रविवार, १५ जुलै, २०१८


 फायरब्रॅंड .........!

"खुदी को कर बुलंद इतना की खुदा बंदे से पुछे के बता 'तेरी रजा क्या है "या प्रमाणे गेल्या साडेतीन चार वर्षात राज्याचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचे नेतृत्व भरारी घेत असल्याचे दिसून आले आहे .  गोपीनाथ मुंडे विरोधीपक्ष नेते असताना त्यांचा जो दबदबा होता त्याचीच आठवण आज धनंजय यांच्या कार्यशैलीकडे पाहिल्यावर येते .मुंडेंच्या घरात महाभारत सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्यांचा अधिकार होता पण कर्णाप्रमाणे येथेही ज्यांच्यावर अन्यायच झाला ते नाव होतं धनंजय मुंडे .मात्र त्यावेळी खचून न जाता धनंजय यांनी संघर्षाच्या माध्यमातून आपलं नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध केलं.त्यामुळेच आज ते फायरब्रॅंड नेते म्हणून नावारूपाला आले आहेत .

ज्या सरकारच्या कारभाराला साडेतीन वर्षाचा काळ लोटत आला असतांना राष्ट्रवादी काँग्रेस ने सरकार विरोधात रान पेटवायला सुरवात केली आहे,कर्जमाफी असो की अच्छे दिन या विषयावरून सरकार किती खोटारडे आहे हे रस्त्यावर उतरून सांगण्यासाठी राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे आणि या सगळ्यांसाठी राष्ट्रवादीने हल्लाबोल चा मार्ग निवडला आहे .विदर्भ ,मराठवाड्यानंतर, उत्तर महाराष्ट्र्र आणि शेवटचा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात नुकताच झाला .या सगळ्यामध्ये आकर्षण ठरले आहेत ते विधान परिषद चे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे.राष्ट्रवादी काँग्रेस चा नवा ओबीसी चेहरा म्हणून महाराष्ट्रानं धनंजय मुंडेंना स्वीकारलंय अस म्हणल्यास वावग ठरणार नाही .

हुबेहूब प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची छाप आपल्या भाषणातून सोडणाऱ्या धनंजय यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब हल्लाबोलच्या माध्यमातून झालं आहे हे नक्की .

गोपीनाथ मुंडे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर अवघ्या तीन साडेतीन वर्षाच्या काळात धनंजय यांनी आपली वेगळी ओळख राज्यात निर्माण केली आहे,विधान परिषदेत ते बोलायला उभे राहिले की सत्ताधाऱ्यांना धडकी भरते हे राज्यानं पाहिलं आहे ,अनुभवलं आहे.राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे असोत की सरकारची शेतकरी विरोधी धोरणं यावर भरभरून बोलणारा नेता म्हणून आज धनंजय यांच्याकडे पाहिलं जातं आहे.

भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ हे दोघेच ओबीसीचे नेते म्हणून राज्याला परिचित होते,ओबीसींच्या प्रश्नावर दिल्लीपर्यंत धडक या दोघांनी मारली होती,मात्र मुंडे यांच्या अकाली निधनानंतर आणि भुजबळांवरील आरोपानंतर राज्यातील ओबीसीला चेहरा राहिला नव्हता,मुंडेंची जागा पंकजा मुंडे यांनी भरून काढली मात्र राष्ट्रवाडीकडं ती जागा रिकामीच होती,मात्र धनंजय यांच्या रुपानं आता राष्ट्रवादीला नवा भिडू मिळाला आहे .

अवघ्या साडेतीन वर्षात धनंजय यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केल्यानं आज अजित पवार यांना सुद्धा त्यांची दखल घ्यावी लागली आहे.हल्लाबोल यात्रेदरम्यान धनंजय मुंडे हे एका सभेच्या ठिकाणी उशिरा पोहचले,तेव्हा अजित पवार यांचे भाषण सुरू होते,ते बोलल्यानंतर लोकांमधून धनंजय मुंडे यांच्या नावाचा आग्रह झाला तेव्हा आपण हरभजनसिंग आहोत आपण दादांच्या बॅटिंग नंतर काय बोलणार असं धनंजय म्हणताच  "अरे धनंजय हरभजन सुद्धा मॅच जिंकून देतो "असं मिश्किल उत्तर देत अजित पवारांनी धनंजय यांना बोलण्यास लावले,यावरूनच धनंजय मुंडे हे सर्वमान्य नेते झाल्याचं सिद्ध होतं .

