शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

डागाळलेली वर्दी ...........!

डागाळलेली वर्दी ......!

एखादा किरकोळ पाकिटमार, चोर,घरफोड्या करणारा पकडायचा अन आपण फार मोठी कामगिरी केल्याचा आव आणायचा मात्र त्याचवेळी खून,दरोडा,बलात्कार,अपहार या सारख्या गंभीर गुन्ह्यात एखाद्या खादी डगले घातलेल्याचा फोन आला की शेपूट घालून कारवाई टाळायची हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे,नोकरीत लागताना अंगावर घातलेली खाकी वर्दी पहिल्या काही वर्षातच एवढी निलाजरी होते की तिच्यावर पडलेले रक्ताचे डागही अच्छे वाटू लागतात ही अवस्था सध्या पोलीस दलाची झाली आहे.राज्यातील पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत हा  विश्वासच लोकांमध्ये राहिलेला नाही.सांगली प्रकरणानंतर तर "खुनी खाकी वर्दी"अशी नवी नकोशी ओळख या खात्याची निर्माण झाली आहे,भविष्यात ही ओळख पुसून काढण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाला विशेष मेहनत घ्यावी लागेल .

एखाद छोटं खेडे गाव असो की मुंबई सारखी माया नगरी, सगळे लोक रात्री शांत झोपतात कारण त्यांच्या रक्षणासाठी पोलीस नावाची यंत्रणा डोळ्यात तेल घालून 24 तास जागी असते . खून,दरोडा,अपघात,महापूर,आंदोलन,नैसर्गिक आपत्ती अशी कोणतीही घटना घडली तर सर्वात अगोदर घटनास्थळी पोहचणारी यंत्रणा म्हणजे पोलीस होय.तलाठी,मंडळ अधिकारी हे महसूल चे लोक उशिरा आले तरी चालते मात्र पोलीस वेळेतच पोहचला पाहिजे ही सर्वांचीच अपेक्षा असते. बहुतांश वेळा पोलीस जनतेची ही अपेक्षा पूर्ण देखील करतात.लाखो लोक रस्त्यावर उतरले असले तरी शंभर पन्नास खाकी वर्दी वाले दिसले की वातावरण शांत होते,कारण या वर्दीचा आदर आजही कायम आहे .  कितीही मोठा गुंड,चोर,मवाली  असला तरी खादीचा धाक त्याच्या मनात कायम असतो .

मात्र अलीकडच्या काळात खाकी आणि खादी हातात हात घालून प्रशासन चालवीत असल्याची अनेक उदाहरणे समोर येतात आणि त्यातून मग खाकीने खादी  समोर गुडघे टेकल्याचे आपण पाहतो . 'ए पुलीस स्टेशन है,तुम्हारे बाप का घर नही, हा अमिताभ चा जंजिर मधील डायलॉग असो की " मेरे जमीर मे दम है,क्यूकी मेरी जरूरते कम है,"हा सिंघम मधील अजय देवगण चा  डायलॉग पहिला की आपल्याला आपण स्वतःदेखील खाकी घालावी असे वाटते,या खाकी चा अभिमान वाटतो रक्त सळसळ करते मात्र याच चित्रपटात खकिमधील काही लोक कसे खादीवाल्यांचे पाय चाटतात हे देखील दाखवले आहे तेव्हा आपल्याला सिंघम चा अभिमान वाटताना इतर सहकारी पोलीस ज्या प्रकारे वागतात ते खरं असल्याचं जाणवत आणि त्यात तथ्य देखील आहे याची खात्री पटते .

पोलीस कोठडीत आरोपीला त्याने  केलेल्या  गुन्ह्याची कबुली द्यावी अन मुद्देमाल ,घटनास्थळ, वापरलेले शस्त्र दाखवावे यासाठी खाकीकडून सुंदरी चा पाहुणचार मिळतो,दोन चार फटके पडले की आरोपी पोपटासारखं बोलू लागतो.आजही चांगले चांगले दादा,भाई,डॉन पोलिसांच्या माराला थरथर कापतात ही वस्तुस्थिती आहे मात्र गेल्या दहा पंधरा वर्षात पोलीस दलातील खाबू गिरी,चाटुगिरी, झेलेगिरी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की या वर्दीचा धाकच राहिला नाही.

