बुधवार, २९ जानेवारी, २०२०

(अ)जाणता राजा ...........!

(अ ) जाणता राजा .............!
राजकारणात कोण कधी कोणाचा कसा वापर करेल याचा नेम नाही,आपल्या स्वार्थासाठी हे राजकारणी देव,दानव एवढंच काय पण थोर महापुरुषांना सुद्धा सोडत नाहीत,अनेकदा या थोर विभूतींच्या नावे आपलं उखळ पांढर करण्याचा उद्योग हे राजकारणी करत असतात .अनेकदा देशापुढील महत्वाच्या समस्या वरून जनतेच लक्ष दूर करण्यासाठी हे असले उद्योग केले जातात,सध्या सुद्धा ज्या पुस्तकावरून देशात आगडोंब उसळला आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाने अधिकच भर पडली आहे .समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते असा दावा पवार यांनी करून नेमकं काय साधल हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे .
शरद गोविंदराव पवार हे नाव गेल्या पाच दशकापासून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपला वेगळा दबदबा निर्माण करून आहे .राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून ते देशाच्या संरक्षण, कृषी मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे शरद पवार हे जाणता राजा म्हणून राज्यात त्यांच्या अनुयायांकडून ठासून सांगितले जाते .आता जाणता राजा म्हणजे काय या विषयावर वाद प्रतिवाद होऊ शकतात पण इतिहासाची पानं चाळली तर हा शब्दप्रयोग केवळ आणि केवळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदराने केला जातो नव्हे जनतेनेच त्यांना ही उपाधी दिल्याचे स्पष्ट होते,तरीसुद्धा अलीकडच्या काळात ही उपाधी पवार यांच्यासारख्याना दिली गेली आणि लोकांनीही त्यावर फार काही आक्षेप घेतला नाही .
मात्र शरद पवार हे गेल्या पन्नास वर्षात अनेकदा ऐतिहासिक असो की सांस्कृतिक अथवा पौराणिक विषयात नको ते बोलून समाजात दुही निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात असे अनेकदा आरोप झालेले आहेत .मात्र पवार यांनी कधी त्याची तमा बाळगलेली नाही .त्यांनी जातपात किंवा जातीयता स्वच्छपणे दिसेल किंवा जाणवेल अशी वक्तव्य करून आपल्या राजकारणाचा गाडा हाकलेला आहे .
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असताना पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूट वर झालेला हल्ला असो की दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्याचे प्रकरण असो प्रत्येकवेळी पवार यांनी यातून आपल्या बोलण्याने तेल ओतण्याचेच काम केलेले आहे .अगदी अलीकडच्या काळातील दाखला द्यायचा झाल्यास छत्रपती संभाजी राजे यांच्या खासदारकीवरून पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावताना पेशवे कधीपासून छत्रपतींना जहागिरी बहाल करु लागले अस वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती .एवढंच काय पण त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात चक्क पुणेरी पगडी हद्दपार करून यापुढे फुले पगडीचा वापर करावा अस सांगून आपले इरादे स्पष्ट केले होते .
पवार जे बोलतात त्यामागे त्यांचा नेमका असा राजकीय हेतू असतो हे आजवर लपून राहिलेलं नाही .एकीकडे राजकीय व्यसपीठावरून अथवा सामाजिक कार्यक्रमामधून जातीयतेच्या विरोधात आरोळ्या ठोकायच्या अन दुसरीकडे जातीय विद्वेष पसरेल अशी वक्तव्य करायची हा प्रकार पवार नेहमी करतात हे राज्यातील जनतेला माहीत झालेलं आहे .पवार नेहमी कोड्यात बोलतात अस म्हटलं जातं पण ज्यांनी त्यांचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे त्यांना हे नक्कीच माहीत आहे की पवार हे कधीही हेतुशिवाय बोलत नाहीत .
महाराष्ट्र राज्य हे बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार यांच्यासह सर्वांच राज्य आहे हे वेगळं सांगायची गरज नाही .दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील या सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेत स्वराज्य घडवण्यासाठी आपली हयात घालवली,ज्या राजेंनी जातीयता निर्मूलन व्हावी यासाठी आपल्या काळात आटोकाट प्रयत्न केले ,आपल्या सोबत सर्व जातीधर्माच्या मावळ्यांना घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली .मात्र त्यांच्याच राज्यात त्यांच्याच नावावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या राजकारण्यांचे आलेले पीक काही कमी होण्याचे नाव घेत नाही .
