शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

देवदरबारी सेवेस निघाला कीर्तनकार ..............!


किर्तनसूर्य निघाला देवदरबारी 
सेवा रुजू करण्यासी ........!!

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या गाथेत मृत्यूचे वर्णन करताना सांगतात की,
"झाला प्रतिरूप शरीराचा भाव |लक्षीयेला ठाव स्मशाणीचा ||रडती रात्रंदिवस कामक्रोध माय|
म्हणती हाय हाय यमधर्म ||वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा| ज्ञानाग्नि लागला ब्रम्हत्वेसी ||
फिरविला घाट फोडीला चरणी |महावाक्य ध्वनी बोंब झाली || दिली तिलांजली कुलनामरूपासी | शरीर ज्याचे त्यासी समर्पिले || तुका म्हणे रक्षा झाली आपोआप | उजळीला दिप गुरुकृपा ||

याप्रमाणे राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी हे वैकुंठाच्या प्रवासाला निघून गेले असले तरी त्यांची कीर्ती अन त्यांचं देव,देश अन धर्माप्रतीच कार्य अनादी काळापर्यंत स्मरणात राहील हे निश्चित .
जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणारच आहे,शरीर हे नश्वर आहे आत्मा अमर आहे हे कटुसत्य आहे पण काही लोकांचं जाणं मनाला चटका लावून जातं, राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांच्या निधनाची बातमी काळजाचा ठोका चुकवणारी होती,प्रकांड पंडित असणारा,कोणताही विषय लीलया पेलणारा ,कोणत्याही दुःखावर सहज मात करून सुखाशी हातमिळवणी करणाऱ्या या माणसाला मृत्यूवर मात्र विजय मिळवता आला नाही,बुवा अस अर्ध्यावर सोडून जाणं काही पटलं नाही हे मात्र खरं .
गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या छोट्याशा गावातून कीर्तनाच्या माध्यमातून आपलं नाव सातासमुद्रापार नेण्याचा भीमपराक्रम भरतबुवा रामदासी यांनी केला होता .त्यांच्याबद्दल काही लिहीन म्हणजे सूर्याला त्याच्या तेजस्वी पणाबद्दल आरसा दाखवण्या सारख आहे .साधारणपणे पाच फूट उंची,अंगावर नेहरू,शुभ्र धोतर आणि गळ्यात पांढरा गमजा, कपाळावर चंदनाचा टिळा अन बुक्का अस त्यांचं रूप पाहिल्या नंतर कोणालाही ते तेजस्वी पुरुष आहेत हे लक्षात यायचं .
भरतबुवा म्हणजे एक चालत बोलत विद्यापीठ होते,अध्यात्मिक,ऐतिहासिक, साहित्यिक,सांस्कृतिक,पौराणिक असा कोणताही विषय असला तरी ते हजारो,लाखो लोकांच्या काळजाला भिडेल अन मनाला पटेल असं कीर्तन करायचे .माणूस येताना रिकाम्या हाताने येतो अन जातानाही रिकाम्या हातानेच जातो हे खरं असलं तरी गेल्यानंतरही तुम्ही तुमच्या कीर्ती,कार्यामुळे कायम स्मरणात राहू शकतात .मरावे परी कीर्ती रुपी उरावे अस काहीस बुवांच्या बाबतीत म्हणावं लागेल .एक आदर्श ते समाजासमोर ठेवून गेले आहेत .बुवा कीर्तनकार होते,बुवा हभप होते,बुवा माणुसकीचा झरा होते,बुवा पितृतुल्य होते,बुवा समाजाचा आधार होते,बुवा संतसाहित्याचे गाढे अभ्यासक होते .
रामकृष्ण ही आले गेले त्याविन का जग हे बुडाले अस म्हणतात हे सत्य असले तरी भरतबुवा यांच्या सारख्या व्यक्तिमत्वाच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबासोबतच समाजाचे अपरिमीत नुकसान झाले आहे ते कधीही भरून निघणार  नाही  हे नक्की .भरतबुवा रामदासी हे रामदासी पंथातील होते,सहसा कीर्तनकार हे  सहजपणे लोकांत मिसळून त्यांना देवाधर्माच्या कार्यात सहभागी करून घेणारे असतात .मात्र भरतबुवा हे देव आणि मनुष्य यांच्या मधील महामार्गावरील मैलाचा दगड होते .नारदीय असो की वारकरी अथवा सांप्रदायिक कीर्तन,ते चौकोनी चिरा होते .सर्वच कीर्तनातून ते समाजप्रबोधन करण्यासोबतच भगवंत भक्तीचे धडे देत असत .
भरतबुवा अन माझं एक वेगळं नातं होत कारण ते माझ्या गावचे म्हणजे रुईचे होते,कधीही कुठेही भेटले की सुहास्य मुद्रेने स्वागत करून मला तुमचा अभिमान वाटतो अस म्हणत पाठीवर थाप देणार .मात्र आता पाठीवर थाप देणारा तो हात अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे .
