सोमवार, १५ जून, २०२०

लोड लेनेका नही देनेका ..........!



लोड लेनेका नही देने का ..........!

अस म्हणतात की जन्म आणि मृत्यू या दोनच गोष्टी माणसाच्या हातात नाहीत बाकी सगळं त्याच्या आवाक्यात आलं आहे,मात्र 21 व्या शतकात माणूस टेस्टट्युब बेबी च्या माध्यमातून जन्म अन आत्महत्येच्या माध्यमातून मृत्यू देखील आपल्या हातात ठेवण्यात यशस्वी झाला आहे,सुशांत ने केलेल्या आत्महत्येच्या प्रकारानंतर हे प्रकर्षाने जाणवू लागल आहे .मृत्यू मग तो नैसर्गिक असो की अनैसर्गिक तो चटका लावूनच जातो मात्र सुशांत सारख्या सेलिब्रिटी ने मरणाला कवटाळण जास्त वेदना देऊन  जातं. माणसानं दगडाशी का होईना पण बोललं पाहिजे अन आपलं मन मोकळं केलं पाहिजे हे तितकंच खरं आहे .

अवघ्या 30 -35 वर्षाच्या आयुष्यात सुशांत सिंग राजपूत इतका कंटाळला की त्याने अचानक एक्झिट घेतली .मोठे तितके खोटे अन जया अंगी मोठेपण तया यातना कठीण अस जे म्हणतात ते या घटनेने पुन्हा एकदा तंतोतंत खर ठरलं .लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा अस आपले आई बाप सांगतात ते काही खोटं नाही .चंदेरी दुनियेतील झगमगाट हा डोळ्यांना दिपवून टाकतो मात्र या झगमागटामागे किती काळ सत्य दडलेलं असत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं .
सुशांत सिंग राजपूत असो की भैयु महाराज अथवा मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी हिमांशू रॉय ,काय नव्हतं या लोकांजवळ, ऐश्वर्य म्हणजे काय असतं हे या लोकांकडे पाहिल्यावर कळतं, मात्र तरीही हे लोक आयुष्याला कंटाळले,प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतील ,मात्र आयुष्यात कोणत्याही अडचणींवर मात करता येत नाही अस नाही,पण तरीदेखील या लोकांनी आत्महत्या सारखा निर्णय घ्यावा म्हणजे खूप वाईट आहे .
माणूस जन्मल्यापासून तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेला असला किंवा आठरविश्व दारिद्र्य घेऊन जन्मलेला असो .अडचणी प्रत्येकाच्या नशिबात येतातच,अडचणी संकट नसली तर आयुष्य बेचव होईल .
सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे त्यांना सोबत घेऊनच आयुष्याचा प्रवास करावा लागतो .ज्या अभिनेत्याने रील लाईफ मध्ये आत्महत्यापासून कस दूर राहायचं हे शिकवलं अन दाखवलं त्यानेच मृत्यूला कवटाळण योग्य नाही वाटत .एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी ला जवळच अस कोणीच नसावं हे केवढ दुर्दैव आहे .सुशांत असो की भैयु महाराज यांनी आपल्या क्षेत्रात लोकांना जगण्याची नवी उमेद शिकवली,त्यांच्या आदर्शावर अनेकजण आयुष्यात स्थिर झाले असतील मात्र याच लोकांनी असा निर्णय घेणे हे बुद्धीला पटत नाही .

आयुष्याच्या पटावर आपण प्यादेच असतो मात्र आपण वजीर म्हणून खंबीरपणे पाय रोवून उभं राहिल्यास येणारी संकट दूर करून संकटावर मात करता येते .हे साध गणित या सेलिब्रिटी लोकांना माहीत नसावं हे किती अवघड आहे .कितीही संकट आली तरी मनाने खंबीर असलेला माणूस शेवटपर्यंत संघर्ष करतो अन सुखाच्या शोधात शेवटपर्यंत राहतो अन जगतो .मात्र सुशांत सारखे लोक जर इतक्या लवकर हार मानणार असतील तर त्यांना फॉलो करणाऱ्या लोकांनी काय करायचं हा प्रश्नच आहे .
आत्महत्या हा उपाय असू शकत नाही,कारण माणसाला नेहमी अडचणी येतातच,नव्हे अडचणी आल्याशिवाय जगण्यात मजाच नाही मग या अडचणी आल्यावर त्यांना तोंड देण्यापेक्षा तो पळवाट का शोधतो हा संशोधनाचा विषय आहे .सुशांत हा सेलिब्रिटी आहे म्हणून त्याच्या मृत्यूवर अनेकांनी हळहळ व्यक्त केली मात्र देशात रोज शेकडो शेतकरी मरणाला कवटाळतात त्याबाबत कोणाला काही वाटत नाही अशा पोस्ट वाचण्यात आल्या,ते बरोबर आहे .मात्र सुशांत सारखे लोक चंदेरी दुनियेत असल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे म्हणून सोशल मीडियावर जास्त हळहळ व्यक्त झाली .याचा अर्थ शेतकऱ्यांची आत्महत्या कमी अन सुशांत सारख्या सेलिब्रिटी ची मोठी असा होत नाही .पण सोशल मीडियावर कोणी काय अन कस व्यक्त व्हावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .
माणसाच्या आयुष्यात एक तरी जागा किंवा मित्र मैत्रिण अशी असावी की जिथं आपल्याला आपलं मन मोकळं करता येईल,एक तरी खांदा असा हवा की त्यावर आपलं डोकं ठेवून धायमोकलून रडता येईल .पण सिमेंट काँक्रीट च्या या जंगलात शहरं वाढली अन माणुसकी,आपुलकी,जवळीकता ,संवेदनशीलता कमी झाली .फ्लॅट संस्कृती मुळे माणसाची वृत्तीदेखील संकुचित झाली अन त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढीस लागले .रोज कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणावरून आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचनात येतात .अगदी टीव्हीवर कार्टून पाहू दिलं नाही म्हणून एका लहानग्यांन दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली,परीक्षेत अपयश आल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या असोत की प्रेम भंगातून होणारे मृत्यू,अथवा कर्जबाजरी पणाला कंटाळून होणाऱ्या आत्महत्या असोत,जीवन खूप सुंदर आहे,मात्र त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे याचा विसर या लोकांना पडतो अन मग हे अस पाऊल ते उचलतात .

