बांगडीचं दुःख.....................!
रस्त्याने चालताना टचकन आवाज झाला अन माझी विचारांची तंद्री अचानक विस्कळीत झाली,पायाखाली काय आलं म्हणून पाहावं म्हटलं तर एक फुटकी बांगडी दिसली,चार पाच ठिकाणी तूटली होती बिचारी,का कोण जाणे पण आतून एक आवाज आल्यासारखा झाला अन तुटलेली,पिचलेली ती बांगडी मी सहज उचलून हातात घेतली,तिला मी स्पर्श करताना माझं मलाच काहीतरी विचित्र होत असल्याची जाणीव झाली ,कदाचित ती अंग चोरते आहे की काय अस मला वाटलं,तरी देखील मी तिला अलगद उचलून माझ्या जवळच्या एका स्वच्छ पांढऱ्या रुमालात व्यवस्थित ठेवलं अन मला लक्षात आलं की ती खरोखरच खूप घाबरलेली,सैरभैर झालेली आहे.तिची नजर ,तिचे विस्फारलेले डोळे माझ्याकडं ,माझ्या प्रत्येक हालचालीकड एकटक बघत होते,जणू काही मी आता नेमकं काय करणार आहे याचा ती हळुवारपणे अंदाज घेत होती.
तिच्या नजरेतील असह्यपणा मी देखील जाणू शकलो नाही असं काही नव्हतं,यापूर्वी मी अनेकदा रस्त्यावरून जाताना कित्येकदा रस्त्यात ,कडेला,दुकानाच्या बाहेर अनेक तुटलेल्या बांगड्या पाहिल्या होत्या,मात्र आजचा तिच्याबद्दलचा अनुभव काही निराळाच होता,मी रुमालात हळुवारपणे ठेवलेल्या तिच्याकडं बघितलं तर ती अद्यापही भेदरलेलीच दिसत होती,काही तरी अघटित झालं आहे याची कल्पना एव्हाना मला आली होती .
नेमकं काय झालं असेल याचा अंदाज बांधण्याचा मी प्रयत्न करीत होतो मात्र काहीच सुचत नव्हतं,मनात अनेक शंका कुशंका नि थैमान घातलं होत,यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं परंतु आज मात्र एक वेगळीच भीती तिच्या स्पर्शामुळं मनात तयार झाली होती.का कोण जाणे पण खूप काहीतरी भयानक घडलं आहे याचा अंदाज आला होता .डोक्यात सुरू असलेलं वादळ बाजूला ठेवून मी तिच्याकडं निरखून पाहू लागलो,बराच काळ गेल्यानंतर तिच्याही लक्षात आलं असावं की ज्या माणसानं आपल्याला आधार देऊन जवळ घेतलं आहे ते हात,तो माणूस भला असावा म्हणून ती देखील थोडी सावरली होती .
बराच काळ आमच्या दोघांमध्ये एक भयान शांतता होती,अगदी हळुवारपणे आपल्या पिलासाठी साखरेचा दाना घेऊन जाणाऱ्या मुंगीच्या पावलांचा देखील आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू यावा एवढी भयाणक शांतता होती.शेवटी मीच या शांततेला तोंड फोडलं अन नेमकं काय झालं हा प्रश्न केला,माझा प्रश्न एकूण इतका वेळ शांत असलेल्या तिने पुन्हा एकदा जोरात हंबरडा फोडला .
तिचा तो आवाज काळीज पिळवटून टाकणारा होता,इतक्या वेळ असलेल्या शांततेला भेदून या आवाजाने नभांगणातील ताऱ्यांना देखील घाम फुटला असावा .तिच्या त्या आवाजाने मला नेमकं काय झालं असेल याचा पूर्णपणे अंदाज आला,मी काहीही न बोलता फक्त तिच्याकडं बघत होतो,तिची प्रत्येक हालचाल टिपण्याचा प्रयत्न करीत होतो,न बोलताही तिनं त्या किंकाळीतून सगळं काही सांगितलं होतं .बराच काळ मी न बोलता थिजल्यासारखा जागच्या जागी बसून होतो,अखेर मी तिला प्रेमानं जवळ घेत नेमकं काय,कसं, कुठं,कधी घडलं,कोणी केलं,का केलं,असे एक ना अनेक प्रश्न एका दमात विचारले अन पुन्हा तिच्या उत्तराची वाट पाहत बसलो .
