शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

राजकारण गडाचं

राजकारण गडाचं
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या वेगळ्या कार्यशैली मुळे परिचित असलेले स्व.गोपीनाथ मुंडे यांची ओळख महाराष्ट्राला आणखी एका कारणामुळे आहे,ती म्हणजे भगवानगड.पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पाथर्डी तालुक्यात असलेला भगवानगड विशेष चर्चेत आला तो मुंडे यांच्या मुळेच,साधारण पणे 12 वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगड च्या गादीवर नामदेव शास्त्री सानप यांना बसवले,मुंडे आणि गड हे समीकरण राज्याच्या राजकारणात मागील दहा बारा वर्षात परिचित झाले होते,दरवर्षी भगवान बाबाच्या पुण्यतिथी आणि जयंती निमित्त गडावर मोठी यात्रा भरते,तसेच विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी मुंडे देशात कोठेही असले तरी गडावर येत,आणि त्या ठिकाणी त्यांची टोलेजंग सभा होई,अगदी दीड वर्षांपूर्वी मुंडे केंद्रात मंत्री झाल्यानंतर राज्यात सर्वप्रथम आले ते भगवान गडावर,या गडाने मुंडेंच्या मागे मोठी ताकद उभी केली,विशेषतः वंजारी समाजाची एकगठ्ठा मते मुंडेंच्या मागे गडामुळे राहिली ,त्यामुळेच राज्यातील सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षातील लोकही मुंडेंच्या या ताकदीपुढे नतमस्तक होत असत,
मुंडे यांच्या अकाली निधनानंतर भगवान गडावरून महंत नामदेव शास्त्री सानप यांनी पंकजा मुंडे यांना गडाची मानसकन्या जाहीर केले,मुंडेंच्या दहाव्या आणि तेराव्या दिवशी नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका मांडली होती,तेथेच गोपीनाथ गडाची मुहूर्त मेढ रोवली गेली आणि सुरु झाला भगवान गड (नामदेव शास्त्री)आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष.
गोपीनाथ गड हा येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरावा हा पंकजा यांचा उद्देश होता,त्यात वावगे असे काहीच नव्हते,मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी शास्त्री यांनी गोपीनाथ गड हा राजकीय गड असेल आणि भगवानगड हा धार्मिक गड असेल,या पुढे भगवान गडावर राजकीय भाषणे होणार नाहीत असे जाहीर केले आणि उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या,आजपर्यंत भगवान गडावरून मुंडे राजकारण करतात अशी दबक्या आवाजात होणारी चर्चा शास्रीनच्या घोषणेमुळे खुलेआम झाली,कदाचित येथेच पंकजा आणि शास्त्री यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली असावी,
राज्यामध्ये भगवानगड ला मानणारा मोठा समाज आहे,केवळ वंजारी समाजाचा गड अशी असणारी प्रतिमा आजही कायम आहे ,वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे,या गडावर सर्व जाती धर्मातील लोक श्रद्धेने येतात,परंतु मुंडे यांचा गडावरील वावर पाहता हा गड वंजारी समाजाचा असावा असा अनेकांचा समज आहे,
भगवान गडावरून यापुढे दसरा मेळाव्यात राजकीय भाषण होणार नाही असा निर्णय नुकताच नामदेव शास्त्री यांनी जाहीर केला,मध्यंतरी पंकजा आणि शास्त्री यांच्यात धुसफूस सुरु असल्याच्या बातम्या होत्या,काही कार्यक्रमानिमित्त पंकजा या गडावर गेल्या तेव्हा शास्त्री आणि त्यांच्यात विसंवाद वाढल्याच्या सुरस बातम्या आल्या होत्या,त्याचे खंडन ना पंकजा यांनी केले ना शास्रीनी केले,दसरा मेळावा होणार कि नाही यावरून शास्त्री विरुद्ध काही पुढाऱ्यांनी शेरेबाजी देखील केली होती,पंकजा यांना मानस कन्या जाहीर केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील गडावर झाला होता हे सर्वश्रुत आहे,अशा वातावरणात गड ,शास्त्री आणि पंकजा यांच्यात दुरावा आल्याचे स्पष्ट जाणवत होते,