पृथ्वीवर हजारो लाखो मंदिर आहेत की ज्यांच्या कळसाचे दर्शन झालं तरी आपण हात जोडतो मात्र असे पाय खूप कमी आहेत की जिथं आपण नतमस्तक होतो,ते पाय होते भरतबुवा,जे भेटले की आपसूक हात जोडले जायचे .
माणूस कितीही मोठा झाला,पैसा ,संपत्ती कमावली तरी त्याला भेटल्यावर जर आपलेपण वाटत नसेल तर त्याच्या जगण्याला काही अर्थ नसतो मात्र भरतबुवा याला अपवाद होते .त्यांना भेटल्यावर नेहमी आपण देवदूताला भेटत आहोत असा भास व्हायचा .लहान मूल असो की तरुण अथवा वृद्ध ते सगळ्यांसोबत एडजेस्ट व्हायचे,आपल्या ज्ञानाचा त्यांना कधीही दुराभिमान नव्हता,गर्व नव्हता .माणूस म्हणून एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते बुवा . बुवा केवळ किर्तनच करायचे अस नाही तर ते छान लिहायचे सुद्धा,लोकमत असो की लोकसत्ता अथवा महाराष्ट्र टाईम्स अशा अनेक वर्तमानपत्रातून त्यांनी सातत्याने संत साहित्यावर लिखाण केले आहे .
काही दिवसांपूर्वी त्यांची भेट एका बैठकीनिमित्त झाली होती तेव्हा त्यांनी स्वतःबद्दल बोलताना सांगितले होते की मी कोण आहे,किती मोठा आहे यापेक्षा मी माणूस आहे अन ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती माझं काही देणं लागत अस मानतो म्हणून मी समाजकार्यात सहभागी होतो .बुवा शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक कार्यात सहभागी होते हे मात्र खरं आहे .अगदी दोन दिवस अगोदर त्यांनी महेश कुलकर्णी यांच्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले होते .
ठेविले अनंते तैसेचि रहावे ,चित्ती असू द्यावे समाधान या प्रमाणे भरतबुवा आयुष्य जगले . त्यामुळे ईश्वराने देखील त्यांना काहीच कमी पडू दिले नाही . ऋतुपर्ण सारखा पुत्र दिला ज्याने आईबापांच्या नावाचा झेंडा अटकेपार नेला .मुलाच्या कीर्तनाचे गुणगान करीत सूत्र संचलन करण्याचा योग बिडकरांनी कीर्तन महोस्तवात याची देही याची डोळा अनुभवला आहे .त्यांच्या पत्नी देखील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत .
"जिंदगी जिंदादिली का नाम है,मुर्दादिल क्या खाक जिया करते है " हे ब्रह्मवाक्य त्यांनी आपल्या काळजात कोरून ठेवलं होतं,त्यामुळे ते नेहमी समाधानी होते .ईश्वरी साक्षात्कार ते जेव्हा कीर्तनातून  लोकांपुढे मांडायचे तेव्हा आपण जणूकाही देवाच्या दरबारात उभे आहोत असा भास व्हायचा .तुकाराम गाथा असो की ज्ञानेश्वरी अथवा भगवतगीता त्यांना मुखोदगत होती .शरीराची उंची कमी असली तरी समाजातील उंची मात्र त्यांनी हिमालयएव्हढी गाठली होती .देव आणि मनुष्य यांच्या मार्गातील या मैलाच्या दगडाने परिस्थितीचे अनेक घाव सोसले आहेत मात्र त्याबद्दल कधीही तक्रार न करता त्यांनी संघर्ष करीत सुखाचे दिवस निर्माण केले .
बुवा इतक्या अकाली जातील हे कोणालाही स्वप्नात सुद्धा वाटले नसेल .शरीर हे नश्वर आहे हे सगळ्यांना सांगणारे बुवा इतक्या सहजपणे संसाराचा त्याग करून निघून जातील यावर अजूनही विश्वास बसत नाही .जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला हे जरी सत्य असले तरी बुवा तुम्ही इतक्या अकाली जाण्याने आम्ही पोरके झालो हो .देवाकडे घेऊन जाणारा देवदूतच देवाने आमच्यातून खेचून नेला आता आम्ही कोणामार्फत आमचं गाऱ्हाणं देवाकडे मांडायचे .
भरतबुवा यांनी सांगली,सातारा,पंढरपूर या भागात हजारो विद्यार्थ्यांना कीर्तनाचे मोफत शिक्षण दिले आहे,जिथे जिथे जातील तिथे तिथे कीर्तनाच्या माध्यमातून देव,देश अन धर्मसेवा करण्याचं अखंड व्रत त्यांनी घेतलं होतं . ते कीर्तन करताना असा अनुभव यायचा की जणूकाही आपण देवाच्या दरबारात उभे आहोत .भाषाप्रभु,वाणीवर सरस्वतीचा वास असलेला हा विठ्ठलाचा भक्त आपल्या सावळ्याच्या सेवेसाठी एवढ्या लवकर अनंताच्या प्रवासाला निघून जाईल यावर अजूनही विश्वास बसत नाही .बुवा एकच शब्द देतोत की तुम्ही चेतवलेली भगवतभक्तीची ही मशाल कायम तेवत राहील अन तुम्ही आमच्या मनात कायम रहाल .तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली !

लक्ष्मीकांत रुईकर, बीड

9422744404 .

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

बांगडीच दुःख .................!


बांगडीचं दुःख.....................!

रस्त्याने चालताना टचकन आवाज झाला अन माझी विचारांची तंद्री अचानक विस्कळीत झाली,पायाखाली काय आलं म्हणून पाहावं म्हटलं तर एक फुटकी बांगडी दिसली,चार पाच ठिकाणी तूटली होती बिचारी,का कोण जाणे पण आतून एक आवाज आल्यासारखा झाला अन तुटलेली,पिचलेली ती बांगडी मी सहज उचलून हातात घेतली,तिला मी स्पर्श करताना माझं मलाच काहीतरी विचित्र होत असल्याची जाणीव झाली ,कदाचित ती अंग चोरते आहे की काय अस मला वाटलं,तरी देखील मी तिला अलगद उचलून माझ्या जवळच्या एका स्वच्छ पांढऱ्या रुमालात व्यवस्थित ठेवलं अन मला लक्षात आलं की ती खरोखरच खूप घाबरलेली,सैरभैर झालेली आहे.तिची नजर ,तिचे विस्फारलेले डोळे माझ्याकडं ,माझ्या प्रत्येक हालचालीकड एकटक बघत होते,जणू काही मी आता नेमकं काय करणार आहे याचा ती हळुवारपणे अंदाज घेत होती.

तिच्या नजरेतील असह्यपणा मी देखील जाणू शकलो नाही असं काही नव्हतं,यापूर्वी मी अनेकदा रस्त्यावरून जाताना कित्येकदा रस्त्यात ,कडेला,दुकानाच्या बाहेर अनेक तुटलेल्या बांगड्या पाहिल्या होत्या,मात्र आजचा तिच्याबद्दलचा अनुभव काही निराळाच होता,मी रुमालात हळुवारपणे ठेवलेल्या तिच्याकडं बघितलं तर ती अद्यापही भेदरलेलीच दिसत होती,काही तरी अघटित झालं आहे याची कल्पना एव्हाना मला आली होती .

नेमकं काय झालं असेल याचा अंदाज बांधण्याचा मी प्रयत्न करीत होतो मात्र काहीच सुचत नव्हतं,मनात अनेक शंका कुशंका नि थैमान घातलं होत,यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं परंतु आज मात्र एक वेगळीच भीती तिच्या स्पर्शामुळं मनात तयार झाली होती.का कोण जाणे पण खूप काहीतरी भयानक घडलं आहे याचा अंदाज आला होता .डोक्यात सुरू असलेलं वादळ बाजूला ठेवून मी तिच्याकडं निरखून पाहू लागलो,बराच काळ गेल्यानंतर तिच्याही लक्षात आलं असावं की ज्या माणसानं आपल्याला आधार देऊन जवळ घेतलं आहे ते हात,तो माणूस भला असावा म्हणून ती देखील थोडी सावरली होती .

बराच काळ आमच्या दोघांमध्ये एक भयान शांतता होती,अगदी हळुवारपणे आपल्या पिलासाठी साखरेचा दाना घेऊन जाणाऱ्या मुंगीच्या पावलांचा देखील आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू यावा एवढी भयाणक शांतता होती.शेवटी मीच या शांततेला तोंड फोडलं अन नेमकं काय झालं हा प्रश्न केला,माझा प्रश्न एकूण इतका वेळ शांत असलेल्या तिने पुन्हा एकदा जोरात हंबरडा फोडला .

