शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

आश्वस्त क्षीरसागर ...........!

आश्वस्त क्षीरसागर ................!

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करत मंत्रीपद मिळविल्यानंतर जयदत्त क्षीरसागर हे अधिकच आश्वस्त  झाल्याचे चित्र दिसून येत आहे . राष्ट्रवादी मध्ये असताना होत असलेली घुसमट त्यांच्या चेहर्‍यावर नेहमी दिसून येत होती मात्र शिवसेनेत गेल्यानंतर पासून ते बऱ्यापैकी रिलॅक्स झाल्याचं दिसून येते एवढेच नव्हे तर क्षीरसागर इलेक्शन मोडमध्ये आल्याचे देखील स्पष्टपणे जाणवू लागले आहे .
सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे करून शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर बीड जिल्ह्यात सर्वात उशिरा शरद पवारांसोबत राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता तो केशरबाई क्षीरसागर आणि त्यांच्या परिवाराने . स्वतः शरद पवार यांनी क्षीरसागर यांच्या घरी जाऊन बैठक घेतल्यानंतर त्यांनी पवारांसोबत जाण्याचा निर्णय पक्का केला होता . दरम्यान 1999 पासून ते आजपर्यंत क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून चौसाळा असो की बीड विधानसभा मतदारसंघ उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेत मंत्रिपदही मिळवलं . 1999 ते 2014 या काळात क्षीरसागर कायम सत्तेत होते, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम उपक्रम असो किंवा इतर खाती त्यांनी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी बीड जिल्ह्यासाठी खेचून आणला मात्र हे करत असताना मध्यंतरीच्या काळात त्यांच्या घरात महाभारत सुरू झालं आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी काका विरुद्ध बंड पुकारलं .या बंडाला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच खतपाणी मिळू लागल्यामुळे जयदत्त क्षीरसागर मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झाले होते मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर वारंवार या गोष्टी घातल्यानंतरही त्यावर तोडगा निघत नसल्यामुळे ते देखील हतबल झाले होते. पक्षातील वरिष्ठ नेते तसेच जिल्ह्यातील स्थानिक नेते यांचा विरोध पत्करून मायक्रो मायनॉरिटी असतानादेखील क्षीरसागर राष्ट्रवादीमध्ये भक्कमपणे उभे होते मात्र संदीप च्या रूपाने घरातच फूट पडली आणि क्षीरसागर यांच्या बंगल्याला तडे गेले हा बंगला ढासळतो की काय आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या दिग्गज राजकारणी राजकीय पटलावरून गायब होतो की काय अशी शंका येऊ लागली होती .
नगरपालिका असो की जिल्हा परिषद पंचायत समिती प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने काका आणि पुतण्या मध्ये कुस्ती लावून प्रेक्षक म्हणून टाळ्या वाजवत आनंद घेतला. त्यामुळे क्षीरसागर हे राष्ट्रवादीमध्ये फार काळ राहणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली .लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला आणि जिल्ह्यातील क्षीरसागर समर्थकांना एक मोठा दिलासा मिळाला .गेल्या चाळीस वर्षापासून राजकीय आणि सामाजिक कार्यात कायम कार्यरत असणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांचा राष्ट्रवादीमध्ये होणारा कोंडमारा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दूर झाला .त्यांच्या मनामध्ये जी काही सल होती ती मताच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 22 मे रोजी जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. शिवसेनेच्या इतिहासात एवढ्या लवकर बाहेरून आलेल्या व्यक्तीला मानाचं पान क्वचितच दिल गेल आहे. मात्र क्षीरसागर यांचा राजकारणातील अनुभव आणि पक्षश्रेष्ठींना खुश करण्याची पद्धत कामाला आली आणि त्यांच्या पदरात मंत्रिपद पडल.