पंकजा यांना गड ताब्यात घ्यायचा आहे तर शास्रीना कोणाची लुडबुड नको आहे अशा चर्चा जोरात सुरु आहेत, कोण चूक कोण बरोबर यावर मतमतांतरे असू शकतील मात्र सुरु असलेला वाद समाजाला देखील मान्य नसल्याचे दिसते, राज्याच्या राजकारणात आपला दबाव कायम ठेवायचा असेल तर समाजाची ताकद आपल्या मागे कायम कशी राहील यासाठी गड आपल्या ताब्यात कसा राहील यासाठी पंकजा यांचा प्रयत्न सुरु असल्यास त्यात वावगे काहीच नाही,कारण स्व गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणात दबदबा निर्माण करण्यात गडाचा सिंहाचा वाटा होता हे कोणीच अमान्य करणार नाही,त्यामुळे गडाची ताकद आपल्या मागे राहावी यासाठी पंकजा यांचा प्रयत्न असल्यास चुकीचे काहीच नाही मात्र त्यासाठी त्यांनी जो मार्ग निवडला आहे तो कदाचित चुकीचा असू शकतो,
कोणी काहीही म्हणो भगवान गडावरून एकदा आदेश मिळाला कि मग समाज कोणाचेच ऐकत नाही हे सर्वच राजकीय पक्षांना चांगलेच माहित आहे,त्यामुळे गडावर दसरा मेळावा होणारच आणि तेथे आपण भाषण करणारच असा जर पंकजा यांचा आग्रह असेल तर त्यात त्यांचा काही दोष नाही असेच म्हणावे लागेल
मात्र त्यासाठी थेट नामदेव शास्त्री सानप यांना आव्हान देणे पंकजा यांना निश्चितच न परवडणारे आहे,कारण गड कि पंकजा असा निवाडा करावयाचा झाल्यास समाज गडाच्या पाठीशी राहील यात शंका नाही,त्यामुळे पंकजा यांना सध्यातरी शांतपणेच निर्णय घ्यावा लागेल.
निवडणुकांना अद्याप साडेतीन वर्षाचा कालावधी असला तरी पंकजा यांची घाई त्यांच्या पुढील राजकारणाला मारक ठरू शकते असे राजकीय धुरिणांचे मत आहे,पंकजा यांनी गड आपल्याला सर्वोच्च आहे,त्याचे कोणी राजकारण करू नये अशीच भूमिका घेणे क्रमप्राप्त आहे असे अनेकांचे मत आहे,मात्र पंकजा यांचा एकंदर कारभार आणि राजकारण करण्याची पद्धत पाहता त्या असे वागतील याबाबत अनेकांना शंका आहे,त्यामुळे आगामी काळात गड (शास्त्री)विरुद्ध पंकजा असा संघर्ष अटळ असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे

रविवार, २४ जानेवारी, २०१६

आत्महत्येस कारण की .......

झी 24 तास ने काही महिन्यांपूर्वी मराठवाड्यातील अल्प भू धारक ,गरीब शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला,आम्हा रिपोर्टर लोकांना असे शेतकरी कुटुंब शोधण्याचं काम सोपवलं,संपादकांचा आदेश शिरसावंद्य मानून आम्ही कामाला लागलो,पण मनात शंका होती,खरोखर गरज असणारे शेतकरी कुटुंब शोधायचे कसे,कारण आत्महत्या केलेल्या कुटुंबांचा समावेश टाळावा अस सांगितलं होत,तेव्हा मी बीड जिल्ह्यातील सहा कुटुंब शोधून काढली ,मात्र त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली,कारण कोणता क्रायटेरिया लावणार,बरं काम सोप वाटत असलं तरी महा कठीण होत,कारण त्या कुटुंबाला दोन तीन एकर जमीन असावी,ती पडीक किंवा नापीक असावी,आर्थिक बाजू कमकुवत असावी,असे काहीसे निकष होते,असे लोक शोधणं तस अवघड होत मात्र सहा कुटुंब शोधली किंवा सापडली म्हणा,त्या कुटुंबांची पार्श्वभूमी पाहिली तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या,मात्र त्या नजरेआड करून निवड करावी लागली,याचा अर्थ निवड चुकीची करावी लागली असा नाही मात्र कुठं तरी मनात अनेक प्रश्नाचं काहूर माजलं होत,आर्थिक बाजू कमकुवत असताना देखील एकाही कुटुंबाची सदस्य संख्या मर्यादित म्हणजे दोन मुलं, आई वडील अशी नव्हती,सहा कुटुंबात किमान चार मुलं, मुली आई वडील,सासू सासरे अशी परिस्थिती होती,एक कुटुंब तर 11 मुलं, मुली ,आई वडील,कुडाच घर,अस होत.