गोपीनाथ मुंडे यांना सोडून पवारांच्या साथीला बसल्यानंतर राज्यातील ओबीसी विशेषतः वंजारी समाजात धनंजय मुंडेंबद्दल प्रचंड रोष होता,मात्र गेल्या साडेतीन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे,आपण गोपीनाथ मुंडे यांना सोडण्यामागे काही कारणं होती हे आता लोकांना पटवून देण्यात ते यशस्वी होत असल्याचं चित्र आहे.धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ अशी त्यांची प्रतिमा तयार होऊ लागली आहे, ठाकरे कुटुंबातील राजकीय महाभारतानंतर राज्यात गाजलं ते मुंडेंच्या घरातील महाभारत.यात कोण कौरव आणि कोण पांडव हे जनता वेळ आल्यानंतर ठरवेल मात्र आजतरी राष्ट्रवादी काँग्रेसला धनंजय यांच्या रुपानं एक फायरब्रँड नेता मिळाला आहे हे दिसू लागलं आहे.

कोणत्याही कार्यक्रमात असो किंवा मुंबईमध्ये धनंजय ज्या सहजतेने लोकांना भेटतात ,त्यांचं ऐकून घेतात त्यामुळे ते तरुणांचे आकर्षण ठरू लागले आहेत .विषय कोणताही असो त्यावर सखोल माहिती घेऊन अभ्यासपूर्ण बोलणारा नेता म्हणून मीडियामध्ये सुद्धा ते परिचित होऊ लागले आहेत,एका एका दिवसात शेकडो किलोमीटर चा प्रवास केल्यानंतरही शेवटच्या कार्यकर्त्याला भेटल्याशिवाय या माणसाचा दिवस संपत नाही .मतदारसंघातील लोक असोत की राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक प्रत्येकाला भेटून त्याच्याशी संवाद साधून,त्याची अडचण समजून घेऊन त्याला आश्वस्त करणारा नेता म्हणून त्यांची इमेज डेव्हलप होऊ लागली आहे .

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील हाडवैर अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे,पंकजा या त्यांच्या पक्षात मास लीडर म्हणून पुढे आल्या आहेत तर धनंजय यांनी देखील हम भी किसिसे कम नही हे सिद्ध करून दाखवलं आहे .गोपीनाथ मुंडे ज्या प्रमाणे लोकांना सभांमधून बोलत करायचे,त्यांच्याशी संवाद साधायचे त्याच पद्धतीने सध्या धनंजय मुंडे हे लोकांना आपलंसं करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

प्रत्येक सभेत बोलायला उभं राहिल्यानंतर आले का अच्छे दिन,खात्यात पंधरा लाख जमा झाले का म्हणताच लोकांचा मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे .राज्य सरकारवर टीका करतांना धनंजय यांच्याकडून केले जाणारे हावभाव,चालू घडामोडीचा संदर्भ यावरून ते पक्के राजकारणी झाले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .

हल्लाबोल यात्रेचा नुकताच समारोप झाला आहे ,या सर्व ठिकाणी तरुण,वृद्ध,महिला यांच्या आकर्षणाचे केंद्र धनंजय मुंडे झाले आहेत.राष्ट्रवादीने सुरू केलेला हल्लाबोल सरकारवर किती परिणाम करील हे येणारा काळच ठरवेल मात्र या माध्यमातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चार्ज झाले आणि मुख्य म्हणजे धनंजय मुंडे यांच्या रुपानं राष्ट्रवादीला एक नवा ओबीसी चेहरा मिळाला हे मात्र नक्की .

येणाऱ्या निवडणुकानंतर सत्ता कोणाची येणार हे आज तरी सांगणे अवघड असले तरी धनंजय मुंडे यांच्या रुपानं राज्याला एक नवा ओबीसी चेहरा मिळाला आहे हे मात्र विसरून चालणार नाही .त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, राज्याचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना प्रभू वैद्यनाथ देवो याच सदिच्छा !

लक्ष्मीकांत रुईकर,बीड .9422744404 .

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...