कोणताही मनुष्यप्राणी जन्माला आल्यानंतर आई हीच त्यांची पहिली गुरू असते कारण आपल्या उदरात नऊ महिने सांभाळ करून जन्म दिल्यानंतर देखील तीच त्याच्यावर संस्कार करत असते,त्यानंतर शिक्षक किंवा गुरुजन,समाज,मित्र हे त्याचे गुरू समजले जातात .मग त्यात वेगळं अस काय आहे .पण कोणत्याही गोष्टीत राजकारण करणाऱ्या पवार यांना या अशा गोष्टीत राजकीय भांडवल नाही सापडलं तर नवलच .त्यामुळे सध्या देशात जय भगवान गोयल यांच्या तथाकथित पुस्तकावरून जो वाद रंगला आहे त्यात शरद पवार हे उडी घेणार नाहीत हे कसं शक्य आहे .गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यातील नेत्यांमध्ये जे वाकयुद्ध सुरू आहे त्यात पवार यांनी वेगळाच विषय मांडून चर्चा तिसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो अजनातेपणे नव्हे तर जाणीवपूर्वक केल्याचे स्पष्ट दिसते .
समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते तर जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरू होत्या अस सांगून पवार यांनी पुन्हा एकदा एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे .
छत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्यकाळ सोळाव्या शतकातला आहे,त्यानंतर चार पाच दशक झाली तरीदेखील आजही या महापुरुषांच्या नावाने गाजर दाखवत जनतेला वेड्यात काढण्याचा उद्योग हे राजकारणी करीत आहेत अन हे माहीत असूनही लोक त्यांच्यामागे जातात यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असावी .
शरद पवार यांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी मोठा वाटा उचलला यात शंकाच नाही मात्र वेळोवेळी जेव्हा केव्हा गरज वाटेल तेव्हा तेव्हा त्यांनी जातीय विधान करून राज्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो .हा सगळाच प्रकार किळसवाणा म्हणावा लागेल असा आहे .आज जग हे एका खेड्याप्रमाणे झालेले असतानाही आपण नको त्या विषयावरून वाद विवाद,जातीयता,धार्मिक तेढ निर्माण करण्यात वेळ वाया घालवत आहोत .शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला अस म्हणलं जात असेल तरी त्यांनी राजकीय,सहकारी,खाजगी अशा अनेक ठिकाणी आपले पाहुणे रावळे चिकटवले अन स्थिरस्थावर केले .
पवार हे केवळ समर्थ रामदास यांच्याबाबत बोलूनच शांत राहिले नाहीत तर अल्पसंख्याक समाजाने संगीतल्यानेच आपण शिवसेनेसोबत महाविकास आघाडी स्थापन केली अस सांगून पुन्हा एकदा आपले मनसुबे उघड केले .
पवार यांना राज्यातील राजकारणात जातपात आणून आपला हेतू साध्य करायचा असेल तर तो त्यांनी जरूर करावा मात्र त्यासाठी दुसऱ्या समाजाला दूषणे देणं भूषणावह नाही,पण हे त्यांना सांगणार कोण . निव्वळ जातीय ध्रुवीकरण करून आपला हेतू साध्य करायचा हेच त्यांच्या राजकारणाचे गणित राहिलेले आहे .समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते की नाही हा विषय कुठेच नव्हता मात्र पवार यांनी जाणीवपूर्वक हा विषय काढून आपल घोड दामटल .
कोणाच्याही ध्यानी मनी नसणारी गोष्ट पवार हे लोकांसमोर मांडतात अन मग त्यावरून राजकीय धुळवड रंगली की मग त्यात आपले हात धुवून घ्यायचे .राजकारण किती गलिच्छ पातळीवर जाऊन केलं जाऊ शकत हे जर शिकायचं असेल तर महाराष्ट्र आणि पवार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे .पवार हे आयुष्याच्या एका अशा टप्यावर आहेत की आता त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असायला हवं आणि राज्याच्या राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीला धडे द्यायला हवेत मात्र पवार हे जातीयवादाच जे बीज रुजवू पाहत आहेत त्यामुळे महाराष्ट्र आणि इथली सहिष्णू संस्कृती धोक्यात येऊ शकते हे नक्की .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड,9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...