गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

गरजने वाले बरस ते भी है

गरजने वाले बरसते भी है

जो गरजते है वो कभी बरस ते नही असं म्हटलं जातं मात्र काल भारतीय सैनिकांनी ज्या पद्धतीने पाकिस्तान मध्ये घुसून त्यांना जशास तसे उत्तर दिले ते पाहता जो गरजते है वो बरस ते भी है हेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे.मोदी यांनी आणि भारतीय सैन्याने जो पराक्रम केला तो ओसामा बिन लादेन याला कंठस्नान घालताना अमेरिकेने जी युद्धनीती अवलंबिली तीच पद्धत फॉलो केल्याचे दिसून येते.देशहितार्थ एखादा निर्णय हा चॅनेल च्या वोर रूममध्ये बसून होत नसतो तर त्यासाठी ठराविक स्टॅटिजी असते हेच मोदी यांनी दाखवून दिलं आहे.मोदी यांच्या डिनर डिप्लोमसी बद्दल जेवढी चर्चा झाली तेवढीच नव्हे त्यापेक्षा जास्त चर्चा आता मोदी यांच्या या गनिमी काव्याची होईल यात शंका नाही.
उरी येथे पाकिस्तानने पोसलेल्या अतिरेक्यांनी हल्ला करीत 18 भारतीय जवानांना मारले,त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या क्षमतेबद्दल अनेक बोरू बहाद्दर आणि पॅनल पंडितांनी आठ दहा दिवस चर्चेचे गुऱ्हाळ चालवले,थेट हल्ला करून जशास तसे उत्तर द्या,आता युद्धच करा,पाकला धडा शिकवा अशा एक ना अनेक सूचना केल्या जात होत्या.कोणी सांगितलं की पाकिस्तान सोबत असलेला सिंधू करार मोडून टाका तर कोणी म्हटलं पाकिस्तान सोबतचे संबंध तोडून टाका मात्र मोदी शांत होते,परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्क येथे जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठणकावून सांगितले तरी देखील अनेकांनी भारताच्या भूमिकेवर शंका घेतली,मोदी शांत आहेत याचा अर्थ त्यांनी माघार घेतली आहे असा काहींनी अर्थ काढला मात्र "शेर जब दो कदम पिछे जाता है तो वो  हार नाही मानता बल कि एक कदम आगे बढकर हमले कि तैयारी करता है"असच काहीसं मोदी यांनी केलं.
पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून भारतीय लष्कराने पाकड्यांची जी शस्त्रक्रिया केली ती बिनतोड होती यात शंका नाही,साधारण पणे अडीच वर्षांपूर्वी मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पाकिस्तान मध्ये घबराट निर्माण झाली होती,जणू काही मोदी आता जगाच्या नकाशावरून पाकचे नामोनिशाण मिटवून टाकणार असे वातावरण भारत आणि पाक या दोन्ही देशात निर्माण करण्यात आले होते,मात्र शपथविधीला पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावून मोदी यांनी आपली जागतिक इमेज मोठी केली,त्यांनतर शरीफ यांना शाल भेट दिली तर त्यांच्या वाढदिवसाला अचानक भेट देवून सगळ्यांनाच धक्का दिला.
मोदी यांनी हे सगळं करताना नेपाळ,अफगाणिस्थान,अमेरिका,या सारख्या देशांचे दौरे करीत भारताचे जागतिक संबंध अधिक दृढ करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला,मोदी हे जेवढ्या काळ बाहेर देशाच्या दौऱ्यावर राहिले तेवढे काळ भारतात देखील राहिले नाही म्हणून त्यांच्यावर टीका देखील झाली,मात्र या दौऱ्यांमधून त्यांनी पाकिस्तान ची अतिरेक्यांना पोसणार राष्ट्र म्हणून इमेज अधिक गडद करण्याचा प्रयत्न केला,त्यात त्यांना यशही मिळालं,
आज अमेरिका असो की इतर देश यांना पाकिस्तान ने पोसलेल्या दहशतवादाचा फटका बसला आहे,त्यामुळे उरी हल्ल्यानंतर पाकला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करावे ही मागणी खुद्द अमेरिकेच्या संसदेत त्यांच्याच खासदारांनी केली,पाकचे पंतप्रधान मियाँ शरीफ हे कितीही शरीफ पणाचा बुरखा पांघरत असले तरी उरी हल्ल्यानंतर त्यांचा हा बुरखा टराटरा फाटला,
जखमी शेर बहोत खतरनाक होता है याचा प्रत्यय मोदी यांनी सर्जिकल  स्ट्राईक मधून दाखवून दिल आहे,अगोदर भारताने सार्क संमेलनावर बहिष्कार टाकून पाकची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी केली तर दुसरीकडे सिंधू कराराबाबत पुनर्विचार करण्याची चर्चा सुरु करून पाकला गाफील ठेवले,अवघ्या चार तासात लाईन ऑफ कंट्रोल पार करून घरात घुसून त्यांना त्यांची औकात दाखवून दिली.
नरेंद्र मोदी हे गुळमुळीत पंतप्रधान आहेत ते केवळ बोलघेवडे आहेत,चाय पे चर्चा करणाऱ्या माणसाने काहीच केले नाही पाकच्या कुरापती चालूच आहेत अशा चर्चा देशात सुरु होत्या मात्र मौका सभी को मिलता है या डायलॉगची आठवण मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक च्या माध्यमातून जगाला दाखवून दिले आहे ,ज्या अमेरिकेने मोदी मुख्यमंत्री असताना त्यांना व्हिसा नाकारला होता मात्र आज तीच अमेरिका त्यांच्यासाठी पायघड्या घालत आहे,हा काळाचा महिमा आहे,अवघ्या चार तासात मोदी यांनी जे केलं ते या अगोदर मागील वर्षी म्यानमार मध्ये करून पाकला एक सूचक इशारा दिला होता मात्र पाकने सुधारण्याचा प्रयत्न केलाच नाही,घरात एखादं कारट व्रात्य असेल तर त्याला दोन चार दा समजून सांगावे लागते नंतर मात्र त्याला त्याची शिक्षा करावीच लागते हाच प्रकार शेजारी देशाबाबत म्हणता येईल,"हम खामोश है इसका मतलब हम डरते है "असा समज पाकने भारताबाबत करून घेतला होता,पण मोदी यांनी आज जे केलं त्यानं पाकड्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे हे निश्चित.
लक्ष्मीकांत रुईकर,9422744404.

