रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

एका दर्शनाने देव म्हातारा होत नाही

गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा त्यांच्यानंतर खंडित होणार की सुरू राहणार हे खरं तर मागच्या वर्षीच स्पष्ट झालं आहे,दरवर्षी गडावर होणारा हा मेळावा गतवर्षी पायथ्यावर घ्यावा लागला मग पुन्हा या वर्षी त्याच विषयावर एवढा गहजब का केला जातोय हे न कळणारे आहे.पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री या दोघांनी आपल्या भूमिकेवर कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे मात्र त्यामुळे जणू काही खूप मोठं संकट कोसळणार आहे असं जे चित्र उभं केलं जातं आहे ते विनाकारण असल्याचं वाटत.एकवर्षी मेळावा घेतला नाही तर काही गड ओस पडणार नाही किंवा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये घट होणार नाही,त्यामुळे या विषयावर जो चर्चेचा फड रंगवला जात आहे तो  विनाकारण आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही.

महाराष्ट्राच्या मातीतून दिल्ली पाहणार नेतृत्व म्हणजे गोपीनाथ पांडुरंग मुंडे होय.प्रमोद महाजन यांच्या सोबत चळवळीतून पुढं आलेलं नेतृत्व म्हणून मुंडेंच नाव घेतलं जातं.संघर्ष जणू पाचवीलाच पूजल्यासारखे मुंडे शेवटपर्यंत लढत राहिले .राज्यात मुंडे यांनी आपल्या पाठीशी समाजाची मूठ बांधली ,त्यामध्ये त्यांना भगवान गडाची मोठी मदत झाली हे नाकारून चालणार नाही,मुंडे वर्षभर कुठेही असोत दरवर्षी दसरा मेळाव्याला ते न चुकता भगवान गडावर यायचे.मुंडे येणार म्हणून लाखोंच्या संख्येने समाजबांधव गडावर गर्दी करायचे,हा करिश्मा मुंडेंचा होता यात शंकाच नाही मात्र गडाच्या गादीचा देखील होता हे विसरता येणार नाही .मुंडे यांनी गडावरून आणीबाणीच्या राजकीय परिस्थिती मध्ये आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रत्येक वर्षी गडावरील दसरा मेळावा हा मुंडेंच्या भूमिकेमुळे चर्चेत असायचा,त्यांनी गडावर भुजबळापासून ते अगदी सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांना आणले.गडाचा आज जो विकास झाला आहे त्यात मुंडे यांच्या नावाचा मोठा वाटा आहे,मात्र त्याचवेळी गडाने देखील त्यांच्या मागे समाजाची जी ताकद उभी केली ती देखील दुर्लक्षित करून चालणार नाही.

मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देखील व्यस्त वेळेत त्यांनी गडाचे दर्शन घेतले त्यावेळीच त्यांनी यावेळी मला गडावरून पंकजा दिसते आहे असे सांगून यापुढे समाजाने पंकजा यांच्या पाठीशी रहावे हेच अप्रत्यक्षपणे सांगितले होते .त्यांच्या निधनानंतर नामदेवशास्त्री यांनी पंकजा याना गडाची लेक असल्याचं जाहीर केलं होतं तेव्हा समाजाने त्यांच जाहीर कौतुक केलं होतं,मात्र अवघ्या वर्षभराच्या काळात अस काय झालं की ज्यामुळे हीच लेक माहेरपणाला दुरावली गेली.पंकजा मुंडे आणि शास्त्री यांच्यात नेमकं काय घडलं हे आजही एक कोडंच आहे,कदाचित त्याला गोपीनाथ गडाची झालेली निर्मिती देखील कारणीभूत असेल कारण त्याच वेळी शास्त्री यांनी यापुढे भगवान गडावरून राजकीय भाष्य होणार नाही हे स्पष्ट केलं होतं,मग त्यानंतर ही गडावर मेळावा घेण्याचा अट्टहास पंकजा मुंडे यांनी का केला असेल,आणि लेक मेळावा घेणार आहे तर काय फरक पडतो असा विचार शास्त्रींनी का केला नसेल हे प्रश्न अनुत्तरित आहेत.खरंतर गडावर मेळावा घेतल्याने गडाची महती कमी होणार नव्हती किंवा पंकजा यांना त्याचा फार मोठा राजकीय फायदा होणार नव्हता,दरवर्षी सारखा हा कार्यक्रम होता मात्र नेमका कोणाचा इगो जागा झाला आणि मेळावा न घेण्याचा निर्णय घेतला गेला हे न कळणारे आहे.

गडाच्या गादीवर असणारे नामदेव शास्त्री हे न्यायाचार्य आहेत,त्यांनीच पंकजा ही गडाची लेक असल्याचे जाहीर केलं होतं असं असताना नेमकी माशी शिंकली कुठं ? पंकजा यांचा स्वभाव बघता त्यांनी शास्त्री बाबत काही वक्तव्य केले असेल तर हे चार भिंतीतले मतभेद बसून मिटवता आले असते मात्र ते चव्हाट्यावर आणून काय हाशील झाले तर काहीच नाही.

