मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०१७

देवेंद्राचा कार 'भार'..........!

देवेंद्राचा कार 'भार'


तुम्ही आम्ही देवेंद्राचा जो काही अवतार पाहिला आहे तो केवळ सिनेमा किंवा वेगवेगळ्या डेली सोपं मधूनच ,त्यात देवेंद्राचे जे दर्शन घडते त्यानुसार हा देवांचा देव ,स्वर्गाचा मालक,राजा किती हतबल,ऍडजस्ट करून घेणारा आहे हे लक्षात येते,राजाची खुर्ची दुरून साजरी दिसत असली तरी त्यावर बसून कारभार करणे किती अवघड आहे हे काल्पनिक कथांमधून का होईना लक्षात येतं, अशीच काहीशी अवस्था राज्याचा कारभार हाकणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची झाल्याचे तीन वर्षांच्या कारभारानंतर दिसते.सहकाऱ्यांच्या चुकांवर पांघरून घालत आपली इमेज जपताना फडणवीस यांना मोठी कसरत करावी लागल्याचे दिसते मात्र तरी देखील सामान्य माणसाच्या मनात एक चांगलं सरकार ही इमेज निर्माण करण्यात ते यशस्वी झाले हाच त्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा प्लस पॉईंट म्हणावा लागेल.

राज्यातील दहा वर्षांच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारभाराला जनता कंटाळली होती,त्यामुळे भाजपने लावलेला जोर आणि मोदी लाट यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या गलबताचा बुडून शेवट होणार हे निश्चित होते,त्यानंतर सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकार समोर अनेक आव्हान होती,विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जरा जास्तच होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही,काँग्रेस राष्ट्रवादी सारखे दृश्य आणि शिवसेनेसारखे अदृश्य विरोधक यांना तोंड देता देता पक्षांतर्गत संघर्षाला देखील त्यांना सामोरे जावे लागणार होते,गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला तर ते या सर्व आघाड्यावर यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल.

सत्तेत असूनही कायम फडणवीस यांच्या सरकारवर तोंडसुख घेणारे शिवसेनेचे नेते असोत की विनाकारण नको त्या गोष्टी करून किंवा बडबड करून सरकारवर नामुष्की ची वेळ आणणारे सहकारी मंत्री असोत देवेंद्र यांच्या डोक्याला कायम ताण च राहिला आहे.कुठे नेवून ठेवलाय  महाराष्ट्र माझा अस पोटतिडकीने म्हणणाऱ्या माणसाला सुखी करण्याचं खडतर काम देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर होतं. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसून येते .

सरकारने जे लोकाभिमुख निर्णय घेतले त्यात सामान्य माणसाचे किती कल्याण झाले हा संशोधनाचा भाग असला तरी चित्र निर्माण करण्यात मात्र फडणवीस यशस्वी झाले हे नक्की.दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या बळीराजाला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून संपन्न करण्याचा प्रयत्न असो की कर्जमाफीचा विषय,सरकार ने आपली इमेज निर्माण केली हे खरे आहे .

मराठा आरक्षण असो की वेगवेगळे संप,आंदोलन ,मुख्यमंत्री म्हणून ते व्यवस्थित हाताळण्याचे कसब फडणवीस यांनी दाखवले हे मान्य करावेच लागेल,एकीकडे राज्यातील स्वपक्षीय,मित्रपक्षांना खुश करण्याची सर्कस करताना दिल्लीकरांची मर्जी सांभाळणे देखील महत्वाचे होते,त्यात फडणवीस शंभर टक्के उत्तीर्ण झाल्याचे दिसते.राज्य सरकार लोकाभिमुख झाले आहे,या सरकारला सामान्य माणसाची काळजी आहे,पारदर्शक पणा दिसतो आहे अशी भावना आज तरी सामान्य मराठी माणसाच्या मनात निर्माण झाली आहे कदाचित त्यामुळेच थेट नगराध्यक्ष असोत की थेट सरपंच यामध्ये भाजपला मोठे यश मिळाल्याचे दिसून येते.

