बुधवार, १९ जून, २०१९

पावसाला पत्र ..............!

आम्हाला माहीत आहे तू आमच्यावर रुसला आहेस,आमच्या अक्षम्य अशा चूका झाल्या आहेत,अरे पण तू लेकरं म्हणतोस ना आम्हाला मग लेकरं चुकली तर त्याची एवढी मोठी शिक्षा द्यायची असते का रे.आम्ही तुला कधी गांभीर्याने घेतलंच नाही रे,तू सहज यायचास,बागडायचास,वाडी वस्ती असो की सिमेंट काँक्रीट ची मोठं मोठी जंगल,तू कधी अजेदुजे पणा केला नाहीस,प्रत्येकासाठी तू सारखाच होतास.गरीबाच्या झोपडीत सुद्धा तू तितकाच आनंद द्यायचास अन राजमहालात सुद्धा तसाच खेळायचास.
मग अचानक मागच्या काही वर्षात तुझं कुठं बिनसलं हेच कळायला मार्ग नाही.दरवर्षी तू न चुकता हजेरी लावायचास. अंगाची लाही लाही करणारं ऊन जेव्हा होरपळून काढायचं तेव्हा आम्हाला तुझ्या आगमनाची आतुरता असायची.माग पुढं होईल पण तू जरूर जरूर येणार ही खात्री असायची आम्हाला .
अरे ए 'पावसा' बस कर ना आता तुझा हा शिवणापाणीचा खेळ.किती छळणार आहेस,सगळीकडं स्मशान शांतता आहे रे,जो तो तुझ्या आगमनाकडं डोळे लावून बसलाय .कधी एकदा येतोस अन आमचं शेत शिवार,अंगण,नद्या नाले,ओढे भिजवून टाकतोस अस झालंय आता .
अरे एवढी विनवणी आम्ही प्रत्यक्ष देवाला जरी केली असती तरी तो ही प्रसन्न होऊन आमच्यासमोर आला असता पण तू इतका निष्ठुर झालास की तुला पाझरच फुटेना झालाय .
आमच्या आजी आजोबांच्या काळात  मिरगाच्या सुरवातीलाच तू यायचास.अगदी तू आला म्हणजे मिरग सुरू झाला अस समीकरण झालं होतं .त्याकाळात तू धो धो बरसायचास,अगदी नंतर नंतर नको नको वाटायचास,पण तू आपला रतीब पूर्ण केल्याशिवाय कधीच थांबायचा नाहीस .तो काळ आम्हाला आता पुसटसा आठवतो कारण पिढी बदलली की घडी बदलते अस म्हणतात तसाच तुही बदललास पण इतका बदलशील अस वाटलं नव्हतं रे .अगदी एखाद्यानं मोठ्या हौसेनं लव्ह मॅरेज करावं अन पहिल्याच रात्रीला ब्रेकअप व्हावं अस काहीस तुझं झालं आहे .आम्ही तुझ्या माग लागलोय,तुझी आतुरतेने वाट पाहतोय पण तू मात्र रुसलेल्या बायकोप्रमाणे फुरंगुटुन बसला आहेस .
अरे यार आमच्या चूका झाल्या ,आम्ही झाडं तोडली,जंगल नष्ट केली अन सिमेंट काँक्रीट ची जंगलं उभारली .आम्ही एवढे आपलपोटे झालो की तू यावं अस वातावरणच ठेवलं नाही .पूर्वी ज्या हिरव्यागार गालिचा वरून तू यायचास तो गालिचा नष्ट आम्हीच केलाय हे देखील आम्ही जाणतो पण चुकतो तो माणूसच ना .जे काहीच काम करत नाहीत त्यांच्याकडून चूका होणारच नाहीत .आम्ही चुकलो त्याबद्दल आम्हाला खूप लाज वाटते आहे,आम्ही आता शतकोटी वृक्षलागवड सुरू केली आहे,यातून किती झाडं लागतील अन जगतील हे तुलाही माहीत आहे पण काहीच नसल्यापेक्षा काहीतरी करीत आहोत ना रे, त्याला काही मार्क देणार की नाही तू ,गेल्या काही वर्षात औषधालासुद्धा झाडं दिसत नाहीत ही म्हण आमच्यामुळेच आणि आमच्या अप्पल पोटे पणा मुळंच रूढ झालीय याची सुद्धा आम्हाला जाणीव आहे रे,पण म्हणून तू एवढा सूड उगवायचा हे बरं नव्ह रे .
