बुधवार, १३ जून, २०१८

जादूच्या कांडीने विरोधकांची दांडी गुल



जादूच्या कांडीने उडवली भल्या भल्यांची दांडी

 पुरेसे संख्याबळ नसतानाही विजय मिळवणे किंवा सत्ता ताब्यात घेणे हा नवीन पॅटर्न अलीकडच्या काळात भाजपने रूढ केला आहे,देशपातळीवर मोदी शहा यांची जोडगोळी यापद्धतीने काम करीत असताना महाराष्ट्रात विशेषतः विधान परिषदेच्या लातूर बीड उस्मानाबाद मतदार संघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील याच पद्धतीने करिष्मा करून दाखवला आहे,जादूची कांडी ही फक्त गोपीनाथ मुंडे यांच्याकडेच होती,त्यांच्यानंतर या कांडीचा प्रभाव ओसरला आहे ही चर्चा पंकजा मुंडे यांनी खोटी ठरवली आहे.पंकजा यांच्या जादूच्या कांडीचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की यामुळे विरोधकांची दांडी गुल झाली . अवघे 370 मत भाजप सेनेकडे असताना सुरेश धस यांनी 527 मत घेवुन विरोधकांच्या हातातील विजय खेचून आणला . या विजयामुळे पंकजा मुंडे यांच्या बेरजेच्या राजकारणाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही .

देशात कोठेही निवडणूक असली की ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अग्निपरीक्षा असल्याचे चित्र रंगवले जाते हा गेल्या चार वर्षातील अनुभव आहे,या अनुभवातून तावून सुलाखून निघत मोदी यांनी तब्बल 15 राज्यात भाजपचा झेंडा रोवला तरीदेखील विरोधक आणि मीडिया प्रत्येकवेळी त्यांची अग्निपरीक्षा असल्याचे सांगून लढत लक्षवेधी करतो .याच पद्धतीने मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत असो की विधानपरिषदेची निवडणूक प्रत्येक वेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागते किंवा तसे चित्र निर्माण केले जाते .अशावेळी कधी धनंजय मुंडे तर कधी पंकजा मुंडे सरस ठरतात.जिल्हा परिषद, नगर पालिकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदार संघात धनंजय मुंडे यांनी सफाया केल्यानंतर पंकजा यांच्या राजकीय कारकीर्दीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते,मात्र एका दर्शनाने देव म्हातारा होत नाही त्याप्रमाणे एक दोन पराभव झाल्याने आपण खचून जाणार नाही हेच पंकजा यांनी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिले आहे .

21 मे रोजी राज्यातील सहा विधानपरिषदे च्या जागांसाठी मतदान झाले मात्र सगळ्यांचे लक्ष मराठवाड्यातील लातूर बीड उस्मानाबाद या मतदार संघाच्या निकालाकडे लागले होते,कारण सुरवातीपासूनच ही निवडणूक नाट्यमय घडामोडीमुळे चर्चेत होती .पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ रमेश कराड यांना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी जोरदार धक्का दिला होता,मात्र कराड यांच्या माघारीमुळे धनंजय यांनाच धक्का बसला,कराड यांच्या माघारीसाठी भाजप आणि विशेषतः पंकजा मुंडे यांना जबाबदार धरले गेले,वास्तव कराड यांनाच माहीत.मात्र कराडांची माघार हा पंकजा यांच्या धूर्त राजकारणाचा मास्टरस्ट्रोक ठरल्याची चर्चा झाली.

भाजपकडे या मतदार संघात केवळ 370 एवढे अत्यल्प संख्याबळ होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीच्या हक्काच्या जागेवर पाणी सोडत  लातूर बीड उस्मानाबाद मध्ये जोर लावला,रमेश कराड यांनी ऐनवेळी धोका दिल्यानंतर अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली .राष्ट्रवादीच्या मराठवाड्यातील नेत्यांना एवढा आत्मविश्वास होता की त्यांनी पक्षाच्या ए बी फॉर्म वर दुसऱ्या उमेदवाराचे नाव सुद्धा टाकले नाही .