तिचा तो आवाज काळीज पिळवटून टाकणारा होता,इतक्या वेळ असलेल्या शांततेला भेदून या आवाजाने नभांगणातील ताऱ्यांना देखील घाम फुटला असावा .तिच्या त्या आवाजाने मला नेमकं काय झालं असेल याचा पूर्णपणे अंदाज आला,मी काहीही न बोलता फक्त तिच्याकडं बघत होतो,तिची प्रत्येक हालचाल टिपण्याचा प्रयत्न करीत होतो,न बोलताही तिनं त्या किंकाळीतून सगळं काही सांगितलं होतं .बराच काळ मी न बोलता थिजल्यासारखा जागच्या जागी बसून होतो,अखेर मी तिला प्रेमानं जवळ घेत नेमकं काय,कसं, कुठं,कधी घडलं,कोणी केलं,का केलं,असे एक ना अनेक प्रश्न एका दमात विचारले अन पुन्हा तिच्या उत्तराची वाट पाहत बसलो .

बराच काळ लोटल्यानंतर आणि मी कोणी तरी विश्वास ठेवण्यासारखा माणूस आहे याची खात्री पटल्यानंतर तिने मला आपली कर्मकहानी सांगायला सुरुवात केली,मी तुम्हाला दादा म्हणू शकते का ? या तिच्या प्रश्नाने मी देखील जरा स्थिरावलो .पण तिच्या त्या प्रश्नाने माझ्या मनाची मात्र चलबिचल झाली,कारण त्या प्रश्नांन माझं एक नातं निर्माण केलं होतं,तसा मी खूप नात्यात अडकून राहणारा नाही पण हे अनामिक नातं मात्र काळजात घर करणार होतं, तिच्या दादा या शब्दात जो विश्वास होता तो जाणवला मला.म्हणलं बोल बिनधास्त बोल,काय झालं तुला ,का अशी अवस्था झाली तुझी,रस्त्यात अशी का पडली होतीस विव्हळत .तशी ती म्हणाली दादा सांगते सगळं सांगते जरा श्वास तर घेऊ दे .

