सोमवार, ११ मे, २०२०

गायछापच्या खारवड्या ...........!



गायछापच्या खारवड्या .................!

तुम्ही सगळ्यांनी म्हणजे बहुतांश जणांनी पापड्या ,कुरडया,खारवड्या खाल्याचं असतील ना,उपवासाच्या पापड्या,ज्वारी,बाजरी,बटाटे अशा वेगवेगळ्या पापड्या खाल्या असतील अन खारवड्या सुद्धा नाही का,या खारवड्या बाजरीपासून बनतात हे सगळ्यांना माहीत आहे मात्र तुम्ही गायछापच्या खारवड्या खाल्या आहेत का कधी, नाही ना,मी पण नाही खाल्या मात्र आमच्या एका मित्राने लॉक डाऊन च्या काळात त्या केल्या असाव्यात अशी आम्हाला शंका आहे .
आम्ही दोन चार मित्र सकाळी सहज गप्पा मारत बसलो असताना अचानक गाय छापचा विषय निघाला अन लगेच उदय जोशीने सिक्सर मारला,तो म्हणला त्यांनी गायछापच्या खारवड्या घातल्या असतील अन आम्ही सगळे पोट धरून हसू लागलो,हा किस्सा सांगायचं कारण म्हणजे या कोरोनाच्या महामारीने अनेकांना अनेक अनुभव दिले आहेत,म्हणलं आज यातील काही अनुभव लिहून काढावेत .
साधारणपणे मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून देशावर कोरोनाचे काळे ढग जमू लागले होते  .देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यु जाहीर करून भारतवासियानो आता महिना दीड महिना घरातच रहा असा संदेश दिला .कधीही  आठ दहा तासापेक्षा जास्त काळ घरात बसू न शकणाऱ्या,त्यातही अर्धवेळ झोपेतच घालवणाऱ्या बहुतांश भारतीयांना हे पचनी पडणार नव्हतं मात्र तरीही गेल्या पन्नास दिवसापासून तमाम लोक हे सरकारी आदेशाचे शक्य तेवढे पालन करीत आहेत .
मात्र शेवटी आपण  सगळे भारतीयच आहोत ,सरकारने कितीही बंधन घातली,आर्जव केली,कायदे केले,एवढंच काय पण गुन्हे दाखल केले तरी आपण या घरबंदी मधून बाहेर पडण्याचा येनकेन प्रकारे प्रयत्न करीतच असतो अन त्यातून मग घडतात वेगवेगळे किस्से .

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा थुंकल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून सरकारने तंबाखू,गुटखा,सिगारेट च्या विक्रीवर बंदी घातली,सर्व दुकाने टपऱ्या बंद केल्या नव्हे सील केल्या मात्र कोणत्याही बंदी घातलेल्या गोष्टी सहज उपलब्ध करून घेण्यात आम्हा भारतीयांना एक वेगळाच आनंद मिळतो तसा या गोष्टीतही का नाही मिळणार,म्हणून मग मागच्या दाराने, चोरी छुपे या वस्तूंची खरेदी विक्री सुरू झाली,त्यातल्या त्यात भाव दुप्पट होऊन देखील आजही या वस्तू सहजपणे मिळू लागल्या आहेत हे विशेष .मध्यंतरी बीडच्या पोलीस खात्याने तब्बल चाळीस कोटी रुपयांचे गुटख्याचे कुपन पकडले होते,त्यात वरकरणी आरोपी वेगळे असले तरी यात एका जिल्हाप्रमुखाचा हात होता अन तो हा धंदा पार्टनर शिप मध्ये करत होता असे नंतर कळले मात्र या कारवाईचे पुढे काय झाले ते काही समोर आले नाही ,असो .तर विषय हा आहे की गुटखा,सिगारेट,पान, तंबाखू,दारू विक्रीवर बंदी घातलेली असली तरी या सगळ्या गोष्टी सर्रास उपलब्ध होत आहेत,भाव फक्त जास्त आहेत एवढंच .
काही ठिकाणी अन्नधान्याच्या नावाखाली सर्रास तंबाखू अन गुटख्याची तस्करी केली गेली तर अनेक लोक हे दुधाचे टँकर,टेम्पो,जनावरांची वाहतूक करणारी वाहने यातून गावाकडे जाताना पकडले गेले .अनेक बियरबार, वाईन शॉप मालकांनी स्टोक घरी घेऊन जात होम डिलिव्हरी करून यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक केली .