पूर्वी खाकी सोडा पण साध्या कपड्यातील पोलीस आला आहे हे जरी कळलं तरी प्रक्षुब्ध झालेला जमाव शांत होत असे आज मात्र जमाव मिळून वर्दी भरदिवसा भररस्त्यात टराटरा फाडत असल्याचे आपण अनेकदा पाहतो,अनुभवतो .

देशात पोलीस कोठडीत मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात पाहिले तर त्यात महाराष्ट्राचा क्रमांक वरचा लागतो हे दुर्दैव म्हणावे लागेल .2015 साली केलेल्या पाहणीत देशात 1087 मृत्यू पोलीस कोठडीत झाल्याचे समोर आले आहे,त्यात सर्वाधिक 127 पेक्षा अधिक मृत्यू हे महाराष्ट्र्रात झाले आहेत हे विशेष .या सगळ्याच मृत्यूला पोलिसच जबाबदार आहेत असे नाही बहुतांश मृत्यू हे आरोपीने आत्महत्या केल्याने झाले आहेत मात्र पोलिसांच्या मारहाणीत किंवा टॉर्चर करण्यामुळे झालेले मृत्यू देखील दुर्लक्षून चालणार नाहीत एवढे आहेत .

गृह विभागाच्या पाहणीनुसार कोठडीतील मृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी विदेशात आरोपींना कागदाचे कपडे घालायला दिले जातात,तसेच त्याला ज्या ठिकाणी म्हणजे जेल मध्ये ठेवले आहे तिथे सुद्धा अशी कोणतीच वस्तू ठेवली जात नाही ज्यामुळे त्याचा मृत्यू होईल .आपल्या देशात मात्र पोलीस दलात अद्याप खूप सुधारणा व्हायच्या आहेत .

पोलीस कोठडीत असताना होणारे सगळेच मृत्यू हे पोलिसांच्या मारहाणीमुळे होतात असे नाही मात्र सांगली सारखी प्रकरणे देखील अधून मधून होत असतात हे खरे आहे. सांगलीच्या प्रकरणात पोलिसांनी एखाद्या क्रूरकर्मा सराईत खून करणाऱ्याला देखील लाजवेल असे नीच आणि घृणास्पद कृत्य केले आहे .किरकोळ गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला टॉर्चर करण्याची एवढी कसली घाई पोलिसांना झाली होती,त्याच्याकडून असा कोणता देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा घडला होता की ज्यासाठी पोलीस एवढ्या खालच्या थराला गेले हे न उलगडणारे कोडे आहे .एकदा मृतदेह जळाला नाही म्हणून दोनदा जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,हा प्रकार म्हणजे खाकीची संघटित गुन्हेगारीच  म्हणावी लागेल .

देशातच नव्हे तर आशिया खंडात ज्या मुंबई पोलिसांचे नाव आणि दबदबा होता त्याच मुंबई पोलीस दलात दया नायक सारखे डॉन लोकांच्या तालावर नाचणारे अधिकारी होते हे देखील समोर आले आहे.नोकरीला लागल्यानंतर प्रशिक्षण घेतानाच बहुतेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना पैसे कसे खायचे,पैसे कशात कमवायचे याचेही प्रशिक्षण दिले जाते की काय अशी शंका आजकाल येऊ लागली आहे.

पोलीस महासंचालकपासून ते साध्या  कॉन्स्टेबल पर्यंत सगळेचजण त्यांच्या त्यांच्या औकातीनुसार पैसे खाण्याच्या मागे लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते .बीड सारख्या मागास जिल्ह्यात देखील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे महिन्याचे कलेक्शन पंचवीस ते पन्नास लाखाच्या घरात असते हे ऐकून धक्का बसतो .

