सोमवार, २९ जुलै, २०१९

नागवी नैतिकता ............!


सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो काही प्रकार सुरू आहे तो पाहिल्यानंतर नैतिकता हा शब्दच अनैतिक असल्याचा भास होऊ लागला आहे .केवळ सत्ता कायम राहावी यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील दिग्गज घरांना बिनबोभाटपणे प्रवेश दिला जात आहे. या प्रवेश मागे अनेक कारणं असली तरी दोन्ही पक्षातील निष्ठावंत मात्र कुठेतरी नाराज असल्याचे चित्र आहे. मात्र निष्ठवंतांना नेहमीच कमरेत लाथा बसतात आणि त्यांना सतरंज्या उचलाव्या लागतात हे त्रिकालाबाधित सत्य या दोन्ही पक्षांच्या निष्ठावंतांना सध्या अनुभवायला मिळत आहे .त्यामुळेच राजकारणात हा जो काही कारभार सुरू आहे तो पाहिल्यानंतर नागवी नैतिकता असंच म्हणावं वाटतं.
1999 पासून ते 2014 पर्यंत तब्बल 14 वर्षापेक्षा अधिक काळ राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कारभाराला आणि या दोन्ही पक्षातील खाऊन खाऊन सुस्त आणि मस्त झालेल्या पुढाऱ्यांना राज्यातील जनता वैतागली होती. त्यामुळेच या जनतेने शिवसेना आणि भाजपची युती फिसकटल्या नंतर देखील या दोघांच्या पदरात भरभरून दान दिलं आणि 2014 ला देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस मुख्यमंत्रीपदी आरूढ झाला. गेल्या साडेचार वर्षात मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी जो कारभार केला आहे तो वाखाणण्याजोगा आहे .स्वपक्षीयांसोबतच विरोधी पक्षातील नेत्यांवर देखील त्यांनी अंकुश ठेवण्याचे काम केला आहे. मात्र देशभरात भाजपने फोडा आणि राज्य करा ही जी रणनीती अवलंबली त्यापासून फडणवीस स्वतःला वाचवू शकले नाहीत. 2014 च्या अगोदर चा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते भारतीय जनता पक्षामधील आज जे 123 आमदार सत्तेत आहेत त्यातील 50 पेक्षा अधिक जण हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील आहेत. मात्र त्यावेळी जनतेने त्यांना स्वीकारलं परंतु आज जो काही प्रकार भाजप आणि शिवसेनेकडून सुरू आहे ते पाहून जनता देखील हैराण झाली आहे.
सत्तेसाठी आम्ही कोणत्याही पातळीला आणि थराला जाऊ शकतो हेच भाजप आणि शिवसेनेनं दाखवून दिल आहे . कर्नाटक असो गोवा असो की इतर राज्य या ठिकाणी भाजपचे जे धोरण राहिले आहे तेच धोरण सध्या महाराष्ट्रात देखील राबवले जात असल्याचे चित्र आहे .आपल्या सोबत येणारा हा किती मोठा गुंड आहे,भ्रष्टाचारी आहे ,त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, तो राजकारणी म्हणून किती चारित्र्यवान आहे याकडे दुर्लक्ष करून आमच्या सोबत या आणि पवित्र व्हा अशीच काहीशी भूमिका भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी पासून सुरू केल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याच्या नावाखाली राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील असोत की विजयसिंह मोहिते पाटील यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा चाळीशी पार केली हीच अवस्था शिवसेनेची देखील झाली. एकेकाळी निष्ठावंत आणि गरीब प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष म्हणून महाराष्ट्रात नावारूपाला आलेल्या शिवसेनेला देखील दुसऱ्या पक्षातील आयाराम सोबत घेण्याची लागण झाली. भाजप सोबत राहून राहून वाण नाही पण गुण लागला आणि या पक्षाने देखील जयदत्त क्षीरसागर किंवा सचिन आहेर यांच्यासारख्या राष्ट्रवादी मध्ये असलेल्या लोकांना सोबत घेऊन सत्तेचा सोपान चढण्याचा निर्णय घेतला.
