शनिवार, २५ मे, २०१९

स्वयंमेव मृगेंद्रता ; पंकजा मुंडे

स्वयंमेव मृगेंद्रता ; पंकजा मुंडे ..........!

न अभिषेकों न संस्कारः सिंघस्य कियते वने । विक्रमाजिर्तस्त्वस्य स्वयमेव मृगेंद्रता ।।
अर्थात सिंहाला जंगलाचा राजा बनण्यासाठी कोणत्याही राज्याभिषेकाची गरज नसते तो आपल्या कार्यकर्तृत्वानेच स्वतः राजा बनतो .असच काहीस पंकजा मुंडे यांच्याबाबत म्हणावं लागेल .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकमेव सभा वगळता कोणत्याही दिग्गज नेत्याची ना सभा झाली ना काही ,  तरी देखील त्यांनी बीड लोकसभा निवडणुकीत डॉ प्रीतम मुंडे यांचा विजय एकहाती खेचून आणत आपली ताकद अन योग्यता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे .प्रचंड जातीयवाद,टोकाची व्यक्तिगत टीका टिप्पणी,वडिलांवरून केलं गेलेलं टार्गेट, भावनिक राजकारण अशा सर्व मार्गांनी त्यांना राजकारणाच्या रणांगणात घेरलं असताना देखील त्यांनी ज्या सफाईदार पणे विजय खेचून आणला ते पाहता स्वयंमेव मृगेंद्रता हाच शब्द त्यांच्यासाठी चपखल बसतो हे नक्की  .
लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर राज्याचे लक्ष बीडकडे लागले होते,वरवर ही लढत प्रीतम विरुद्ध बजरंग सोनवणे अशी वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र ही लढत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे विरुद्ध ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अशीच झाली .बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत असो की लोकसभा कोणत्याही निवडणुकीत या बहीण भावाची प्रतिष्टा पणाला लागते हे निश्चित .यावेळी तर लढाई लोकसभेची होती,त्यामुळे दोघांनीही आपलं सर्वस्व पणाला लावले होतं .
वरकरणी पाहता ही निवडणूक भाजपसाठी तशी खूप सोपी होती,कारण पाच आमदार,जिल्हा परिषद,पंचायत समित्या,नगर पालिका,जिल्हा बँक अशा सगळ्या सत्ता भाजपच्या म्हणजे पंकजा मुंडे यांच्या ताब्यात होत्या,त्यामुळे ही लढत एकतर्फी होईल असे वाटत होते अन निकालाने ते स्पष्टही केलं मात्र त्यापूर्वी प्रचारादरम्यान जो काही आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला तो राजकारणाची पातळी किती खालावली आहे हे दाखवणारा होता .
पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या त्यांच्या वडिलांचे नाव लावतात इथपासून ते त्यांच्या वागण्या बोलण्यापर्यंत व्यक्तिगत स्वरूपाची टीका केली गेली .अगदी प्रीतम मुंडे यांचे नाव मुंबईतील मतदार यादीत लावण्याचा करंटेपणा देखील विरोधकांनी करून प्रचाराची परिसीमा गाठली .
पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या प्रचारासोबतच राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यात सुद्धा प्रचार दौरे केले,त्यांनी मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र देखील पिंजून काढला .पंकजा मुंडे या तुसड्या आहेत,त्या कार्यकर्त्यांना टाकून बोलतात,वेड म्हणतात अशा प्रकारे टीका केली गेली मात्र प्रचारादरम्यान त्यांनी याकडे दुर्लक्ष करीत आपले टार्गेट आचिव्ह करण्यावर लक्ष केंद्रित केलं .जिल्ह्यातील भाजपसह इतरही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला .त्यांनी योग्य रसद पुरवली नाही म्हणून मीडिया मधील काही लोकांनी देखील त्यांच्या नावाने बोट मोडली,अगदी प्रीतम यांच्या पराभवासाठी काही लोकांनी देव पाण्यात ठेवले होते .परंतु माश्याच्या लेकराला जसं पोहण्याच शिकवावं लागत नाही तसं गोपीनाथ मुंडे यांच्या पोटी जन्म घेतलेल्या पंकजा यांना राजकारण कस करायचं हे शिकवण्याची गरज नाही हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे .
देशात मोदी यांची लाट नसली तरी अंडरकरंट आहे हे विरोधक मान्य करीत नव्हते .बीड जिल्ह्यात तर सुरवाती पासूनच प्रचार जातीयवादावर केला गेला .एकीकडे पंकजा मुंडे या मी विकास करताना कधीही जातपात पाहिली नाही हे सांगत होत्या तर दुसरीकडे विरोधक मात्र  जातीचा आधार घेताना दिसत होते .काहीही करून पंकजा यांचा चौखूर उधळलेला वारू रोखायचाच अशा योजना विरोधक आखत होते तर दुसरीकडे पंकजा या आपल्या बुद्धिकौशल्याने विरोधकांना नामोहरम करण्यासाठी कार्यरत होत्या .
बीड जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षाच्या काळात रस्ते,रेल्वे, यामाध्यमातून जो काही विकास केला तो होता तर दुसरीकडे राष्ट्रवादीने दिलेला नवखा उमेदवार होता .राष्ट्रवादी ने शरद पवार यांना मुक्काम ठोकायला लावून लढतीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला मात्र पवारांचा मुक्काम देखील पराभव वाचवू शकला नाही .
