रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

लाडक्या श्री ला एका रसिकाच पत्र ..........!


प्रिय श्री,चटका लावून गेलीस ग !

1980 -90 च्या काळात जेव्हा हेमामालिनी नावाचं सुखद स्वप्न आम्हा भारतीयांना रुंजी घालत होत तेंव्हा शिवकाशी सारख्या भागातून मुंबई गाठत प्रिय श्री  तू फिल्मी दुनियेत अवतरलीस, त्या अगोदर शिवकाशी ची आम्हाला ओळख ही केवळ फटाक्याचं गाव म्हणूनच  होती ,मात्र त्यानंतर तू शिवकाशी ला एक नवी ओळख दिलीस .त्या अगोदर तू तुझ्या अदाकारीने तामिळ चित्रपट सृष्टी गाजवायला सुरवात केली होतीस मात्र कमल हसन सोबत तू सदमा च्या रुपानं तुझ्या अभिनयाचं  कसब दाखवून दिलंस आणि बॉलिवूड ला तुझी दखल घ्यायला भाग पाडलेस ."ताकी हो ताकी हो ताकी ताकी रे,जब से तू मेरे दिल मे झाकी "असं म्हणत जेव्हा तू जितू ला थिरकवायला लावलंस तेव्हा जितू च काय पण अख्खा देश तुझ्या तालावर नाचायला लागला .
नागीण मधील तुझे जुल्मी डोळे बघून प्रत्येक जण तुझ्या प्रेमातच पडला .तुझ्या अदाकारीच गारुड असं काही होत की प्रत्येक जण आपल्या घरात सुद्धा तूच माझी श्रीदेवी असं म्हणून संसारसुखाचा आनंद घेऊ लागला .

आजही आठवत की कॉलेज असो की तरुणांचा कट्टा कोणीही एखादी सुंदर तरुणी दिसली की आली बघा श्रीदेवी म्हणून टोंट मारायचे .तू एखाद्या वादळासारखी बॉलिवूड मध्ये आलीस आणि तुझी मोहिनी तमाम रसिक प्रेक्षकांवर घातलीस . सदमा पासून सुरू झालेला तुझा प्रवास मॉम पर्यंत येऊन थांबला .चालबाज असो की मिस्टर इंडिया अथवा आखरी रास्ता, प्रत्येक चित्रपटात तू नेहमीच वेगळी वाटलीस. चांदणी मधील तुझा अल्लड अभिनय आजही आठवणीत राहतो,लम्हे मधील अनिल कपूर सोबतची शांत अभिनेत्री अजूनही आमच्या मनात घर करून राहिली आहे .
रेखा,जयाप्रदा, हेमामालिनी यांच्या नंतर बॉलिवूड ने तुझ्यावर भरभरून प्रेम केलं,रसिकांनी तुझ्या अभिनयाचं तोंड भरून कौतुक केलं,90 च्या दशकात रसिकांच्या मनावर तू अधिराज्य गाजवलस .तुझ्या बॉलिवूड मधील एन्ट्री ने ड्रीमगर्ल हेमामालिनी च आसन देखील डळमळीत केलं होतंस. तुझ्या एका एका चित्रपटाचं पारायण करणारे हजारो चाहते आजही सापडतील .तू म्हणजे बॉलिवूड ला पडलेलं एक सोनेरी स्वप्न होतीस,प्रत्येक जण तुझ्यात आपली मैत्रीण,सहचारिणी पाहत होता.उत्कृष्ट अभिनयाचं तू विद्यापीठ होतीस,नवीन कलाकारांसाठी तू एक आदर्श होतीस,तामिळ,तेलगू या सोबतच तू बॉलिवूड आणि छोटा पडदा सुद्धा गाजवलास.

तब्बल पन्नास वर्षे तू रुपेरी पडद्यावर आपल्या अदाकारीने वर्चस्व गाजवलंस, पन्नास वर्षाचा काळ थोडा थोडका नसतो ग,मात्र एवढ्या लवकर जगाचा निरोप घेण्यासारखा देखील नसतो.
तू अशी अचानक आम्हाला सोडून एक्झिट घेशील हे स्वप्नातही आम्हाला वाटलं नव्हतं .तुझं अस जाणं आम्हाला सदमा देणारं आहे.मेरे हाथो में नौ नौ चुडीया है अस म्हणत आजही अनेक तरुण पोरी तुझ्या सारखा अभिनय करण्याचा प्रयत्न करतात.