पुणे, सांगली ,सातारा ,कोल्हापूर, नाशिक ,नागपूर हे तसे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मजबूत किल्ले मानले जायचे मात्र 2014 पासून या किल्ल्यांना तडे जाऊ लागले आणि 2019 उजाडेपर्यंत हे किल्ले अक्षरशः ढासळले. विजयसिंह मोहिते पाटील असो नरेंद्र पाटील अथवा राधाकृष्ण विखे किंवा संजय काकडे अथवा लक्ष्मण जगताप, आझम पानसरे अनेक दिग्गज राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पुढार्‍यांना भाजप आणि शिवसेनेने गळाला लावत आपली सत्तेवरील मांड कायम करण्याचा निर्णय घेतला. हे करताना आपल्या सोबत आयुष्यभर राबणाऱ्या कार्यकर्त्याला कुठेही विश्वासात घेण्याची गरज वरिष्ठ नेत्यांना वाटली नाही.
हम करे सो कायदा या पद्धतीने शिवसेना आणि भाजपने सध्या वागणं सुरू केल आहे , हे करताना राजकारणामध्ये काही नैतिक मूल्य इथिक्स पाळावी लागतात याचा विसर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना पडला असल्याचे चित्र आहे राजकारण हे गलिच्छ आहे भ्रष्ट आहे त्यामुळे या दलदलीला साफ करायच असेल तर तरुणांनी दलदलीत उतरून नवा असा प्रयोग केला पाहिजे असे मत अनेक जाणकार व्यक्त करतात परंतु सध्या राज्याच्या राजकारणात जे काही सुरु आहे ते पाहिल्यानंतर कोणत्याही भविष्याची स्वप्न रंगवनाऱ्या तरुणाला या क्षेत्रात यायला आवडणार नाही. राजकारणामध्ये नैतिकता असते आणि ती पाळावी असे संकेत असतात मात्र कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणाऱ्या लोकांना नैतिकता या शब्दाचा विसर पडल्याचं सध्या तरी दिसून येत आहे .नैतिकतेचे धिंडवडे काढून भर चौकात नैतिकता नागवी केली जात आहे .विरोधी पक्षात जो मोठा दिग्गज आणि पैसेवाला आहे त्याला सोबत घ्या आणि आपला हेतू साध्य करून घ्या असंच या दोन्ही पक्षाच्या लोकांनी ठरवलेल आहे .राजकारणामध्ये आयाराम गयाराम ही संस्कृती काही नवीन नाही मात्र ज्या पद्धतीने महाराष्ट्रात या आयाराम-गयाराम ला पायघड्या घातल्या जात आहेत त्यांना सत्तेची ऊब दिली जात आहे ते पाहिल्यानंतर मूल्यांचा किती ऱ्हास झाला आहे हे लक्षात येतं.
मंत्र्याचा मुलगा मंत्री, आमदाराचा मुलगा आमदार ,पोरगी खासदार ,नातू नगराध्यक्ष ,पणतू नगरसेवक ही परंपरा तशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील त्यांच्या सत्तेच्या काळात कायम ठेवलेली आहे .एक व्यक्ती एक पद असं केवळ बोललं जातं मात्र एकाच घरात चार चार सत्तेची पद देताना सर्वच पक्षांना याचा विसर पडल्याचे दिसून येतं .जर शरद पवार यांनी एकाच घरात एक पद दिलं असतं तर आज सत्तेच्या साठी जी काही त्यांच्याजवळच्या नेत्यांची लगबग सुरू आहे ती दिसली नसती. पवारांनी देखील त्यांच्या कार्यकाळात मोहिते असोत शिंदे असोत विखे असोत ती क्षीरसागर अशी अनेक घराणी मोठी केली .एकाच घरात तीस चाळीस चाळीस वर्ष सत्तेची पदे दिली. हे करताना भविष्यात आपण उभा करीत असलेले भस्मासुर आपल्याच विरोधात उभा राहतील याची भीती पवारांना वाटली नाही. जे पवारांनी केलं तेच पुन्हा एकदा भाजप शिवसेनेकडून होताना दिसत आहे .भारतीय जनता पक्षामध्ये ज्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील लोक प्रवेश करत आहेत ते पाहिल्यानंतर लवकरच भाजप आणि शिवसेनेची देखील काँग्रेस झाल्यास आश्चर्य वाटायला नको .निष्ठा नैतिक मूल्य राजकीय कार्यकर्ता म्हणून केलेले कष्ट या सगळ्या गोष्टी खुंटीला टांगून आज केवळ संख्या वाढवण्याच्या मागे शिवसेना आणि भाजप लागली असल्याचं दिसून येतं.
