मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

प्रेमाचा पंचनामा ..............!

प्रेमाचा पंचनामा ....................!

प्रेम,लव्ह,इश्क,प्यार दोन अक्षरं, मात्र यात दोन जीवांच आयुष्य बांधल जातं, नव्हे दोन जीव शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहतात,प्रेम ही काही करायची गोष्ट नाही की ती ठरवून केली जाईल,प्रेम हे सहजपणे होतं, नकळतपणे दोन भिन्नलिंगी,समलिंगी व्यक्ती एकमेकांच्या सहवासाने सुखावतात अन आपली सुख दुःख वाटून घेतात,मात्र हे प्रेम समाज मान्य करीत नाही.अगदी अनादी काळापासून प्रेमाला समाजाचा कायमच विरोध राहिलेला आहे,अलीकडच्या काळात तर सोशल मीडिया आणि तत्सम गोष्टींमुळे प्रेम करणं म्हणजे जणू काही गुन्हाच झाला आहे,समाजाचे तथाकथित ठेकेदार अशा प्रेम करणाऱ्यांना विनाकारण त्रास देतात अन त्यातूनच मग जालन्या सारख्या घटना समोर येतात .त्याने प्रेम केलं,तीन प्रेम केलं,मग तुमच्या बापाच काय गेलं अस मंगेश पाडगावकर यांनी त्याकाळी लिहून ठेवलेलं आजही तंतोतंत लागू पडत ते यामुळेच .अशा विकृत पध्दतीने वागणाऱ्या लोकांना कठोर शासन तर व्हाययलाच पाहिजे पण यामध्ये ज्यांच्यावर हा प्रसंग गुदरला आहे त्यांनाही आधार द्यायला हवा अस वाटतं .
देवादिकापासून प्रेमाच्या कोमल अन मुलायम जाळ्यात कोणी अडकल नाही अस झालेलं नाही .अनेकदा सहवासातून तर कित्येकदा पहिल्याच भेटीत प्रेम निर्माण होतं .कोणाला स्वभाव आवडतो तर कोणाला रुबाब अन कोणाला मन आवडतं, ज्याची त्याची आवड असते शेवटी.त्यामुळेच म्हणत असतील कदाचित की 'दिलं आया गधी पे ,तो परी क्या चीज है '.
प्रेम ही भावनाच अशी आहे की ती मारून मुटकून,जबरदस्तीने कोणावर लादता येत नाही .प्रेमाला वयाचं देखील बंधन नसतं .पहिलं प्रेम हे नशीबवान व्यक्तीच्या पदरात पडतं अस नेहमी म्हणतात कारण पहिलं प्रेम हे शालेय जीवनात होत सहसा,त्यामुळेच ते चिरकाल सोबत राहील याची शाश्वती नसते .मात्र काही लोक याबाबत देखील नशीबवान असतात .पण एक मात्र खरं आहे की प्रेम हे ठरवून होऊच शकत नाही .
मात्र या प्रेमाला विरोध करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.अन प्रेम शेवटपर्यंत पदरात पडणाऱ्यांची संख्या देखील कमीच आहे .जिच्यावर किंवा ज्याच्यावर प्रेम असतं ती व्यक्ती सहजीवनात सोबत असेलच अस फार कमी वेळा होतं अन मग पदरात पडलं अन पवित्र झालं या भावनेतून माणूस जगत राहतो .कृष्णाचं राधेवर प्रेम होतं पण ती त्याच्या नशिबात नव्हती तर मिरेच्या नशिबात कृष्ण नव्हता पण याचा अर्थ त्यांचं एकमेकांवर प्रेम नव्हतं असा होत नाही .
प्रेम ही भावना सहज निर्माण होणारी आहे पण समाज नावाची जी व्यवस्था आहे तिला ही भावना मान्य नाही .झाकून लपून, चोरी चोरी केलं तर चालत पण उघड झाल की बोंबाबोंब होते .अन अशी बोंब करणारे आपल्या खाली काय जळतंय याचा कधीच विचार न करता प्रेम करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून मोकळे होतात .
