रविवार, १९ जून, २०१६

पाणी गावाला गेलं

पाणी गावाला गेलं

माझी मुलगी तिच्या काकूला दुपारच्या वेळी सहज विचारत होती,काकू आपल्या बोअर च पाणी कुठं गेलं,तिच्या काकूने जे उत्तर दिलं ते मलाच नव्हे तर आजच्या परिस्थितीला चपखल बसणारे असेच होते,"पाणी गावाला गेलं"हे तिच्या काकूंचे उत्तर माझ्या मनाला चटका लावून गेलं.
आमच्या बोअर च पाणी मे च्या अखेरीस अचानक कमी झालं,कॉलनीत सगळे बोअर कोरडे पडले असताना आम्ही मात्र नशीबवान होतो कारण भीषण दुष्काळात आमच्या बोअर ला भरपूर पाणी होत,बटन दाबलं कि पाणी सुरु व्हायचं,मात्र आमच्या पाण्याला नजर लागली अन पावसाळ्याच्या तोंडावर बोअर च पाणी कमी झालं,आजूबाजूला कोणी तरी बोअर घेतला असेल त्यामुळे पाणी कमी झालं असेल,जमिनीखालच पाणी आपली जागा बदलत असे एक ना अनेक विषय मग घरात चर्चिले गेले,
खऱ्या परिस्थिती बद्दल मात्र कोणीच बोलायला तयार नव्हतं,आज भूगर्भातील पाणी पातळी जी खोल गेली आहे ती काही एका रात्रीत झालेली जादू नाही,माणूस नैसर्गिक संपत्ती चा वापर योग्य प्रमाणात करीत नसल्याने आज माणसावर पाण्यासाठी दारोदार हिंडण्याची वेळ आली आहे,पाणी म्हणजे नीर जे विवेकाने वापरावे असे म्हणतात मात्र माणूस नेमकं याच्या उलट वागत गेला ज्यामुळे आज पाण्याच्या एका थेंबासाठी तरसावे लागत आहे
इतिहासाचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल कि अगदी राम कृष्णाचा काळ असो अथवा छत्रपती शिवरायांचा काळ या काळात पाण्याचं योग्य नियोजन कस करावं याला विशेष महत्व दिल गेलं होत,आजही शिवकालीन पाणी पुरवठा योजना नावाने जी योजना कार्यरत आहे ती शिवरायांच्या काळातील संदर्भावर आधारित अशीच आहे,
राज्याच्या मराठवाडा,विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग मागील तीन चार वर्षापासून दुष्काळाचा सामना करतो आहे,सातत्यानं कमी होणारा पाऊस,पाण्याचं बिघडलेले नियोजन,भूगर्भातील घसरत चाललेली पाणी पातळी,पाण्याचा बेसुमार उपसा यामुळे या भागात दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत,हा सगळा भूभाग हा शेतीवर आधारलेला असाच आहे,आणि शेती हि लहरी पावसाच्या जीवावर केली जाते त्यामुळे पाऊसाने दगा दिला कि शेती पिकतं नाही आणि बळीराजाच्या गळ्याला फास लागतो
     मराठवाडा असो कि विदर्भ या भागात मागील दहा बारा वर्षात किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून शेतीमध्ये नगदी पिकाच्या नावाखाली शेतकरी ऊस आणि कापूस याच पिकांवर जोर देतानाचे चित्र दिसते,एक एकर ऊस लागवडीसाठी साधारणपणे जेवढे पाणी लागते तेवढे पाणी एका गावाची महिनाभराची तहान भागवू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे तरी देखील आम्ही उसाची शेती करणं सोडलेलं नाही,ते सोडावं असा अट्टहास नाही मात्र ठिबक वर उसाची शेती केली तर पाण्याची बचत होऊ शकते,दुसर म्हणजे या उसाच्या शेतीत अंतर पीक घेतल्यास चार पैसे गाठीला राहू शकतात,मात्र एवढा बारकाईनं विचार कोण करतो आज काल ज्याला त्याला आजचा आताचा विचार सुचतो,त्यामुळे आज पाणी आहे ना मग वापरा बेसुमार नसेल तेव्हा बघू हि बेफिकीर वृत्ती वाढीस लागली आहे त्यामुळे आज पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