गेल्या तीन वर्षात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या सरकारचा चेहरा मोहरा हे एकटे फडनविसच आहेत,बाकी सगळे मंत्री खूप लांब आहेत,देवेंद्र फडणवीस यांची क्लीन इमेज,पंधरा अठरा तास काम करण्याची क्षमता,थेट प्रत्येक खात्यात काय चालले आहे याची इत्यंभूत माहिती देणारी यंत्रणा यामुळे आज तरी फडणवीस हे सर्वांपेक्षा उजवे ठरतात .राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर अनेकवेळा थेट हल्ला करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना मात देण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले हे नक्की.

सरकारला तीन वर्षे पूर्ण होताना शिक्षण ,सार्वजनिक आरोग्य,बांधकाम,नगरविकास,ऊर्जा या खात्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक वाटते,जनतेशी थेट संबंध असणाऱ्या या खात्यात आजही आघाडी सरकारच्या काळातीलच बजबजपुरी कायम आहे,रोज नवे नवे निघणारे जी आर,शिक्षकांच्या बदल्या असोत की बढत्या, यावरून मोठी नाराजी आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आजही सलाईनवर आहे,राज्यात एकही प्रमुख राज्य किंवा राष्ट्रीय मागमार्ग असा नाही की त्यावर खड्डा नाही,लोडशेंडिंग मुळे जनता नाराज आहे त्यामुळे येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या विभागात अधिक चांगले लक्ष देऊन रिझल्ट द्यावे लागतील,केवळ स्वच्छ कारभार,पारदर्शक पणा या गोष्टीवर पुन्हा सत्तेचा सोपान चढता येणे अवघड आहे,त्यामुळे सत्तेचा थेट लाभ ज्या विभागामार्फत जनतेपर्यंत पोहचतो त्या विभागावर जास्त लक्ष देऊन गतिमान कारभार करावा लागेल हे निश्चित .

कापूस ,सोयाबीन,मूग,उडीद यासारख्या पिकांच्या खरेदी साठी सरकारने ऑनलाईन नोंदणी चा घेतलेला निर्णय व्यापारी आणि दलालांच्या जोखडातून बळीराजाला मुक्त करणारा आहे,मात्र ही गोष्ट सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात सरकारी आणि पक्षीय यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

एकूणच काय तर आता यापुढे फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मागील सरकारवर खापर फोडून आपल्या चुका झाकता येणार नाहीत,तसेच शासन हे सामान्य माणसाची काळजी करणारे आहे हे अधिक गडद पणे दाखवून द्यावे लागेल,कारण येणाऱ्या वर्षभरात कधीही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजू शकतो त्या दृष्टीने वाटचाल भविष्यात करावी लागेल हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404



रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

लेकीनं गड राखला ......!

लेकीनं गड राखला ........!

कौन कहता है की आसमान मे छेद नही हो सकता, एक पत्थर तो तबियत से उच्छालो यारो ! अस जे म्हटलं गेलं आहे ते सार्थ ठरविणार दृश्य शनिवारी सावरगाव येथे दिसून आलं.स्व गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा वादात अडकली अन खंडित झाली,मात्र त्यामुळे न डगमगता पंकजा मुंडे यांनी अवघ्या दोन दिवसात हाच दसरा मेळावा भगवान बाबा यांच्या जन्मभूमीत यशस्वी करून दाखवला अन समाज आपल्याच पाठीशी असल्याचे दाखवत विरोधकांचे दात घशात घातले .त्याच बरोबर कितीही संकट आली तरी " बघतोस काय रागानं गड राखलाय लेकीनं " हा संदेश देण्यात त्या यशस्वी झाल्या.

