शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

दसरा (मनातील)काढून तर बघा !

 


दसरा (मनातला)काढून तर बघा !
सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापासून तर या सगळ्या सणवाराना जास्तच उधाण येत.यात दसरा अन दिवाळी हे दोन सण चारचांद लावतात .गरीबातला गरीब अन अब्जाधीश हे सगळेच दसरा असो की दिवाळी आपापल्या पध्दतीने आनंदात साजरी करतात .काही भागात विशेषतः महाराष्ट्रात आजही बहुतांश घरात दसरा काढण्याची पद्धत रूढ आहे .ही पद्धत तर ग्रामीण भागात फार जपली जाते अस म्हणायला हरकत नाही .वर्षभरात घरात आपण काही ना काही वस्तू आणतो,काही जुन्या झाल्या तरी जपून ठेवतो,भंगार सामान देखील जुनी आठवण म्हणून आपण जपलेली असते.ग्रामीण भागातील मोठं मोठ्या वाड्यात आजही अडगळीची खोली असतेच,शहरात आजकाल त्याला स्टोर रूम म्हटलं जातं .या रूममध्ये सध्या गरज नसलेल्या अनेक वस्तू मालकाच किंवा मालकीनीच लक्ष जावं या प्रतीक्षेत कित्येक महिने पडून असतात .जी अवस्था या स्टोर रूमची असते तशीच काहीशी अवस्था ही बेडरूम असो की किचन यांची देखील असते .अनेकांची गच्ची (फ्लॅट संस्कृती मध्ये न मिळणारी हक्काची जागा) तर बांधकाम सुरू असल्या पासून अनेक न लागणाऱ्या वस्तू ठेवण्याची जागा असते .
या सगळ्या ठिकाणी साठवलेल्या किंवा अडगळीत पडलेल्या वस्तू लागत नसतील तर भंगारात काढण्यासाठी किंवा लागत असतील तर आवरून ठेवण्यासाठी म्हणून सगळेच दसरा काढतात .ग्रामीण भागात या काळात नदीवरील दृश्य बघण्यासारखे असते .नदीचा काठ दोन्ही बाजूनी स्त्रिया (आई,आजी,काकू,मावशी,मामी,ताई) यांनी भरून गेलेला असतो तर नदीत घरातले चिल्ले पिल्ले पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत असतात .त्यामुळेच ग्रामीण भागातून आलेल्या बहुतांश महिला,मुलं, मुली हे शहरातील स्विमिंग क्लास पाहून खुदकन हसतात,कारण या दसऱ्याच्या निमित्ताने ज्यांना ज्यांना पोहायला येत नाही ते सगळे नदीत पोहणं शिकून घेतात .नदीच्या काठावर वेगवेगळ्या रंगाच्या साड्या पसरलेलं दृश्य पाहिलं की मन भरून पावतं. एकूणच काय तर या काळात सणाच्या स्वागतासाठी जो तो लगबगीने कामाला लागलेला असतो .घरातील दसरा आपण ज्या पद्धतीने वर्षातून एकदा का होईना काढतो ना तसाच मनातील दसरा देखील कधीतरी काढायला पाहिजे .जन्मानंतर वर्षभर किंवा दोन दोनवर्षं प्रत्येक जण इनोसंट असतो,नंतर प्रत्येकाला राग,लोभ,काम,क्रोध मद, मत्सर,या षड्रिपूंची लागण झालेली असते .
अन तेव्हापासून ते मरेपर्यंत आपण कित्येक चांगल्या (कमी) वाईट (जास्त) गोष्टी मनाच्या खोलीत दडवून ठेवलेल्या असतात.लहानपणी आई,बाबा,काका,काकू,आजी आजोबा ,गुरुजी हे सगळे आपल्याला संस्कार मिळावेत,शिस्त लागावी म्हणून प्रसंगी कठोर वागत असतात मात्र आपल्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड राग असतो .मोठेपणी शिक्षण,नोकरी,समाज ,मित्र मैत्रिणी यांच्याकडून अनेकदा अपेक्षाभंग झाल्याने आपण मनात कुठंतरी दुखावलेले असतो .लग्न झाल्यावर सोबत आलेल्या सहचारिणी बद्दल असलेल्या अपेक्षा किंवा नवरा म्हणून मनात असलेला ड्रीमबॉय न मिळाल्याने आपल्या डोक्यात कायम लग्न या पद्धतीबद्दलच गैरसमज निर्माण झालेले असतात .
एकूणच काय तर जन्मापासून ते इहलोकीची यात्रा संपवून निघेपर्यंत हजरो लाखो गोष्टी आपण मनात दडवून ठेवलेल्या असतात .मग या गोष्टी जर दसऱ्याच्या निमित्ताने वर्षातून एकदा बाहेर काढल्या तर .म्हणजे त्याला कन्फेक्शन म्हणा हवं तर .जैन धर्मात ज्या पद्धतीने मिच्छामी डुक्कडम असत तस काहीसं.पण ते फक्त झालेल्या न झालेल्या चुकीबद्दल सरसकट माफी मागतात अन मोकळे होतात,तस नसायला पाहिजे .
मनातील दसरा काढण्यासाठी आपली मानसिक तयारी असायला हवी .आई वडील,गुरुजी, नातेवाईक,बायको,पोरं, मित्र मैत्रिणी या सगळ्यांची यादी करून आपण वर्षभरात कोणाला काय दुखावलं याची यादी करून प्रत्येकाला भेटून त्याला त्या गोष्टीची आठवण करून देत मनःपूर्वक माफी मागितली तर हार्ट अटॅक, हार्ट फेल,ब्लडप्रेशर,मनावरील ताण,मानसिक ताण तणाव कमी व्हायला मदत होईल .
मनातल्या भावना कधी का होईना बोलून दाखवल्या पाहिजेत कारण खूप काही घडून गेलेलं असतं, मात्र मनात ते साठून राहिलेलं असतं अन त्याचा निचरा होण्यासाठी का होईना पण मनातला दसरा काढण्याची गरज आहे .दरवर्षी जर अशा पध्दतीने दसरा काढायचा निर्णय घेतला तर जगण्याचा आनंद अधिक द्विगुणित होईल यात शंका नाही .बघा पटतंय का.यंदाच्या वर्षीपासून हा संकल्प करा अन पुढच्या वर्षी आपल्या मनातील दसरा काढल्यानंतर काय काय फिलींग आल्या ते नक्की कळवा .
©लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...