गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

सायकल ........!



सायकल .....!

." सायकल वाल्या पुलीसवाल्या बिरीक लावून थांब,टोपी तुझी र हातात माझ्या , होईल कसं र काम ,जाऊया डबल सीट रे लांब लांब लांब "हे गाणं लक्ष्मीकांत बेर्डे आणि उषा चव्हाण यांच्यावर चित्रित केलं तेव्हा मुख्य आकर्षण होती ती सायकल .हे गाणं आणि सायकल आठवण्याच कारण म्हणजे आज लेकींसाठी दोन सायकल खरेदी केल्या,या सायकल पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो कोणत्याही शब्दात वर्णन करता येणारा नव्हता,अनमोल असा तो क्षण अनुभवला आणि लहानपणीचे दिवस आठवले .

लहानपणी बहुतांश लोकांकडे येण्या जाण्याच साधन म्हणजे सायकल असायची,ज्यांच्याकडे सायकल आहे तो सधन कुटुंबातील समजला जायचा,त्याला चारचौघात मानसन्मान असायचा . मला आजही आठवत की मी पहिल्यांदा सायकल चालवली ती सातवी आठवीत गेल्यानंतर,म्हणजे वयाच्या बारा तेराव्या वर्षी,आज मात्र लेकरू वर्षभराच झालं की त्याला सायकल ,बाबा गाडी,तीनचाकी सायकल खेळायला मिळते .सायकल सोबतच आता ट्रायसिकल ची मोठं मोठी शोरूम मेट्रो सिटी सोबतच बिडसारख्या शहरातही दिसून येतात .

पूर्वी म्हणजे 90 च्या दशकात ग्रामीण भागासह शहरातही भाड्याने / किरायाने सायकल मिळायची,सुरवातीला चार अणे,आठ अणे तास मिळणारी सायकल नंतर तीन चार रुपये तासांपर्यंत पोहचली.दिवसभर सायकल वापरायची असेल तर दहा वीस रुपये मोजावे लागत,त्यावेळी बीड शहरात नसीम सायकल मार्ट,ए वन सायकल मार्ट,नितीन सायकल मार्ट ,मोहारे सायकल मार्ट अशी मोजकीच दुकानं असायची. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही सायकल मार्ट,पंचर काढणे हे व्यवसाय तरुणांना आकर्षित करीत असत .

त्या काळात लेडीज आणि जेन्ट्स अशा दोनच सायकल असायच्या आज मात्र लहान मुलांच्याच सतराशे साठ सायकलचे प्रकार बाजारात आले आहेत .आमच्या लहानपणी आम्हाला खेळायला लाकडी गाडे होते, सुताराकडून चार लाकडं त्रिकोणी आकारात बांधून तयार केलेला गाडा हा मर्सिडीज पेक्षा भारी वाटायचा .

कालौघात मात्र सायकल हळूहळू मागे पडली . मोपेड,स्कुटर,बुलेट या गाड्या बाजारात आल्या आणि गरिबांची सायकल बाजारातून हळूहळू कमी होऊ लागली .सायकल ला असलेले कॅरियर वर बसून किंवा मधल्या दांडीवर बसून डबल सीट लॉंग ड्राइव्ह तुम्ही आम्ही अनेकांनी एन्जॉय केली असेल .काही गोड आठवणी देखील असतील अनेकांच्या .अगदी रुपेरी पडद्यावरील नायक नायिका यांनी  देखील आता आता पर्यंत सायकल चा वापर केल्याचे दिसून येते .

आजही चीन सारख्या देशात सायकल भाड्याने मिळते नव्हे तिथे बहुतांश लोक मोठं मोठ्या गाड्या ऐवजी सायकलचा सर्रास वापर करताना दिसतात,भारतात मात्र अद्यापही हे चित्र दिसत नाही .पूर्वीच्या काळी दूधवाला सायकलवर दूध घालायला येत असे,आज मात्र मोटारसायकल वर दूध घालणारेच दिसतात .आज सायकल फक्त पेपर टाकणाऱ्या मुलांकडेच सायकल दिसतात .

काही ध्येयवेडे लोक आजही सायकलवर भारत भ्रमण  करताना दिसतात,अनेक देशात सायकलच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात,बराक ओबामा सारखे लोकही सायकलचा वापर करताना दिसतात मात्र हे फार थोडे लोक आहेत,सायकल ही शरीराच्या सर्व अवयवांना चालना देणारे साधन आहे परंतु त्याकडे कोणी लक्ष देत नाही.पेट्रोल आणि डिझेल च्या वाढलेल्या किमती त्यातून होणारे वायू प्रदूषण या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर सायकल ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली पाहिजे .आठवडा भरातून एक दिवस तरी मोटार सायकल किंवा चारचाकी ऐवजी सायकलवर फिरण्याचा निर्णय प्रत्येकाने घेतला तर राष्ट्रीय संपत्ती तर वाचेलच परंतु आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होईल हर नक्की .

पूर्वी सायकल ही गरिबांची गरज होती आज सायकल ही श्रीमंतांच्या प्रतिष्टे च लक्षण झाली आहे,दिवसरात्र कामात व्यस्त असणाऱ्या माणसाकडे स्वतःच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम पाहायला देखील वेळ नाही,मग वाढलेलं पोट,शरीरातील बदल नियंत्रित करण्यासाठी मोठं मोठे उद्योगपती,राजकारणी सायकलिंग करताना दिसतात,अनेक शहरात तर सायकल चालवणाऱ्यांचे क्लब स्थापन झाले आहेत,कालचक्रात सायकलमध्ये अनेक बदल झाले आहेत, आता पारंपरिक सायकल बरोबरच गेयरच्या सायकल बाजारात आल्या आहेत,पूर्वी दोन चारशे रुपयांना मिळणारी साधी सायकल आजघडीला तीस चाळीस हजारापर्यंत गेली आहे .

माणूस तरुण पणात पैसे कमवण्यासाठी मरमर करतो आणि आयुष्याच्या मध्यानंतर कमावलेला पैसा शरीर व्यवस्थित राहावे,आरोग्य  टिकावे यासाठी खर्च करतो आणि त्यातूनच मग महागड्या सायकल ची फॅशन सुरू होते.आज बहुतांश लोक सकाळी मॉर्निंग वॊक सोबतच सायकलिंग करताना दिसून येतात,मात्र या सायकलिंग मध्ये जुन्या जमान्यातील सायकलची मजा नाही हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404 .

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...