जिथं जिथं म्हणून मोकळी जागा दिसेल तिथं तिथं आम्ही घर,दार,माड्या, इमारती उभारल्या,त्यामुळं तू आमच्यावर रुसलास .सरकार मग ते कोणतंही असो त्यातही माणसंच काम करतात ना ,त्यांनी आपलं पोट भरण्यासाठी विकासाच्या नावाखाली नद्या,नाले ,ओढे गिळंकृत केले.टेकड्या पोखरून काढल्या,जंगल भुईसपाट केली त्यामुळं व्हायचं तेच झालं अन तू आमच्यावर कोपलास. बरं तुला बोकड,कोंबड्या चा नेवैद्य दाखवावा म्हणलं तर तू त्यालासुद्धा तयार होईना .तुझं आपलं एकच,तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वागलात ना आता "मेरी मर्जी "म्हणत तू दडून बसलास .
अरे मित्रा राग नको मानू पण अलीकडच्या इंग्रजाळलेल्या संस्कृतीनुसार आम्ही बापाला मित्र म्हणू लागलो आहोत त्या अधिकारातून तुला मित्र म्हणलो .तर मित्रा अडीअडचणीला मदतीला धावून येतो तोच खरा मित्र अस आम्ही पुस्तकात वाचलं होतं त्याला तरी जाग अन ये बाबा एकदाचा जोरात . पूर्वी कसा तू अगदी न चुकता ठरलेल्या वेळेला यायचास आता मात्र तू आवसा पुनवेला सुद्धा येशील की नाही याचा भरवसा राहिलेला नाही .
आम्ही झाडं तोडली,जंगल संपवली,गगनचुंबी इमारती उभारल्या हे सगळं आम्हाला मान्य आहे मात्र आम्ही तुला कायम घरातलं मानलं आहे रे,तू आमच्या कवींचा,लेखकांचा आवडीचा आहेस,अगदी कालिदास असोत की तानसेन अथवा ग्रेस किंवा भीमसेन बुवा, अगदी अलीकडच्या काळातील स्वप्नील बांदोडकर असो की संदीप खरे प्रत्येकाने तुला त्यांच्या त्यांच्या नजरेतून पाहिलं आहे,चितारल आहे,शब्दबद्ध केलं आहे,पहिला पाऊस अन मातीचा सुगंध आजही आमच्या रोमारोमात एक वेगळी नशा निर्माण करतो हे सगळं कसं विसरलास तू .कोणतीही प्रेम कविता असो की प्रियकर-प्रियसी च पहिल्यांदा भेटणं असो तू कायम आमच्या हक्काचा वाटला आहेस आम्हाला .प्रत्यक्ष देवावर सुद्धा जेवढं लिहिलं गेलं नसेल तेवढं आम्ही तुझ्यावर लिहिलं,ऐकलं, चितारल आहे रे,हे सगळं आम्ही तुझ्यावर प्रेम आहे,तू हक्काचं आहेस,तुझ्याशिवाय आमचं जगणं अवघड आहे या जाणिवेतूनच आम्ही केलं ना रे .मग आमच्यातल्याच काही स्वार्थी लोकांनी तुझ्या वाटेत सिमेंटची जंगल उभारून हिरव्या गार गालिचा ऐवजी काटे पेरले असतील तर तू मूठभर लोकांमुळे आम्हा सगळ्यांना का असा त्रास देतो आहेस .
