शनिवार, २१ मार्च, २०२०

माज कराल तर जीवानिशी जाल ...........!


माज चांगला नाही ............!
संपूर्ण जग ज्या भीतीच्या सावटाखाली सध्या जगतंय ते पाहिल्यानंतर प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे मात्र काही लोक अजूनही याबाबत जागृत नसल्याचे दिसत आहे,सरकार,प्रशासन सामाजिक संस्था सगळेच दक्ष राहण्याची हात जोडून विनंती करत असताना दीड शहाणे लोक मात्र अजूनही रस्त्यावर फिरताना,प्रतिबंधक उपाययोजना पायदळी तुडवताना दिसत आहेत,हा माज चांगला नाही ,नाहीतर एकाच्या मुर्खपणामुळे हजारो,लाखोंना आपला जीव गमवावा लागेल .
कोणत्याही आपत्ती ला इष्टापत्ती मध्ये रूपांतर करण्याची मानवी मानसिकता आहे,कोरोना बाबतही अस करता येऊ शकतं पण त्यासाठी हवी आहे सामूहिक संघटनशक्ती आणि इच्छाशक्ती .कारण या आजारापासून दूर राहायचं असेल तर प्रत्येकाने आपल्याला गर्दीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे .
मानवी जन्म हा चौऱ्या ऐंशी योनी मधून गेल्यानंतर मिळतो अस म्हणतात मग हे माहीत असूनसुद्धा आपण एवढं अमूल्य अस जीवन हसतखेळत जगण्यापेक्षा ,चार आठ दिवस घरात बसण्यापेक्षा बाहेर फिरून का धोक्यात घालतोय हा न उलगडणारा प्रश्न आहे .
चीनमध्ये साधारणपणे डिसेंम्बर च्या सुमारास कोरोना व्हायरस ची लक्षणे दिसून आली,त्या देशाने या व्हायरस शी दोन हात करण्यासाठी उपाययोजना देखील सुरू केल्या,अगदी दहा हजार खाटांचे रुग्णालय अवघ्या एक महिन्यात उभारले,हे सगळं करण्यामागे अखंड मानवजातीचे रक्षण हाच हेतू त्यांचा होता .हा विषाणू भारतापर्यंत किंवा इतर देशापर्यंत येता येता फेब्रुवारी मार्च उजाडला .
मार्चच्या पहिल्या आठवड्यात ज्या इटलीमध्ये कोरोनाची नुकतीच लागण झाली .त्याच देशात 20 मार्चपर्यंत पन्नास हजारच्या घरात लोकांना लागण झाल्याचे समोर आले आहे .तर चीन सारख्या देशात देखील या विषाणू ने लाखो लोकांना आपल्या कवेत घेतले आहे .
भारतात देखील या विषाणूमुळे तिनशेच्या आसपास लोकांना लागण झाली आहे . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री हे जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहेत .
हा आजार संसर्गजन्य आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे,मात्र भारतासारख्या देशात अजूनतरी एखाद्या मोठ्या समूहाला हा आजार झाल्याचे समोर आलेले नाही हे सुदैव आहे .मात्र त्यामुळे धोका टळलेला नाही .धोका कायमच आहे,त्यासाठी गोळ्या औषधे तर आहेतच पण काळजी घेण जास्त महत्वाचं आहे .
जगाच्या पाठीवर हा एकमेव प्रसंग असा आहे की याचा कुठेही निषेध केला गेला नाही,किंवा याच्या विरोधात कुठेही आंदोलन,मोर्चे,उपोषण केले गेलेले नाही .सगळेजण हातात हात घालून याच्याशी लढण्यासाठी सज्ज झाले आहेत .सरकार कोणाचे आहे अन विरोधात कोण आहे याचा विचार न करता,कोण कुठल्या धर्माचा,जातीचा,पंथाचा आहे याचाही विचार न करता लोक एकत्र येऊन या संकटाचा सामना करत आहेत हे विशेष आहे .