कराड यांनी दिलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत सावरली नाही हेच निकालानंतर स्पष्ट झाले .तब्बल 550 पेक्षा अधिक मतदान हातात असताना राष्ट्रवादीला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला तर भाजपने संख्याबळ नसतानाही योग्य नियोजन,मतदारांशी थेट संपर्क यावर भर देत विजय खेचुन आणला .

ट्वेन्टी ट्वेन्टी असो की वल्ड कप ची फायनल प्रत्येकवेळी कुल माईंडणे  खेळून विजय खेचून आणणाऱ्या महेंद्रसिंग धोनी प्रमाणे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी याठिकाणी थंड डोक्याने मेहनत घेत विजय मिळवला . या निवडणुकीची तयारी भाजपने वर्षभरा पासूनच सुरू केली होती,जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेश धस यांनी भाजपला उघडपणे मदत केल्यानंतर स्पष्ट झाले होते की पंकजा मुंडे या धस यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांना विधानपरिषदेची संधी देणार म्हणून,मुख्यमंत्र्यांनी देखील तसा ग्रीन सिग्नल त्यावेळीच दिला होता,त्यामुळे धस कामाला लागले होते,तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे हे सहा आठ महिन्यापासून मेहनत घेत असताना ऐनवेळी कराड यांना आयात करून राष्ट्रवादीने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला होता,हे कराड यांच्या माघारीने अधिकच स्पष्टपणे अधोरेखित झाले .
समोर शत्रू पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेला असताना सेनापतीनेच पळ काढल्यानंतर काय अवस्था होते तशी काहीशी परिस्थिती कराड  यांच्या माघारीनंतर राष्ट्रवादीची झाली होती.मात्र तरीदेखील जगदाळे यांच्या पाठीशी राष्ट्रवादीने ताकद लावली पण मित्रपक्षाने हात दिला आणि सहज वाटणारा विजय पराभवाच्या रुपात पदरात पडला .

या निकालाने अनेकांचा हिशोब चुकता झाला आहे,पंकजा मुंडे या केवळ स्वतःपुरते राजकारण करतात,त्या अद्याप परिपक्व राजकारणी झालेल्या नाहीत,उथळ राजकारणाने त्यांना जी प ,प स,न प मध्ये फटका बसला आहे,त्यांचा फटकळ स्वभाव त्यांच्या राजकारणाचा घात करणार या सर्व चर्चांना या विजयाने पूर्णविराम मिळाला आहे .

गेल्या अनेक वर्षांपासून या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे,मात्र 2014 नंतर पंकजा मुंडे असोत की संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भाजपची ताकद वाढली होती,लातूर महापालिका असो की जिल्हा परिषद अथवा बीड जिल्हा परिषद प्रत्येक ठिकाणी भाजपने यश मिळवले होते त्यामुळेच भाजपने या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आणि विजय मिळवून दाखवला .

राजकारणामध्ये कोणीच कायमचा शत्रू नसतो हे स्व गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे,विलासराव देशमुख असोत की जयदत्त क्षीरसागर यांच्याशी मुंडे साहेबाचे असलेले संबंध सर्वश्रुत होते,मात्र त्यांच्या नंतर पंकजा मुंडे यांनी सुरवातीच्या काळात जे राजकारण केले त्यामुळे त्यांना बेरजेचे राजकारण जमत नाही अशी चर्चा सुरू झाली,मोठ्या विजयासाठी प्रसंगी दोन पावलं मागं सरकाव लागतं हे त्यांना माहीतच नाही की काय,मुंडे साहेबांचे हे गुण त्यांनी कसे काय घेतले नाही अशा चर्चा रंगल्या होत्या ,परंतु या निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाबरोबरच राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील नेत्यांना ज्या पद्धतीने हँडल केले ते भविष्यातील त्यांच्या राजकीय वाटचालीची झलक दाखवून गेले .शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे सूत्र त्यांनी आत्मसात केले आणि विजय मिळवला .