सत्तेत कायम राहायचा असेल आणि सत्ता टिकवायची असेल तर पाशवी बहुमत आपल्याकडे पाहिजे या पद्धतीने ईर्षेला पेटलेल्या शिवसेना आणि भाजप कडून जो काही प्रकार सुरू आहे तो पाहिल्यानंतर हा राजकीय शिष्टाचार नसून राजकीय व्यभिचार असल्याचं म्हणावं वाटतं. लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवून भाजपने कर्नाटक असो की गोवा अशा राज्यांमध्ये आपली सत्ता काबीज केली मात्र हे करताना या लोकांना एका गोष्टीचा विसर पडला की सत्ता ही कायम एकाकडेच कधीच राहत नाही .त्यामुळे आज जे सुपात आहेत ते कधीतरी जात्यात जाणारच आहेत. भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांनी काही शेवटपर्यंत सत्ता लिहून आणलेली नाही .अस असतानाही राजकीय शिष्टाचाराच्या ऐवजी जो बाजार मांडला गेलाय तो मन विषण्ण करणारा आहे.
जे लोक भाजप शिवसेनेमध्ये जात आहेत त्यांना मोठमोठी आमिषं दाखवली जात आहेत तसेच चौकशीच्या धमक्या दिल्या जात आहेत अस विरोधी पक्ष सांगतो मात्र घेणाऱ्यांना अक्कल नसली तरी जाणाऱ्यांना तर आहेच परंतु दोघांनीही नाकाला गुंडाळून ठेवल्या नंतर हे असच होणार हे निश्चित ."पार्टी विथ डिफरन्स" हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या भाजपमध्ये हा जो काही नवीन प्रवाह आला आहे तो भाजपच्या निष्ठावंतांना निश्चितच रुचणारा नाही तसेच "80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण" असं म्हणून मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेकडून ज्या पद्धतीने 100% राजकारणासाठीच आयाराम गयाराम यांना पायघड्या घातल्या जात आहेत ते पाहिल्यानंतर मराठी माणसाचं मन देखील कुठेतरी दुखावला गेल आहे .मात्र जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनाशी आम्हाला काही देणे घेणे नाही "हम हम है बाकी सब पानी कम है" अशा पद्धतीने वागण्याचा निर्णय या दोन्ही पक्षांनी घेतल्यामुळे लोकशाहीदेखील निर्वस्त्र होतानाचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
सत्ता ही सर्वसामान्य माणसाचं जगणं सुलभ करून त्याच्या घरापर्यंत विकास पोचवण्यासाठी असते याचा विसर शिवसेना आणि भाजप ला पडला आहे .आम्ही सत्तेत आल्यानंतर विरोधक नसलाच पाहिजे म्हणजे आम्ही माजलेल्या वळू सारखे वागायला मोकळे असे ठरवूनच या दोन्ही पक्षांनी सध्या कारभार सुरू केला आहे. "अगर मेरी सत्ता आई तो भी मै विरोधी पक्ष मे बैठू गा "असं म्हणणाऱ्या लोहिया यांचा आदर्श आज शिवसेना आणि भाजप सारख्या पक्ष्यांमुळे खुंटीला टांगला गेला आहे .आम्हाला सत्ता पाहिजे त्यासाठी वाटेत जो येईल तो सोबत आला तर ठीक अथवा त्याला आडवा करून आम्ही सत्ता काबीज करू हा जो काही नवा प्रकार राज्यात सुरू झाला आहे तो पाहिल्यानंतर कुठेतरी फडणवीस साहेब हे वागणं बरं नव्हं असंच म्हणाव वाटतय.
गावागावातील खेड्यापाड्यातील सर्वसामान्य शिवसैनिक हाच माझा प्राण आणि श्वास आहे असं म्हणणारे बाळासाहेब ठाकरे असोत की सत्तेसाठी खरेदी विक्री करणार नाही भलेही माझं सरकार कोसळले तरी चालेल असं सांगून एका मतानं बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे राजीनामा देणारे अटल बिहारी वाजपेयी हे जर आज हयात असते तर त्यांनी हा प्रकार पाहून निश्चितच आपल्याच पक्षातील असं काम करणाऱ्या लोकांना कडेलोटाची शिक्षा दिली असती. बाळासाहेब ठाकरे यांनी रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरा पासून ते साखर कारखान्यावर चिठ्ठ्या लिहिणाऱ्या कामगारापर्यंत अनेकांना आमदार खासदार केलं. मात्र सत्तेच्या माध्यमातून प्रचंड पैसा आणि संपत्ती गोळा करता येते आणि सत्तेच रक्त जिभेला लागलेल्या या सत्तेतील लांडग्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी सगळी नैतिकता गुंडाळून ठेवत केवळ सत्तेसाठी आपल्याच विरोधकांत सोबत बदफैली करण्याचं ठरवलं.
