शुक्रवार, १२ जून, २०२०

डी एम गेट वेल सून ...........!


डी एम गेट वेल सून ..........!
धनंजय मुंडे हे नाव आज राज्यातील कानाकोपऱ्यात परिचित झालं आहे ते त्यांच्या भाषणामुळे अन दांडग्या जनसंपर्कामुळे .तब्बल सहा सात वर्षांपूर्वी स्व गोपीनाथ मुंडे यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर ते टीकेचे धनी झाले,अगदी त्यांना खलनायक म्हणून काही वर्षे टिका सहन करावी लागली,मात्र कोशीष करनेवाले की हार नही होती हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ते लढत राहिले अन आज राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे .आयुष्यात कायम संघर्ष वाट्याला आलेल्या धनंजय यांना आता कोरोनाशी दोन हात करावे लागणार आहेत, मात्र नेहमीप्रमाणे ते कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा जनसेवेत रुजू होतील हे नक्की .
धनंजय मुंडे म्हणजे ग्राऊंडवरचा गडी, कायम लोकांत राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेला नेता म्हणून आज त्यांची राज्यभर ओळख आहे .रात्री अपरात्री कधीही ,कोणीही फोन केला तरी ते हजर असतात .आपले काका गोपीनाथ मुंडे आणि भाजपनेते प्रमोद महाजन यांच्याकडे बघून मोठे झालेले धनंजय यांच्या बोलण्यात मुंडे महाजन यांची छाप कायम जाणवते .
गोपीनाथ मुंडे म्हणजे आपले राजकीय गुरू अस मानून या एकलव्याने त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात जिल्हा परिषद पासून सुरवात केली .आज ते राज्याच्या मंत्रिमंडळात मानाच्या स्थानावर आहेत .
बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांना सोडल्या नंतर धनंजय हे टीकेचे धनी झाले,त्यांच्या समाजातच नव्हे तर राज्यात ते खलनायक ठरले .राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी टाकत गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर उभं केलं .धनंजय यांनीदेखील आपल्या पदाची प्रतिष्ठा राखत पदाला न्याय दिला,मात्र यावेळी त्यांच्यासमोर होत्या बहीण पंकजा मुंडे .ग्रामपंचायत असो की विधानसभा, लोकसभा प्रत्येक निवडणुकीत या बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली राज्याने याची देही याची डोळा पाहिलं आहे .गेल्या पाच वर्षात पंकजा आणि धनंजय यांच्यातील राजकीय वैरभाव अधिक गडद झाला,बहिणीच्या खात्यातील भ्रष्टाचार बाहेर काढताना धनंजय यांनी आरोपांच्या ज्या फैरी झाडल्या त्यामुळे नात्यातील कटुता अधिकच वाढली .मात्र तरीही ते मागे हटले नाहीत .प्रत्येकवेळी दोघेही एकमेकांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नव्हते .
धनंजय म्हणजे एक शापित राजकुमार अस बोललं जायचं,कायम संघर्ष आणि तोही रक्ताच्या नात्याशी,त्यामुळे वेळप्रसंगी ते अनेकदा भावुक अन व्यथित होत असलेल अनेकांनी पाहिलं आहे,तसच बहीण पंकजा यांच्याबाबतीत सुद्धा घडत होतं,मात्र दोघांचे पक्ष अन विचार वेगळे असल्याने संघर्ष योगायोगाने व्हायचाच, पण त्यामुळे राजकीय गणित मात्र अनेकदा बदलेली पाहिली गेली .
बहीण भावाच्या या संघर्षात कार्यकर्ते देखील भरडून निघाले,धनंजय यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले मात्र आगीतून तावून सुलाखून निघाल्याशिवाय जस सोन्याच मोल कळत नाही तसेच त्यांच्याबाबतीत सुद्धा झालं .लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था असो की बीड लोकसभा निवडणूक प्रत्येकवेळी धनंजय याना राजकीय मात देण्यात पंकजा मुंडे यशस्वी ठरल्या, मात्र या पराभवामुळे खचून न जाता धनंजय मुंडे यांनी त्यातून प्रत्येकवेळी एक नवा धडा घेत आपली लढाई सुरू ठेवली .
परळी विधानसभा निवडणुकीच्या काळात पंकजा मुंडे यांचा पराभव होईल हे कोणालाच अपेक्षित नव्हते .कारण लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना दीड लाखापेक्षा अधिकचे मिळालेले मताधिक्य .मात्र प्रत्येक निवडणुकीची गणित ही वेगळी असतात,त्यामुळे मागच्या अनुभवातून शिकून पुढे जायचे असते,पराभवाने खचून अन विजयाने उन्मादुन न जाता संयमाने वाटचाल करायची असते हा धडा त्यांनी गिरवला होता,त्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झाला .धनंजय मुंडे यांचा थेट असलेला जनसंपर्क त्यांना या निवडणुकीत कामाला आला अन त्यांनी विजयाची पताका फडकावली .
महाविकास आघाडीच्या सरकार पूर्वी मुंबईत ज्या घडामोडी घडल्या त्यातही धनंजय मुंडे हे टीकेचे धनी झाले .अजित पवार यांच्याशी असलेलं सख्य त्यांच्या टिकेसाठी कारणीभूत ठरले .मात्र त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली .सामाजिक न्यायमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी गरीब कल्याणासाठी काम सुरू केलं .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तळ ठोकून बसलेल्या धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले,यासह जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी त्यांनी प्रशासनाला कामाला लावले .कोरोना असताना देखील लोकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते कायम कार्यरत होते .मात्र मुंबईत गेल्यानंतर ते स्वतःच कोरोना बाधित झाले अन पुन्हा त्यांच्या संघर्षाची आठवण लोकांना झाली .
कोरोना हा आजार झालेले मुंडे हे महाविकास आघाडी सरकारमधील तिसरे मंत्री ठरले आहेत .त्यांना फार लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्या स्वास्थ्यासाठी समर्थकांनी पूजा,प्रार्थना सुरू केली आहे,कायम लोकांत रमणाऱ्या आपल्या लाडक्या नेत्यांसाठी कार्यकर्ते चिंतेत पडले आहेत .या अशा काळात कोण आपला अन कोण परका  हे कळतं .धनंजय यांचा दांडगा जनसंपर्क पाहता आणि लढण्याची इच्छाशक्ती पाहता ते या संकटावर सुद्धा लीलया मात करतील यात शंका नाही .ते लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू होतील ही अपेक्षा आहे .जनसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या संघर्ष योध्याला प्रकृती स्वास्थ्यासाठी अन जनसेवेत रुजू होण्यासाठी शुभेच्छा !
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

कोरोनापेक्षाही महाभयंकर विकारांचा आपण मुकाबला केला आहे..
...आपण लवकरच प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तंदुरुस्त होवून सेवेत रुजू व्हाल यात शंका नाही....

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...