती आहे त्यामुळे जीवित हानी देखील होण्याचा धोका आहे हे वेळीच रोखायच असेल तर याठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि यंत्रणा कामाला लावावी लागेल .कारण योग्यवेळी या उपाययोजना केल्या नाहीत तर हजारो लोकांना साथरोग होण्याची शक्यता आहे आजार झाल्यानंतर त्यावर उपाय योजना करून पाठ थोपटून घेण्यापेक्षा आजार होणार नाही यासाठी काळजी घेणे कधीही चांगलं एकूणच पश्चिम महाराष्ट्रात झोपलेला निसर्ग आणि त्यामुळे निर्माण झालेली महापुराची परिस्थिती आणि मराठवाड्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्माण झालेलं दुष्काळाचं संकट या दोन्ही परिस्थितींना हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं हे खेदाने म्हणावे लागते नियोजन आणि दूरदर्शीपणा चा अभाव असल्यामुळेच हा सगळा प्रकार झाला हे मात्र नक्की.

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९

राजकारणातील वाघीण ...........!


जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला अस नेहमी म्हणलं जातं मात्र हे काही लोकांच्या बाबतीत खोटं ठराव अस नेहमी वाटतं त्यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सुषमा स्वराज,साधारण वीस वर्षांपासून पत्रकारिता करताना त्यांची अनेक भाषणे टी व्ही वरून ऐकण्याची संधी  मिळाली होती,गेवराईत एका कार्यक्रमात त्यांना जवळून पाहता आलं आणि त्यांचं भाषण याची देही याची डोळा बघता आणि अनुभवता आलं.ओघवत वक्तृत्व काय असतं नव्हे वक्ता दशसहस्त्रेशु म्हणजे काय हे मी स्वतः बघितलं अन अनुभवलं आहे .
देशाच्या इतिहासात इंदिरा गांधीनंतर परराष्ट्र खात यशस्वीपणे सांभाळणाऱ्या म्हणून त्यांचा उल्लेख कायम होईल,तब्बल सात वेळा संसद सदस्य आणि तीन वेळा विधानसभा सदस्य म्हणून त्यांची कारकिर्द कायम लक्षात राहील अशीच आहे .हरियाणा सारख्या प्रदेशातून येणाऱ्या सुषमा जी यांच्याकडे पाहिल्यावर एक प्रसन्न हास्य कायम चेहऱ्यावर दिसायचं .हिंदी,इंग्रजी सह संस्कृत भाषेचा गाढा अभ्यास त्यांचा होता,वेदपूरणातील दाखले त्यांच्या भाषणात नेहमी असायचे,कपाळावर मोठं कुंकू किंवा टिकली,भांगेत सिंदूर,फुल बाह्या असलेले ब्लाउज आणि भरजरी साडी,त्यावरून त्याला मॅचिंग होईल असे स्वेटर हा पेहराव आजही अनेकांना आठवत असेल .
जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या लढवय्या नेत्याच्या बोटाला धरून राजकारणात आणि समाजकारणात प्रवेश केलेल्या सुषमा जी सुपर मॉम म्हणून सुद्धा ओळखल्या जात होत्या,परराष्ट्र खात सांभाळताना त्यांनी अनेकांना केवळ एका ट्विट वर मदत केल्याचे दाखले देणारे हजारो लोक आज हळहळले असतील .
स्व अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्यांनी संसदीय कार्यमंत्री असो की दुरसंचारमंत्री अथवा मागच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून जे काम केलं ते कायम स्मरणात राहील यात शंका नाही .कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत त्यांनी जी ठोस भूमिका घेतली होती त्यामुळे आयर्न लेडी म्हणूनही त्या नावजल्या गेल्या .
गेवराई बाजार समितीच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन भाजपचे आमदार अमरसिंह पंडित यांच्या आग्रहावरून गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत सुषमा स्वराज गेवराई येथे आल्या होत्या ,निवडणुकीच्या काळात त्या काहीवेळा परळीला ही आल्या मात्र त्या व्यतिरिक्त त्या गेवराईत आग्रहपूर्वक आल्या होत्या. या ठिकाणी देखील त्यांनी जे भाषण केले होते ते खूप प्रभावी होते राजकारणातील एक सु सभ्य सत्शील आणि चारित्र्यवान महिला म्हणून त्यांचा नेहमी उल्लेख व्हायचा त्या भाषणाला उभ्या राहिल्या की संपूर्ण सभागृह त्यांचे शब्द कानात साठवून घेण्यासाठी शांत असायचे. सभागृहात पिन ड्रॉप सायलेन्स काय असतो हे त्यांच्या भाषणाच्या वेळी अनुभवायला यायचे परराष्ट्र खात्याची जबाबदारी सांभाळताना सुषमा सगळ्यात जास्त सोशल मीडियाचा पॉझिटिव वापर करून घेतला .ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी परदेशात अडचणी आलेल्या अनेक भारतीयांना तातडीने मदत केली आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा नेहमीच खुले होईल. स्वपक्षीय यांसोबतच विरोधी पक्षातील लोकांच्या मताचा देखील आदर करावा लागतो आणि त्यांना सन्मानपूर्वक बोलावे लागते आणि त्यांचे ऐकून घ्यावे लागते ही शिकवण जयप्रकाश नारायण यांच्या कडून मिळाल्यामुळे सुषमा जींनी नेहमीच विरोधी पक्षातील लोकांच्या अडचणी देखील समजावून घेतल्या . विरोधी पक्षात असताना सुषमा स्वराज यांनी 1996 मध्ये  एच डी देवेगौडा यांच्या सरकारने दाखल केलेल्या विश्वास प्रस्ताव विरुद्ध जे घणाघाती भाषण केले होते ते तत्कालीन सदस्य असलेल्या चंद्रशेखर यांच्यापासून ते सोमनाथ चॅटर्जी शरद पवार यांच्यासह  तत्कालीन उपसभापती नितीश कुमार यांच्या देखील कायम स्मरणात राहण्यासारखेच होते .सुषमा जींनी त्यावेळी विरोधी पक्ष म्हणजे कौरव आणि आम्ही म्हणजे पांडव आहोत , आम्हाला वनवासात पाठवण्यासाठी  समोर कितीतरी मंथरा आणि शकुनी बसले आहेत असा दाखला देत स्वपक्षीय सहित विरोधी पक्षातील नेत्यांची देखील वाहवा मिळवली होती, त्यांच्या भाषणात व्यत्यय आणणाऱ्या  अनेक विरोधी पक्षाच्या  खासदारांना  चंद्रशेखर यांनी स्वतः उठून  शांत केले होते हाच दबदबा आणि आदर होता सुषमा जींचा .त्यामुळेच विरोधी पक्षात सुद्धा त्या पॉप्युलर होत्या 2019 च्या निवडणुकीच्या अगोदर पुन्हा मोदी सरकार येईल की नाही अशी चर्चा सुरू झाली आणि सर्वमान्य पंतप्रधान म्हणून ज्या तीन चार नावांवर मीडियामधून चर्चा सुरू होती त्यात सुषमा जींचे नाव आघाडीवर होते. एक स्त्री असतानाही त्या आपल्या निर्णयावर ज्या पद्धतीने ठाम असायच्या अनेक कठीण प्रसंगात देशहितासाठी त्यांनी ज्या पद्धतीने खंबीर राहून निर्णय घेतले त्यामुळे त्या आयर्न लेडी म्हणून परिचित झाल्या होत्या, गेल्या काही महिन्यांपासून सुषमा जी या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे राजकारणापासून दूर होत्या मात्र त्या एवढ्या अकाली जातील असे कोणालाही वाटले नव्हते .
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीर मधून कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला दोन्ही सभागृहांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि त्यानंतर अवघ्या काही वेळात म्हणजे साडेसात वाजण्याच्या दरम्यान सुषमा स्वराज यांनी ट्विट करून मोदीजी हाच दिवस पाहण्यासाठी मी  जिवंत होते असे सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यांच्या या शेवटच्या ट्वीटनंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या जाण्यामुळे भारतीय राजकारणा मधील एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल आहे. त्यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहीत आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हळहळले असून एक लढवय्या विचारांची महिला, राजकारणातील रणरागिनी, राजकारणातील वाघीण गमावल्याचं अनेकांनी स्पष्ट केलं .सुषमा स्वराज यांची आठवण केवळ भाजपलाच नव्हे तर तमाम भारतीयांना कायम येत राहील हे निश्चित त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

लक्ष्मीकांत रुईकर,बीड,9422744404

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

आश्वस्त क्षीरसागर ...........!