माणसाकड दोन वेळच भागेल एवढाच पैसा असावा अस नेहमी म्हंटल जात मात्र मनुष्य स्वभावानुसार तो गाडी,घोडी,घरदार,जमीन जुमला यासाठी मरमर करतो अन जाताना मात्र फुटका मनी तोंडात घेऊन जातो,हे सगळं माहीत असून सुद्धा माणूस पैशाच्या मागे धावतो हे किती मोठा दुर्दैव आहे .माणूस आपल्या स्वतःकड बघून  जगण्यापेक्षा दुसऱ्यासोबत स्पर्धा करण्यात धन्यता मानतो अन मग त्याचा शेवट दुर्दैवी होतो .

येताना नागवा अन जातानाही नागवच जाव लागतं मात्र तरीही आपण नेहमी दुसऱ्याच्या संपत्तीकडे पाहतो,अगदी भाऊ भाऊ असो,बहीण भाऊ असो की बाप लेक, जावा जावा ,प्रत्येकजण दुसऱ्याच्या ताटात काय अन किती आहे हे पाहण्यात तो आपल्या ताटाकड अन पोटाकड दुर्लक्ष करतो .किती लागत हो जगायला,दिवसभरात चार पोळ्या,भाजी किंवा चटणी,पण माणूस दुसऱ्याच्या नादात स्पर्धा करण्यासाठी म्हणून नको तेवढं कमवायच्या मागे लागतो अन मग नाही भेटलं की मरणाला कवटाळतो .
त्यामुळं एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे की मनुष्य जन्म एकदाच मिळतो त्यामुळे भेटलेल आयुष्य सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर झोका घेत घेत जगायचं,कितिही मोठं संकट आलं, दुःख वाट्याला आलं,तरी हे आपल्या नशिबाचे भोग आहेत अस म्हणून सगळं काही नशिबाच्या माथी मारून मोकळं व्हायचं .लोड लेनेका नही देने का हे कायम लक्षात ठेवल्यास अशक्य अस काहीच नाही.तेव्हा खचून न जाता धैर्याने जगा अन आलेल्या परिस्थितीला तोंड देत आयुष्याचा प्रवास सुखाचा करा .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

शुक्रवार, १२ जून, २०२०

डी एम गेट वेल सून ...........!