 त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरु आहे ते पाहिल्यानंतर नैतिकता नागवी झाली आहे आणि जनता डोळ्यावर पट्टी बांधून मुकाटपणे हे पहात आहे असं वाटतं.
लक्ष्मीकांत रुईकर,बीड,9422744404

गुरुवार, २५ जुलै, २०१९

ति च राजकारणच वेगळं ...........!

ती संघर्ष कन्या आहे,ती बायको आहे,ती मोठी बहीण आहे,ती आई सुद्धा आहे,एवढंच काय पण ती लाखो लोकांची माय देखील आहे एवढं कमी की काय म्हणून ती आता राजकारणातील बाप देखील झाली आहे,तीच राजकारणच वेगळं आहे,कारण ती आहे स्व गोपीनाथ मुंडे यांची कन्या,पंकजा गोपीनाथ मुंडे, आज तिचा वाढदिवस आहे,तिच्या भविष्यातील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा

सहसा वडिलांचा वारसा हा मुलगा चालवतो असे म्हणतात मात्र राजकारणामध्ये मुला ऐवजी मुलीनं वारसा यशस्वीपणे चालवून आपल्या वडिलांचं नाव राजकीय पटलावर कायम ठेवल्याचे एकमेव उदाहरण म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे होय . 2009 सालापासून पंकजा मुंडे यांची राजकीय कारकीर्द खर्‍या अर्थाने सुरू झाली मात्र या राजकीय कारकिर्दीला विकासाचे आणि प्रगतीचे धुमारे फुटले ते 2014 नंतर, कारण पाच वर्ष विरोधी पक्षात राहिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी लोकांची नस ओळखली आणि 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थाने यश मिळत गेलं. गेल्या पाच वर्षात पंकजा मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता राहिला आहे. ग्राम विकास सारख्या खात्याला आर आर पाटलां नंतर जर कोणी न्याय दिला असेल तर ते नाव आहे पंकजा मुंडे यांच. त्यांनी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्यामुळेच राज्याच्या राजकारणात भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर मास लीडर म्हणून जर कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते नाव पंकजा मुंडे यांचंच आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी अत्यंत संघर्ष मधून आपलं नेतृत्व उभा केलं , आणीबाणीच्या काळात संघर्ष करून मुंडेंनी तीस चाळीस वर्षाच्या राजकारणात आपली वेगळी छाप महाराष्ट्रातून ठेवली .गोपीनाथ मुंडे यांचा वारसा कोण चालवणार असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा पंकजा मुंडे यांचं नाव पुढे आलं आणि बापानं लेकी वर टाकलेला विश्वास सार्थ करत "हम भी कुछ कम नही" अशा पद्धतीने त्यांनी गेल्या दहा वर्षात कारभार केला आहे .विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी गेल्या पाच वर्षात विकासाचे नवे आयाम प्रस्थापित केले आहेत ते पाहिल्यानंतर त्या मुरब्बी राजकारणी आहेत असंच म्हणावं वाटतं, पंकजा मुंडे यांनी स्वपक्षी यांसोबतच विरोधी पक्षातील लोकांना देखील निधी देताना कुठलाही दुजाभाव केला नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असो की जलयुक्त शिवार अथवा अंगणवाडी सेविकांचा प्रश्न त्यांनी विकास कामांमध्ये कधीच राजकारण केलं नाही स्वतःच्या परळी मतदार संघातील नगरपालिका विरोधी पक्षाच्या ताब्यात असताना देखील पंकजा मुंडे यांनी या नगरपालिकेला भरभरून निधी दिला, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचं नवं रूप त्यांच्या सहकाऱ्यांना नव्हे तर विरोधी पक्षाला देखील पाहायला मिळालं. एकीकडे जातीय वादावरून पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असताना थेट मतदारांशी नाळ जोडत पंकजा यांनी निर्भेळ यश मिळवले ,हे करताना त्यांनी महाराष्ट्रातील विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो खानदेश अथवा मराठवाडा सर्वच ठिकाणी प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळली ,याचेच द्योतक म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी तीन जूनला बारा पेक्षा अधिक खासदार आणि 25 पेक्षा अधिक आमदार व्यासपीठावर हजर होते, आणि त्यातील बहुतांश आमदार हे बहुजन समाजातील होते हे विशेष या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी आपण राज्याचे नेतृत्व करू शकतो हेच दाखवून दिलं .