इतका वेळ शांत असलेला मी जरा स्थिरावलो आणि प्राण कानाशी आणून ऐकू लागलो,तिनं सांगायला सुरुवात केली,का रे दादा जेव्हा माणसाचा जन्म होतो तेव्हा पाचव्या दिवशीच मला हातात प्रेमानं घातलं जात,मुलगा असो की मुलगी माझ्या असण्यानं त्यांच्या सौंदर्यात भरच पडते,माणसाच्या जन्मापासून ते मरणापर्यंत सोबत असणारी मी आज मात्र पूर्णपणे खचून गेले आहे, सुवासिनींचा दागिना म्हणून मिरवताना मला कोण आनंद होतो ते शब्दात नाही सांगता येणार,एवढंच काय पण एखादी सुवासीन जेव्हा तीच कुंकू पुसलं जात तेव्हा देखील मला तिचा हात सोडून जाताना प्रचंड वेदना होतात .मात्र आज माझीच मला लाज वाटू लागली आहे,मी किती असाह्य आहे हे या समाजाने मला आज दाखवुन दिलं आहे .
मी तुझ्या लेकीची लाडकी असते,बायको मला हळुवारपणे सांभाळते तर आई अन बहीण या मला जीवापाड प्रेम देऊन जपतात,मैत्रीण देखील मला घरची वागणूक देतात हा सगळा आनंद असताना एक वेदना मात्र कायम मनात घर करून राहते आहे की ज्यांच्या हातात मी थाटात मिरवते तीच आयुष्य जेव्हा कोणी नराधम विस्कटून टाकतो ना तेव्हा माझीच मला लाज वाटते .
आजकाल माणूस ज्या पशूंच्या वृत्तीने वागतो आहे ना ते पाहिल्यावर आया बायांनो यापुढे तुम्ही हातात हात घालून मला मिरवण्यापेक्षा हाती शस्त्र घ्या अन तुमच्या इभ्रतीवर दरोडा घालणाऱ्या नरपशूंच्या नरडीचा घोट घ्या अस म्हणावं वाटत आहे .अरे आज मी जीच्यासोबत होते ना काय दोष होता तिचा,ती सुंदर होती दिसायला,लडिवाळ होती बोलायला,डोळे तिचे जुल्मीगडे असे होते,केशसंभार करून ती निघाली होती उच्च शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला .तिच्या जन्मापासून मी सोबत असल्याने कित्येकदा एकांतात तिने मला मनातल्या गोष्टी सांगितल्या आहेत,मात्र काही वासनांध लोकांची नजर तिच्या देहावर पडली अन त्यांनी ती कळी उमलण्याआधीच कुस्करून टाकली रे,तीच हे वाक्य ऐकलं अन माझं काळीज पिळवटून निघालं .
तस पाहिलं तर ती होती एक बांगडी,निर्जीव वस्तू पण लेकीबळींच्या स्पर्शाने ,कुरवळण्याने तिच्यात सुद्धा प्राण आले होते, म्हणूनच तिची वेदना आज माझ्या कानी पडली .अरे दादा,या तिच्या आवाजाने मी पुन्हा भानावर आलो,म्हणलं काही नाही ग,पण कोणी केलं हे सगळं,कोण होते ते,त्यांना आया बहिणी नव्हत्या का?या माझ्या प्रश्नावर ती कुस्तीक पणे हसली अन म्हणाली अरे आपलं ते लेकरू अन दुसऱ्याचं ते कार्ट ही जगाची रितच आहे वेड्या हे अजूनही तुला कसं नाही कळलं .
आपल्या आई,बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर तळपायाची आग मस्तकाला जाणारा पुरुष जेव्हा रस्त्याने जाताना ,येताना,कार्यालयात बसल्यावर,कामाच्या ठिकाणी,बाजारात,सार्वजनिक सभा ,समारंभात दुसऱ्या स्त्री ला पाहतो ना तेव्हा त्याच्या डोक्यात तो एक नर आणि समोरची स्त्री म्हणजे असते फक्त मादी .ती आपल्या वापरासाठी च आहे हा पक्का समज करून घेत तो लाळ घोटेपणा करत राहतो .हे करताना त्याला स्थळकाळ, वय,जातपात,धर्म याच कुठलच भान राहत नाही अन त्याच्या नजरेतून फक्त वासना टपकत राहते .जी दिसेल,जिथे दिसेल तिथे या पुरुष नावाच्या नरपशूंच्या डोक्यात वासना निर्माण होते अन मग माझ्यासारख्या लाखो बांगड्यांच्या नशिबी हे असं रस्त्यात विव्हळण येतं .