हि सगळी स्थिती पाहिल्यानंतर काही प्रश्न पडले,या लोकांची आर्थिक बाजू कमकुवत होती तर कुटुंब नियोजन किंवा मर्यादित कुटुंब का नाही,बरं कुटुंब मर्यादित नाही तर नसू दे मात्र पिकांचं नियोजनही दिसलं नाही,दोन तीन एकर जमिनीवर कापूस किंवा ऊस हि दोनच पीक दहा वर्षापासून घेतली जात असल्याचं दिसून आलं.अशा वेळी जर नियोजन कोलमडून पडलं तर दोष कोणाला द्यायचा ,अरे बाबांनो जमिनीत जर नियोजन करून पीक घेतलं तर आर्थिक परिस्थिती डबघाईला येणार नाही,दहा पंधरा वर्षांपूर्वी शेतात ज्वारी ,बाजरी,मूग,उडीद,तूर,भुईमूग अशी पीक घेतली जायची,वर्षातून दोन पीक घेतली जायची,त्यातील चार पाच क्विंटल माल विकून उरलेला माल वर्षभर घरी खायला पुरवायचा अस ठरलेलं गणित असायचं,त्या काळात ग्रामीण भागात पै पाहुणा आला तरच गव्हाची पोळी ताटात दिसायची,पुरण पोळी तर सण वाराला पहायला मिळायची,आज रोज गव्हाची पोळी ताटात दिसते,काही जण म्हणतील कि तुम्हाला शेतकऱ्यांनी पोळ्या खाऊ नयेत अस वाटत का?तर निश्चित नाही,त्यांनीही पोळ्या खाव्यात वावगं काहीच नाही मात्र सांगण्याचा उद्देश एवढाच कि पूर्वी शेतात पिकलेल धान्य,डाळी दुळी वर्षभर घरात पुरतील एवढ्या व्हायच्या आज मात्र प्रत्येक गोष्ट विकत आणावी लागते,पूर्वी शेतात बांधावर वांगी,मेथी,करडी,कांदा,आळू ,बटाटे अशा भाज्या लावल्या जायच्या,रोज जेवणात त्याचा वापर केला जायचा,वाण्याच्या दुकानात तेल,तूप,साखर पत्ती यासाठी जावं लागायचं,त्याला खर्चही कमी लागायचा,आज मात्र शेतकर्याच्या हातात भाजी ची पिशवी आणि किराणा सामानाची यादी सोबतच असते मग पैसा पुरणार कोठून.
शेतकरी आत्महत्या हा अत्यन्त संवेदनशील विषय आज झाला आहे,दहा पंधरा वर्षांपूर्वी शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताना दिसत नव्हते आज मात्र रोज कोठे ना कोठे आत्महत्या केल्याची बातमी वाचायला,ऐकायला मिळते,एखादा माणूस एवढ्या सहजपणे आपलं जीवन कस संपवू शकतो ?हा न उलगडणारा प्रश्न आहे, आत्महत्या करण्यामागे अनेक कारण असतात,नापिकी,कर्जबाजारी पणा, सावकाराच कर्ज इथपासून ते अगदी व्यसनाधीनता इथपर्यन्त अनेक कारण आहेत,मात्र त्याला शेतकरी आत्महत्या हे गोंडस नाव देऊन त्या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतानाचे चित्र दिसते.