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

सलाम बळीराजा तुझ्या हिमतीला सलाम

सलाम बळीराजा तुला त्रिवार सलाम बीड जिल्हा तसा मागासलेला म्हणूनच राज्यात प्रसिद्ध आहे,या जिल्ह्याने गोपीनाथ मुंडे सारखा लढवय्या लोकप्रतिनिधी दिला,तसेच मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवणारे वीर योध्ये देखील दिले,याच बीड जिल्ह्याने मागील चार वर्षात 1972 पेक्षाही भयानक दुष्काळ अनुभवला,आज मात्र बीड जिल्ह्याचा हा कलंक पुसला गेला आहे,जिल्ह्यातील धरणं ओसंडून वाहत आहेत.
मागच्या तीन चार वर्षात कधीही बातम्या करण्याची वेळ आली तर मनावर दगड ठेवून कराव्या लागायच्या,कारण केवळ भेगाळलेली जमीन,रापलेले चेहरे,भकास अन पांढरी फट पडलेली कपाळ, अनेक घरचे करते पुरुष फासावर गेलेलं या डोळ्यांनी पाहिलं आहे,अनेक शेतकऱ्यांच्या चिता जळत असताना त्याच्या घरात चाललेला आक्रोश पाहून मन हेलावून जात होतं.
वाटायचं काय एवढं पाप केलंय आमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी कि हा दुष्काळाचा कलंक पुसतच नाहीए, जनावरांचे अनेक बाजार फिरलो,लाखाचे सर्जा राजा कवडीमोल भावाने विकताना पाहिल्यानंतर मन विषण व्हायचं,कधी फिटणार हे दिवस असं वाटायचं,दुष्काळाचा फटका केवळ शेतकार्यालाच बसला होता असे नाही तर संपूर्ण बाजारावर त्याचा विपरीत परिणाम जाणवत होता,बियाणे बाजार असो की किराणा अथवा कापड बाजार प्रत्येक ठिकाणी दुष्काळाचे दशावतार दिसत होते.अगदी रियल इस्टेट वर देखील याचा गंभीर परिणाम दिसत होता,प्रत्येक जण दुष्काळाने पिचलेला दिसत होता,या दुष्काळानं बीड जिल्ह्याला दहा वर्षे मागं ढकललं,
यंदा मात्र मिरगाचा पाऊस जोरदार बरसला,त्यामुळे पिचलेल्या बळीराजाने मोठ्या उमेदीने काळ्या आईची ओटी भरली,वरूनराजांना देखील कृपा केली शेतकऱ्याच्या पदरात यंदा चांगलं दान पडणार असं दिसतं होत,मात्र महिनाभर पावसानं ताण दिला आणि बळीराजाच्या चिंतेत भर पडली,मात्र पोळ्याच्या अमावस्येला पावसाचं पुनरागमन झालं आणि बळीराजाचा जीव भांड्यात पडला.मात्र गणपती विसर्जनापासून पावसानं मनावर घेतलं आणि मागील तीन चार दिवसात पावसानं अक्षरशः बीड जिल्ह्याला झोडपून काढलं.जिल्ह्यात मागील आठ दहा वर्षांपासून कोरडा पडलेला बिंदुसरा तलाव भरभरून वाहिला एवढंच नाही तर मृत साठ्यात असलेली माजलगाव आणि मांजरा सारखी मोठी धरणं देखील ओव्हरफ्लो झाली.