 मंत्री झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात आणि विदर्भातही शिवसेनेच्या बांधणीसाठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. सध्या ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ,युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन त्यांनी केल आहे. त्यानिमित्ताने त्यांची भेट झाली तेव्हा ते कमालीचे आश्वस्त असल्याचं जाणवलं लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा-जेव्हा जयदत्त क्षीरसागर यांची भेट व्हायची तेव्हा कुठेतरी ते पक्षावर नाराज असल्याचं ,पक्षाकडून डावलले गेल्याच दिसून यायचं ,थेट तोंडावर आणि स्पष्ट सांगण्याचा क्षीरसागर यांचा स्वभाव नाही. पत्रकारांशी देखील बोलताना ते हातचे राखूनच बोलतात ,त्यांच्या मनात काय चाललं आहे हे त्यांच्या घरच्यांना देखील माहित असतं की नाही असा प्रश्न नेहमी पडतो. कधीच मोकळेपणानं आणि थेट प्रतिक्रिया द्यायला किंवा आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना थेट टीका करायला ते कधीच पुढे येत नाहीत .विकास कामाच्या माध्यमातून मी लोकांच्या समोर जातो, कोणावरही व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा आपल्या कामाच्या माध्यमातून टीकाकारांचे तोंड बंद करणे आपल्याला आवडते असं ते नेहमी म्हणतात.
 दरम्यान शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जुन्या आणि नव्या शिवसैनिकांचा मेळ ते कसा बसवणार असा प्रश्न होताच तो बऱ्यापैकी आजही कायम असला तरी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन करण्यात त्यांना यश आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच महिनाभरावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते शिवसेनेत तरी रिलॅक्स असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं आणि चेहऱ्यावर देखील ते दिसून आलं. "आम्ही रोजच इलेक्शन मूडमध्ये असतो "त्यामुळे निवडणुका तोंडावर आल्या म्हणून फार लोड घेणाऱ्यांपैकी मी नाही" असं सांगण्याचा जयदत्त क्षीरसागर यांचा कॉनफिडन्स कमालीचा उंचावल्या स्पष्टपणे दिसत होतं .
जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेला देखील आगामी काळात बळकटी मिळणार आहे हे निश्चित .कारण बीड जिल्ह्यात आर्थिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या ताकद असणारा माणूस आज पर्यंत शिवसेनेकडे नव्हता.शिवसेनेची अवस्था फारशी आशादायक अशी नव्हती .मात्र क्षीरसागर यांच्यासारख्या दिग्गज राजकारणी अनुभवी व्यक्ती पक्षात आल्यामुळे पक्षाला अच्छे दिन येतील असे म्हणावयास हरकत नाही .कदाचित क्षीरसागर यांच्यामुळे मराठवाड्यातील शिवसेनेला देखील बळकटी मिळेल यात शंका नाही .एकूणच चाळीस-पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ काँग्रेस संस्कृतीमध्ये वाढलेल्या क्षीरसागर यांना शिवसेनेत जाऊन ऍडजेस्ट होता येईल का ही शंका दूर झाली असून क्षीरसागर शिवसेनेत पक्के सेट झाले आणि त्यामुळेच ते भविष्यातील निवडणुकीच्या दृष्टीने कमालीचे आश्वस्त असल्याचं दिसून आलं . निवडणुकीत काय होईल कोणाचा विजय कोणाचा पराभव होईल हे आज सांगणं कठीण आहे .एक मात्र नक्की की राष्ट्रवादी मध्ये असताना क्षीरसागर यांची होणारी घुसमट नक्कीच थांबली असून त्यांनी पाडलेल्या पायवाटेने अनेक दिग्गज चालू लागले असून शिवसेनेकडे येणाऱ्यांची संख्या पाहता आता क्षीरसागर यांच्या रूपाने शिवसेनेकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग अनेकांसाठी खुला झाला आहे असेच म्हणावे लागेल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होणार आहे त्यामध्ये दोघांचे भवितव्य मतदारांच्या हाती असले तरी जयदत्त क्षीरसागर यांचा अनुभव नक्कीच कामाला येईल आणि त्यामुळेच ते आश्वस्त असल्याचं दिसून आलं.
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

२ टिप्पण्या:

Dr.S.P.Ladda म्हणाले...

अप्रतिम व परखड लिखाण. सूक्ष्म निरीक्षण व ते सर्व उच्च प्रतीच्या शब्द रचनेत वर्णन करणे......रुईकर सर ग्रेट

Unknown म्हणाले...

Kharach abhyaspurna lekhan

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...