सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

गुजरातच्या निकालाचा अन्वयार्थ

काँग्रेस को हरा दिया,बीजेपी को डरा दिया !


केंद्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर तब्बल सतरा राज्य पादाक्रांत करणार्‍या भाजपच्या उधळलेल्या वारूला काही प्रमाणात वेसण घालण्याचं काम राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने गुजरातमध्ये केलं. गुजरातच्या निवडणूकीत मोठ्या फरकानं भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्ता राखेल असा राजकीय धुरीणांचा अंदाज सपशेल खोटा ठरवत मतदारांनी मोदींना देखिल जास्त हवेत उडू नका, जमिनीवर चाला असा इशाराच दिला आहे. 2012 च्या तुलनते तब्बल 16 जागा भाजपच्या कमी झाल्या आणि 99 जागांवर भाजपला समाधान मानावे लागले तर कॉंग्रेस 61 जागांवरून 80 जागांपर्यंत जावून पोहचली. 2012 पासून तब्बल 27 राज्यात पराभवाचे तोंड पहावे लागलेल्या राहुल गांधी यांच्या पदरी गुजरात आणि हिमाचलमध्ये देखिल पुन्हा एकदा निराशाच आली. मात्र गुजरातच्या निकालाने राहुल काठावर का होईना पास झाले असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तर दुसरीकडे मोदींच मेरीट मात्र हुकलं हे देखिल तितकच खर आहे. एका वाक्यात या निकालाच विश्लेषण करायचं झाल्यास मतदारांनी "काँग्रेस को हरा दिया,भाजपा को डरा दिया "असच म्हणावं लागेल .

स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात तब्बल 60 वर्षापेक्षा अधिक काळ कॉंग्रेसने एक हाती सत्ता राखल्याचा इतिहास आहे. अट्टल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सहा-साडेसहा वर्षाचा काळ आणि देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल आणि चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील तीन-साडेतीन वर्षाचा काळ सोडला तर कॉंग्रेसला पराभूत करण्याची किमया कोणीच दाखवली नाही. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र दामोधरदास मोदी नावाच्या व्यक्तीचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला आणि त्याने कॉंग्रेसच्या सुर्याला ग्रहण लावत कॉंग्रेसी सत्तेचा अस्त केला. ज्या भाजपच्या कधीकाळी देशात केवळ दोन जागा निवडूण आल्या होत्या त्या भाजपने 2014 च्या निवडणूकीत 282 जागांपर्यंत मजल मारत एनडीएच्या माध्यमातून 300 चा टप्पा पार करत देशात कॉंग्रेसला नेस्तनाबुत केलं. कॉंग्रेसची अवस्था एवढी केवीलवाणी झाली की, विरोधी पक्षासाठी लागणारं 10 टक्के संख्याबळा एवढा आकडा देखिल कॉंग्रेसला गाठता आला नाही. 2014 च्या धक्क्यातून कॉंग्रेस तीन वर्ष झाले तरी देखिल सावरलेली नाही.
लोकसभा निवडणूकीतील अभुतपुर्व यशानंतर भाजपचा अश्वमेध चौखूर उधळला आणि पाहता-पाहता केवळ पाच राज्यात सत्ता असलेल्या भाजपने तब्बल 14 राज्य पादाक्रांत करत 19 राज्यांमध्ये आपला सत्तेचा झेंडा रोवला. जम्मु काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत कॉंग्रेसमुक्त भारत हा नरेंद्र मोदी यांनी दिलेला नारा गेल्या तीन वर्षात भाजपच्या कार्यकर्त्यांनी खरा करण्यासाठी रात्रीचा दिवस केला. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, जम्मु काश्मिर, बिहार, उत्तरप्रदेश यासारख्या मोठ-मोठ्या राज्यांमधून कॉंग्रेसला घरचा रस्ता दाखवत भाजपने आपले बस्तान बसवले. आज 29 पैकी 19 राज्यात भाजप आणि एनडीएची सत्ता आहे तर कॉंग्रेसच्या ताब्यात केवळ 4 राज्य शिल्लक राहिलेले आहेत.
अशा परिस्थितीत देशातील जनतेच्या नजरा या गुजरात निवडणूकीकडे लागल्या होत्या. तब्बल 22 वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपला यंदा फटका बसणार का? नोटाबंदी आणि जीएसटीमुळे वैतागलेली जनता कॉंग्रेसच्या हाताला साथ देणार का?, गुजरातमध्ये यश मिळवून कॉंग्रेस 2019 च्या दृष्टीने वाटचाल सुरू करणार का? असे प्रश्न निवडणूकी दरम्यान उपस्थित होत होते. तीन महिने अगोदर गुजरातमध्ये प्रचाराला सुरूवात करून कधी नव्हे ते राहुल गांधी यांनी ही निवडणूक सिरअस घेतल्याचे दाखविले. पाटीदार आंदोलनाचा मुद्दा असो की बेरोजगारी अथवा विकास गांडो थयो च्छे असं म्हणत मोदींना टार्गेट करण्याची एकही संधी राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने सोडली नाही. गुजरातच्या रणसंग्रामामध्ये राहुल यांनी तब्बल 115 पेक्षा जास्त सभा घेतल्या. अगदी प्रत्येक मंदिराच्या उंबर्‍यावर डोकं टेकवत आपण हिंदु असल्याचा दावाही त्यांनी केला. अगदी जाणवे घालायलाही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यामुळे यावेळी गुजरातमध्ये नक्कीच परिवर्तन होणार आणि कॉंग्रेसला अच्छे दिन येणार अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती .मात्र राहुल यांनी हे सगळं करताना ज्या हार्दिक पटेल नावाच्या 23 वर्षीय पोराला साथीला घेतलं त्याचा म्हणावा तेवढा फायदा राहुल यांना झालाच नाही,त्याच बरोबर जिग्नेश आणि अलपेश ठाकूर यांच्या मागेही लोक मोठ्या प्रमाणात न आल्याने काँग्रेस ला म्हणावा तेवढा लाभ झाला नाही .