एका राजकीय नेत्याला मालिश करण्याची हुक्की आली,मग काय शेठने मालिश करणाऱ्याला चारचाकी गाडी पाठवली अन घरी बोलावून घेतलं,सगळ्या अंगाची मालिश झाली अन नेत्याला झोप लागली,मालिश करणारा पायी पायी निघाला घराकडे अन त्याला गाठलं पोलिसांनी आणि त्याची एवढी धुलाई केली की त्याला स्वतःचीच मालिश करण्याची वेळ आली .

अशाच आमच्या एका मित्राने गेल्या महिनाभरात तब्बल ऐंशी च्या आसपास गायछाप तंबाखूच्या पुड्या फस्त केल्याचा विषय निघाला,आता एवढ्या पुड्या त्याने एकट्याने खाल्या की गावजेवन दिल्याप्रमाणे वाटल्या .हे त्यालाच माहीत,मात्र हा विषय निघाला अन आम्हालाही आश्चर्य वाटलं,तेवढ्यात उदय जोशी ने आपल्या खास शैलीत सांगितले की कदाचित त्यांनी गायछापच्या खारवड्या घातल्या असतील,ही कल्पनाच भारी आहे,गायछाप तंबाखुला चुना लावायचा,त्या मिश्रणाला खारवड्या प्रमाणे वाळत घालायचं अन झाल्या गायछापच्या खारवड्या तयार,तर आजकाल या गायछाप ला सोन्याचा भाव आला आहे,दहा रुपये किरकोळ किंमत असलेली ही पुडी आज शौकीन अन व्यसनी लोक तीस चाळीस रुपयांना खरेदी करत आहेत .
हे झालं गायछापच,इतरही सगळ्याच न मिळणाऱ्या किंवा समोरून शटर बंद असलेल्या गोष्टीसुद्धा या कोरोनाच्या संकटात बेभाव मिळू लागल्या आहेत .आता दारुचच घ्या ना,राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व बियर बार अन वाईन शॉप ला।सील केलं असल तरी देखील तळीरामांना सहजपणे मदिरा उपलब्ध होत आहे,दीडशे रुपयांची बाटली पाचशे रुपयांना मिळत असली तरी देणारा उपकार केल्याप्रमाणे अन घेणारा कृतकृत्य झाल्याप्रमाणे भाव चेहऱ्यावर आणून याचा आनंद घेतात हे नक्की .
देशात लॉक डाऊन असताना बीडच काय पण जिल्ह्यात अन राज्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे दारू मिळत आहे,अट फक्त एकच आहे जी स्टोक मध्ये असेल तिच्यावर भागवावे लागत आहे,नही मामु से नकटे मामु सही याप्रमाणे जी मिळेल ती गोड मानून तळीराम आपला घसा ओला करत आहेत हे नक्की .ही दारू उपलब्ध व्हावी म्हणून जुने जाणते मित्र,नातेवाईक,जुने कस्टमर अशांच्या ओळखी काढून हौस भागवली जात आहे .एकंदर काय तर रोज नाइंटि का होईना मिळाली पाहिजे हे खरं,बाकी ती ओरिजिनल आहे की डुप्लिकेट याला सध्या कोणी महत्व देत नाही .
संचारबंदी शिथिल असल्याच्या काळात अनेकजण सहलीला निघाल्याप्रमाणे बाहेर पडत असून काहीजण बँकेत गार्डन मध्ये फिरायला आल्यासारखे येतात,शंभर दोनशे रुपये भरतात किंवा काढतात नाहीतर एक तासभर लाईनमध्ये उभं राहून  बॅलन्स किती आहे चेक करा अन पासबुक भरून द्या अस सांगत आपली बाहेर फिरण्याची हौस भागवून घेत आहेत .काही महाभाग तर एक बिस्किटंचा पुडा किंवा एक कोथिंबीर ची जुडी घेण्यासाठी बाहेर पडतात.