उपर वाला जब भी देता ,देता छप्पर फाडके असं म्हणतात ते बीड करांनी मागील दोन दिवसात अनुभवलं,48 तासात मागच्या चार वर्षाचा दुष्काळ फिटला, सगळीकडे पाणीच पाणी झालं,नद्या ,नाले ,ओढे ,खळखळून वाहू लागले,बिंदुसरा,मांजरा,माजलगाव सारखी कोरडी ठाक पडलेली धरण भरली,भूगर्भाची पाण्याची भूक भागली,पुढच्या चार पाच वर्षांची चिंता मिटली,पावसाने सगळ्यांचं कल्याण केलं,
बीड जिल्ह्यातील 144 छोटे आणि मोठे तलाव भरून वाहू लागले आहेत,जलयुक्त शिवार च्या कामामुळे शिवारात पाणी खेळू लागलं आहे, जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळी देखील चांगलीच वाढली आहे,जिल्ह्यातील विहिरी ,आड आणि बोअर ला भरपूर पाणी आलं आहे, पावसानं समद रान आबादानी केलं आहे,काळ्या मातीत मातीत तिफन चालते,तिफन चालते,मैना राघूच्या जोडीला हिरवं सपान पाहते अशी परिस्थिती आज जिकडे तिकडे झाली आहे .
मात्र या पावसानं बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला,आज दिवसभर गुडघाभर चिखलात रानावनात हिंडलो,बातमी शोधताना शेतकऱ्यांच्या व्यथा काय आणि किती असू शकतात हे जाणवलं,पाऊस नाही पडला तर दुष्काळ,आणि जास्त झाला तर ओला दुष्काळ,जगायचं कास हाच खरा प्रश्न मात्र तरीही बळीराजा आपले पाय घट्ट मातीत रोवून उभा आहे,अनेक शेतात जमीन खरवडून गेली आहे,तर शेकडो हेक्टर क्षेत्रावरील मळणी साठी आलेली बाजरी आडवी झाली आहे,फुलं आणि बोन्ड लागलेला कापूस पार जमिनीवर झोपलाय,अनेक शेतात तर पाणीच बाहेर निघालेलं नाही,सोयाबीन पुरतं संपलंय,
चार दिवस झाले शेतात जायला रस्ता देखील ठेवला नाही या पावसानं,अक्षरश धूळधाण झाल्याचं चित्र दिसून आलं,आता काय करायचं हा प्रश्न बळीराजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता मात्र सलाम त्याच्या जिद्दीला,अनेकांनी सांगितलं" साहेब यंदा बक्कळ पाऊस झाला,खरीप हातचं गेलं,मातर अवनदा जे गेलं ते म्होरल्या टायमाला जोमानं यील कि,असला पाऊस लई गरजेचा हुता,आता बघा म्होरला हंगाम रब्बी कशी येति ते,पुढच्या तीन चार वर्षाची ददाद  मिटविली बघा या पावसानं 'असं म्हणून त्यांनी पावसाचं स्वागत केलं,तेव्हा वाटलं खरच बारा महिने शेतीत राब राब राबणाऱ्या या माणसाला बळीराजा का म्हणतात ते कदाचित या मुळेच असावं,सलाम बळीराजा तुला आणि तुझ्या धैर्याला ,सलाम तुझ्या मोठ्या मनाला,सलाम तुझ्या मोडण्यातून हि उभं राहण्याच्या जिद्दीला,सलाम तुझ्या सकारात्मक दृष्टीला,तू असाच खंबीर रहा, मग बघ कोणी तुझं काहीच वाकडं करू शकणार नाही.
लक्ष्मीकांत रुईकर
9422744404