प्रत्येक मतदार संघातील प्रमुख नेते किंवा समाजाचे मुकादम यांच्यासोबतच पंकजा मुंडे यांनी त्या त्या गावातील सरपंच,सोसायटीचे चेअरमन,बूथ लेव्हल चे कार्यकर्ते यांना सोबत घेऊन एक पक्की मोट बांधली अन त्याच फलित एका दैदिप्यमान यशात झालं . राजकारण करताना किंवा युद्ध करताना समोर आपले आहेत की परके याचा विचार करायचा नसतो ही कृष्णाने अर्जुनाला शिकवलेली नीती पंकजा यांनी या निवडणुकीत तंतोतंत अंमलात आणली .समोरच्या बाजूने आपला भाऊच आपल्या विरोधात आहे हे माहीत असतानाही पंकजा डगमगल्या नाहीत .एखाद्या मुरब्बी राजकारण्याला लाजवेल अशी रणनीती त्यांनी आखली आणि यश खेचून आणलं .
"हम हम है बाकी सब पाणी कम है " हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं आहे .स्वपक्षीयांसोबतच मित्रपक्षातील लोकही त्यांच्या पराभवासाठी आतुर झालेले असताना या सगळ्यांना सणसणीत चपराक या विजयने बसली आहे . "बघतोस काय रागानं गड जिंकलाय वाघिणीनं "हेच पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं आहे .या वेळच्या निवडणुकीत भाजप चे कार्यकर्ते देखील साशंक होते,कारण जो भेटेल तो अवघड आहे,जातीयवाद खूप झाला,काठावर पास होऊ असच सांगत होता,एवढा मोठा विजय कोणालाच अपेक्षित नव्हता मात्र पंकजा यांनी ते करून दाखवलं आहे .
लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांनी रमेश कराड यांच्या माघारीपासून विरोधकांना दिलेल्या धक्यातून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत सावरलेच नाहीत.रमेश अप्पा ते बजरंग बप्पा अस एक वर्तुळ या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी पूर्ण केलं.या निवडणुकीत त्यांनी जादूच्या कांडीचा प्रयोग करीत जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याला आपल्या सोबत घेत विरोधकांना जोरदार धक्का दिला .सुरेश धस यांच्या रूपानं त्यांना एक रांगडा गडी लढण्यासाठी मिळाला अन त्यांचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला .धस यांनी ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली त्याच फलित निकालातून दिसून आलं .एकट्या आष्टी मतदार संघातून भाजपला 70 हजाराचे मताधिक्य मिळाले,त्याच बरोबर मोहन जगताप असोत की बदामराव पंडित या सगळ्यांना एकाच भात्यात घेत त्यांनी विरोधकांवर जे धनुष्य ताणले त्यामुळे विरोधक धारातीर्थी पडले .
या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी जे निर्विवाद यश मिळवले आहे ते पाहता  "आपला नाद नाही करायचा " हाच इशारा त्यांनी दिला आहे .या निकालामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू निश्चितपणे सरकली असणार यात शंका नाही ,कारण येत्या चार महिन्यावर विधानसभा निवडणुक येऊन ठेपली आहे,त्यामुळे ही बाई त्यावेळी काय करणार अन त्यावेळी देखील मोदी आणि फडणवीस यांचा करिष्मा चालला तर आपलं काय होणार या विचारानेच विरोधकांना धडकी भरली आहे .लोकसभा तो एक झांकी है विधानसभा अभि बाकी है अशीच चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे .
नेता ते सर्वसामान्य मतदार हा जो राजकारणाचा नवा ट्रेंड नरेंद मोदी यांनी या निवडणुकीत सुरू केला आहे काहीसं तसच काम पंकजा मुंडे यांनी या लोकसभा निवडणुकीत करून दाखवलं आहे,अधले मधले कोणालाही भाव न देता त्यांनी थेट रूट बेस च्या लोकांच्या मनाला हात घालीत राजकारणात आपणच शेर असल्याचं आणि आपल्याला कोणी रोखण्याचा प्रयत्न करू नये नसता तोंडावर पाडल्याशिवाय राहणार नाही हेच दाखवून दिलं आहे .या निकालाने अनेकांची दुकानदारी देखील कायमची बंद करण्यात पंकजा यांना यश आले आहे .जंगलाचा राजा सिंह हा जसा कोणाच्या इशाऱ्याने किंवा कोणाच्या सल्याने कारभार करीत नाही तो आपल्या मानाप्रमाणेच वागतो कारण तो राजा आहे आणि त्यामुळेच तो जंगलावर अधिराज्य गाजवतो हेच पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा या निकालाने सिद्ध केलं आहे .जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात त्यांचा एक मोठा दबदबा या निकालाने निर्माण झाला आहे याचा त्यांना आगामी राजकीय वाटचालीत निश्चितपणे मोठा लाभ होईल यात शंका नाही .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404 .

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...