एका मित्राने तर भन्नाट किस्सा सांगितला, लॉक डाऊन च्या काळात बायकोने गाऊन घेण्याची फर्माईश केली मग काय दुकानात घेऊन जावं लागलं,दुकानात सोडून साहेब पत्नीला आणायला गेले तर दुकानात पाच पंचवीस बायका तोंडाला बांधून खरेदी करत होत्या,याची अडचण झाली कोण आपली बायको अन कोण दुसऱ्याची,शेवटी याने आवाज दिला अन बायकोला घेऊन घर जवळ केलं.आता मला सांगा गाऊन नसला तर एवढं काही बिघडत का पण नाही लॉक डाऊन च्या काळात खरेदी केली हे मैत्रिणींना सांगायला पाहिजे ना म्हणून कदाचित वहिणीसाहेबांनी गाऊन खरेदीची फर्माईश केली असावी,बर आणल्यावर मैत्रिणी म्हणल्या अग हा चांगला नाही,कलर धुरकट आहे बदलून आण, मग पुन्हा साहेब दुकानात .
काही महाभाग हे घरच खाऊन खाऊन बोर झाले म्हणून त्यांनी सरळ खानावळ किंवा हॉटेल ला फोन केला ,मग तिथं वेगवेगळ्या पदार्थासोबत घसा ओला करण्याची सोय असणाऱ्या हॉटेल किंवा खानावळीला प्राधान्य दिलं गेलं .कुलर असो की एसी अथवा कॉम्प्युटर खरेदी सगळं काही आतल्या दारान किंवा मागच्या दारान सुरूच आहे .
या महिन्यात अनेकांचे वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस देखील आहेत त्यामुळे त्यातील काही जणांनी टरबूज कापून केक कापल्याचा आनंद मिळवला तर काहींनी स्वीट होम मधून केक आणून सेलिब्रेशन केलं .अनेकांनी आपल्या नातेवाईकांना ,कुटुंबियांना आजारी पाडल अन त्यांच्या जुन्या फाईल सोबत घेऊन गावातून एक फेरफटका मारण्यात धन्यता मानली .
सरकारी कर्मचारी देखील यामध्ये मागें नाहीत,सरकारी कार्यालयात केवळ दहा किंवा 33 टक्के कर्मचारी हजर असावेत असा आदेश असताना काही महाभाग गळ्यात कार्यालयाचे ओळखपत्र घालून फिरताना दिसून आले .अगदी या काळात पत्रकार देखील मोठ्या संख्येने झाले,कोणीही सोम्या गोम्या गळ्यात प्रेस च कार्ड घालून पोलिसांसमोर बिनधास्त फिरताना दिसून आले .
अनेकांनी पोलीस आणि इतर गोरगरिबांना अन्नदान करण्याच्या नावाखाली पास मिळवले अन ते रस्त्यावर बिनधास्त उंडारू लागल्याचं चित्र पहावयास मिळालं .काही पोलीस बांधवांनी देखील मग अंतर्वस्त्रे खरेदी करण्याची हौस भागवून घेतली .हे सगळं पाहिल्यानंतर एक प्रश्न पडला की खरच आपण कोरोना बाबत किती जागरूक आहोत,देशावर मोठं संकट आलेलं असताना आपण मात्र या संकटात घरात बसून सरकारला सहकार्य करण्याऐवजी बाहेर उंडारत फिरण्यात धन्यता मानली आहे .दोन महिने नाही पिली दारू,नाही कपडे खरेदी केले,नाही व्यसन केले तर आपण मरणार आहोत का ,नक्कीच नाही पण कायदा मोडण्यात आपल्याला मोठा चेव येतो ना त्यामुळे आपण गायछापच्या खारवड्या सुद्धा करून टाकुत हे या संकटकाळात प्रकर्षाने दिसून आलं .कधी सुधारणार आहोत आपण हे देवालाच माहीत अस यानंतर म्हणावं वाटतं .या सगळ्या संकट काळात आपण घरात राहावं,बाहेर पडू नये,गर्दी करू नये यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र झटत आहे आपण मात्र हे सगळे नियम,कायदे धाब्यावर बसवून कसे नियम मोडले याचे किस्से रंगवण्यात आघाडीवर आहोत,काय मिळवणार आहोत यातून आपण,कोणतं मेडल मिळणार आहे,हे सगळं करून आपण आपलंच नाही तर आपल्या कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं आरोग्य बिघडवत आहोत हे आपल्याला कधी कळणार आहे .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...