राजकारणात ठंडा करके खाना चाहिए हे ब्रीद वाक्य कायम लक्षात ठेवलं पाहिजे आणि पंकजा यांनी त्याच पद्धतीने काम करत हजारो लोकांच्या साक्षीने देवेंद्र फडणवीस यांना पुढील पाच वर्षासाठी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देत लोकांच्या मनातील गैरसमज दूर केला. गेल्या पाच वर्षात पंकजा मुंडे यांनी ज्या पद्धतीने राजकारण केल आहे ते पाहता त्या लंबी रेस का घोडा आहेत हे कोणीच नाकारणार नाही .पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला एक सक्षम असं महिला नेतृत्व महाराष्ट्रात मिळाल आहे ,गेल्या पाच वर्षात त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी सोडला नाही मात्र या प्रत्येक संकटातून पंकजा मुंडे यांचे नेतृत्व अधिकच सरस बनत गेलं आणि त्यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत केलं, एक महिला म्हणून त्यांच्या वागण्या बोलण्यावर त्यांच्या राहणीमानावर टीका केली गेली मात्र त्यांनी या टीकेला आपल्या कार्यातून सडेतोड उत्तर दिलं "हम हम है बाकी सब पानी कम है" अशा पद्धतीने कारभार करताना पंकजा यांनी कुठेही तोल ढळू दिला नाही राजकारणा सोबतच आपलं घर संसार सांभाळून यावरही त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि त्यामध्ये त्या यशस्वी देखील ठरल्या. लोकांच्या अडचणीत धावून जाण्याबरोबरच त्यांना योग्य ट्रॅक वर आणण्यासाठी पंकजा यांनी अहोरात्र मेहनत घेतली, पंकजा मुंडे या फटकळ आहेत कडक शब्दात बोलतात लोकांना भेटत नाहीत लोकांची कामे लवकर होत नाहीत असे अनेक आरोप त्यांच्यावर केले गेले मात्र लोकसभा निवडणुकीत दिड लाखापेक्षा जास्त मताधिक्‍य देऊन आपल्या बहिणीला म्हणजेच डॉक्टर प्रीतम मुंडे यांना संसदेत पाठवून पंकजा यांनी नवा इतिहास घडवला आहे .
गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे ग्राम विकास विकास विभागाचा कार्यभार आला या खात्याच्या माध्यमातून देशातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याच स्वप्न मुंडे यांनी पाहिलं होतं मात्र त्यांचं अकाली निधन झालं आणि त्यांनी पाहिलेले स्वप्न अधुर राहते की काय अशी चर्चा सुरू झाली परंतु आपल्या बाबांचा विसर जगाला पडू देणार नाही अशी शपथ घेत पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेच जनजीवन सुव्यवस्थित करण्याचा विडा उचलला, त्याचा त्यांना फायदा देखील झाला आज गडचिरोलीपासून ते साताऱ्यापर्यंत आणि मुंबईपासून ते उदगीर पर्यंत असा एकही मतदारसंघ नाही की ज्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचे फॉलोवर्स नाहीत ,एक महिला म्हणून निश्चितपणे त्यांना कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी रात्री-अपरात्री त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अडचणी येतातच परंतु तरीदेखील पंकजा यांनी ज्या पद्धतीने कारभार केला आहे तो पाहता एका कसलेल्या मुरब्बी राजकारण्याला लाजवणारा आहे असंच म्हणावं लागेल. आपल्या बाबांच्या नावाने परळी येथे गोपीनाथ गड उभारून त्यांनी वडीला प्रती असलेली निष्ठा दाखवून दिली .गोपीनाथ मुंडे म्हणजे हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री होता हे नाव त्यांनी राजकारणात अजरामर केलं. केवळ गड उभारून त्या थांबल्या नाहीत तर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान असो की इतर सामाजिक संस्था या माध्यमातून पंकजा यांनी मुंडे साहेबांचं नाव अजरामर केलं .आजही घराघरात गोपीनाथ मुंडे यांचा फोटो देव्हाऱ्यात दिसतो त्याचं कारण मुंडे यांनी केलेलं कार्य आहे मात्र बाबांच्या पश्चात त्यांचं नाव मोठं करण्यासाठी लेकिन जी मेहनत घेतली आहे ती वादातीत आहे.