महाराष्ट्राच्या राजकारणात कायम या ना त्या कारणाने चर्चेत असणाऱ्या नावांपैकी एक नाव म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे होय.बेधडक बोलणे,निर्णय घेतांनाचा बिनधास्तपणा,परिणामाची फिकीर न करता मनात आलं ते बोलणे ,सभा समारंभात लोकांना काय अपेक्षित आहे तेच बोलणे यामुळे पंकजा नेहमीच मीडियामध्ये आपलं वेगळं स्थान टिकवून आहेत.राज्याच्या राजकारणात त्यांना मानणारा एक मोठा समूह आहे,कदाचित ती स्व गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई देखील असेल मात्र त्यांच्या नंतर ती जपण्याचं काम पंकजा मुंडे यांनी केलं आहे .लाखोंच्या सभा आपल्या वक्तृत्व शैली ने कशा गाजवायच्या हे गोपीनाथ मुंडेंना कधी सांगावे लागले नाही तशीच परिस्थिती पंकजा यांच्या बाबतीत ही आहे . आजही त्यांच्या सभांचे रेकॉर्ड कोणी  तोडू शकेल असे वाटत नाही .मात्र नेता जेवढा मोठा होत जातो तेवढाच तो सत्य परिस्थिती आणि वास्तवापासून दूर जातो की काय असे वाटण्यासारखे पंकजा यांच्याबाबतीत घडू लागले ,त्यातूनच मग भगवान गडाच्या वादाचा जन्म झाला .

पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील मतभेद मागच्या वर्षी राज्याने पाहिले, मात्र तरीदेखील यावर्षी भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याचा अट्टहास पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी धरला होता,स्वतः पंकजा मुंडे मात्र याबाबत कमालीच्या शांत होत्या,अनेकांनी त्यांना याबाबत बोलत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी संयम ढळू दिला नाही.गड ही आपली श्रद्धा आहे अन भक्त ,समाज ही शक्ती आहेत हे त्यांनी वारंवार ठासून सांगितले.त्याच बरोबर महंत यांच्या नावे एक पत्र लिहून त्यांनी चेंडू महंतांच्या कोर्टात ढकलला ,मी लहान झाले मात्र ते ऐकत नाहीत हा  मॅसेज देण्यात त्या यशस्वी झाल्या.

साधारणपणे दोन  दशकांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी समाजाच्या उत्थानासाठी भगवान गडावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली,त्याचा त्यांना राजकीय आयुष्यात देखील मोठा फायदा झाला,आपल्याच नव्हे तर विरोधी पक्षात देखील त्यांनी समाजाच्या जीवावर एक दबदबा निर्माण केला होता . त्यांच्या मेळाव्यातून चेतविलेलं स्फुल्लिंग राजकीय उलथापालथी घडवून आणण्यास उपयोगी पडत असे.

मुंडे यांनी समाजाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केल्याने कोठे काय बोलायचे,कधी बोलायचे हे त्यांना पक्के माहीत होते,मात्र त्यांच्या अकाली जाण्यानंतर एकाकी पडलेल्या पंकजा यांची सुरवातीला चिडचिड झाली,त्याचा फायदा घेत विरोधकांनी त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला अन त्यात ते यशस्वी झाले,त्यातूनच मग भगवान गडाचा वाद घडवून आणला गेला अन त्यात पंकजा मुंडे यांच्या नशिबी नको तेवढी टीका आली,वास्तविक पाहता त्याला कारण पंकजा यांचा स्वभाव देखील होताच ,मात्र वडीलकीच्या नात्यानं शास्त्री यांच्याकडून समाजाला जास्त अपेक्षा होत्या,पण त्यांनी देखील उभा दावा असल्यासारखं सुरू केलं अन त्यात गड बदनाम झाला.महंत यांनी अधिकार वाणीने या वादावर पडदा टाकणे अपेक्षित होते मात्र नियतीला कदाचित ते मान्य नसावे म्हणूनच गडावर वंजारी समाजाचे दोन गट निर्माण झाले,त्यातून पंकजा यांच्या नेतृत्वावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते .पंकजा यांच्या मागे समाज आहे की नाही असा देखील सवाल उपस्थित केला गेला .

दरम्यान यावर्षी  दसरा दोन दिवसावर आला असताना पंकजा मुंडे यांनी हा मेळावा सावरगाव या भगवान बाबा यांच्या जन्मगावी घेण्याचा निर्णय घेतला अन वादावर पडदा पडल्याचे काही जणांना वाटले,मात्र हा वाद इथेच संपेल असे वाटत नाही .कारण राजकीय आकांक्षा ,अपेक्षा एकीकडे आहेत तर दुसरीकडे धार्मिक श्रेष्ठत्व आहे, त्यामुळे हा वादाचा निखारा कायमस्वरूपी धगधगत राहणार असे आज तरी दिसते .