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

संदीप क्षीरसागर मऊ मेणाहून कठीण वज्राहून

संदीप बद्दल थोडंसं......
काही लोकांबद्दल काय लिहावं असा प्रश्न कधी कधी पडतो,कावळ्याला कधी गरुडाचे पंख लावताही येतील पण आकाशाला गवसणी घालण्याचं बळ  आणि जिद्द मनातच असावी लागते असं म्हटलं जातं,कारण कोणीही उठून आकाशाला गवसणी घालू शकत नाही मात्र आमचे मित्र तथा हजारो तरुणांचे हृदयस्थान असणारे संदीप क्षीरसागर यांच्यात मात्र नक्कीच आकाशाला गवसणी घालण्याची ताकद आहे हे नक्की.

संदीप चा आणि माझा प्रथम संबंध आला तो दहा वर्षांपूर्वी आम्ही दोघे काठोडा या गावी एका क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनाला गेलो होतो तेव्हा,तेव्हा संदीप ला जास्त बोलता देखील येत नव्हतं,आज हे कोणाला खरंही वाटणार नाही,गेल्या दहा वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, संदीप आज कमालीचा प्रगल्भ झालाय, काही जणांना असं वाटणार नाही परंतु ते त्यांचं मत असेल,माझ्या मते एक राजकारणी,समाजकारणी, मित्र,अनेकांचा युवा नेता म्हणून संदीप खरोखर प्रगल्भ झालाय यात शंका नाही,
क्षीरसागर घराण्यातील हा तरुण आज राजकारणाच्या पटलावरील अढळ स्थान निर्माण केलेला ध्रुव तारा झालाय हे नक्की,जिल्हा परिषद मध्ये येण्याअगोदर संदिप ने पाच वर्षे पंचायत समिती मध्ये काम केलं,एक पंचायत समिती म्हणजे पूर्ण मतदारसंघ,त्यामुळे त्याला लोकांचे स्वभाव कळले,त्यांची काम कळली,कसं वागायचं,कसं बोलायचं ते कळलं,त्यानंतर त्याची खरी इनींग सुरु झाली ती जिल्हा परिषदच्या राजकारणापासून.
जिल्हा परिषदेत निवडून आल्यानंतर त्याच्यावर सभापती पदाची जबाबदारी आली,खरं तर नशिबानं कमी आणि राजकारणाच्या कुटील डावपेचामुळे त्याची जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी हुकली,संदीप च्या जागी कोणी दुसरा असता तर त्याने आकांडतांडव केलं असत मात्र एका कसलेल्या राजकारण्याप्रमाणे त्याने हा वार छातीवर झेलला आणि लोंकांच्या कामात स्वतःला झोकून देत त्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.
असं म्हणतात की,
"ऊबड़ खाबड़ रस्ते भी, समतल हो सकते हैं,
कोशिश की जाए तो मुद्दे हल हो सकते हैं.
शर्त यही है कोई प्यासा हार न माने, तो
हर प्यासे की मुट्ठी मेँ बादल हो सकते है "
या प्रमाणे संदीप ने काम सुरु ठेवलं.आपण सर्वच लोक नेहमी राजकारण्यांबद्दल चांगली कमी आणि वाईटच चर्चा जास्त करतो मात्र त्यांच्या सोबत एक दिवस राहील तर त्यांना काय काय सहन कराव लागत हे मी अनेकदा संदीप बरोबर अनुभवलंय, कोणाची पोरगी नांदत नाही,तर कोणाची बायको सोडून गेलीय,कोणाचे बांधावरून भांडणं झालीयत तर कोणाला पोलिसांनी पकडलं आहे,एक ना अनेक तक्रारी कायम असतात त्या सगळ्या लोकांना मदत करायची त्यांच्या अडचणी सोडवायच्या,सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि कधी कधी झोपेतही लोकांची काम करायची,वैताग नुसता मात्र प्रत्येकाला हसून बोलावच लागत."राजकारणी हा अस्सल आणि खराखुरा अभिनेता असतो" असे मला  वाटत कारण दुःख असो की सुख त्याला चेहऱ्यावर दाखवायला परमिशन नसते,असच काहीसं संदीप च्या बाबतीत जाणवतं.