तिच्या बोलण्यातून तिच्या मनातील वेदना, अंगार लक्षात येत होता.कोणत्या समाजात आपण राहत आहोत याची चीड येत होती .ज्या समाजात स्त्री म्हणजे लक्ष्मी,सरस्वती,दुर्गा,अंबा, चण्डिका म्हणून स्त्री ची पूजा केली जाते,ज्या स्त्रीच्या उदरात नऊ महिने मनुष्य वाढतो त्याच स्त्री ला उपभोगाची वस्तू म्हणून पाहताना त्याला लाज कशी वाटत नाही हा तिचा सवाल माझ्यासमोर हजारो प्रश्न निर्माण करून गेला,तिच्या प्रत्येक शब्दात अंगार होता,तर शब्द शस्त्रप्रमाणे माझ्यावर वार करीत होते अन मी हतबल होतो .
कुठे प्रेमाला नकार दिला म्हणून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार सुरू आहे तर कुठे एकतर्फी प्रेमातून रिंकू पाटील सारखे अनेक जीव जाळून टाकले जात आहेत,काही मुलींना प्रेम का करत नाही म्हणून तेजाब टाकून विद्रुप केलं जातंय तर काही सावित्रीच्या लेकींची इभ्रत भर रस्त्यात लुटली जात आहे .स्त्री ही पुरुषाच्या वापराची,उपभोगाची,ऐशा आरामाची वस्तू असल्याप्रमाणे जिकडे तिकडे सध्या स्त्री ला लुटलं जात आहे,छळल जात आहे .
अरे दादा वासनेने ग्रासलेल्या या समाजातील काही नराधमांना तीन दिवसांपूर्वी जन्मलेलं लेकरू असो की नव्वद वर्षांची माझी आजी असो काहीच दिसत नाही त्यांना फक्त त्यांचा कंड जिरवायचा असतो.अशा घटना घडल्यानंतर निषेध, मोर्चे आंदोलने होतात आणि पुन्हा जणूकाही घडलेच नाही अस तुम्ही आम्ही सगळे वागू लागतो .
हा सगळा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे,काय दोष होता त्या कोवळ्या जीवाचा जिच्या हातात मी होते,ती देशाच्या,कुटुंबाच्या समाजाच्या प्रगतीची स्वप्न रंगवत आपल्या मार्गावर जात होती मात्र काही हरामखोर नराधमांना तीच सुख पाहवल नाही अन तिला कुस्करून टाकलं रे.कोणी अधिकार दिला या नालायक लोकांना अस तीच आयुष्य उध्वस्त करण्याचा.कायदा किती तकलादू आहे हे सुद्धा अशा घटनांमध्ये होणारी वाढ अधोरेखित करते .या देशात जिच्यावर अत्याचार,बलात्कार,अन्याय झाला आहे तिलाच प्रश्न विचारून,तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून पुन्हा एकदा कायद्याच्या मंदिरात निर्वस्त्र केलं जातं तेव्हा मी निर्जीव असून सुद्धा माझं मनही हेलावून जातं रे .कुठंतरी हे थांबल पाहिजे,कोणीतरी या अशा नराधमांना,लेकी बाळींच्या अब्रूशी खेळणाऱ्या नरपशुना जिथल्या तिथे फासावर लटकवणारा माईचा लाल पैदा होणार आहे की नाही .आज देशात दररोज हजारो आया बहिणींच्या इभ्रतीवर दरोडे घातले जात आहेत मात्र समाज आणि कायदा डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे .लाज वाटते या अशा माणसांच्या जगात राहण्याची .
कानात शिस ओतल्याप्रमाणे तिचे शब्द माझ्या मनावर घणाचे घाव घालीत होते अन मी मात्र निशब्द झालो होतो .
सध्या जे चालू आहे ते खरच खूप चीड आणणार आहे,दिल्लीतील निर्भया असो की गल्लीतील निर्जला,कोणीच आज सुरक्षित राहिलेली नाही,ज्या स्त्रीच्या छातीला कवटाळून आपण लहानाचे मोठे झालो आहोत तिच्याच छातीवर घाव घालताना समाजातील या अशा लोकांना लाज कशी वाटत नाही हा खरा प्रश्न आहे .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404
                               