ग्रामीण भागात आजही शेतकरी असो कि शेतमजूर लग्न सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्याचे फॅड दिसून येते,मुलीच्या लग्नात ऋण काढून सण साजरा करण्याचे प्रकार सर्रास दिसून येतात याला काय म्हणायचं.दोन तीन एकर जमीन सावकाराकडे गहाण टाकायची आणि मुलीच लग्न थाटात लावायचं,कारण पै पाहुण्या मध्ये आपला रुबाब कायम राहावा यासाठी हा सगळा थाट माट असल्याचं दिसत.येणारा माणूस खुश झाला पाहिजे ,पाहुण्या रावळ्यानी आपलं नाव घेतलं पाहिजे या साठी केलेला हा सगळा खटाटोप शेवटी वधुपित्याच्या गळयाला फास देऊन जातो.एक लग्न शेतकऱ्याला चार पाच वर्ष मागं घेऊन जात,पाहुण्यांचे आहेर,नवरदेवाच्या घरच्यांचा मानपान,जेवणावळी,यावर लाखो रुपये खर्च होतात,जेवणारे जेवून जातात,हे कमी पडलं,ते जास्त झालं अशा चर्चा करतात,ग्रामीण भाषेत सांगायचं तर खातात पितात अन टेरी ला हात पुसून जातात अशी अवस्था असते मात्र तरी देखील मागील पाच पंन्नास वर्षात लग्नावरील खर्च कमी झालेला नाही.
कर्ज काढून लग्न सोहळे उरकायचे अन ते फेडताना नाकीनऊ आले कि गळ्याला फास लावायचा असा कार्यक्रम ठरलेला दिसतो,गळफास लावताना कोणीही नंतर काय होईल याचा विचार करताना दिसून येत नाही,लग्न करू नयेत अस नाही मात्र ते करताना आपलं अंथरून पाहून पाय पसरावेत हे नक्की.सामूहिक विवाह हा देखील एक चांगला पर्याय आहे किंवा एक गाव एक लग्नतिथी हा देखील उपाय होऊ शकतो.यावर सर्वानीच गांभीर्याने विचार करायला हवा,
ग्रामीण भागाचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते कि जमीन खरेदी किंवा विक्री चे व्यवहार झालेच नाहीत अस एकही गाव आढळणार नाही,ज्याच्याकडे दहा पंधरा एकर जमीन आहे तो वर्ष दोन वर्षात एक एकर का होईना जमीन विक्री करतो,बरं हि जमीन कोणी मुंबई पुण्यावाले विकत घेतात अस नाही तर गावातीलच दोन तीन एकर शेती असलेला माणूस हि जमीन विकत घेतो,त्याला ते कसे शक्य आहे याचा अभ्यास केल्यास लक्षात येईल कि त्याच्याकडे काम करण्याची इच्छा शक्ती आहे अन 24 तास तो घाम गाळण्यात घालवतो,काम करील त्याला दाम मिळतील किंवा करा काम गाळा घाम मिळवा दाम असा सृष्टीचा नियम आहे आज अनेकांना त्याचा विसर पडल्याचे चित्र दिसते .