पोलिसांच्या डोळ्यादेखत मटका,जुगार,वेश्याव्यवसाय, या बरोबरच अनेक अवैध धंदे बिनबोभाट सुरू असतात मात्र त्यांच्यावर काहीच आणि कधीच कारवाई होताना दिसून येत नाही याउलट हेच पोलीस सामान्य माणसाला वर्दीचा रिकामा धाक दाखवताना जिथे तिथे दिसतात .प्रत्येक खेड्यापासून ते मुंबई सारख्या मेट्रो सिटी पर्यंत सगळीकडे पोलिसांची पैसे कमविण्याची पद्धत एकच असल्याचे दिसते फरक फक्त शहरातील गुन्हेगार, दादा ,भाई यांच्या नुसार होताना दिसते .

स्थानिक गुन्हे शाखा असो की दहशतवाद विरोधी पथक कोणत्याही ठिकाणी बदली किंवा बढती हवी असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाखो रुपये द्यावे लागतात हे पोलीस दलातील उघड सत्य आहे.पोलीस निरीक्षक म्हणून स्वतंत्र पदभार पाहिजे असेल तर सध्या बीड सारख्या जिल्ह्यात किमान पाच आणि कमाल आठ लाखाचा रेट आहे,ठाण्याच्या हद्दीत किती बार,दारू दुकाने,मटका,पत्याचे क्लब आहेत यावर त्या त्या ठाण्याच्या इंचार्ज चे कलेक्शन ठरवले जाते आणि त्यानुसार त्याच्याकडून तेव्हडे घेतले जाते .अधिकारी,त्यांच्या बायका ,पोरं, नातेवाईक हे जिल्ह्यात दौऱ्यावर आले की त्यांना साड्या,कपडे,उंची भेटवस्तू द्याव्याच लागतात,निलाजरे आणि बेशरम अधिकारी देखील कोणताही विचार न करता या भेटवस्तू स्वीकारतात हे विशेष .ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पगार वीस पंचवीस हजार नाही तो लॅपटॉप,सोनसाखळी,मोबाईल आशा वस्तू भेट म्हणून कशा देऊ शकतो याचा विचार ना देणारा करतो ना घेणारा .

अनेक ठिकाणी तर नवा अधिकारी आला की जुन्यापेक्षा लाख पन्नास हजार वाढवून घेतो असे अनेकांचे अनुभव आहेत .अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहन असोत की वाळू,खडी, दगड,मुरूम वाहतूक करणारी वाहन,एवढंच काय अनेक वरिष्ठ अधिकारी हे प्लॉटिंग,भिशी ब्रोकिंग,सट्टा ,हॉटेलिंग अशा अनेक व्यवसायात भागीदार असल्याची अनेक उदाहरणे आहेत .

ज्यांच्या डोक्यावर खादी घालणाऱ्यांचा वरदहस्त आहे किंवा त्यांच्या भागीदारीनेच अवैध व्यवसाय सुरू आहे त्यांच्या पुढे पुढे करण्यात धन्यता मानणारे पोलीस सामान्य माणसाने ट्राफिक सिग्नल तोडला तरी बॉर्डर क्रॉस केल्याचा कांगावा करीत त्याच्यावर कारवाई करताना दिसतात एवढेच काय पण सामान्य माणूस चोरी,दरोडा किंवा अन्यायाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला तर फिर्यादीलाच एवढे उलट सुलट प्रश्न विचारले जातात की कुठून अवदसा आठवली अन तक्रार द्यायला आलो असे त्याला वाटते . प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या करणारे,पाकिटमार,मंगळसूत्र चोरणारे,बॅग लंपास करणारे लोक कोण आहेत हे पोलिसांना माहीत असते,एखाद्या भागात चोरी झाली की त्या भागात कोण आहे रे रामू की शामु, बाळू की बंडू त्याला धरा, माल वसूल करा आणि केस रफा दफा करा हेच धोरण पोलोसांचे ठरलेले असते .

अशाच प्रकरणामुळे शेवटी सांगली सारख्या घटना समोर येतात अन पोलिसांची अब्रू पार चव्हाट्यावर येते ,साध्या चोरीचा आरोप असणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ज्या प्रकारे मारून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला  तो पाहता यातील दोषी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करून चालणार नाही तर त्यांना सेवेतून बडतर्फ करीत असे खटले देखील फास्टट्रेक  कोर्टात चालवून या लोकांना जबर शिक्षा होणे आवश्यक आहे तरच खुनाचे पडलेले डाग धुवून निघण्यास मदत होईल .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...