संदीप हा जेवढा डॅशिंग आहे तेवढाच तो संवेदनशील आणि कुटुंब वत्सल आहे हे मी अनेकदा अनुभवलंय,काही महिन्यांपूर्वीच त्याला सह कुटुंब फिरायला जायचे होते मात्र वेळच मिळत नव्हता तेव्हा बायको चा फोन आल्यानंतर त्याचा जो समजावून सांगण्याचा स्वर होता तो प्रत्येक कॉमन नवर्यासारखाच होता,बाप म्हणून देखील संदीप खूप इमोशनल आहे,मुलगा म्हणून त्याला वडीलांबद्दल वाटणारी काळजी मी कमालनयन  बजाज च्या मोकळ्या मैदानात त्याच्या डोळ्यात पाहिली आहे.
संदीप ला बोन्साय झाडं आणि प्राणी यांच्याबद्दल प्रचंड माहिती आहे हे बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं,कुत्रे,मांजर,साप, चिमण्या,घुबड,कावळे,कुठं मिळतात,त्यांची निगा कशी राखायची हे तो सांगत असताना मी फक्त ऐकत होतो,त्याला बंदूक ,पिस्टल याबद्दल देखील चांगलीच जाण असल्याचं पाहून मी आश्चर्य चकित झालो,
स्वतःच्या राहण्या,खाण्याबद्दल देखील संदीप फार चुझी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत झालेल्या या युवा नेत्याला आता आकाश पादाक्रांत करण्याची स्वप्न पडू लागली आहेत,कायम कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारा हा माणूस आपल्या इमेज ला धक्का लागणार नाही याची देखील काळजी करत असल्याचं अनेकवेळा पाहिलं आहे,अलीकडच्या काळात आपल्या इमेज बिल्डिंग वर त्याने विशेष भर दिलाय हे विशेष.आपल्या कार्यकर्त्यांकडून कोणालाही त्रास होणार नाही यासाठी संदीप स्वतः जातीनं लक्ष देत असल्याचं मी पाहिलंय, विशेष म्हणजे त्याने केवळ गॅंग जमा केली आहे हा समज दूर करण्याचा सातत्याने त्याच्याकडून प्रयत्न होताना अलीकडच्या काळात अनेकांनी पाहिलं आहे.
काही महिन्यांपूर्वी संदीप च्या नेतृत्वाखाली शहरात साजरी झालेली शिवजयंती आज ही अनेकांच्या स्मरणात आहे,त्या मिरवणुकीत ज्या पद्धतीने महिलांनी फेटे घालून सहभाग नोंदवला तो पाहता संदीप ची इमेज बदलली आहे हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नक्कीच नाही.
कोणी तरी म्हटलं आहे की ,
"जिनकी बुनियादों में खट्टापन है, मत भूलो,
पकने पर सब के सब मीठे फल हो सकते हैं.
ये दुनिया इन्सानों की है थोड़ा  तो रुकिए,
पत्थर दिल वाले भी सब कोमल हो सकते हैं"
संदीप बाबत देखील असच म्हणावं लागेल,अनेक जण मी संदीप असा एकेरी उल्लेख करतो म्हणून भुवया उंचावतील मात्र तो माझा स्वभाव आहे,त्याला इलाज नाही,माझ्यापेक्षा संदीप ला जवळून ओळखणारे अनेक जण असतील मात्र मागच्या काही वर्षात त्याच्या बद्दल जे मला जाणवलं,जे समजलं,त्यातलं जेवढं मांडता येईल ते मी मांडल शेवटी म्हणतात ना ......
" सपनों के सच होने की तारीख नहीं होती,
आज न जो सच हो पाए वो कल हो सकते है
जीवन के हर पल को यूँ ही जीते चलिए बस, इनमें ही कुछ महके महके पल हो सकते है "
माझ्या या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,त्याच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण होवोत आणि त्यासाठी ईश्वर त्याला बळ देवो,त्याच्याकडून विधायक कामं होवोत याच शुभेच्छा .....!
लक्ष्मीकांत रुईकर,झी मीडिया ,बीड
9422744404.