आज मेळावा होणार की नाही यावरून वादंग माजले आहे,मात्र नाही घेतला मेळावा तर काही बिघडणार आहे का,बरं मेळावा घेतल्यानंदेखील काही आगळंवेगळं घडण्याची शक्यता नाही मग का हा अट्टहास ,मेळावा घ्यायचा की नाही हा जसा पंकजा मुंडे यांचा प्रश्न आहे तसा तो गडावर घेऊ द्यायचा की नाही हा अधिकार आज तरी विश्वस्त यांचा आहे.मात्र या सगळ्यामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचा काही लोक  प्रयत्न करीत आहेत . मेळावा घ्यावा म्हणत काहींनी पंकजा यांच्या पुढे पुढे करण्याचा जो प्रयत्न चालविला आहे तो केविलवाणा असल्याचं दिसत आहे .मुंडे यांनी कोणाच्या सांगण्यावरून कधी मेळावा सुरू केला नव्हता,त्यांना समाजाची वज्रमुठ बांधायची होती,त्यासाठी गडावरील मेळावा हे निमित्त योग्य होत म्हणून त्यांनी मेळावा सुरू केला, आज मेळावा झाला तरच पंकजा यांच्या पाठीशी जनाधार कायम राहणार आहे अन्यथा त्यांचं नेतृत्व संपेल अशी परिस्थिती नाही मग का विनाकारण हे केलं जातंय.

पंकजा मुंडे यांचा राज्याच्या राजकारणात एक वेगळा दबदबा आहे,ग्रामविकास च्या माध्यमातून त्यांना राज्यातील जनतेचा विकास करण्याची मोठी संधी आहे,कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवले आहे,केवळ दसरा मेळावा त्या घेतात म्हणून त्यांच्यावर समाज प्रेम करतो,त्यांचं नेतृत्व मान्य करतो अस काही नाही.त्या गडावर आल्या नाहीत,मेळावा घेतला नाही तर सगळं काही संपणार आहे असंही नाही.

त्या गडावर आल्या नाहीत तर गड ओस पडेल असंही काही नाही,गडावर लोक भगवान बाबा यांच्या समाधीच्या दर्शनाला येतात,शास्त्री हे गडाचे महंत आहेत त्यामुळे त्यांना लोक सन्मान देतात याचा अर्थ तर गडावरून पायउतार झाले तर गडावर भक्त येणार नाहीत असाही काही नाही.हे सगळं समजत असतानादेखील आज वाद घातला जात आहे.

मेळावा भगवान गडावर घेतला तरच समाजाला संदेश देता येतो अस काही नाही,पंकजा मुंडे यांनी त्यांच्या संकल्पनेतून गोपीनाथ गडाचा जी वेगळी ओळख निर्माण केली आहे  ती पाहता मेळाव्यासाठी आज तरी त्यांना भगवान गडाची गरज आहे असे वाटत नाही.गोपीनाथ मुंडे यांनी आपली हयात समाजाच्या उत्थानासाठी घालवली मग हा समाज भगवान गडावर एकत्र आला काय अन गोपीनाथ गडावर एकत्र आला काय काहीच फरक पडत नाही. खरंतर गोपीनाथ गड हा मेळावा,सभा ,संमेलन यासाठी योग्य आहे .लोकभावना विचारात घेता आज पंकजा यांचं नेतृत्व एवढं मोठं नक्कीच आहे की त्यांनी आदेश दिला तर समाज खडकावर देखील एकत्र येऊ शकतो .
तरीदेखील हा वाद वाढवून त्या आपल्याच नेतृत्वाविषयी संभ्रम निर्माण करीत आहेत .एका वर्षी नाही घेतला मेळावा तर समाजात त्यांची प्रतिष्ठा कमी होईल अशी परिस्थिती नक्कीच नाही .मात्र हे त्यांना अधिकार वाणीने सांगणार कोणीच नाही.वडिलांच्या मागे आपणच समाजाची माता असल्याचं त्यांनी मागच्या वेळी पायथ्याच्या मेळाव्यात स्पष्ट केलं होतं,त्यामुळे मातेला कोण सांगणार,बाप म्हणणारे शास्त्री आज लेकीला माहेरी मेळावा घेण्यापासून  रोखत आहेत अशा वेळी दुसरं कोणी पंकजा यांना सांगेल अशी स्थिती नाही अन शास्त्री हे तर स्वतःच न्यायाचार्य असल्याने त्यांना कोण बोलणार तेव्हा सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेवून पंकजा यांनीच दोन पावलं मागे आल्यास त्यांना त्याचा फायदा होईल असं दिसतं कारण राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते हे त्यांनी लक्षात घ्यावे .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...