रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

तुझं ते हि माझंच ...........!

तुझं ते ही माझंच .........!

सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमारच्या एका चित्रपटातील एक प्रसंग जोरदारपणे चर्चेत आहे,यामध्ये अक्षयकुमार हा त्याच्या पार्टनर सोबत पैशाची वाटणी करताना दाखवला आहे,तसेच राऊडी राठोड मध्ये सुद्धा तो अशाच पद्धतीने वाटणी करताना दाखवला आहे,यामध्ये वाटणी समसमान झाल्याचा आणि पार्टनर खुश झाल्याचं दिसत,मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळंच असत,यात फायदा होतो तो अक्षयकुमार याचाच .हे आठवण्याच कारण म्हणजे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांमध्ये झालेलं जागांच वाटप होय .

माझं ते माझं अन तुझं ते ही माझं असा खेळ सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू असल्याचं दिसत आहे.भाजप आणि शिवसेनेच्या यादीवर नजर टाकली तर लक्षात येते की आपल्या पक्षाचे म्हणजे आपल्याला मानणारे लोक तर फडणवीस यांनी भाजपकडून दिलेच पण शिवसेनेच्या यादीत सुद्धा फडणवीस यांना माणणाऱ्यांचा भरणा आहे,एवढंच नाही तर जे मित्रपक्षाकडून उमेदवार म्हणून दिले आहेत ते देखील फडणवीस यांच्याच जवळचे आहेत .काँग्रेस,राष्ट्रवादीकडून ऐनवेळी उमेदवारी मिळवलेले काहीजण सुद्धा फडणवीस यांच्या संपर्कात होते हे विशेष .त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत माझं ते माझ अन तुझं ते ही माझंच असाच खेळ फडणवीस यांनी मांडला आहे .त्यामुळे निकाल काय लागणार हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही हे नक्की .
राज्याच्या विधानसभा निवडणुकी कडे देशाचे लक्ष लागले आहे,देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई आणि राज्यावर आपली हुकूमत असावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . निवडणूक जाहीर होण्याच्या सहा महिने नव्हे वर्ष दोन वर्षे अगोदर पासूनच फडणवीस यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती अस म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही .
काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील असोत की विजयसिंह मोहिते पाटील अथवा जयदत्त क्षीरसागर किंवा ऐनवेळी पक्षात आलेले अनेकजण असोत प्रत्येकाशी फडणवीस यांनी एक वेगळीच लाईन लावून ठेवली होती .पाथरी विधानसभा मतदार संघातून रिपाई ची उमेदवारी मिळालेले मोहन फड हे अपक्ष म्हणून 2014 ला निवडून आले ,नंतर शिवसेना मार्गे भाजपात दाखल झाले आणि वाटाघाटीमध्ये हा मतदारसंघ मित्रपक्ष रिपाईकडे गेल्यानंतर त्यांना रिपाईकडून उमेदवारी देण्यात फडणवीस यशस्वी झाले .त्यांच्याच शेजारच्या जिंतूर मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या मेघना बोर्डीकर यांना देखील फडणवीस यांनी रासपची उमेदवारी मिळवून दिली .
गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये सहभागी झालेल्या विनायक मेटे यांच्या वाट्याला जे तीन मतदारसंघ आले तेथेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलेच शिलेदार उभे केले .लोकसभा निवडणुकीच्या काळात विजयसिंह मोहिते पाटील यांनी तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला .बीड आणि सिल्लोड मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला असल्याने जयदत्त क्षीरसागर आणि अब्दुल सत्तार यांना सेनेत पाठवत फडणवीस यांनी बाजी मारली .लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजेंद्र गावित या विद्यमान भाजप खासदाराला शिवसेनेत पाठवत त्यांना निवडून आणले .
राज्यात यावेळी भाजपकडून जे उमेदवार उभे आहेत आणि ज्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली अशा तब्बल वीस पेक्षा अधिक लोकांची उमेदवारी आणि मतदारसंघ फडणवीस यांनी च फायनल केले आहेत .शिवसेनेच्या वाट्याला ज्या 124 जागा आल्या आणि मित्रपक्षांना ज्या 18 जागा दिल्या गेल्या त्यातील तीस टाक्यांपेक्षा जास्त उमेदवार हे फडणवीस यांना मानणारे आहेत हे विशेष .