तू अवखळ आहेस,लडिवाळ आहेस,गोजिरवाणा आहेस म्हणून तर आम्हाला आवडतोस.अनेक महिन्याचा दुष्काळ तू एका क्षणात दूर करू शकतोस हा विश्वास आहे आम्हाला .तरीसुद्धा तू यंदा जरा जास्तच कोपला आहेस की रे .जिथं नको तिथं बेफाम होऊन बरसतोस अन जिथं गरज आहे तिथं तरसवतोस ,हे वागणं काही बरं नाही गड्या .आमची लेकरं कॉन्व्हेंट मधून " रेन रेन गो अवे " म्हणत असली तरी देखील तुझी चाहूल लागताच त्यांच्या तोंडी आजही "ये रे ये रे पावसा,तुला देतो पैसा "हेच बोल येतात रे .आम्ही यंदापासून तुला शब्द देतो की तू जर वेळेवर येणार असशील तर आम्ही सुद्धा यावेळपासून तुझ्या स्वागताला हिरवागार गालिचा तयार करण्यासाठी झाडांची लागवड अन संगोपन करू .
आता एवढंच सांगून थांबतो अन हात जोडून विनवणी करतो ये रे येरे पावसा,तुला देतो पैसा, ये रे येरे पावसा .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

सोमवार, १७ जून, २०१९

अव्यक्त ती ..............!

बऱ्याच दिवसांनी नव्हे तब्बल दोन अडीच महिन्यांनी आज तीच दर्शन झालं,कस आहे ना,की कोणतीही व्यक्ती असो,वस्तू असो,प्राणी असो आपल्याला त्याच्या सहवासाची सवय जडली ना की भेट नाही झाली तर अस्वस्थ होतं, तसच काहीस तीचंही झाल्याची मला जाणीव झाली .
कधी नव्हे ते आज मी आवरून सावरून लवकर उठून तिच्याकडे जायचं ठरवलं,लेकर सुद्धा होते सोबत,खरतर त्यांच्यामुळेच मला तिची रोजची सवय झाली होती,आज तिच्याकडे जात असताना वाटेत लागणारी झाड,वेगवेगळी दुकानं, त्यावरील पाट्या,गतिरोधक,एवढच काय तर रस्ता देखील मी तिच्याकडेच चाललोय या कल्पनेने मोहरून गेल्याची जाणीव मला क्षणोक्षणी होत होती .
बरं तीला भेटायचं म्हणजे वेळेच भान अन बंधन ठेवावं लागतं हे नक्की .उग आपलं उठलं की सुटलं तिला भेटलं अस चालत नाही .तब्बल अडीच महिन्यांचा विरह काय असतो हे तिच्या पहिल्याच शब्दातून मला जाणवलं ।
"अरे आलास का,काय केलंस दोन अडीच महिने,माझी साधी आठवण सुद्धा झाली नसेल ना,माझं नशीबच फुटक आहे म्हणा,दरवर्षी हा अडीच महिन्यांचा विरह मी पाचवीलाच लिहून आणलाय "तिचे हे शब्द सकाळी सकाळी कानावर पडले अन कुठंतरी मलाच माझी लाज वाटली .विचार आला की खरंय राव आपण गेल्या अडीच महिन्यात हिचा जरासुद्धा विचार केला नाही,आपण आपल्या संसारात एवढं गुरफटून गेलो की ही काय करत असेल,एकटी बोर होत असेल का,कोणी सोबत असेल की नाही,याचा जर सुद्धा विचार आपल्याला आला नाही .
"ए एवढा काय विचार करतोस,सोड यार,आलास ना,मला खूप छान वाटलं,आज एवढ्या मोठ्या कालावधीनंतर तू दिसलास अन माझं मन भरून आलं,कोणीतरी आपलं हक्काचं माणूस आलंय म्हणून अधिकाराने बोलले रे, नाहीतरी तुमच्याशिवाय आहे कोण मला,वर्षातले दहा महिने सोबत असते ना तुझी म्हणून राहवल नाही,आणि जरा जोरात बोलले,रागावलास का रे "या शब्दांनी मी पुन्हा भानावर आलो .
यावर्षी 17 जूनपासून लेकरांच्या शाळा सुरू होणार म्हणून मागच्या महिनाभर दप्तर,पुस्तकं, पाट्या,पेन्सिल, पेन,कव्हर,टिफिन बॅग,टिफिन बॉक्स अस काही काही खरेदी सुरू होती,त्या अगोदर महिनाभर रखरखत्या उन्हात कुठं बाहेर जाण्याचा मूड नसल्याने घरातच मस्त आय पी एल अन नंतर इलेक्शन चा आनंद घेतला .आज सकाळी सकाळी लेकीच्या शाळेत गेलो अन त्या शाळेनं अधिकार वाणींन मला मानतल सांगितलं .