असं म्हणतात की टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देखील देवपण येत नाही तसंच काहीसं पंकजा मुंडे यांच्या आयुष्यात घडल आहे. राजकारणातला त्यांचा प्रवेश हा घरातील संघर्ष मधून समोर आला,भाऊ धनंजय याला डावल्ल्याने घरातच महाभारत सुरू झालं होतं,अशावेळी जुन्या नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधत त्यांनी विजय मिळवला .वडिलांच्या अकाली जाण्याने एखादी दुसरी मुलगी असती तर कोलमडून पडली असती,मात्र आईचा खंबीर आधार,दोन बहिणींचा बाप आणि लाखो चाहत्यांची पंकजा माय झाली,काही लोकांनी यावरही टिका करण्याची संधी सोडली नाही मात्र वाईटातून चांगलं निर्माण करण्याच बाळकडू बापाकडून मिळवलेल्या लेकीन आपलं वेगळेपण वारंवार सिद्ध केलं .
 "तू सामने से आकर वार कर,पिछे से तो कुत्ते भी भोंका करते है "अशा पद्धतीने वागत पंकजा यांनी विरोधकांना चारिमुंडया चित केलं .आज राज्यातील मुंडेंवर प्रेम करणारे लाखो अनुयायी पंकजा मध्येच गोपीनाथ मुंडे यांना पाहतात,त्यांनी देखील लोकांच्या मनातील मुंडेंची प्रतिमा कायम राहावी यासाठी धडपड सुरूच ठेवली आहे . आपलं काम थेट आणि स्ट्रेट असतं ,आपल्याला छक्के पंजे जमत नाहीत,काम होणार असेल तर हो नाहीतर स्पष्ट नाही म्हणून सांगण्याचा माझा स्वभाव आहे असं त्या नेहमी बोलताना सांगतात .
खरतर राजकारणात अपघातानेच आलेल्या पंकजा मुंडे यांनी दहा वर्षात जी प्रगती केली आहे ती डोळे दिपवणारी आहे,सत्ता आल्यानंतर माणसात थोडा बदल होतो हे मान्य आहे पण पंकजा यांनी आपल्यात बदल करण्यापेक्षा लोकांच्या वैचारिक पातळीत बदल करण्याचा प्रयत्न केला अन त्यात त्या यशस्वी देखील झाल्या .सततच्या निवडणुका अन जाहीर सभेतून होणारी चिखलफेक त्यांना मान्य नाही मात्र ठकास ठक अन सज्जनाशी सज्जन हे आपल्या जगण्याचं सूत्र त्यांनी कायम जपलं आहे त्यामुळे त्या काही जणांना उद्धट,फटकळ वाटतात मात्र त्या जे काही बोलतात त्यामागचा हेतू लक्षात घेतल्यानंतर त्यांची थेट बोलण्यामागची तळमळ दिसून येते.
सत्तेत असल्यानंतर विकासकामे होणारच आणि त्यासाठी कोट्यावधी चा निधी येणारच त्यात विशेष अस काही नाही मात्र या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने व्हावा हे पाहण्याची पंकजा यांची धडपड वादातीत आहे .रस्ते,वीज,पाणी,शाळा खोल्या,अंगणवाडी इमारती यासोबतच लोकांच्या राहणीमानात आणि विचारसरणीत फरक व्हावा यासाठी देखील त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचं दिसून येत .पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकता येतात हा समज त्यांनी लोकसभा निवडणुकीत खोटा ठरवला.
लोकांची कामं करताना बडे दिलवाला ही मुंडे यांची इमेज त्यांनी कायम जपली आहे मात्र लोक निवडणूक आली की पैशासाठी दलबदलू पणा करतात या गोष्टीचा त्यांना ताण येतो हे अनेकवेळा त्यांच्याशी बोलताना जाणवतं .लोकांची नाळ ओळखून त्याना काय हवे नको याचा अभ्यास केलेल्या या महाराष्ट्राच्या संघर्ष कन्येच्या माध्यमातून बीडकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं भावी नेतृत्व पाहतो आहे,त्यांना मनेच्छित पद मिळो अन बिडकरांनी स्व मुंडे साहेबांच्या माध्यमातून पाहिलेलं स्वप्न पूर्ण होवो याच वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड,9422744404

रविवार, २१ जुलै, २०१९

राजकारणातील दोन ध्रुव !