भाजपचे संख्याबळ पाहिल्यास कोणालाही येथे भाजप यश मिळवेल असे स्वप्नातही वाटले नसते मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील नाराजांची मोट बांधण्यात पंकजा मुंडे यशस्वी ठरल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बीड आणि लातूर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंदित केले तर पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी उस्मानाबादला टार्गेट केले,जगदाळे हे उस्मानाबाद चे असल्याने या भागातील नाराजांची संख्या मोठी होती,त्यातच राष्ट्रवादी मधील बेबनाव भाजपच्या पथ्यावर पडला .तब्बल 20 ते 22 दिवस धस हे स्वतः यंत्रणा हातात घेऊन लढत होते तर जगदाळे यांची मदार त्या त्या भागातील नेत्यांवर होती .

आपल्या हक्काची जागा राष्ट्रवादीने घेतली ही काँग्रेसची नाराजी आणि आपल्या ताटात आणखी एक वाटेकरी नको ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची मानसिकता याचा अचूक फायदा पंकजा मुंडे यांनी घेतला .कोणाला कोठे कसे ऍडजस्ट करायचे,कोणाला भविष्यातील मदतीचा शब्द द्यायचा,कोणाच्या दुखऱ्या बाजूवर दाब द्यायचा हे अगदी कसलेल्या राजकारण्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनी केले त्यामुळे यशाने त्यांच्यापुढे लोटांगण घातले . युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असत अस म्हणतात त्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीत सगळी अस्त्र अचूकपणे वापरली.पंधरा वीस दिवस मतदारांच्या, त्यांच्या नेत्यांच्या,नाराजांच्या , मतदारांच्या मुकादमांच्या  भेटी गाठी घेऊन त्यांनी विजयाला गवसणी घातली,दुसरीकडे धनंजय मुंडे हे एकाकी पडल्याचे चित्र दिसून आले,पक्षाच्या बड्या नेत्यांनी या निवडणुकीकडे फारसे लक्ष दिले नाही असे दिसून आले.नाही म्हणायला स्वतः शरद पवार यांनी स्वपक्षासाहित काँग्रेसच्याही अनेक नेत्यांना संपर्क केला मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता .

या निडणूकीकडे विधानसभेची लिटमस टेस्ट म्हणून देखील पाहिले गेले मात्र आज तरी तसे म्हणणे धाडसाचे होईल,कारण हजार मताची निवडणूक आणि लाखो मतांची निवडणूक यात निश्चितच फरक आहे परंतु  या निकालाने पंकजा मुंडे यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढण्यास मदत झाली आहे तर धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होणार हे अघोरखीत झाले आहे .

धस होते म्हणूनच विजय सोपा झाला

या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ पाहता सुरेश धस यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार असता तर कदाचित निकाल उलटा लागला असता कारण धस हे वीस पंचवीस वर्षांपासून राजकारणात आहेत,त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आलेले आहेत,राज्यमंत्री पदाच्या काळात अनेकांना अंधारातून तर काहींना उघडपणे मदत केलेली आहे,कोण कोणाचा नातेवाईक,कोणाला काय पाहिजे,कोणाला कोणी बोलल्यास फायदा होईल या सगळ्या गोष्टींचा होमवर्क धस यांचा पक्का होता .त्याच बरोबर अनेकांच्या अपेक्षा,आकांशा काय आहेत आणि त्या कशा पद्धतीने पूर्ण कराव्या लागतात हे धस यांना सांगण्याची गरज नव्हती,धनंजय मुंडे हे कोणती चाल खेळतील आणि त्याला कशा पद्धतीने मात द्यायची हे धस यांना चांगलेच माहीत होते त्यामुळे भाजपला हा विजय सोपा गेला .

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...