सावरगाव येथे अवघ्या दोन दिवसात लाखो लोक येतील अन सामावतील याची पुरेपूर काळजी घेतली गेली .
नेटके नियोजन,अल्पकाळात समाजात मेळाव्याच्या नव्या स्थळाबाबत गेलेला मॅसेज यामुळे लाखो लोक याठिकाणी पंकजा काय बोलतात,कोणती भूमिका घेतात हे ऐकण्यासाठी आले होते,अगदी नाशिक,बुलढाणा,सोलापूर आशा दूरवरून लोक आले होते . मेळावा यशस्वी होणार की नाही,लोक जमतील की नाही या बाबत अनेकांच्या मनात शंका होती मात्र समाजाने पंकजा यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.

एवढ्या मोठ्या समाजासमोर काय बोलावे अशा गोंधळलेल्या अवस्थेत पंकजा यांनी जो ट्रॅक पकडला तो निश्चित पणे समाजाला दिशा देणारा असाच होता,जास्त भडक ही नाही अन जास्त मिळमिळीत ही नाही अशा पद्धतीने त्यांनी समाजाचे ब्रेन वॉश केले.संघटन कौशल्य कसे करावे हे कोणत्याही मुंडे ला कोणी सांगायची गरज नाही याची प्रचिती पुन्हा एकदा पंकजा यांच्या रूपाने दिसून  आली .आपलं अख्ख आयुष्य संघर्षात घालवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाचा सुद्धा वारसा पंकजा या समर्थपणे चालवीत आहेत नव्हे त्यासाठी त्याच योग्य आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवले .हुबेहूब गोपीनाथ मुंडे यांची स्टाईल,तसेच हावभाव,त्याच पद्धतीने भाषणाची लकब,हातवारे ही आता पंकजा मुंडे यांची सुद्धा ओळख होऊ लागली आहे.

उघड्या जीप मधून कार्यक्रम स्थळी आल्यानंतर  दोन्ही हाताच्या मुठी आवळून ज्या स्टाईलने त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले त्यामुळे तेथे हजर असणाऱ्या लोकांमध्ये नवा जोश निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले ,त्या ज्या पद्धतीने जीप मधून उतरल्या ते पाहिल्यानंतर अनेकांना मुंडे साहेबांची आठवण झाली असेल .त्यानंतर जळगाव चे कोण आलेत,बुलढण्याचे आलेत ना अस म्हणून समोर बसलेल्या लोकांशी थेट संवाद साधण्याच त्यांचं कौशल्य दिसून आलं.सावरगाव या तशा दुर्गम भागाने काल मुंडे नावाच्या जादूचा अनुभव घेतला . पंकजा यांच्या या निर्णयामुळे सावरगाव हे  नवीन श्रद्धास्थान निर्माण होणार यात शंका नाही मात्र त्याचवेळी भगवान गड देखील समाजाच्या मनात कायम राहावा यासाठी पंकजा यांनी पुढील काळात प्रयत्न करायला हवेत .मात्र पंकजा मुंडे यांचा राजकीय स्वभाव पाहता ते कितपत होईल यात शंकाच आहे,पण अपेक्षा ठेवायला हरकत नाही,कारण उम्मीद पे दुनिया कायम है अस नेहमीच म्हटलं जातं .मेळावा रेकॉर्ड ब्रेक झाला यात शंका च नाही मात्र या मांडव वाऱ्यातून लवकर बाहेर पडून त्यांना जमिनीवर येत समाजासाठी कायम परिश्रम घ्यावे लागतील ,त्यांच्याकडून आता लोकांच्या,समाजाच्या अपेक्षा कितीतरी पटीने वाढल्या आहेत,त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना झटाव लागेल अन्यथा समाजाचा भ्रमनिरास व्हायला वेळ लागणार नाही .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...