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 36 सभा घेवून कॉंग्रेसच्या प्रचारातील हवा काढून घेत भाजपचे कमळ पुन्हा एकदा गुजरातमध्ये कसे फुलेल यासाठी प्रयत्न केले. आणि त्याचा परिणाम म्हणून 22 वर्षानंतर पुन्हा एकदा जनतेने मोदींच्या हातात सत्तेचे सुत्र सोपवली. राजकीयदृष्ट्या भाजपने गुजरात आपल्याकडे राखली असली तरी नैतिकदृष्ट्या मात्र भाजपचा पराभवच झाला असेच म्हणावे लागेल. कारण ज्या गुजरात मॉडेलच्या नावाखाली मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडूकीत आणि त्यानंतर झालेल्या प्रत्येक राज्याच्या निवडणूकीत भाजपला बहुमताकडे नेले. त्याच गुजरातमध्ये त्यांना पुन्हा सत्ता आपल्याकडेच राखण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपचे जणू सिझर झाले असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही.
भाजपच्या या विजयानंतरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नरेंद्र मोदी यांचा एक कलमी कार्यक्रम सहकारी मंत्र्यांना विचारा न घेण्याचा उद्योग, मोठ-मोठ्या घोषणा, नोटबंदी आणि जीएसटी सारखे जनतेच्या माथी लादलेले निर्णय आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मतदारांना गृहीत धरण्याचा उद्योग कसा अंगाशी येवू शकतो हेच गुजरातच्या आकड्यावरून स्पष्ट झाले आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी तसेच सर्वसामान्य माणूस भरडला गेला हे भाजपचे कार्यकर्ते देखिल खाजगीत मान्य करतात. मात्र बोलायला कोणीच तयार नव्हते. गुजरातच्या जनतेने मोदींना मतपेटीतून याचा जवाब दिला आहे. दुसरीकडे सतत 27 निवडणूकांमध्ये पराभवाचे तोंड पाहणार्‍या राहुल यांच्या नेतृत्वाला थोड्या फार प्रमाणात साथ देण्याचा प्रयत्नही जनतेने गुजरातच्या माध्यमातून केला आहे. 2012 च्या निवडणूकीत  61 जागा असणार्‍या कॉंग्रेस यंदा 80 पर्यंत मजल मारता आली. याचाच अर्थ पप्पू पास हो गया असा लावल्यास वावगे ठरणार नाही. दुसरीकडे 115 वरून 99 वर का यावे लागले याचा विचारही जर मोदींनी केला तर आणि तरच 2019 ला पुन्हा एकदा निर्भेळ यश भाजपला मिळू शकेल असे वाटते.