मराठवाड्यात 21 आणि 22 मार्च रोजी बंदचे आवाहन केले आहे .तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यु चे आवाहन केले आहे .याचे पालन करणे हे सजग नागरिक म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे .परंतु लोक मात्र त्याकडे जास्त लक्ष देत नसल्याचे चित्र आहे .
या जगाच्या पाठीवर असा कोणताही मनुष्य प्राणी नाही की जो काही दिवस,महिने घराबाहेर पडला नाही तर जगबुडी होईल .जगाची आर्थिक वाढ खुंटल ,काही दिवस आपण जर घरात बसून राहिलो तर कोणाचं काहीच नुकसान होणार नाही मग आपण का आटापिटा करतोय ही न कळणारी बाब आहे .
या आजारापासून बचाव करायचा असेल तर समूहाने एकत्र येणे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक आहे, अशावेळी काही हौशी लोक मात्र सर्रास बाहेर बोंबलत फिरतानाचे चित्र आहे .बंद म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच असल्याचे ते समजत आहेत .लोकांना कळकळीने सांगितले तरी ते घराबाहेर पडत आहेत .स्वतः पंतप्रधान, मुख्यमंत्री सांगत आहेत की अन्न धान्याचा साठा करू नका,घरातच बसून रहा, लोकसंपर्क टाळा मात्र तरीही लोक शहाणपणा करून आपल्या सोबत इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत .जिथं मंदिर मस्जिद,चर्च,गुरुद्वारा बंद आहेत,देवदर्शन,सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे तिथं घराबाहेर पडून आपण अस काय साध्य करणार आहोत .विनाकारण बाहेर पडल्याने फार काही देशहिताचे काम आपण करणार नाहीत मात्र तरीही लोक मजाक म्हणून बाहेर निघत आहेत .
सध्याच्या इंटरनेट आणि सोशल मीडिया च्या जमान्यात घरबसल्या सगळं उपलब्ध असताना आपण बाहेर जाण्याचा अट्टहास का करतो आहोत हेच कळत नाही .एखाद्या आजारामुळे का होईना आपण घरात बसून आहोत याचा आनंद साजरा करण्यापेक्षा आपण घराबाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहोत हे लाजिरवाणे आहे .
लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करणे हे आपले परम कर्तव्य असताना त्यावेळी मात्र आपण घरात बसणे, पिकनिक ला जाणे पसंत करतो,मात्र आज घरी बसण्याची अत्यंत गरज असताना आपण घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत .घरात लेकरं बाळ आहेत,आईवडील,भाऊ बहीण आहेत,गावाकडे अनेक महिन्यांनी,वर्षांनी आलेले पै पाहुणे आहेत,त्यांच्याशी बोला, गप्पा मारा,खेळ खेळा, मनपसंत टीव्ही सिरीयल पहा,वाचन करा,जीवनाचा आनंद घ्या ना,कशाला पाहिजे बाहेर हिंडण, फिरणं.
एकीकडे आपण इंटरनेट आणि मोबाईलमुळे माणूस माणसापासून दूर चालल्याची रोजच चर्चा करतो अशावेळी निसर्गानेच आपल्याला एक संधी उपलब्ध करून दिली आहे अस समजून जर घराबाहेर न पडता प्रशासन आणि सरकारला सहकार्य केले तर निश्चितपणे या संकटाला आपण सहजपणे दूर करू शकतो ,हे माहीत असूनसुद्धा आपण रस्त्याने अत्यन्त निष्काळजीपणे फिरत आहोत .हर कुठंतरी थांबल पाहिजे .
हा आजार वैयक्तिक काळजी घेतल्यास आटोक्यात येऊ शकतो हे सत्य आहे त्यामुळे माज न करता घरातच बसून रहा ,तुम्ही जर स्वतःची काळजी घेतली तर तुमच्यासोबतच समाज देखील सुदृढ आणि सक्षम राहील हे निश्चित .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

शनिवार, ७ मार्च, २०२०

प्रोडक्ट नव्हे प्रोडक्टिव्ह ...............!


प्रोडक्ट नव्हे प्रोडक्टिव्ह .............!

दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर जॉनी लिव्हर यांचा एक व्हिडिओ पाहिला, म्हाताऱ्या झालेल्या आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती काय म्हणते आहे हे मुलांना कळत नाही अन ते चिडचिड करतात,शेजारी असलेले डॉक्टर सांगतात की तुम्ही आम्ही लहान असताना आपलं बोबड बोलणं ज्या आईला न सांगता कळतं तिचं म्हातारपणी च बोलणं आपल्याला कळू नये हे दुर्दैव आहे,तिच्या जवळ बसा, प्रेमाने हात हातात घ्या अन तिच्याशी बोला बास तिला काही नको .हा व्हिडीओ पाहिला अन मनात कालवाकालव झाली .स्त्री मग ती आई असो,बहीण असो नाहीतर पत्नी असो किंवा मैत्रीण ,किती सोसते पण तिच्या नशिबी मात्र कायम अवहेलना अन उपेक्षाच येते,तिला एक दिवस शुभेच्छा द्यायच्या अन वर्षभर अन आयुष्यभर मात्र मनःस्ताप द्यायचा किंवा तिने तो सोसायचा हे कुठवर चालणार .
अनादी काळापासून स्त्री ही शोषित आहे .मग ती रामायण महाभारतातील राजकन्या असो किंवा पट्टराणी ,तिच्या नशिबी कायम हाल अपेष्टा अन अवहेलना च आलेली आहे .स्त्री ही उपभोगाची वस्तू म्हणून आजही तिच्याकडे पाहिले जाते .तिला काय कळतं अस म्हणून कायम तिला डावलल जातं. तिचा पदोपदी अपमान केला जातो .प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री असते अस म्हणलं जात मात्र हाच पुरुष एखाद्या स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभा असलेला अभावानेच जाणवतो किंवा दिसतो .हे अस का होतं याच उत्तर माहीत असूनही कोणीच पुढे येऊन देत नाही .
एखादी स्त्री सुंदर असेल,चांगलं रहात असेल ,व्यवस्थित बोलत असेल,तिच्या कामातून वेळ काढून जर सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असेल तर लगेच तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात .विशेष म्हणजे यात महिलांचाच मोठा सहभाग असतो .स्त्रियांना ईश्वरानेच सुंदर रूप दिलं आहे,ते सांभाळण्यासाठी ती जर प्रयत्न करत असेल,जगाच्या राहटगाडग्यात ती जर खंबीरपणे उभे राहून आपलं अस्तित्व सिद्ध करत असेल तर इतरांना अडचण असण्याच काहीच कारण नाही .पण समाजाला ते मान्य नसतं .अशी स्त्री लगेच बाहेरख्याली आहे,तीच कुणासोबत तरी लफडं आहे अस म्हणून तिला बदनाम केलं जातं .खरंतर स्त्री च रूप हे तिच्यासाठी एक वरदान आहे मात्र सुंदर स्त्रीबद्दल जेव्हा तिच्याच सारख्या स्त्रिया नको ती चर्चा करतात तेव्हा हेच सौंदर्य अभिशाप ठरतं .
आज भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात एकीकडे प्रतिभा पाटील,सोनिया गांधी,सुमित्रा महाजन अशा एक ना अनेक स्त्रिया आपलं अस्तित्व सिद्ध करत असताना दुसरीकडे स्त्री ही उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं जाण्याची अनेक उदाहरणे आपल्या आसपास दिसतात .महिलांच्या शिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या वाट्याला देखील समाजाकडून उपेक्षाच आली मात्र त्यांनी त्याला न जुमानता आपलं कार्य सुरू ठेवलं, ज्यामुळे आज महिला,मुली ताठ मानेने शिकत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत .
स्त्री भ्रूण हत्येचा विषय असो की हुंडाबळी अथवा मानसिक,शारीरिक छळाचा विषय असो,नीट अभ्यास केल्यास लक्षात येतं की या सगळ्या ठिकाणी एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीवर अन्याय करण्यासाठी पुढे असते .सासू सुनेचा छळ करते,मुलगी नको म्हणून तिच्यावर अन्याय अत्याचार केले जातात .हुंड्यासाठी सुनेचा छळ करणारी देखील एक स्त्रीच असते ,अठरा वीस वर्षे आपल्या घरात,आपल्या नजरेखाली वाढवलेल्या मुलीला सासरी पाठवल्यावर तिच्या संसारात लुडबुड करणारी आई देखील एक स्त्रीच असते,एवढच नव्हे तर बहुतांश वेश्या वस्त्या असोत की कुंटणखाने या ठिकाणी एक स्त्रीच पुढाकार घेताना दिसते .हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर मन विषण्ण होतं .
एक स्त्रीच दुसरीचा दुस्वास कसा करू शकते हा न सुटणारा प्रश्न आहे .तस पाहायला गेलं तर स्त्रीने ठरवलं तर ती होत्याच नव्हतं अन नव्हत्याच होतं करू शकते .ती सरस्वती आहे,अंबा आहे,तशीच ती दुर्गा देखील आहे .ती देघरातला नंदादीप आहे,मात्र तिच्यातील शक्ती ला व्यासपीठ मिळत नाही अन मिळालं तर तिथंही दुसरी कोणीतरी स्त्रीच तिला आडवी येते .हा सगळा प्रकार थांबला तर स्त्री ही नवदुर्गा होऊ शकते .याचा अर्थ स्त्रियांच्या या अवस्थेला पुरुष जबाबदार नाहीत असा होत नाही .स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे हा पुरुषांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे .प्रत्येक स्त्री ही स्वतंत्र आहे, तिला तीच अस्तित्व आहे हे पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे .रस्त्याने चालताना असो की एखाद्या सभा समारंभात असो,स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजेच .स्त्रीच शरीर म्हणजे पुरुषांचा हक्क आणि त्यांची वासना शमविण्यासाठी च स्त्रीचा जन्म आहे ही मानसिकता बदलली पाहिजे .
आपली आई,बहीण,बायको यांच्यानंतर प्रत्येक स्त्री ही आपल्या वासना शमविण्यासाठी आहे अस पुरुष जोपर्यंत मानतात तोपर्यंत स्त्री ही सबला होऊच शकत नाही .
आजही एकीकडे मोठं मोठ्या पदावर स्त्रिया यशोशिखर पादाक्रांत करीत असताना शेतात राबणारी,कचरा वेचणारी, भांडे धुणे करणारी स्त्री कायम उपेक्षित च राहिलेली दिसते .हे कुठंतरी थांबल पाहिजे .जी स्त्री नऊ महिने आपल्या पोटात गर्भाला वाढवते,वर्ष दोन वर्षे आपल्या छातीशी कवटाळून स्तनपान करून मुलाला ,मुलीला वाढवते,पोसते त्याच स्त्रीच्या बाबत आपण इतका राक्षसी विचार कसा करू शकतो याच आत्मपरीक्षण प्रत्येक पुरुषाने करण्याची गरज आहे .
पुरुषाने नोकरी करायची,चार पैसे कमवायचे अन स्त्रीने चूल अन मूल सांभाळायचं ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे .स्त्री ही उपभोगाची नव्हे तर उपयोगाची वस्तू आहे,तिला सोबत घेतल्यास जग जिंकता येतं हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं .देशात आज वाढते बलात्कार, अत्याचार अन्याय पाहिल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो की खरच आपण स्त्री ला माता मानतो का .कथा असो की कादंबरी किंवा सिनेमा, नाटक या ठिकाणी स्त्री ही शोषित ,पीडित दाखवली जाते .हे कुठंतरी थांबल पाहिजे .महिला दिन आहे म्हणून एक दिवस स्त्रीचा सन्मान करायचा,तिच्याबद्दल चांगलं चांगलं बोलायचं,लिहायचं,तिचा गौरव करायचा अन नंतर मात्र तिच्यावर सातत्याने अन्याय अत्याचार करायचे हे योग्य नाही .
कोणतीही स्त्री ही स्वखुशीने वेश्या व्यवसाय किंवा व्यभिचार करत नाही किंबहुना तिला या दलदलीतून बाहेरच पडायचं असतं, मात्र समाजाचे ठेकेदार,पुरुष मंडळी तिला या दलदलीत घट्ट रोवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत .झोपडीत राहणारी असो की राजमहालात राहणारी असो कोणत्याही स्त्री चा सगळ्यात मोठा दागिना तिची इभ्रत असते ,त्यासाठी ती प्रसंगी आपला जीव देखील द्यायला तयार असते मग तीच स्त्री या अशा कामात कशी खुश असू शकेल .याचा विचार झालाच पाहिजे .
अलीकडच्या काळात वाढते अत्याचार,अन्याय यावर बोलताना बहुतांश वेळा महिला,मुलींच्या पेहरावाबद्दल आक्षेप घेतला जातो .कदाचित तो योग्यही असेल पण उघड नागड फिरायचा ठेका काय फक्त पुरुषांनाच आहे का याचा विचार का केला जात नाही .स्त्री ने आपला पदर सांभाळावा अस म्हटलं जातं .मुली जीन्स,टॉप,वनपीस,टू पीस घालतात त्यामुळे पुरुषांची मानसिकता बिघडते अस सांगून सर्रास या अशा नराधम लोकांच्या समर्थनार्थ बोललं जातं.मग हेच जर आपल्या आई,बहिणीबद्दल किंवा बायको बद्दल कोणी बोललं तर मात्र आमचा इगो जागा होतो ,हे अस का होत याचाही विचार व्हायला हवा .स्त्रियांनी राहणीमान बदलले आहे कारण ती आजची गरज आहे,त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे,पण तस न करता कोणीही उठतो अन स्त्रीच्या राहणीमानाबद्दल टिकटिपनी सुरू करतो .हे करताना आपण विसरतो की आपण काय पेहराव करतो,आपली मानसिकता काय आहे याचा आपल्याला का विसर पडतो .
एक मुलगा शिकला तर एक कुटुंब सुधारू शकतं पण एक स्त्री शिकली तर एक पिढि सुधारते हे आपण केवळ भाषणापूरत का लिमिटेड करून ठेवतो .
आज अस कोणतं क्षेत्र आहे ज्यात महिला,मुली या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत नाहीत .राजकारण असो की समाजकारण ,विज्ञान असो की तंत्रज्ञान, व्यवसाय असो की उद्योग या प्रत्येक क्षेत्रात मुली,महिला बरोबरीने नव्हे काकणभर पुढेच आहेत .तरीदेखील स्त्री ही अबला आहे,तिला काही कळत नाही,ती भित्री भागूबाई आहे अस म्हणून तिला हिनवल जातं, हे चूक आहे .स्त्री ही घराचा आधार असते,स्त्री ही समाजाला शिस्त लावणारी हेडमास्तर असते,स्त्री ही समाजाचा आरसा असते त्यामुळं ती स्त्री जर अबला असेल तर समाज सुदृढ आणि सक्षम कसा होऊ शकेल .या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास निश्चितपणे स्त्री ही दीन न राहता सक्षम,खम्बीर ,धाडसी होऊ शकेल यात शंका नाही .
स्त्री ही एक प्रॉडक्ट् नसून ती प्रोडक्टिव्ह आहे,ती नवनिर्मितीचा स्रोत आहे, तिच्या पोटातून मनुष्याची निर्मिती होते याचा विसर अलीकडच्या काळात पडल्याने स्त्री चा जागोजागी अवमान होत असल्याचं चित्र आहे .स्त्री फक्त शोषणासाठीच असते ही भावना वाढीस लागल्याने ती पोषण देखील करू शकते हे समाज विसरत चालला आहे .स्त्रीच शरीर हे कमनीय बांधा नसून सहनशक्तीच आगार आहे हे कायम लक्षात ठेवायला हवे .तरच खऱ्या अर्थाने स्त्रीचा मान,सन्मान राखला जाईल अन ती समाजाला पुढे घेऊन जाईल .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड .
9422744404 .

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...