सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

संघर्षयोध्याची वारसदार !

संघर्षयोध्याची वारसदार !


बीड सारख्या मागासलेल्या जिल्ह्यातून ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करीत दिल्लीच्या तख्ताला गवसणी घालण्याची ताकद ठेवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यात कायम संघर्ष करावा लागला,त्यांच्या नंतर त्यांचा राजकीयच नव्हे तर संघर्षाचा वारसा देखील पंकजा मुंडे यांच्या वाट्याला आल्याचे मागील तीन वर्षात दिसून आले आणि त्यांनी या संघर्षाला धीरोदत्तपणे तोंड दिल्याचं देखील वेळोवेळी दिसून आलं,वैद्यनाथ कारखान्यावर घडलेल्या दुर्घटनेनंतर देखील हेच प्रकर्षाने दिसलं.पंकजा मुंडे यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना खंबीरपणे आधार देऊन मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला. रुके ना तू थके ना तू,संघर्ष के आगे झुके ना तू हा मूलमंत्रच जणू गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा यांना दिल्याचं वेळोवेळी  त्यांनी दाखवून दिलं आहे हे नक्की .आज मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त त्यांच्यातील नेतृत्व गुणांची चुणूक जागोजागी पंकजा यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येते हे ही तितकच खरं आहे.मुंडेंची ही कन्या साहेबांच्या नावाचा जनतेला विसर पडू देणार नाही याची पुन्हा एकदा खात्री या निमित्ताने पटली हे कोणीच नाकारू शकणार नाही .

मराठवाड्यासारख्या मागास भागातून राजकीय पटलावर अनेक दिग्गज नेते पुढे आले,स्व शंकरराव चव्हाण असोत की प्रमोद महाजन अथवा विलासराव देशमुख या नेत्यांच्या तोडीसतोड नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली ती गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांनी .बीड जिल्ह्यातील परळी सारख्या भागात जन्मलेल्या या माणसाने महाविद्यालयीन काळापासूनच संघर्षाला सुरवात केली,आणीबाणीचा प्रसंग असो की इतर कोणतेही आंदोलन गोपीनाथ मुंडे यांनी त्यात हिरीरीने सहभाग घेतला,पुण्यात शिक्षण घेत असताना ते प्रमोद महाजन आणि विलासराव देशमुख यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी राजकारणाची वाट धरली .चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत उनेपुरे साडेचार वर्ष सत्ताधारी म्हणून त्यांच्या वाट्याला आले मात्र या काळात मेन गेट टू रामटेक ही ओळख त्यांनी निर्माण केली .गृहमंत्री पदाचा दरारा काय असतो हे मुंडेंनी दाखवून दिलं .कायम दिन दलीत ,पीडित ,उपेक्षित लोकांसाठी झगडणाऱ्या या माणसाने लोकांचं प्रेम कमावलं आणि माणसं कमावली,जीवाला जीव देणारे लोक निर्माण केले जे आजही त्यांच्या माघारी पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,त्यामुळेच त्यांच्या निधनांनातर वाट्याला आलेल्या संघर्षात पंकजा मुंडे यांना दहा हत्तीचं बळ मिळालं .

गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाचे दुःख बाजूला सारून पंकजा यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून काढला,भाजप च सरकार येण्यामध्ये पंकजा यांचा वाटाही मोठा आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही .गोपीनाथ मुंडे यांनी 1995 मध्ये संघर्षयात्रा काढली होती,त्याच पद्धतीने पंकजा यांनी 2014 साली संघर्षयात्रा काढून उपेक्षितांचा आवाज बुलंद केला .

सत्तेत आल्यानंतर त्यांनी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातुन ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा कसोशीने प्रयत्न केला .मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असो की जलयुक्त शिवार सारखी योजना,सामान्य माणसाला थेट सत्तेचा लाभ मिळावा म्हणून पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केला आणि त्यात त्यांना मोठे यशही मिळाले .

गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न असणारा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना त्यांच्या अकाली निधनानंतर पोरका झाला होता मात्र पंकजा यांनी दोन वर्षांपासून बंद असणारा हा कारखाना या वर्षी मोठ्या हिमतीने सुरू केला,महिनाभरात जवळपास एक लाख साखर पोत्यांचे उत्पादन करण्यात आले होते मात्र अचानक काळाने घाला घातला आणि कारखान्यात झालेल्या अपघाताने पाच कामगारांचा बळी गेला .एकीकडे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना हा आघात झाल्याने पंकजा या मोडून पडल्या,मात्र घरावर संकट कोसळले तर कर्त्या माणसाने हतबल व्हायचं नसतं हे पंकजा यांनी दाखवून दिलं .या मोठ्या अपघातानंतर अवघ्या काही तासात पंकजा मुंडे यांनी लातूर आणि अंबाजोगाई येथे जाऊन जखमींची भेट घेतली तसेच घटनेत मृत पावलेल्या लोकांच्या घरी जाऊन सांत्वन करीत मोठा आधार दिला .ज्यावेळी पंकजा मुंडे यांनी लातूर येथे जाऊन जखमींची नातेवाईकांची भेट घेतली तेव्हा त्या लोकांना जणू देवदूतच आपल्या मदतीला आल्याची भावना निर्माण झाली.अनेक महिलांनी त्यांना ही भावना बोलून देखील दाखवली .ताई तुम्ही आलात आता सगळं व्यवस्थित होईल,तुम्ही काळजी करू नका ,आमच्या घरात जर अशी घटना घडली असती तर आम्ही काय केलं असत,तुमचा यात काहीच दोष नाही असं म्हणून अनेक माता भगिनींनी पंकजा यांनाच आधार देण्याचा प्रयत्न केला .या आधारावरच अवघ्या काही तासात त्यांनी परिस्थिती यशस्वीपणे हाताळत या अपघातात सापडलेल्या लोकांना आधार देत त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला .घरातील कर्ता माणूस गमावण्याचे दुःख काय असते हे त्या अजून विसरलेल्या नाहीत त्यामुळे त्यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या पाठीवर हात ठेवत घाबरू नका सगळं व्यवस्थित होईल असा विश्वास दिला .

एवढा मोठा आघात झाल्यानंतर कितीही हिम्मतवान पुरुष असता तरी तो खचला असता मात्र पंकजा मुंडे यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती त्यांच्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच रक्त आहे याची साक्ष देते. राजकीय संघर्ष तर पाचवीलाच पुजलेला असताना अचानक येणाऱ्या अशा संकटांना देखील खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे हेच त्यांनी दाखवून दिले आहे .

गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारावेळी प्रक्षुब्ध झालेल्या जमावाला मुंडे साहेबांची शपथ घालून शांत करणाऱ्या या बहाद्दर मुलीनं त्यांच्या नंतर देखील समाजाला सातत्यानं आपल्या पंखाखाली घेतल्याचं दाखवून दिलं आहे .राजकीय माणसाच्या आयुष्यात चढउतार हे नेहमीच येत असतात मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आघात झाल्यानंतर ही त्यातून समाजासाठी सगळं विसरून उभं राहणं यालाच कदाचित संघर्षयोद्धा म्हणत असावेत .आज गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने पंकजा मुंडे याच सक्षमपणे चालवू शकतात हेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...