राजकारणातील दोन दिग्गजांचा आज वाढदिवस, हे दोन्ही दिग्गज म्हणजे स्वभावाने अगदी दोन टोकं म्हणावी लागतील ,यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही  . एक कायम उपेक्षित दुर्लक्षित आणि दुष्काळी असलेल्या विदर्भातला तर दुसरा कायम संपन्न सुखी आणि सुजलाम-सुफलाम असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातला मात्र राजकीय पटलावर पश्चिम महाराष्ट्राच्या या सुजलाम सुफलाम असलेल्या नेत्यावर विदर्भ वीरांन मात केली अन मुख्यमंत्रिपद काबीज केलं . पश्चिम महाराष्ट्रातील नेते अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा अद्यापही अपूर्णच आहे तर दुसरीकडं देवेंद्र फडणवीस या विदर्भवीर माणसानं मुख्यमंत्रीपदी आरूढ होत सर्वच राजकारण्यांना गेल्या साडेचार पाच वर्षात धक्का दिला आहे  . राज्याच्या राजकीय पटलावर आपल्या कारभाराचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या या दोन्ही नेत्यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस असावा हा देखील दैवी योगच म्हणावा लागेल .
राजकारणामध्ये शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 12 डिसेंबर ला असतो . त्यामुळे हे दोन्ही नावं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला कायम लक्षात आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षामध्ये राज्याच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे काम देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने केलं आणि पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी टाकली . शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस हा डिसेंबर महिन्यात असतो तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचा वाढदिवस 22 जुलैला असतो हा योगायोगच म्हणावा लागेल . मुंडे यांचा वारसा समर्थपणे चालवणारे फडणवीस आणि मोठ्या पवारांचा वारसा पुढे नेणारे अजित पवार यांचे वाढदिवस ही एकाच दिवशी आहेत राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांची सुरुवात नागपूर पासून झाली तर अजित पवार या दादा माणसानं राजकारणात पाऊल ठेवलं ते बारामती पासून . सुरुवातीला लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेत आपला वेगळा ठसा अजितदादांनी उमटवला तर दुसरीकडे नगरसेवक पदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली ती देवेंद्र फडणवीस यांनी. देवेंद्र फडणवीस यांचा गेल्या पाच वर्षातील कार्यकाळ पाहिला तर स्वपक्षीय नव्हे तर विरोधी पक्षातील लोकांना देखील चांगल्या चांगल्या मुरलेल्या राजकारण्यांना देखील कात्रजचा घाट दाखवण्यात यशस्वी ठरले आहेत.फडणवीसांचा कारभार हा पहाटे चार वाजेपर्यंत चालतो सहसा ते राज्याच्या कोणत्याही भागात दौऱ्यावर असले तरी मुक्कामासाठी आपल्या वर्षा निवासस्थानी जातात त्याचं कारण रात्री दहानंतर महत्त्वाचे निर्णय महत्त्वाच्या फायली हातावेगळ्या करण्यासाठी वर्षावर पहाटे चार वाजेपर्यंत अधिकाऱ्यांचा राबता असतो .आपल्यावर पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून जनसेवेचे अखंड व्रत या देवेंद्राने अंगिकारल आहे . महाराष्ट्रात जलयुक्त शिवार असो की इतर कोणत्याही योजना ,सर्वसामान्य लोकांच्या दारात विकासाची गंगा नेण्याचं काम  फडणवीसांनी   केल आहे .राज्यातील पहिलाच मुख्यमंत्री असा असेल ज्याने दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी जिल्हावार बैठका घेतल्या आणि असा एकही जिल्हा नसेल ज्या ठिकाणी विकासकामासाठी फडणवीस गेले नाहीत. त्यांच्यावर जातीयवादाचा शिक्का लावून त्यांना नामोहरम करण्याचा देखील प्रयत्न झाला देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या जाणता राजाने फडणवीसांची जात काढण्यापर्यंत मजल मारली मात्र अशा कुठल्याही टीकेला आपल्या कार्यातून उत्तर देत फडणवीसांनी विरोधकांना नामोहरम केले .सत्ताधारी असो की विरोधक योग्य काम असेल तर त्यांनी कधीच आडवले नाही देशात 20 पेक्षा अधिक राज्यांमध्ये आज भाजप आणि मित्र पक्षाची सत्ता आहे मात्र या सर्व  मुख्यमंत्र्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे लाडके कोणी असतील तर ते आहेत देवेंद्र गंगाधरराव फडणवीस . सलमान ज्या पद्धतीने म्हणतो की 'मेने एक बार कमिटमेंट कर ली तो मै अपने आप की भी नही सुनता 'तशाच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकदा निर्णय घेतला की तो बदलला आहे असे साडेचार वर्षात पाहायला मिळाले नाही.