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

प्रेमाचा पंचनामा ..............!

प्रेमाचा पंचनामा ....................!

प्रेम,लव्ह,इश्क,प्यार दोन अक्षरं, मात्र यात दोन जीवांच आयुष्य बांधल जातं, नव्हे दोन जीव शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहतात,प्रेम ही काही करायची गोष्ट नाही की ती ठरवून केली जाईल,प्रेम हे सहजपणे होतं, नकळतपणे दोन भिन्नलिंगी,समलिंगी व्यक्ती एकमेकांच्या सहवासाने सुखावतात अन आपली सुख दुःख वाटून घेतात,मात्र हे प्रेम समाज मान्य करीत नाही.अगदी अनादी काळापासून प्रेमाला समाजाचा कायमच विरोध राहिलेला आहे,अलीकडच्या काळात तर सोशल मीडिया आणि तत्सम गोष्टींमुळे प्रेम करणं म्हणजे जणू काही गुन्हाच झाला आहे,समाजाचे तथाकथित ठेकेदार अशा प्रेम करणाऱ्यांना विनाकारण त्रास देतात अन त्यातूनच मग जालन्या सारख्या घटना समोर येतात .त्याने प्रेम केलं,तीन प्रेम केलं,मग तुमच्या बापाच काय गेलं अस मंगेश पाडगावकर यांनी त्याकाळी लिहून ठेवलेलं आजही तंतोतंत लागू पडत ते यामुळेच .अशा विकृत पध्दतीने वागणाऱ्या लोकांना कठोर शासन तर व्हाययलाच पाहिजे पण यामध्ये ज्यांच्यावर हा प्रसंग गुदरला आहे त्यांनाही आधार द्यायला हवा अस वाटतं .
देवादिकापासून प्रेमाच्या कोमल अन मुलायम जाळ्यात कोणी अडकल नाही अस झालेलं नाही .अनेकदा सहवासातून तर कित्येकदा पहिल्याच भेटीत प्रेम निर्माण होतं .कोणाला स्वभाव आवडतो तर कोणाला रुबाब अन कोणाला मन आवडतं, ज्याची त्याची आवड असते शेवटी.त्यामुळेच म्हणत असतील कदाचित की 'दिलं आया गधी पे ,तो परी क्या चीज है '.
प्रेम ही भावनाच अशी आहे की ती मारून मुटकून,जबरदस्तीने कोणावर लादता येत नाही .प्रेमाला वयाचं देखील बंधन नसतं .पहिलं प्रेम हे नशीबवान व्यक्तीच्या पदरात पडतं अस नेहमी म्हणतात कारण पहिलं प्रेम हे शालेय जीवनात होत सहसा,त्यामुळेच ते चिरकाल सोबत राहील याची शाश्वती नसते .मात्र काही लोक याबाबत देखील नशीबवान असतात .पण एक मात्र खरं आहे की प्रेम हे ठरवून होऊच शकत नाही .
मात्र या प्रेमाला विरोध करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.अन प्रेम शेवटपर्यंत पदरात पडणाऱ्यांची संख्या देखील कमीच आहे .जिच्यावर किंवा ज्याच्यावर प्रेम असतं ती व्यक्ती सहजीवनात सोबत असेलच अस फार कमी वेळा होतं अन मग पदरात पडलं अन पवित्र झालं या भावनेतून माणूस जगत राहतो .कृष्णाचं राधेवर प्रेम होतं पण ती त्याच्या नशिबात नव्हती तर मिरेच्या नशिबात कृष्ण नव्हता पण याचा अर्थ त्यांचं एकमेकांवर प्रेम नव्हतं असा होत नाही .
प्रेम ही भावना सहज निर्माण होणारी आहे पण समाज नावाची जी व्यवस्था आहे तिला ही भावना मान्य नाही .झाकून लपून, चोरी चोरी केलं तर चालत पण उघड झाल की बोंबाबोंब होते .अन अशी बोंब करणारे आपल्या खाली काय जळतंय याचा कधीच विचार न करता प्रेम करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून मोकळे होतात .
ऐतिहासिक घटना असोत की रुपेरी पडदा अथवा वास्तव जीवन यामध्ये प्रेम ही कल्पना खूप सुखद मानली गेली आहे .प्यार किया तो डरना क्या अस म्हणत हसत हसत मृत्यूला कवटाळणारे अनेक प्रेमीयुगुल आपण पाहिले आहेत .प्रेमाला जस वयाचं बंधन नसत तस जातीपातीच, धर्माच,लिंगभेदाच सुद्धा बंधन नसतं पण तरीही समाजाला ते मान्य नसतं .प्रेम करणाऱ्यांना समाज आणि त्याचे ठेकेदार गुन्हा ठरवतात अन ते करणारे गुन्हेगार .मग त्यातून अशा लोकांना एक अनभिषिक्त अधिकार मिळतो अन त्यातूनच ते प्रेम करणाऱ्यांना स्वतः न्यायाधीश असल्याप्रमाणे शिक्षा देऊन मोकळे होतात .
हिर रांझा असोत की रोमियो ज्युलियट अथवा सोनी महिवाल ही रुपेरी पडद्यावर अजरामर झालेली प्रेमाची प्रतीक किंवा पात्र .सलीम अनारकली यांच प्रेम देखील असच आहे .पारो देवदास हे देखील त्याच पठडीतले .मात्र या सगळ्यांमध्ये एक दुवा एकसारखा आहे तो म्हणजे या सगळ्याच प्रेम समाजाला मान्य नव्हत .दोन व्यक्तींना एकमेकांच्या आवडीनिवडी,स्वभाव,राहणीमान,बोलणं चालणं पटत असेल अन त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण ,ओढ वाटत असेल तर इतरांना त्याविषयी वाईट वाटण्याचं कारण नाही मात्र इथंच खरी गोम आहे .त्याला ती भेटते,तिला तो मान्य होतो मग आम्हाला का नाही भेटत किंवा आम्ही काय त्याच्यापेक्षा वाईट आहोत का या अहंगंडातून सुरू होतो विरोध अन त्याला नाव दिले जात चारचौघांचं .चार लोक काय म्हणतील या सबबीखाली अन ओझ्याखाली मनासारखं वागता आलं नाही म्हणून कुढुन कुढुन मरणाऱ्यांची संख्या 99 टक्के असेल .कोणी कोणावर प्रेम करावे,कोणी कोणाशी कसं वागावं हे ठरवण्याचा अधिकार या चारचौघाना कोणी दिला .प्रत्येक माणूस जन्मल्यावर त्याने काय करावं,कसं वागावं,कसं जगावं हे ठरवण्याचा अधिकार त्याला आहे परंतु समाज नावाची जी व्यवस्था आहे ना ती माणसाच्या या मूलभूत अधिकारावरच गदा आणते.विनाकारण दोन भिन्नलिंगी व्यक्ती बोलत असतील तर त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते .
जालना जिल्ह्यातील गुंडेगाव येथे जो प्रकार झाला तो अत्यंत चीड आणणारा अन हिडीस असा आहे .सुशिक्षित सज्ञानी असणारे दोघे जण एखाद्या निर्जन ठिकाणी फिरावयास जाऊ शकत नाहीत का,कायद्याने त्यांना अशी परवानगी नाकारली आहे का,नाही ना,मग ते दोघेजण तिथे गेले तर  समाजाच्या तथाकथित ठेकेदारांना हा अधिकार कोणी दिला की त्यांना पकडून,मारहाण करून डांबून ठेवायचा .मात्र एक मुलगा अन एक मुलगी,किंवा एक स्त्री अन एक पुरुष एकत्र दिसले की काही लोकांचे मस्तक हलते अन त्यातून मग या अशा घटना घडतात .आता यावर काही लोक असाही दावा करतील की अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्यानेच महिलांवरील अन्याय अत्याचार वाढत आहेत,मात्र हा त्यांचा दावा पोकळ आहे .दोन व्यक्ती एकमेकांच्या परवानगीने जर एकत्र भेटत,बोलत असतील तर त्यात गैर काय आहे .परंतु समाजाला ते मान्य नसतं अन त्यातुनच मग अशी जोडपी दिसली की त्यांना मारहाण,धमकावणे, डांबून ठेवणे असे प्रकार होतात,काही वर्षांपूर्वी शिवसेनेने अशाच पद्धतीने व्हॅलेंटाईन डे ला विरोध केला होता तेव्हाही त्याचा मोठ्या प्रमाणात अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोध केला होता .
मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने काय करावे अन काय नको याचा अधिकार कायद्याने त्याला दिला आहे मात्र कायदा न मानणारे मोठ्या प्रमाणात वाढल्याने हे असले प्रकार होऊ लागले आहेत .
त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत,गरीब,मध्यमवर्गीय घरातील लेकरांनी प्रेम केलं तर ते समाजाच्या दृष्टीने लफडं ठरतं अन थोरा मोठ्यांच्या लेकरांनी केलं तर ते अफेयर असत अन त्याला मान्यता दिली जाते .अरे काय हा वेडेपणा आहे,कुणी कुणावर प्रेम करावं याला काही बंधन नाहीत मात्र प्रेम करताना आजूबाजूचे वातावरण ,जागा,स्थळकाळ याच भान ठेवलं पाहिजे हे नक्की .पण ते सांगण्यासाठी सुद्धा पद्धत आहे,प्रेम हे झाडावर करा झाडाखाली नको अस चेष्टेने म्हटलं जातं ते आज खर होताना दिसत आहे कारण प्रेम करणाऱ्यांना बंधन घालणारे,त्यांच्यावर एखाद्या गुप्तहेराप्रमाणे नजर ठेवणाऱ्यांची संख्या मोठी आहे,बर या प्रेम करणाऱ्यांसाठी निश्चित अशी जागाही नाही की तिथं त्यांना कोणी अडवणार नाही .
जालना येथे घडलेला प्रकार हा हिमनगाचे एक टोक आहे,देशात,राज्यात,जिल्ह्याजिल्ह्यात,अगदी वाडी वस्ती तांड्यावर अशा प्रकारे प्रेम करणाऱ्यांना विरोध करणारे उपलब्ध आहेत .जणूकाही यांनी हे काम नाही केलं तर जगबुडी होईल अशा पद्धतीने हे लोक वागतात .मात्र हे करताना त्या दोन व्यक्तींच्या व्यक्तिगत आयुष्यावर त्याचा किती खोलवर आणि गंभीर परिणाम होईल याचा विचार कोणी करीत नाही .जालना येथे ज्या मुलामुलींच्या बाबतीत हा प्रकार घडला त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाला,त्यातून त्या मुलाची,मुलीची किती बदनामी होणार याच्याशी या ठेकेदारांना काही देणंघेणं नाही .आयुष्यभर हे दोघे सामाजिक दडपणाखाली वावरत राहणार,समाज त्यांना पावलापावलावर टीका टिपणी करीत राहणार,त्यांच्या कुटुंबियांना देखील त्रास होणार आणि हे सगळं का तर प्रेम केलं म्हणून .त्यामुळेच मंगेश पाडगावकर यांच्या कवितेच्या या ओळी चपखलपणे या ठिकाणी आठवतात
"त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ?
त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !"
मात्र समाजाला हे मान्य नाही कारण त्यांना दोन भिन्नलिंगी लोक कोणत्याही नात्याशिवाय एकत्र आलेले चालत नाहीत,आणि मग त्या दोन जीवांचा जीव घेण्यासाठी सुद्धा समाज मागेपुढे पाहत नाही .अन त्यातूनच मग ऑनर किलिंग सारखे प्रकार सुद्धा समोर येतात,वास्तविक पाहता असे कोणतेही प्रकार जर समाजाच्या निदर्शनास आले तर या दोन व्यक्तींना समोर बसवून त्यांचं समुपदेशन करून,समजावून सांगून,त्यांच्या कुटुंबियांना बोलून हा विषय मार्गी लावला जाऊ शकतो .पण अस केलं तर समाज सुसंकृत झाला आहे हे दिसेल ना अन ते होऊ द्यायचं नाही म्हणून मग हा असा प्रेमाचा पंचनामा केला जातो अन आपला कंडू शमवून घेत समाज नावाची व्यवस्था आपलीच पाठ थोपटून घेते,हे कुठेतरी थांबायला पाहिजे हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड.
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...