बराच काळ लोटल्यानंतर आणि मी कोणी तरी विश्वास ठेवण्यासारखा माणूस आहे याची खात्री पटल्यानंतर तिने मला आपली कर्मकहानी सांगायला सुरुवात केली,मी तुम्हाला दादा म्हणू शकते का ? या तिच्या प्रश्नाने मी देखील जरा स्थिरावलो .पण तिच्या त्या प्रश्नाने माझ्या मनाची मात्र चलबिचल झाली,कारण त्या प्रश्नांन माझं एक नातं निर्माण केलं होतं,तसा मी खूप नात्यात अडकून राहणारा नाही पण हे अनामिक नातं मात्र काळजात घर करणार होतं, तिच्या दादा या शब्दात जो विश्वास होता तो जाणवला मला.म्हणलं बोल बिनधास्त बोल,काय झालं तुला ,का अशी अवस्था झाली तुझी,रस्त्यात अशी का पडली होतीस विव्हळत .तशी ती म्हणाली दादा सांगते सगळं सांगते जरा श्वास तर घेऊ दे .
इतका वेळ शांत असलेला मी जरा स्थिरावलो आणि प्राण कानाशी आणून ऐकू लागलो,तिनं सांगायला सुरुवात केली,का रे दादा जेव्हा माणसाचा जन्म होतो तेव्हा पाचव्या दिवशीच मला हातात प्रेमानं घातलं जात,मुलगा असो की मुलगी माझ्या असण्यानं त्यांच्या सौंदर्यात भरच पडते,माणसाच्या जन्मापासून ते मरणापर्यंत सोबत असणारी मी आज मात्र पूर्णपणे खचून गेले आहे, सुवासिनींचा दागिना म्हणून मिरवताना मला कोण आनंद होतो ते शब्दात नाही सांगता येणार,एवढंच काय पण एखादी सुवासीन जेव्हा तीच कुंकू पुसलं जात तेव्हा देखील मला तिचा हात सोडून जाताना प्रचंड वेदना होतात .मात्र आज माझीच मला लाज वाटू लागली आहे,मी किती असाह्य आहे हे या समाजाने मला आज दाखवुन दिलं आहे .
मी तुझ्या लेकीची लाडकी असते,बायको मला हळुवारपणे सांभाळते तर आई अन बहीण या मला जीवापाड प्रेम देऊन जपतात,मैत्रीण देखील मला घरची वागणूक देतात हा सगळा आनंद असताना एक वेदना मात्र कायम मनात घर करून राहते आहे की ज्यांच्या हातात मी थाटात मिरवते तीच आयुष्य जेव्हा कोणी नराधम विस्कटून टाकतो ना तेव्हा माझीच मला लाज वाटते .
आजकाल माणूस ज्या पशूंच्या वृत्तीने वागतो आहे ना ते पाहिल्यावर आया बायांनो यापुढे तुम्ही हातात हात घालून मला मिरवण्यापेक्षा हाती शस्त्र घ्या अन तुमच्या इभ्रतीवर दरोडा घालणाऱ्या नरपशूंच्या नरडीचा घोट घ्या अस म्हणावं वाटत आहे .अरे आज मी जीच्यासोबत होते ना काय दोष होता तिचा,ती सुंदर होती दिसायला,लडिवाळ होती बोलायला,डोळे तिचे जुल्मीगडे असे होते,केशसंभार करून ती निघाली होती उच्च शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला .तिच्या जन्मापासून मी सोबत असल्याने कित्येकदा एकांतात तिने मला मनातल्या गोष्टी सांगितल्या आहेत,मात्र काही वासनांध लोकांची नजर तिच्या देहावर पडली अन त्यांनी ती कळी उमलण्याआधीच कुस्करून टाकली रे,तीच हे वाक्य ऐकलं अन माझं काळीज पिळवटून निघालं .
तस पाहिलं तर ती होती एक बांगडी,निर्जीव वस्तू पण लेकीबळींच्या स्पर्शाने ,कुरवळण्याने तिच्यात सुद्धा प्राण आले होते, म्हणूनच तिची वेदना आज माझ्या कानी पडली .अरे दादा,या तिच्या आवाजाने मी पुन्हा भानावर आलो,म्हणलं काही नाही ग,पण कोणी केलं हे सगळं,कोण होते ते,त्यांना आया बहिणी नव्हत्या का?या माझ्या प्रश्नावर ती कुस्तीक पणे हसली अन म्हणाली अरे आपलं ते लेकरू अन दुसऱ्याचं ते कार्ट ही जगाची रितच आहे वेड्या हे अजूनही तुला कसं नाही कळलं .