सोमवार, २५ जुलै, २०१६

स्वयमेव मृगेंद्रता .........!

स्वयमेव मृगेंद्रता.........!

साधारपणे चार पाच दिवसापूर्वी राष्ट्रसंत भय्यू महाराज यांना भेटण्याचा योग आला,नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे महाराज येणार आहेत अस कळल्यानंतर तेथे जाऊन भेट घेतली,इतक्या दिवस महाराजांबद्दल फक्त ऐकून होतो,प्रत्यक्ष भेट चार पाच वेळा झाली होती,मात्र ती जुजबी अशीच होती,मात्र कोपर्डी येथे काहीशी निवांत भेट झाली,त्यांच्या बरोबर चर्चा करण्याचा योग आला,तब्बल एक दीड तास वेगवेगळ्या विशेषतः शेती आणि शेतकरी या विषयावर चर्चा झाली,त्यानंतर मनात विचार आला महाराजांची जी प्रतिमा आहे ती म्हणजे ते राजकीय गुरू आहेत त्यापेक्षा ते कितीतरी वेगळे आहेत,त्यांचा प्रत्येक क्षेत्रात गाढा अभ्यास आहे याची जाणीव झाली,अस कोणतंच क्षेत्र नाही ज्याची माहिती महाराजांना नाही,प्रत्येक क्षेत्राचा त्यांचा अभ्यास आणि अधिकारवाणीने बोलणं पाहून एका श्लोकाची आठवण झाली "नाभिषेको न संस्कारःसिहंस्य क्रियते नने । विक्रमार्जित सत्वस्य " 'स्वयमेव मृगेंद्रता '। अर्थात सिंहाला कोणत्याही अभिषेक किंवा संस्कार करून राजा हि उपाधी घेण्याची गरज पडत नाही कारण तो जंगलाचा अनभिषिक्त सम्राट हा आपल्या कार्यकौशल्यामुळे असतो,असच काहीस मला भय्यू महाराजांबद्दल जाणवलं .
आमचे मित्र डॉ सतीश लड्डा यांनी महाराज कोपर्डी ला येणार असल्याचं सांगितलं आणि मी त्यांच्यासोबत रवाना झालो,साडेचार पाच वाजेपासून महाराजांची भेट होईल यासाठीची प्रतीक्षा तब्बल रात्री नऊ वाजता संपली, खरं तर एवढा वेळ लागल्यामुळे मी काहीसा निराश झालो होतो,कदाचित मी पत्रकार असल्यामुळे माझ्यातील इगो मला त्याची सातत्याने जाणीव करून देत असावा कारण एवढा वेळ कोणाची भेट घेण्यासाठी थांबणं आमच्या (पत्रकार )स्वभावात नाही,अगोदर आम्ही नंतर सगळे हाच आमचा आजपर्यंतचा समज त्यामुळे लागणारा वेळ असह्य होत होता,उद्विग्न करीत होता ,पण दुसर मन थांबण्यासाठी  आग्रह करीत होत, शेवटी थांबूया काही वेळ काय होईल थोडा उशीरच होईल मात्र भय्यूजींच्या भेटीचा योग् पुन्हा कधी येईल हे सांगता येणार नाही म्हणून थांबलो आणि एका विचारवंत,प्रकांड पंडित,सर्वगुणसंपन्न,माणुसकीचा झरा असणाऱ्या महान दैवी योगपुरुषाला भेटण्याची संधी मिळाली
येणारा प्रत्येक जण महाराजांना अडचण सांगत होता ते त्याच्याशी बोलतं होते,मी मात्र कुळधरन गावातील शाळेत कधी एकदा हा सगळा प्रकार थांबतो याचाच विचार करीत होतो,महाराज कर्जत येथे निवांत भेटतील अस कळल्यानंतर आम्ही कर्जत ला गेलो,मात्र तेथेही गर्दी असल्यामुळे न भेटताच जावे असा विचार केला पण डॉ लड्डा याना महाराजांशी बोलायचे होते त्यामुळे थांबावे लागले मात्र महाराजांची भेट झाली आणि थकवा ,निराशा कुठल्या कुठे दूर पळून गेली,किती लोकांना तुम्ही इंटरटेन करता,जरा