लक्ष्मीकांत रुईकर,बीड .

सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

संघर्षयोध्याची वारसदार !

संघर्षयोध्याची वारसदार !


बीड सारख्या मागासलेल्या जिल्ह्यातून ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करीत दिल्लीच्या तख्ताला गवसणी घालण्याची ताकद ठेवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यात कायम संघर्ष करावा लागला,त्यांच्या नंतर त्यांचा राजकीयच नव्हे तर संघर्षाचा वारसा देखील पंकजा मुंडे यांच्या वाट्याला आल्याचे मागील तीन वर्षात दिसून आले आणि त्यांनी या संघर्षाला धीरोदत्तपणे तोंड दिल्याचं देखील वेळोवेळी दिसून आलं,वैद्यनाथ कारखान्यावर घडलेल्या दुर्घटनेनंतर देखील हेच प्रकर्षाने दिसलं.पंकजा मुंडे यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना खंबीरपणे आधार देऊन मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला. रुके ना तू थके ना तू,संघर्ष के आगे झुके ना तू हा मूलमंत्रच जणू गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा यांना दिल्याचं वेळोवेळी  त्यांनी दाखवून दिलं आहे हे नक्की .आज मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त त्यांच्यातील नेतृत्व गुणांची चुणूक जागोजागी पंकजा यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येते हे ही तितकच खरं आहे.मुंडेंची ही कन्या साहेबांच्या नावाचा जनतेला विसर पडू देणार नाही याची पुन्हा एकदा खात्री या निमित्ताने पटली हे कोणीच नाकारू शकणार नाही .

मराठवाड्यासारख्या मागास भागातून राजकीय पटलावर अनेक दिग्गज नेते पुढे आले,स्व शंकरराव चव्हाण असोत की प्रमोद महाजन अथवा विलासराव देशमुख या नेत्यांच्या तोडीसतोड नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली ती गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांनी .बीड जिल्ह्यातील परळी सारख्या भागात जन्मलेल्या या माणसाने महाविद्यालयीन काळापासूनच संघर्षाला सुरवात केली,आणीबाणीचा प्रसंग असो की इतर कोणतेही आंदोलन गोपीनाथ मुंडे यांनी त्यात हिरीरीने सहभाग घेतला,पुण्यात शिक्षण घेत असताना ते प्रमोद महाजन आणि विलासराव देशमुख यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी राजकारणाची वाट धरली .चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत उनेपुरे साडेचार वर्ष सत्ताधारी म्हणून त्यांच्या वाट्याला आले मात्र या काळात मेन गेट टू रामटेक ही ओळख त्यांनी निर्माण केली .गृहमंत्री पदाचा दरारा काय असतो हे मुंडेंनी दाखवून दिलं .कायम दिन दलीत ,पीडित ,उपेक्षित लोकांसाठी झगडणाऱ्या या माणसाने लोकांचं प्रेम कमावलं आणि माणसं कमावली,जीवाला जीव देणारे लोक निर्माण केले जे आजही त्यांच्या माघारी पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,त्यामुळेच त्यांच्या निधनांनातर वाट्याला आलेल्या संघर्षात पंकजा मुंडे यांना दहा हत्तीचं बळ मिळालं .

गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाचे दुःख बाजूला सारून पंकजा यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून काढला,भाजप च सरकार येण्यामध्ये पंकजा यांचा वाटाही मोठा आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही .गोपीनाथ मुंडे यांनी 1995 मध्ये संघर्षयात्रा काढली होती,त्याच पद्धतीने पंकजा यांनी 2014 साली संघर्षयात्रा काढून उपेक्षितांचा आवाज बुलंद केला .

सत्तेत आल्यानंतर त्यांनी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातुन ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा कसोशीने प्रयत्न केला .मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असो की जलयुक्त शिवार सारखी योजना,सामान्य माणसाला थेट सत्तेचा लाभ मिळावा म्हणून पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केला आणि त्यात त्यांना मोठे यशही मिळाले .

गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न असणारा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना त्यांच्या अकाली निधनानंतर पोरका झाला होता मात्र पंकजा यांनी दोन वर्षांपासून बंद असणारा हा कारखाना या वर्षी मोठ्या हिमतीने सुरू केला,महिनाभरात जवळपास एक लाख साखर पोत्यांचे उत्पादन करण्यात आले होते मात्र अचानक काळाने घाला घातला आणि कारखान्यात झालेल्या अपघाताने पाच कामगारांचा बळी गेला .एकीकडे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना हा आघात झाल्याने पंकजा या मोडून पडल्या,मात्र घरावर संकट कोसळले तर कर्त्या माणसाने हतबल व्हायचं नसतं हे पंकजा यांनी दाखवून दिलं .या मोठ्या अपघातानंतर अवघ्या काही तासात पंकजा मुंडे यांनी लातूर आणि अंबाजोगाई येथे जाऊन जखमींची भेट घेतली तसेच घटनेत मृत पावलेल्या लोकांच्या घरी जाऊन सांत्वन करीत मोठा आधार दिला .ज्यावेळी पंकजा मुंडे यांनी लातूर येथे जाऊन जखमींची नातेवाईकांची भेट घेतली तेव्हा त्या लोकांना जणू देवदूतच आपल्या मदतीला आल्याची भावना निर्माण झाली.अनेक महिलांनी त्यांना ही भावना बोलून देखील दाखवली .ताई तुम्ही आलात आता सगळं व्यवस्थित होईल,तुम्ही काळजी करू नका ,आमच्या घरात जर अशी घटना घडली असती तर आम्ही काय केलं असत,तुमचा यात काहीच दोष नाही असं म्हणून अनेक माता भगिनींनी पंकजा यांनाच आधार देण्याचा प्रयत्न केला .या आधारावरच अवघ्या काही तासात त्यांनी परिस्थिती यशस्वीपणे हाताळत या अपघातात सापडलेल्या लोकांना आधार देत त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला .घरातील कर्ता माणूस गमावण्याचे दुःख काय असते हे त्या अजून विसरलेल्या नाहीत त्यामुळे त्यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या पाठीवर हात ठेवत घाबरू नका सगळं व्यवस्थित होईल असा विश्वास दिला .

एवढा मोठा आघात झाल्यानंतर कितीही हिम्मतवान पुरुष असता तरी तो खचला असता मात्र पंकजा मुंडे यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती त्यांच्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच रक्त आहे याची साक्ष देते. राजकीय संघर्ष तर पाचवीलाच पुजलेला असताना अचानक येणाऱ्या अशा संकटांना देखील खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे हेच त्यांनी दाखवून दिले आहे .

गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारावेळी प्रक्षुब्ध झालेल्या जमावाला मुंडे साहेबांची शपथ घालून शांत करणाऱ्या या बहाद्दर मुलीनं त्यांच्या नंतर देखील समाजाला सातत्यानं आपल्या पंखाखाली घेतल्याचं दाखवून दिलं आहे .राजकीय माणसाच्या आयुष्यात चढउतार हे नेहमीच येत असतात मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आघात झाल्यानंतर ही त्यातून समाजासाठी सगळं विसरून उभं राहणं यालाच कदाचित संघर्षयोद्धा म्हणत असावेत .आज गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने पंकजा मुंडे याच सक्षमपणे चालवू शकतात हेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...