आश्वस्त क्षीरसागर ................!

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करत मंत्रीपद मिळविल्यानंतर जयदत्त क्षीरसागर हे अधिकच आश्वस्त  झाल्याचे चित्र दिसून येत आहे . राष्ट्रवादी मध्ये असताना होत असलेली घुसमट त्यांच्या चेहर्‍यावर नेहमी दिसून येत होती मात्र शिवसेनेत गेल्यानंतर पासून ते बऱ्यापैकी रिलॅक्स झाल्याचं दिसून येते एवढेच नव्हे तर क्षीरसागर इलेक्शन मोडमध्ये आल्याचे देखील स्पष्टपणे जाणवू लागले आहे .
सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे करून शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर बीड जिल्ह्यात सर्वात उशिरा शरद पवारांसोबत राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता तो केशरबाई क्षीरसागर आणि त्यांच्या परिवाराने . स्वतः शरद पवार यांनी क्षीरसागर यांच्या घरी जाऊन बैठक घेतल्यानंतर त्यांनी पवारांसोबत जाण्याचा निर्णय पक्का केला होता . दरम्यान 1999 पासून ते आजपर्यंत क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून चौसाळा असो की बीड विधानसभा मतदारसंघ उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेत मंत्रिपदही मिळवलं . 1999 ते 2014 या काळात क्षीरसागर कायम सत्तेत होते, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम उपक्रम असो किंवा इतर खाती त्यांनी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी बीड जिल्ह्यासाठी खेचून आणला मात्र हे करत असताना मध्यंतरीच्या काळात त्यांच्या घरात महाभारत सुरू झालं आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी काका विरुद्ध बंड पुकारलं .या बंडाला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच खतपाणी मिळू लागल्यामुळे जयदत्त क्षीरसागर मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झाले होते मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर वारंवार या गोष्टी घातल्यानंतरही त्यावर तोडगा निघत नसल्यामुळे ते देखील हतबल झाले होते. पक्षातील वरिष्ठ नेते तसेच जिल्ह्यातील स्थानिक नेते यांचा विरोध पत्करून मायक्रो मायनॉरिटी असतानादेखील क्षीरसागर राष्ट्रवादीमध्ये भक्कमपणे उभे होते मात्र संदीप च्या रूपाने घरातच फूट पडली आणि क्षीरसागर यांच्या बंगल्याला तडे गेले हा बंगला ढासळतो की काय आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या दिग्गज राजकारणी राजकीय पटलावरून गायब होतो की काय अशी शंका येऊ लागली होती .
नगरपालिका असो की जिल्हा परिषद पंचायत समिती प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने काका आणि पुतण्या मध्ये कुस्ती लावून प्रेक्षक म्हणून टाळ्या वाजवत आनंद घेतला. त्यामुळे क्षीरसागर हे राष्ट्रवादीमध्ये फार काळ राहणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली .लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला आणि जिल्ह्यातील क्षीरसागर समर्थकांना एक मोठा दिलासा मिळाला .गेल्या चाळीस वर्षापासून राजकीय आणि सामाजिक कार्यात कायम कार्यरत असणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांचा राष्ट्रवादीमध्ये होणारा कोंडमारा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दूर झाला .त्यांच्या मनामध्ये जी काही सल होती ती मताच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 22 मे रोजी जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. शिवसेनेच्या इतिहासात एवढ्या लवकर बाहेरून आलेल्या व्यक्तीला मानाचं पान क्वचितच दिल गेल आहे. मात्र क्षीरसागर यांचा राजकारणातील अनुभव आणि पक्षश्रेष्ठींना खुश करण्याची पद्धत कामाला आली आणि त्यांच्या पदरात मंत्रिपद पडल.