महायुतीमध्ये जे मित्रपक्ष सहभागी झाले त्यांना आमच्या कोट्यातून जागा दिल्या जातील हे मान्य करताना फडणवीस यांचा धुर्तपणा कोणाच्याच लक्षात आला नाही . रिपाई असो की रासप अथवा शिवसंग्राम सगळ्यांना जागा तर दिल्या मात्र त्यांचे उमेदवार आपल्या मर्जीतील देताना फडणवीस यांनी त्यांना आपल्याच पक्षाच्या चिन्हावर म्हणजे कमळावर उभे करून आपली खेळी यशस्वी केली .
मित्रपक्ष आणि सत्ताधारी असताना सुद्धा शिवसेनेने  साडेचार वर्ष भाजपच्या विरोधात रान उठवले,फडणवीस यांच्यापासून ते मोदी शहा यांच्यापर्यंत सगळ्यांचा यथेच्छ समाचार घेतला .लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती तुटते की काय असे वाटत असताना शहा आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना अशी काही स्वप्न दाखवली की त्यात त्यांचा विरोध मावळला आणि विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात देखील युती अभेद्य राहिली .
मध्यंतरी एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आमची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फायनल करणार आहेत अशी मिश्किल टिप्पणी केली होती,आज दोन्ही पक्षांसह मित्रपक्षांना दिलेल्या जागा आणि उभे असलेले उमेदवार पाहिल्यास यादी फडणवीस यांनी फायनल केल्याचे दिसून येते .
भाजपमध्ये शिस्त पाळली जाते अस म्हटलं जातं ,यादीवर नजर टाकली तर कॉग्रेसी संस्कृती मध्ये वाढलेल्या आणि अनेक बेशिस्त असणाऱ्यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते .लोकसभा निवडणुकीत देखील शिवसेनेने काही उमेदवार बदलावेत असा फडणवीस यांचा आग्रह होता मात्र सेनेने ती ऐकला नाही अन चार पाच जागांचा फटका त्यांना बसला .कॉग्रेसमुक्त भारत चा नारा नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर फडणवीस यांनी राज्यात राष्ट्रवादी मुक्त नारा दिला ,पण तो पूर्ण करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गजांचा सहारा घ्यावा लागला हे ढळढळीत सत्य आहे .विजयसिंह मोहिते असोत की राणा पाटील अनेक दिग्गजांना आपल्या गळाला लावताना फडणवीस यांनी आपल्या पक्षातील स्पर्धक बनू शकणाऱ्या खडसे,तावडे यांच्यासारख्यांचा पत्ता कापून आपणच किती प्रबळ आहोत हर दाखवून दिले .
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्यासारखा ऐंशी वर्षाचा तरुण मैदानात उतरला असताना राज ठाकरे असोत की राहुल गांधी यांच्यात मात्र तो उत्साह पाहायला मिळत नाही .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे ते भाजप सेनेच्या या दिग्गज लोकांसमोर कितपत टिकतील ही शंकाच आहे .अशावेळी येणाऱ्या 24 तारखेनंतर जे सरकार अस्तित्वात येईल त्यावर देखील फडणवीस यांचाच वरचष्मा असणार हे निश्चित आहे .सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यावयाचे अन कोणाला बाजूला बसवायचे,तसेच कोणाला कोणते खाते द्यायचे याचा मास्टर प्लॅन देखील फडणवीस यांच्याकडे तयार असल्यास आश्चर्य वाटायला नको .मध्यंतरी एका कार्यक्रमात फडणवीस यांना तुम्ही आजच्या काळातले शरद पवार आहात का,तुम्हाला पवार व्हायला आवडेल का अस विचारल्यावर मिश्कीलपणे हसत त्यांनी पवार यांचे दिवस आणि त्यांच राजकारण संपल्याच सांगितलं होतं,तेव्हाच खडसे,तावडे यांनी वाऱ्याचा वेग अन दिशा ओळखायला पाहिजे होती .अबकी बार फडणवीस सरकार असंच त्यांना सांगायचं होत मात्र ते ना स्वपक्षातील लोकांना समजलं ना मित्रपक्षांना .त्यामुळेच आज जी परिस्थिती दिसते आहे ती पूर्णपणे फडणवीस यांना पोषक अशीच असल्याचे जाणवते .त्यामुळेच येणाऱ्या काळात फडणवीस बोले अन मित्रपक्षासह विरोधीपक्ष सुद्धा चाले असे चित्र दिसले तर आश्चर्य वाटायला नको .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...