डी एम गेट वेल सून ..........!
धनंजय मुंडे हे नाव आज राज्यातील कानाकोपऱ्यात परिचित झालं आहे ते त्यांच्या भाषणामुळे अन दांडग्या जनसंपर्कामुळे .तब्बल सहा सात वर्षांपूर्वी स्व गोपीनाथ मुंडे यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर ते टीकेचे धनी झाले,अगदी त्यांना खलनायक म्हणून काही वर्षे टिका सहन करावी लागली,मात्र कोशीष करनेवाले की हार नही होती हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ते लढत राहिले अन आज राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे .आयुष्यात कायम संघर्ष वाट्याला आलेल्या धनंजय यांना आता कोरोनाशी दोन हात करावे लागणार आहेत, मात्र नेहमीप्रमाणे ते कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा जनसेवेत रुजू होतील हे नक्की .
धनंजय मुंडे म्हणजे ग्राऊंडवरचा गडी, कायम लोकांत राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेला नेता म्हणून आज त्यांची राज्यभर ओळख आहे .रात्री अपरात्री कधीही ,कोणीही फोन केला तरी ते हजर असतात .आपले काका गोपीनाथ मुंडे आणि भाजपनेते प्रमोद महाजन यांच्याकडे बघून मोठे झालेले धनंजय यांच्या बोलण्यात मुंडे महाजन यांची छाप कायम जाणवते .
गोपीनाथ मुंडे म्हणजे आपले राजकीय गुरू अस मानून या एकलव्याने त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात जिल्हा परिषद पासून सुरवात केली .आज ते राज्याच्या मंत्रिमंडळात मानाच्या स्थानावर आहेत .
बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांना सोडल्या नंतर धनंजय हे टीकेचे धनी झाले,त्यांच्या समाजातच नव्हे तर राज्यात ते खलनायक ठरले .राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी टाकत गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर उभं केलं .धनंजय यांनीदेखील आपल्या पदाची प्रतिष्ठा राखत पदाला न्याय दिला,मात्र यावेळी त्यांच्यासमोर होत्या बहीण पंकजा मुंडे .ग्रामपंचायत असो की विधानसभा, लोकसभा प्रत्येक निवडणुकीत या बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली राज्याने याची देही याची डोळा पाहिलं आहे .गेल्या पाच वर्षात पंकजा आणि धनंजय यांच्यातील राजकीय वैरभाव अधिक गडद झाला,बहिणीच्या खात्यातील भ्रष्टाचार बाहेर काढताना धनंजय यांनी आरोपांच्या ज्या फैरी झाडल्या त्यामुळे नात्यातील कटुता अधिकच वाढली .मात्र तरीही ते मागे हटले नाहीत .प्रत्येकवेळी दोघेही एकमेकांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नव्हते .
धनंजय म्हणजे एक शापित राजकुमार अस बोललं जायचं,कायम संघर्ष आणि तोही रक्ताच्या नात्याशी,त्यामुळे वेळप्रसंगी ते अनेकदा भावुक अन व्यथित होत असलेल अनेकांनी पाहिलं आहे,तसच बहीण पंकजा यांच्याबाबतीत सुद्धा घडत होतं,मात्र दोघांचे पक्ष अन विचार वेगळे असल्याने संघर्ष योगायोगाने व्हायचाच, पण त्यामुळे राजकीय गणित मात्र अनेकदा बदलेली पाहिली गेली .
बहीण भावाच्या या संघर्षात कार्यकर्ते देखील भरडून निघाले,धनंजय यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले मात्र आगीतून तावून सुलाखून निघाल्याशिवाय जस सोन्याच मोल कळत नाही तसेच त्यांच्याबाबतीत सुद्धा झालं .लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था असो की बीड लोकसभा निवडणूक प्रत्येकवेळी धनंजय याना राजकीय मात देण्यात पंकजा मुंडे यशस्वी ठरल्या, मात्र या पराभवामुळे खचून न जाता धनंजय मुंडे यांनी त्यातून प्रत्येकवेळी एक नवा धडा घेत आपली लढाई सुरू ठेवली .
परळी विधानसभा निवडणुकीच्या काळात पंकजा मुंडे यांचा पराभव होईल हे कोणालाच अपेक्षित नव्हते .कारण लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना दीड लाखापेक्षा अधिकचे मिळालेले मताधिक्य .मात्र प्रत्येक निवडणुकीची गणित ही वेगळी असतात,त्यामुळे मागच्या अनुभवातून शिकून पुढे जायचे असते,पराभवाने खचून अन विजयाने उन्मादुन न जाता संयमाने वाटचाल करायची असते हा धडा त्यांनी गिरवला होता,त्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झाला .धनंजय मुंडे यांचा थेट असलेला जनसंपर्क त्यांना या निवडणुकीत कामाला आला अन त्यांनी विजयाची पताका फडकावली .
महाविकास आघाडीच्या सरकार पूर्वी मुंबईत ज्या घडामोडी घडल्या त्यातही धनंजय मुंडे हे टीकेचे धनी झाले .अजित पवार यांच्याशी असलेलं सख्य त्यांच्या टिकेसाठी कारणीभूत ठरले .मात्र त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली .सामाजिक न्यायमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी गरीब कल्याणासाठी काम सुरू केलं .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तळ ठोकून बसलेल्या धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले,यासह जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी त्यांनी प्रशासनाला कामाला लावले .कोरोना असताना देखील लोकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते कायम कार्यरत होते .मात्र मुंबईत गेल्यानंतर ते स्वतःच कोरोना बाधित झाले अन पुन्हा त्यांच्या संघर्षाची आठवण लोकांना झाली .
कोरोना हा आजार झालेले मुंडे हे महाविकास आघाडी सरकारमधील तिसरे मंत्री ठरले आहेत .त्यांना फार लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्या स्वास्थ्यासाठी समर्थकांनी पूजा,प्रार्थना सुरू केली आहे,कायम लोकांत रमणाऱ्या आपल्या लाडक्या नेत्यांसाठी कार्यकर्ते चिंतेत पडले आहेत .या अशा काळात कोण आपला अन कोण परका  हे कळतं .धनंजय यांचा दांडगा जनसंपर्क पाहता आणि लढण्याची इच्छाशक्ती पाहता ते या संकटावर सुद्धा लीलया मात करतील यात शंका नाही .ते लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू होतील ही अपेक्षा आहे .जनसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या संघर्ष योध्याला प्रकृती स्वास्थ्यासाठी अन जनसेवेत रुजू होण्यासाठी शुभेच्छा !
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...