 मंत्री झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात आणि विदर्भातही शिवसेनेच्या बांधणीसाठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. सध्या ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ,युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन त्यांनी केल आहे. त्यानिमित्ताने त्यांची भेट झाली तेव्हा ते कमालीचे आश्वस्त असल्याचं जाणवलं लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा-जेव्हा जयदत्त क्षीरसागर यांची भेट व्हायची तेव्हा कुठेतरी ते पक्षावर नाराज असल्याचं ,पक्षाकडून डावलले गेल्याच दिसून यायचं ,थेट तोंडावर आणि स्पष्ट सांगण्याचा क्षीरसागर यांचा स्वभाव नाही. पत्रकारांशी देखील बोलताना ते हातचे राखूनच बोलतात ,त्यांच्या मनात काय चाललं आहे हे त्यांच्या घरच्यांना देखील माहित असतं की नाही असा प्रश्न नेहमी पडतो. कधीच मोकळेपणानं आणि थेट प्रतिक्रिया द्यायला किंवा आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना थेट टीका करायला ते कधीच पुढे येत नाहीत .विकास कामाच्या माध्यमातून मी लोकांच्या समोर जातो, कोणावरही व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा आपल्या कामाच्या माध्यमातून टीकाकारांचे तोंड बंद करणे आपल्याला आवडते असं ते नेहमी म्हणतात.
 दरम्यान शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जुन्या आणि नव्या शिवसैनिकांचा मेळ ते कसा बसवणार असा प्रश्न होताच तो बऱ्यापैकी आजही कायम असला तरी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन करण्यात त्यांना यश आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच महिनाभरावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते शिवसेनेत तरी रिलॅक्स असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं आणि चेहऱ्यावर देखील ते दिसून आलं. "आम्ही रोजच इलेक्शन मूडमध्ये असतो "त्यामुळे निवडणुका तोंडावर आल्या म्हणून फार लोड घेणाऱ्यांपैकी मी नाही" असं सांगण्याचा जयदत्त क्षीरसागर यांचा कॉनफिडन्स कमालीचा उंचावल्या स्पष्टपणे दिसत होतं .
जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेला देखील आगामी काळात बळकटी मिळणार आहे हे निश्चित .कारण बीड जिल्ह्यात आर्थिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या ताकद असणारा माणूस आज पर्यंत शिवसेनेकडे नव्हता.शिवसेनेची अवस्था फारशी आशादायक अशी नव्हती .मात्र क्षीरसागर यांच्यासारख्या दिग्गज राजकारणी अनुभवी व्यक्ती पक्षात आल्यामुळे पक्षाला अच्छे दिन येतील असे म्हणावयास हरकत नाही .कदाचित क्षीरसागर यांच्यामुळे मराठवाड्यातील शिवसेनेला देखील बळकटी मिळेल यात शंका नाही .एकूणच चाळीस-पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ काँग्रेस संस्कृतीमध्ये वाढलेल्या क्षीरसागर यांना शिवसेनेत जाऊन ऍडजेस्ट होता येईल का ही शंका दूर झाली असून क्षीरसागर शिवसेनेत पक्के सेट झाले आणि त्यामुळेच ते भविष्यातील निवडणुकीच्या दृष्टीने कमालीचे आश्वस्त असल्याचं दिसून आलं . निवडणुकीत काय होईल कोणाचा विजय कोणाचा पराभव होईल हे आज सांगणं कठीण आहे .एक मात्र नक्की की राष्ट्रवादी मध्ये असताना क्षीरसागर यांची होणारी घुसमट नक्कीच थांबली असून त्यांनी पाडलेल्या पायवाटेने अनेक दिग्गज चालू लागले असून शिवसेनेकडे येणाऱ्यांची संख्या पाहता आता क्षीरसागर यांच्या रूपाने शिवसेनेकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग अनेकांसाठी खुला झाला आहे असेच म्हणावे लागेल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होणार आहे त्यामध्ये दोघांचे भवितव्य मतदारांच्या हाती असले तरी जयदत्त क्षीरसागर यांचा अनुभव नक्कीच कामाला येईल आणि त्यामुळेच ते आश्वस्त असल्याचं दिसून आलं.
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...