     केवळ शेतिमध्येच पाण्याचा बेसुमार उपसा होतो अस नाही तर शहरी भागातील लोकही भविष्याचा विचार न करता पाण्याचा अतिरेकी वापर करताना दिसून येतात,आज शहरीकरण वाढू लागलं आहे,फ्लॅट संस्कृती वाढीस लागल्याने घर तिथं बोअर पद्धत रूढ झाली आहे त्यामुळे फुटाफुटावर बोअर दिसू लागले आहेत,जमिनीची अक्षरशः चाळण केली जात आहे,शंभर किंवा दोनशे फुटापर्यंत  बोअर खोदण्यास परवानगी आहे मात्र  नियम तोडण्यात धन्यता मानणाऱ्या आम्ही लोकांनी पाण्याच्या थेंबासाठी हजार फुटापर्यंत जमिनीला छिद्र पाडली, तरी देखील पाणी लागेनास झालं आहे,बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात देवी निमगाव या गावात एका शेतकऱ्याने दहा वर्षात त्याच्या शेतात 48 बोअर घेतले आहेत विशेष म्हणजे त्यातील फक्त चार ते पाच बोअर ला आज पाणी आहे,यासाठी त्याने किमान पंचवीस लाख रुपये खर्च केले असतील,हि वेळ आज मराठवाडा ,विदर्भ या भागातील लोकांवर का आली याचा कधीतरी गांभीर्यानं विचार होणार आहे कि नाही .
वाढत्या शहरीकरणामुळे शहर बकाल होत आहेत,अवाढव्य वाढणाऱ्या शहरांना आणि शहर वासियांना मूलभूत सोयी सुविधा पुरवणे नगर परिषद प्रशासनाला कठीण होत आहे मात्र त्यांनी जो नागरिक बांधकाम परवानगी मागण्यास येईल त्याने जल पुनर्भरण अथवा पावसाच्या पाण्याचं बोअर मध्ये पुनर्भरण करण्याचं मान्य केल्यास आणि ते केलं आहे कि नाही याची खात्री करूनच परवानगी देण्याचा नियम लावल्यास काही प्रमाणात लोकांवर वचक बसेल असे वाटते.
एका पाचशे फुटाच्या गच्चीवर एका रात्रीत साधारण पाऊस झाल्यास दीड ते दोन हजार लिटर पाणी जमा होऊ शकते,हेच पाणी प्रत्येकाने आपल्या बोअर अथवा आडात किंवा जमिनीत मुरवले तर खालावत चाललेली पाणी पातळी काही प्रमाणात का होईना पण सुधारण्यास मदत होईल यात शंका नाही.शहरात बेसिन असो अथवा संडास बाथरूम सर्वत्र जे फ्लश वापरले जातात त्याद्वारे रोज हजारो लिटर पाणी नालीत वाया जात मात्र याचा विचार ना लातूर करांनी केला ना बीड करांनी मग आज हे सगळे लोक बसले आहेत बोंबा मारत,तेव्हा विनाकारण निसर्गाचा लहरीपणा ,देवाची अवकृपा या गोष्टीवर चर्चा करीत  बसण्यापेक्षा पाण्याचा योग्य वापर,शेतीमध्ये पाण्याचं योग्य नियोजन,भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी जलपुनर्भरण यासारखे प्रयोग राबवणे आवश्यक आहे,
    आज प्रत्येक गावात जलयुक्त शिवार अथवा इतर माध्यमातून पाणी साठवण्याची काम केली जात आहेत  त्यामुळे यंदाचा पावसाळा शिवारातील पाणी शिवारात साठवण्यासाठी उपयोगी ठरेल यात शंका नाही,प्रत्येक गावात जे सांडपाणी रस्त्यावर अथवा नालीमध्ये सोडलं जात ते  गावातील मोकळ्या जागेवर एक मोठा खड्डा खोदून त्यात सोडले तर  गावातील पाणी पातळी वाढण्यास मदत होऊ शकते , त्याच पद्धतीने गावातील प्रत्येक घरासमोर सांडपाण्याचा वापर करून झाडं लावली तर ती सावली बरोबरच पाऊस पाडण्यास मदत करू शकतील .
     माणसाने पाणी हे जीवन आहे ते जपून वापरावे लागते याचा धडा घेतल्यास आणि पाण्याच्या वापराचे नियम काटेकोर पणे पाळल्यास पाणी पुन्हा कधी गावाला जाण्याचा विचार करणार नाही अशी आशा करायला हरकत नाही,आज पाणी काही दिवस गावाला अथवा सुट्टीवर गेलं तर आपले हाल बेहाल सुरु आहेत विचार करा पाण्यानं जर संप अथवा बेमुदत गावाला जाण्याचा विचार केला तर आपले कसे होईल.तेव्हा पाणी गावाला जाणार नाही यासाठी सर्वजण प्रयत्न करूया आणि पाणी वाचवूया .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...