ऐतिहासिक घटना असोत की रुपेरी पडदा अथवा वास्तव जीवन यामध्ये प्रेम ही कल्पना खूप सुखद मानली गेली आहे .प्यार किया तो डरना क्या अस म्हणत हसत हसत मृत्यूला कवटाळणारे अनेक प्रेमीयुगुल आपण पाहिले आहेत .प्रेमाला जस वयाचं बंधन नसत तस जातीपातीच, धर्माच,लिंगभेदाच सुद्धा बंधन नसतं पण तरीही समाजाला ते मान्य नसतं .प्रेम करणाऱ्यांना समाज आणि त्याचे ठेकेदार गुन्हा ठरवतात अन ते करणारे गुन्हेगार .मग त्यातून अशा लोकांना एक अनभिषिक्त अधिकार मिळतो अन त्यातूनच ते प्रेम करणाऱ्यांना स्वतः न्यायाधीश असल्याप्रमाणे शिक्षा देऊन मोकळे होतात .
हिर रांझा असोत की रोमियो ज्युलियट अथवा सोनी महिवाल ही रुपेरी पडद्यावर अजरामर झालेली प्रेमाची प्रतीक किंवा पात्र .सलीम अनारकली यांच प्रेम देखील असच आहे .पारो देवदास हे देखील त्याच पठडीतले .मात्र या सगळ्यांमध्ये एक दुवा एकसारखा आहे तो म्हणजे या सगळ्याच प्रेम समाजाला मान्य नव्हत .दोन व्यक्तींना एकमेकांच्या आवडीनिवडी,स्वभाव,राहणीमान,बोलणं चालणं पटत असेल अन त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण ,ओढ वाटत असेल तर इतरांना त्याविषयी वाईट वाटण्याचं कारण नाही मात्र इथंच खरी गोम आहे .त्याला ती भेटते,तिला तो मान्य होतो मग आम्हाला का नाही भेटत किंवा आम्ही काय त्याच्यापेक्षा वाईट आहोत का या अहंगंडातून सुरू होतो विरोध अन त्याला नाव दिले जात चारचौघांचं .चार लोक काय म्हणतील या सबबीखाली अन ओझ्याखाली मनासारखं वागता आलं नाही म्हणून कुढुन कुढुन मरणाऱ्यांची संख्या 99 टक्के असेल .कोणी कोणावर प्रेम करावे,कोणी कोणाशी कसं वागावं हे ठरवण्याचा अधिकार या चारचौघाना कोणी दिला .प्रत्येक माणूस जन्मल्यावर त्याने काय करावं,कसं वागावं,कसं जगावं हे ठरवण्याचा अधिकार त्याला आहे परंतु समाज नावाची जी व्यवस्था आहे ना ती माणसाच्या या मूलभूत अधिकारावरच गदा आणते.विनाकारण दोन भिन्नलिंगी व्यक्ती बोलत असतील तर त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते .
जालना जिल्ह्यातील गुंडेगाव येथे जो प्रकार झाला तो अत्यंत चीड आणणारा अन हिडीस असा आहे .सुशिक्षित सज्ञानी असणारे दोघे जण एखाद्या निर्जन ठिकाणी फिरावयास जाऊ शकत नाहीत का,कायद्याने त्यांना अशी परवानगी नाकारली आहे का,नाही ना,मग ते दोघेजण तिथे गेले तर  समाजाच्या तथाकथित ठेकेदारांना हा अधिकार कोणी दिला की त्यांना पकडून,मारहाण करून डांबून ठेवायचा .मात्र एक मुलगा अन एक मुलगी,किंवा एक स्त्री अन एक पुरुष एकत्र दिसले की काही लोकांचे मस्तक हलते अन त्यातून मग या अशा घटना घडतात .आता यावर काही लोक असाही दावा करतील की अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्यानेच महिलांवरील अन्याय अत्याचार वाढत आहेत,मात्र हा त्यांचा दावा पोकळ आहे .दोन व्यक्ती एकमेकांच्या परवानगीने जर एकत्र भेटत,बोलत असतील तर त्यात गैर काय आहे .परंतु समाजाला ते मान्य नसतं अन त्यातुनच मग अशी जोडपी दिसली की त्यांना मारहाण,धमकावणे, डांबून ठेवणे असे प्रकार होतात,काही वर्षांपूर्वी शिवसेनेने अशाच पद्धतीने व्हॅलेंटाईन डे ला विरोध केला होता तेव्हाही त्याचा मोठ्या प्रमाणात अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोध केला होता .
मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने काय करावे अन काय नको याचा अधिकार कायद्याने त्याला दिला आहे मात्र कायदा न मानणारे मोठ्या प्रमाणात वाढल्याने हे असले प्रकार होऊ लागले आहेत .
त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत,गरीब,मध्यमवर्गीय घरातील लेकरांनी प्रेम केलं तर ते समाजाच्या दृष्टीने लफडं ठरतं अन थोरा मोठ्यांच्या लेकरांनी केलं तर ते अफेयर असत अन त्याला मान्यता दिली जाते .अरे काय हा वेडेपणा आहे,कुणी कुणावर प्रेम करावं याला काही बंधन नाहीत मात्र प्रेम करताना आजूबाजूचे वातावरण ,जागा,स्थळकाळ याच भान ठेवलं पाहिजे हे नक्की .पण ते सांगण्यासाठी सुद्धा पद्धत आहे,प्रेम हे झाडावर करा झाडाखाली नको अस चेष्टेने म्हटलं जातं ते आज खर होताना दिसत आहे कारण प्रेम करणाऱ्यांना बंधन घालणारे,त्यांच्यावर एखाद्या गुप्तहेराप्रमाणे नजर ठेवणाऱ्यांची संख्या मोठी आहे,बर या प्रेम करणाऱ्यांसाठी निश्चित अशी जागाही नाही की तिथं त्यांना कोणी अडवणार नाही .
जालना येथे घडलेला प्रकार हा हिमनगाचे एक टोक आहे,देशात,राज्यात,जिल्ह्याजिल्ह्यात,अगदी वाडी वस्ती तांड्यावर अशा प्रकारे प्रेम करणाऱ्यांना विरोध करणारे उपलब्ध आहेत .जणूकाही यांनी हे काम नाही केलं तर जगबुडी होईल अशा पद्धतीने हे लोक वागतात .मात्र हे करताना त्या दोन व्यक्तींच्या व्यक्तिगत आयुष्यावर त्याचा किती खोलवर आणि गंभीर परिणाम होईल याचा विचार कोणी करीत नाही .जालना येथे ज्या मुलामुलींच्या बाबतीत हा प्रकार घडला त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाला,त्यातून त्या मुलाची,मुलीची किती बदनामी होणार याच्याशी या ठेकेदारांना काही देणंघेणं नाही .आयुष्यभर हे दोघे सामाजिक दडपणाखाली वावरत राहणार,समाज त्यांना पावलापावलावर टीका टिपणी करीत राहणार,त्यांच्या कुटुंबियांना देखील त्रास होणार आणि हे सगळं का तर प्रेम केलं म्हणून .त्यामुळेच मंगेश पाडगावकर यांच्या कवितेच्या या ओळी चपखलपणे या ठिकाणी आठवतात
"त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ?
त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !"
मात्र समाजाला हे मान्य नाही कारण त्यांना दोन भिन्नलिंगी लोक कोणत्याही नात्याशिवाय एकत्र आलेले चालत नाहीत,आणि मग त्या दोन जीवांचा जीव घेण्यासाठी सुद्धा समाज मागेपुढे पाहत नाही .अन त्यातूनच मग ऑनर किलिंग सारखे प्रकार सुद्धा समोर येतात,वास्तविक पाहता असे कोणतेही प्रकार जर समाजाच्या निदर्शनास आले तर या दोन व्यक्तींना समोर बसवून त्यांचं समुपदेशन करून,समजावून सांगून,त्यांच्या कुटुंबियांना बोलून हा विषय मार्गी लावला जाऊ शकतो .पण अस केलं तर समाज सुसंकृत झाला आहे हे दिसेल ना अन ते होऊ द्यायचं नाही म्हणून मग हा असा प्रेमाचा पंचनामा केला जातो अन आपला कंडू शमवून घेत समाज नावाची व्यवस्था आपलीच पाठ थोपटून घेते,हे कुठेतरी थांबायला पाहिजे हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड.
9422744404

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...