फडणवीस यांनी आपल्या कारभाराचा जसा वेगळा ठसा राज्यात उमटवला तसाच काहीसा एक वेगळा थाट अजित पवारांनी मिरवला असं म्हणायला हरकत नाही. अजित पवार यांना राजकारणात दादा म्हणूनही संबोधले जात. कदाचित त्यांच्या स्वभावाला अनुसरून हे नाव असावं. अजित म्हणजे सर्व आघाड्यांवर विजय मिळवणारा अशाच पद्धतीने पंधरा वर्ष राज्याच्या राजकारणात सत्तेत असताना अजित पवारांनी स्वपक्षीय आणि विरोधी पक्षातील अनेक आघाड्यांवर आपली निरंकुश सत्ता कायम ठेवली. जे आहे ते थेट आणि रोखठोक बोलून मोकळं व्हायचं इतरांना काय वाटेल याचा विचार न करता निर्णय घेण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते काही वेळा अडचणीतही आले मात्र अजित पवारांनी त्याची कधी तमा बाळगली नाही. त्यांच्या पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील लोकही शब्द पाळण्याबद्दल अजित पवारांचं पाठीमागे देखील कौतुक करतात कारण त्यांना एखादं काम सांगितलं तर ते तातडीने झालंच पाहिजे असा त्यांचा स्वभाव आहे. आजही मंत्रालयातील नव्हे तर राज्यातील महसूल अधिकारी अजित पवार यांचं नाव निघताच आदरयुक्त भीतीने थरथर कापतात. प्रचंड अभ्यास राजकारणावरील घट्ट पकड यामुळे अजित पवार हे नाव महाराष्ट्राला सुपरिचित झालं .दुष्काळी मराठवाड्याला गोदावरी नदीवर बॅरेजेस बांधून सुजलाम सुफलाम करण्याचा अजित पवारांचा निर्णय मराठवाड्यातील जनता कधीच विसरू शकणार नाही. भलेही त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे हे बदनाम झाले असतील परंतु वरून नारळासारखा दिसणारा हा माणूस आतून मात्र मृदू आहे असाच अनेकांचा अनुभव आहे
राजकारण म्हणलं की टीकाटिपणी आरोप-प्रत्यारोप या गोष्टी आल्याच मात्र आरोप करताना ही पातळी सोडली नाही पाहिजे हे कायम अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवल आहे .लोकसभेच्या काळात आपल्याच पक्षातील एका महिला कार्यकर्तीने फडणवीस आणि मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका सुरू केल्यानंतर तिला मध्येच थांबवत टीका करतानाही भाषा सभ्य वापरा असा वडिलकीचा सल्ला अजित पवारांनी दिल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल  आहे तर दुसरीकडे आपल्या पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील लोकांचं नावही यांनी आदराने घेतल आहे . शरद पवार असोत की विखे पाटील विकासाच्या कामांमध्ये कुठलाही आडपडदा न ठेवता निसंकोचपणे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सल्ला घेतला आहे.
या दोन्ही नेत्यांच्या स्वभावात मोठा फरक आहे,अजित पवार थेट बोलणारे तर देवेंद्र फडणवीस हसून काम करणारे आहेत, मात्र आपल्या आपल्या पक्षात आज या दोघांचे स्थान अढळ आहे हे निश्चित .राजकारणात विरोधकांना कसे रोखायचे यावर  विरोधकांनी फडणवीस यांच्याकडे क्लास लावायला हवेत .कारण प्रत्येक अधिवेशनापूर्वी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना माझ्याकडे तुम्ही मारलेल्या डल्याच्या फाईली आहेत अस छातीठोकपणे सांगणारा मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस होय .फडणवीस यांनी प्रशासनामध्ये जे मोठे बदल केले त्यामुळे ते कायम लक्षात राहतील .
राज्याच्या राजकारणावर आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटवणाऱ्या या नेत्यांमधील एकाने साठी ओलांडली आहे तर दुसरा पन्नाशीच्या घरात पोहचला आहे,या दोन्ही नेत्यांच्या हातून महाराष्ट्राचे महान राष्ट्र व्हावे,राज्य सुजलाम सुफलाम व्हावे हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...