शेतकरी आत्महत्या करताना परिवाराचा विचार करीत नाही असही दिसून येत,बरं ग्रामीण भागात काम करणारे भटके ,विमुक्त ,सालगडी,मजूर कधीही अशा वाटेने जाण्याचा विचार करीत नाहीत अस दिसत मग शेतकरीच का असा विचार करतो,त्याला अनेक कारण आहेत, असतील मात्र शेतकऱ्यांनी जर ठराविक पिकाचा अट्टहास सोडून शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर शेती आतबट्याची होण्याऐवजी फायद्याची होऊ शकते ,अनेक जण सांगतात शेतीसाठी पाणी मुबलक मिळत नाही म्हणून शेती परवडत नाही ,मान्य आहे मात्र पाण्याचं योग्य नियोजन करन कोणाच्या हातात आहे,आहे पाणी म्हणून चोवीस तास उपसा करायचा आणि संपलं कि बोंबा मारायच्या हे कस मान्य होईल,ठिबक सिंचन सारखा प्रयोग केल्यास कमी पाण्यात हि शेती पिकवता येते परंतु शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतो,
आज काल एक हजार फुटापर्यंत बोअर घेण्याचा नवा नाद अनेकांना लागला आहे मात्र आडातच नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार अशी स्थिती आहे,जमिनीतील पाणी पातळी कमालीची घटत चालली आहे अशा वेळी किती खोल खोदायच याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
शेती पूरक उद्योग धंदे फारसे होत नसल्याचं चित्र देखील प्रकर्षाने दिसून येत,फार फार तर दुधाचा धंदा दिसतो मात्र शेळी पालन ,कुक्कुट पालन,वराह पालन,खत बी बियाणांची दुकान असा व्यवसाय करताना शेतकरी दिसत नाहीत.बहुतांश ग्रामीण भागात लोक सकाळी तीन चार भाकरीचा मुडपा पाडून गाडीला किक मारून शहरात येतात तिथं येऊन एखाद्या नेत्याच्या माग पुढं फिरायचं,चार दोन कप चहा प्यायचा ,गावगप्पा मारायच्या ,फार तर तहसील किंवा कलेक्टर कचेरीत चक्कर मारायची अन दिवस मावळतीला गावाकडचा रस्ता धरायचा असा नित्यक्रम दिसतो,गावात गेल्यावरही शहरात काय झालं,दिल्लीत काय चालू आहे,सी एम च कस चुकलं यावर गप्पांचा फड रंगवायचा अन झोपायचं अस चित्र दिसत.
दिवस भरात हाच वेळ जर शेतात दिला तर काही चांगलं होऊ शकत मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असताना दिसत, आज ग्रामीण भागात कापूस वेचणी असो कि तण काढणी अथवा पीक कापणी यासाठी मजूर मिळत नाहीत,शहरातून मजूर न्यावे लागतात ,मनरेगा च्या कामावर हि मजूर मिळत नाहीत असे चित्र आहे,एकीकडे काम नाही म्हणून बोंब मारायची अन दुसरीकडे असलेल्या कामावर जायचं नाही अशी परिस्थिती दिसते,शेतीत जर वेळ दिला तर पोटापुरत पिकत अन कुटुंबाच भागत अस गणित आहे मात्र शेती परवडत नाही म्हणायचं अन काहीच न करता मरणाला कवटाळायच हे काही बरोबर नाही.
शेती हि परवडत नाही अस म्हणून नोकरीच्या मागे लागणारे अनेक जण दिसतात मात्र दहा पाच हजाराची चाकरी करण्यापेक्षा शेतीत कष्ट केले तर मालक बनता येत याची अनेक उदाहरण आहेत त्यांचा आदर्श सर्वांनी घेणं गरजेचं आहे.शेतकर्याच्या पोरानं शेतीच करावी असा काही नियम नाही हे मान्य आहे मात्र ती केली त्यात नवनवीन प्रयोग केले तर काही बिघडत नाही पण हे करणार कोण.
शेत मालाला योग्य भाव मिळत नाही हा देखील एक गहन विषय। आहे मात्र तो मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी मार्केटचा अभ्यास करून शेतीत ,तिच्या तंत्रात बदल करन अपेक्षित आहे,पण ते होताना दिसून येत नाही.कापूस आणि ऊस याशिवाय अनेक पीक आहेत मात्र त्याकडे कानाडोळा केला जातो.
एकंदरच काय तर शेतकरी आत्महत्या का करतो याकडे त्याने स्वतः देखील गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे,प्रत्येक गोष्ट सरकारच्या माथी मारायची अन मोकळं व्हायचं हे काही बरोबर नाही,थाटात लग्न करा,कर्ज काढून घर बांधा, कापूस अन ऊस च लावा,हजार हजार फूट बोअर खोदा, अस सरकार म्हणत नाही मग हे का करता ,जरा विचार करा जीवन हे अमूल्य आहे,एवढ्या सहज संपवू नका,पीक,पाणी,कुटुंब याच नियोजन करा,एवढंच सांगण आहे.

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...