आपल्या आई,बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर तळपायाची आग मस्तकाला जाणारा पुरुष जेव्हा रस्त्याने जाताना ,येताना,कार्यालयात बसल्यावर,कामाच्या ठिकाणी,बाजारात,सार्वजनिक सभा ,समारंभात दुसऱ्या स्त्री ला पाहतो ना तेव्हा त्याच्या डोक्यात तो एक नर आणि समोरची स्त्री म्हणजे असते फक्त मादी .ती आपल्या वापरासाठी च आहे हा पक्का समज करून घेत तो लाळ घोटेपणा करत राहतो .हे करताना त्याला स्थळकाळ, वय,जातपात,धर्म याच कुठलच भान राहत नाही अन त्याच्या नजरेतून फक्त वासना टपकत राहते .जी दिसेल,जिथे दिसेल तिथे या पुरुष नावाच्या नरपशूंच्या डोक्यात वासना निर्माण होते अन मग माझ्यासारख्या लाखो बांगड्यांच्या नशिबी हे असं रस्त्यात विव्हळण येतं .
तिच्या बोलण्यातून तिच्या मनातील वेदना, अंगार लक्षात येत होता.कोणत्या समाजात आपण राहत आहोत याची चीड येत होती .ज्या समाजात स्त्री म्हणजे लक्ष्मी,सरस्वती,दुर्गा,अंबा, चण्डिका म्हणून स्त्री ची पूजा केली जाते,ज्या स्त्रीच्या उदरात नऊ महिने मनुष्य वाढतो त्याच स्त्री ला उपभोगाची वस्तू म्हणून पाहताना त्याला लाज कशी वाटत नाही हा तिचा सवाल माझ्यासमोर हजारो प्रश्न निर्माण करून गेला,तिच्या प्रत्येक शब्दात अंगार होता,तर शब्द शस्त्रप्रमाणे माझ्यावर वार करीत होते अन मी हतबल होतो .
कुठे प्रेमाला नकार दिला म्हणून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार सुरू आहे तर कुठे एकतर्फी प्रेमातून रिंकू पाटील सारखे अनेक जीव जाळून टाकले जात आहेत,काही मुलींना प्रेम का करत नाही म्हणून तेजाब टाकून विद्रुप केलं जातंय तर काही सावित्रीच्या लेकींची इभ्रत भर रस्त्यात लुटली जात आहे .स्त्री ही पुरुषाच्या वापराची,उपभोगाची,ऐशा आरामाची वस्तू असल्याप्रमाणे जिकडे तिकडे सध्या स्त्री ला लुटलं जात आहे,छळल जात आहे .
अरे दादा वासनेने ग्रासलेल्या या समाजातील काही नराधमांना तीन दिवसांपूर्वी जन्मलेलं लेकरू असो की नव्वद वर्षांची माझी आजी असो काहीच दिसत नाही त्यांना फक्त त्यांचा कंड जिरवायचा असतो.अशा घटना घडल्यानंतर निषेध, मोर्चे आंदोलने होतात आणि पुन्हा जणूकाही घडलेच नाही अस तुम्ही आम्ही सगळे वागू लागतो .
हा सगळा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे,काय दोष होता त्या कोवळ्या जीवाचा जिच्या हातात मी होते,ती देशाच्या,कुटुंबाच्या समाजाच्या प्रगतीची स्वप्न रंगवत आपल्या मार्गावर जात होती मात्र काही हरामखोर नराधमांना तीच सुख पाहवल नाही अन तिला कुस्करून टाकलं रे.कोणी अधिकार दिला या नालायक लोकांना अस तीच आयुष्य उध्वस्त करण्याचा.कायदा किती तकलादू आहे हे सुद्धा अशा घटनांमध्ये होणारी वाढ अधोरेखित करते .या देशात जिच्यावर अत्याचार,बलात्कार,अन्याय झाला आहे तिलाच प्रश्न विचारून,तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून पुन्हा एकदा कायद्याच्या मंदिरात निर्वस्त्र केलं जातं तेव्हा मी निर्जीव असून सुद्धा माझं मनही हेलावून जातं रे .कुठंतरी हे थांबल पाहिजे,कोणीतरी या अशा नराधमांना,लेकी बाळींच्या अब्रूशी खेळणाऱ्या नरपशुना जिथल्या तिथे फासावर लटकवणारा माईचा लाल पैदा होणार आहे की नाही .आज देशात दररोज हजारो आया बहिणींच्या इभ्रतीवर दरोडे घातले जात आहेत मात्र समाज आणि कायदा डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे .लाज वाटते या अशा माणसांच्या जगात राहण्याची .
कानात शिस ओतल्याप्रमाणे तिचे शब्द माझ्या मनावर घणाचे घाव घालीत होते अन मी मात्र निशब्द झालो होतो .
सध्या जे चालू आहे ते खरच खूप चीड आणणार आहे,दिल्लीतील निर्भया असो की गल्लीतील निर्जला,कोणीच आज सुरक्षित राहिलेली नाही,ज्या स्त्रीच्या छातीला कवटाळून आपण लहानाचे मोठे झालो आहोत तिच्याच छातीवर घाव घालताना समाजातील या अशा लोकांना लाज कशी वाटत नाही हा खरा प्रश्न आहे .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा