गुरुवार, १४ मार्च, २०१९

राजकीय शत्रुत्व ..........!

राजकीय शत्रुत्व ...........!

राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो अस म्हंटल जातं नव्हे असे अनेकदा अनुभव आलेले आहेत ,मात्र देशाचं नेतृत्व करण्याची आस मनात बाळगणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या राजकीय धुरंधर व्यक्तीनं राजकीय शत्रुत्व किती खोल असत हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे,नगरच्या राजकारणात पवार आणि विखे कुटुंबातील कलह अवघ्या महाराष्ट्रानं 90 च्या दशकात पाहिला अन त्याचीच पुनरावृत्ती यावेळीही होणार असे दिसते आहे .

महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठी घराणी कायम सत्तेत किंवा चर्चेत राहिलेली आहेत,त्यात शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील यांचा मोठा वाटा आहे,विखे आणि पवार हे दोघेही पश्चिम महाराष्ट्रात राहणारे ,एकाच पक्षात असून देखील या दोघांमधील संघर्ष लपून राहिलेला नाही .90 च्या काळात पवार आणि विखे यांच्यातील या संघर्षाला अधिकच धार आली,बाळासाहेब विखे यांचा पराभव करण्यासाठी तेव्हा मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवार यांनी गडाख कुटुंबाला जवळ करीत नगरच्या राजकारणात भूकंप घडवला ,मात्र पराभव जिव्हारी लागलेल्या बाळासाहेब विखे यांनी गडाख आणि पवार यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित करीत आपल्या पराभवाचे उट्टे काढले .सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पवार वाचले मात्र गडाख कुटुंबाचे राजकारण सहा वर्षासाठी थांबले.

90 च्या दशकात सुरू झालेला पवार विखे कुटुंबातील संघर्ष आज 20 वर्षानंतर देखील सुरूच आहे यावरून राजकारणात शत्रुत्व कसे असू शकते हे स्पष्ट होते .देशाच्या राजकारणात एकमेकाला पाण्यात पाहणारे मायावती,अखिलेश असोत की एकेकाळी भाजपशी जवळीक साधत नंतर त्यांच्यावरच टीकास्त्र सोडणाऱ्या ममता बॅनर्जी असोत,बदलत्या राजकीय परिस्थिती नुसार प्रत्येक राजकीय नेत्याने आपल्या भूमिका कायम बदलेल्या आहेत, मात्र राज्याच्या राजकारणात विखे पवार कुटुंबातील कलह काही थांबण्याची चिन्हे नाहीत .

शरद पवार हे नेहमीच पक्षाबाहेर राजकीय संबंध ठेवणारे म्हणून परिचित आहेत,देशपातळीवर सर्वपक्षीय आघाडी उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे,मात्र असे असतानाही विखे कुटुंबाशी असलेली खानदानी दुष्मनी विसरण्यास पवार तयार नाहीत यातच सगळे काही आले .त्यातूनच पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला, हा नकार देताना पवार यांनी विखे पाटील कुटुंबाबद्दल जी वक्तव्य केली त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी च्या आघाडीवर देखील आविश्वासाचे ढग दाटले आहेत .

राजकारणात एक अधिक एक दोन न होता अकरा होतात हे न समजण्याएवढे पवार दुधखुळे निश्चितच नाहीत,मात्र ज्यांनी आपल्याला राजकारणातून हद्दपार करण्याचा प्रयत्न केला त्या विखेंबद्दल पवार दोन पावलं माघार घ्यायला तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे .पवार नेहमी जे बोलतात त्याच्या विपरीत वागतात अस म्हणलं जात मात्र नगरच्या बाबतीत ते जे बोलले त्यावर ते कायम राहणार हे स्पष्ट दिसल्याने सुजय विखे यांनी भाजपची वाट धरली .

सुजय यांच्या निर्णयामुळे नगरची लढाई प्रतिष्टेची होणार यात शंका नाही .नगर मधून राष्ट्रवादीकडून अरुण जगताप यांचे नाव निश्चित मानले जात आहे ,मात्र दुसरीकडे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये आपण राष्ट्रवादी चा प्रचार करणार नाही असे सांगून आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली आहे .त्यांच्या या निर्णयामुळे नगरमध्ये काय होणार हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यकाराची गरज नाही .

नगरच्या संघर्षामुळे कदाचित काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला देखील मोठा फटका बसू शकतो .मात्र नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे अशी भूमिका जाणत्या नेत्यांनी घेतल्यास परिणाम दुर्दैवीच होणार हे निश्चित .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...