तू तुझ्या सौन्दर्याच्या बाबतीस आणि शरीर प्रकृतीच्या बाबतीस भलतीच काँशियस होतीस ग ,तरीसुद्धा तू अशी अचानक एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाशील अस वाटलं नव्हतं .तुझ्या एक्झिट ची खबर घेऊन आजचा सूर्य उगवला आणि रसिकांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला .श्री खरोखरच तू एक दैवी देणगी होतीस,अजूनही विश्वास बसत नाही की तू आम्हाला सोडून गेलीस. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हणतात मात्र देवही एवढा निष्ठुर कसा होऊ शकतो हाच प्रश्न आम्हाला पडला आहे .

तुझाच एक चाहता

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

डोळे हे जुल्मी गडे ..............!

डोळे हे जुल्मी गडे ..................!

तुम्ही आम्ही सर्वांनीच कधी न कधी कोणावर तरी पहिल्यांदा प्रेम केलंच असेल ना,हां आता प्रत्येकाच्याच आयुष्यात जिच्यावर किंवा ज्याच्यावर प्रेम केलं त्याची साथ आयुष्यभरासाठी मिळालीच असेल असं मात्र झालं नसणार तरी सुद्धा पहिलं प्रेम काही केल्या विसरता येत नाही हा सगळ्यांचाच अनुभव आहे .मनाच्या एका कोपऱ्यात ते पहिलं प्रेम,तो किंवा ती कायम असते,ते दिवस कधीही केव्हाही ,कुठेही आठवतात आणि प्रत्येक जण काही क्षणासाठी का होईना भूतकाळातल्या त्या सुखद आठवणीत रममाण होतो यात शंकाच नाही,हे आठवण्याचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी हृदयांचा चुराडा करणारी प्रिया होय .तिच्या भुवया उडवत केले जाणारे इशारे अनेकांना जुन्या आठवणीत घेऊन गेले असतील हे नाकारून चालणार नाही ."इन आखोंकी मस्ती के मस्ताने हजारों हैं "या गीताची आठवण पुन्हा एकदा प्रियाच्या डोळ्यांनी करून दिली हे मात्र नक्की .

कोण कधी केव्हा आणि कसं फेमस होईल हे सांगता येत नाही,मध्यंतरी "सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय "अस म्हणणारी आर जे मलिष्का सोशल मीडियावर धुमाकूळ घालून गेली तर मागील चार पाच दिवसांपासून एक भुवयी उडवीत आपल्या नयन बाणांनी समोरच्याला घायाळ करणारी प्रिया सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे .डोळे हे जुल्मी गडे याचा प्रत्यय प्रियाकडे पाहिल्यावर येत आहे हे मात्र नक्की .

प्रिया प्रकाश वरीयार ही अभिनेत्री सध्या लाखो तरुण तरुणींच्या दिलाची धडकन बनली आहे,मूळची केरळ मधील रहिवाशी असणारी प्रिया आपल्या पहिल्याच मल्याळम सिनेमातील केवळ 27 सेकंदाच्या व्हिडीओ ने  रातोरात स्टार बनली आहे,तिची भुवयी उडवण्याची स्टाईल पाहून लाखो लोकांना आपलं तरुणपण आठवलं असणार यात शंकाच नाही,काश हमे भी कोई इस नजर से देखणे वाली मिल जाती असंच प्रियाकडे पाहिल्यावर अनेकांच्या तोंडून निघालं असणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही .

पाच सात वर्षांपूर्वी अचानक आलेल्या कोलावरी या गाण्याने धुमाकूळ घातला होता,काही दिवसात या गाण्याने कोट्यवधी लोकांना भुरळ घातली होती,गाण्याचे बोल आणि त्याचा अर्थ कळत असो अथवा नसो पण त्यासाठीच्या संगीतामध्ये, त्याच्या सुरावटीमध्ये एक वेगळीच जादू होती,त्यामुळे लहानग्यापासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांच्या तोंडी कोलावरी होत, आज तशीच काहीशी परिस्थिती असल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसत आहे .