खरंच तसं पाहिलं तर ती एक इमारत,दगड विटांनी बांधलेली, मात्र कच्चे बच्चे,शिक्षक,हेडमास्तर आणि हो पालक यांच्या गोंगाटाने ती फक्त इमारत राहतच नाही,ती आपल्या कुटुंबातिलच  एक बनून जाते.म्हणून तर तब्बल अडीच महिन्यांनी मी तिच्या समोर गेल्याने ती अधिकाराने बोलली .प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा हा अविभाज्य घटक आहे,कोणाला ती साहेब बनवते तर कोणाला व्यापारी अन कोणाला काही .शेकडो हजारो जण तिच्या अंगाखांद्यावर खेळून मोठे झालेले असतात .अलीकडच्या काळात तर लेकरू अडीच तीन वर्षांच झालं की त्याला तिच्या हवाली केलं जातं .
तस पाहिलं तर ती म्हणजे काळ्या कृष्णची जशी यशोदा तशीच या सगळ्या बालगोपाळांची यशोदा म्हणावी लागेल .कारण लेकरू जेवढ्या वेळ आई बापाकडे असतं तेवढाच वेळ तिच्या देखील कुशीत अन मुशीत असतं .आई बाप जसे आपल्या लेकरावर चांगले संस्कार करतात तसेच संस्कार ती सुद्धा त्याच्यावर करते .ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असते अन सोबतही असते म्हणून तर आपण सगळे पालक बिनधास्त असतो नाही का .
अशी ही शाळा आज जेव्हा मी तिच्या जवळ गेलो ना तेव्हा मला पाहून दिलखुलास हसली,काही क्षण प्रेयसी माझ्याकडे बघून हस्ते आहे असं वाटलं,काय फिलिंग होत राव ते काय सांगू .पोरीला सहावीच्या ,दुसऱ्या पोरीला दुसरीच्या अन तिसऱ्या कृतिकाला युकेजी च्या वर्गात सोडलं तेव्हा ती जेवढ्या आस्थेवाईकपणे बोलली ना त्याला तोड नव्हती .
तिच्या आवाजात आईची काळजी,बापाचा धाक होता.आता तब्बल दहा महिने माझी अन तिची रोज भेट होत राहील,न चुकता,हो हो न चुकता,कारण रविवार असला तरी मी कधी कधी तिला मुद्दाम भेटायला जातो .आपलं लेकरू रडल,पडलं,त्याला लागलं तर आपण जेवढं जपतो ना तेवढंच न पेक्षा अधिक ती करते,खरंच आपण कधीच विचार करीत नाही की उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन अडीच महिने ती काय करत असेल,रोज शेकडो हजारो पोरांच्या सोबतीची सवय लागलेल्या तिला हा अडीच महिन्याचा काळ खायला उठत असेल नाही का .आपलं घरातलं एक माणूस एक दोन तास नजरेआड गेलं तर आपण कावरेबावरे होतो, आपल्याला करमत नाही,मग शाळेची तर काय अवस्था होत असेल,विचार करूनच अंगावर काटा आला .
अव्यक्त अशा ती च्या मनातल्या भावना ऐकून खूप छान वाटलं,सजीव प्राणी,माणूस असो किंवा एखाद रोप,झाड,वेल, अथवा एखादी निर्जीव वस्तू,त्यांना सुद्धा कोणीतरी हक्काचं हवंच असतं ना,सहवासान जीव जडतो अन जीव जडला की विरहाचा त्रास होतो अस म्हणतात ते काही खोटं नाही हे मला तिच्याशी बोलल्यावर उमगलं .खूप काही बोललो आम्ही सांगेन पुन्हा कधी तरी निवांत,तोपर्यंत रोज तिच्या भेटीची ओढ कायम राहो हीच इच्छा !
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
942274440

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...