प्रियाच्या या व्हिडीओ ने दोन तीन दिवसात कतरीना,सनी लिओनी ,दीपिका पदुकोण यांना मागे टाकलं आहे,तब्बल एक कोटींपेक्षा अधिक लोकांनी ट्विटर,फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर तिला फॉलो केलं आहे .कधीकाळी आम्हीपण तरुण होतो,आम्हाला सुद्धा शाळा, कॉलेज,गल्ली किंवा शहरातील एखादी पोरगी आवडायची,तिच्या एका दर्शनासाठी आम्ही दिवसभर एका पायावर उभे असायचो हे किस्से सांगून सांगून म्हातारे झालेल्यांना प्रियाच्या या व्हिडीओ ने पुन्हा एकदा आपले जुने दिवस आणि तरुणपण आठवायला लावले असतील हे नक्की .

1970 ते 90 च्या दशकात आशा पारेख,झीनत अमान,रेखा,मुमताज,सायराबानो, वहिदा रहेमान अशा नायिकांनी तरुणांच्या हृदयावर राज्य केलं,त्यानंतर आलेली धकधक गर्ल माधुरी दीक्षित ही कित्येक वर्षे मुलामुलींची आयडॉल होती,अलीकडच्या काळात काजोल असो की दीपिका पदुकोण अथवा इतर कोणतीही अभिनेत्री,प्रत्येकीनं त्या त्या काळात आपल्या अदाकारीने लाखो लोकांना वेड लावलं होतं, मात्र प्रियाच्या व्हिडीओ ने सध्या धुमाकूळ घातला आहे.

मराठी चित्रपटातील लावण्या पाहिल्यानंतर डोळ्यांचे इशारे काय असतात आणि ते काय करू शकतात हे लक्षात येतं, या रावजी बसा भावजी,कशी मी राखू तुमची महरजी, अस म्हणत नयन बाणांनी घायाळ करणाऱ्या लावण्य तारका पाहिल्यानंतर अनेकांनी फेटे आणि टोप्या उडवल्या आहेत,लावणीमध्ये अदाकारी ला नृत्या एवढेच महत्व आहे हे आजपर्यंत सगळ्यांनीच अनुभवलं आहे ,सध्या प्रियाबाबतही सर्वांचा हाच अनुभव आहे .या पोरीच्या नयन बाणांनी अनेकजण घायाळ झाले आहेत .

डोळा मारणं हे आपल्या संस्कृती मध्ये प्रेम व्यक्त करण्याचं प्रतिक मानलं जातं,संस्कृतीचे रक्षक म्हणवून घेणारे मात्र याला अश्लील म्हणतात हा भाग अलहिदा . डोळा मारणं हे जस प्रेम व्यक्त करण्याचं प्रतिक आहे तसच वेगळं काही तरी सांगणं किंवा एखादी गोष्ट लक्षात आणून देण्यासाठी सुद्धा समजलं जातं . आय लव्ह यु म्हणण्यापेक्षा सहजपणे डोळ्याने केलेले इशारे अधिक काही सांगून जातात हे मात्र निश्चित आहे. डोळे हे जुल्मी गडे असो की तेरे नैना बडे दगाबाज रे हे अलीकडच्या काळातील सलमान च गाणं असो,डोळ्यांच्या अदाकारीवर शेकडो गाणी,कविता,लेख लिहिले गेले आहेत ,अगदी घालीन लोटांगण,वंदीन चरण,डोळ्यानं पाहीन रूप तुझे यात सुद्धा डोळ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केल आहे हे विसरून चालणार नाही .त्यामुळेच कदाचित डोळ्यात डोळे घालणे,डोळ्याच्या धाकात असणे,डोळे वटारने,डोळेझाक करणे आदी शब्द प्रचलित झाले असावेत .

प्रिया वरीयार चा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक जण वेडापिसा झाला असणार आणि प्रत्येकाने तिचं हे रूप डोळ्यात साठवून घेतलं असणार यात शंका नाही, डोळे हे न बोलताही खूप काही सांगून जातात हे अनेकांच्या अनुभवातून समोर आलेलं आहे त्यामुळे प्रियाच्या डोळ्यांची उघडझाप प्रत्येकाला आपली वाटल्यास नवल वाटायला नको .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404 .

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...