तब्येतीची काळजी घ्या,लोकांना समस्या कायम राहणारच आहेत मात्र आपल्याही काही मर्यादा आहेत अस त्यांना सांगावं असा विचार एकदा मनात आला मात्र त्यांची भेट झाल्यानंतर सगळं विसरून त्यांच्याशी बोलण्यात किती आणि कसा वेळ गेला ते कळलेच नाही,महाराज कर्जत येथे एका भक्ताच्या घरी गेले तेव्हा श्रीकांत चव्हाण यांनी माझी ओळख करून दिली,महाराजांनी सहजपणे वडिलांच्या तब्येतीची चौकशी केली ते गेल्याचं सांगितल्यानंतर गंभीर होत महाराजांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.
कोपर्डीच्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत अशा घटना का घडतात त्या कशा रोखता येतील,समाजाने काय केले पाहिजे,महिलांच्या रक्षणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील या विषयावर ते भरभरून बोलत होते,महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा दल स्थापन करण्याचा त्यांचा विचार आणि तळमळ यातून ते किती कोमल मनाचे आहेत याची जाणीव झाली.
आज पर्यंत महाराजांचा एकच चेहरा जगासमोर होता तो म्हणजे ते राजकीय गुरू आहेत,राजकारणी लोकांचा,उद्योजकांचा त्यांच्याकडे मोठा राबता असतो,ते अनाथ ,निराधार मुले,महिला यांच्यासाठी सेवाव्रतीने कार्य करतात,मात्र एवढ्या सगळ्या धावपळीत ते महिलांच्या सुरक्षेबाबत इतके जागरूक असतील याची कल्पना नव्हती,कोपर्डी येथे त्यांनी दोन बस मुलींना शाळेत ने आण करण्यासाठी दिल्या,या बस मध्ये सीसीटीव्ही ,हजेरी रजिस्टर,मोबाईल,अलार्म अशा सुविधा दिल्या आहेत, दोन बस त्यांनी बीड साठी दिल्याचं देखील आवर्जून सांगितलं आणि त्यांचं बीडवर किती बारीक लक्ष आहे हे लक्षात आलं.
कोपर्डी घटनेवर  चर्चा झाल्यानंतर  मीच त्यांना शेतीचा विषय काढला,दिवसभर हजारो लोकांना भेटून ते काहीशे थकले होते,त्यांना नगर ला जाऊन आराम करायचा होता मात्र शेतीचा विषय निघाला आणि महाराजांची पावलं थबकली,बीड जिल्ह्यातील शेती,शेतकरी,त्याच जीवनमान या विषयावर ते पोटतिडकीने बोलत होते,बीडसह मराठवाड्यात रासायनिक खताचा अतिरेकी वापर झाल्याने तेथील जमीन नापीक झाली आहे,कापूस आणि ऊस या दोनच पिकांवर शेतकऱ्याचा भर असल्याने इतर पिकं तो घेत नाही,त्यामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे तो सेंद्रिय खताच्या माध्यमातून सुधारण्यासाठी पुढील नऊ वर्ष परिश्रम घ्यावे लागतील हे सांगतांना त्यांची बळीराजसाठीची तळमळ दिसून आली.
मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्याबरोबरच रासायनिक खतांचा अति वापर थांबला पाहिजे यासाठी काय करता येईल याची चिंता त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती,शासन शेतकऱ्याला ठिबक सिंचनासाठी अनुदान देत मात्र त्यात शेतकरी कसा नागवला जातो आणि बँकांचे उखळ कसे पांढरे होते हे त्यांनी उदाहरण देऊन पटवून दिले तेव्हा मी अचंबित झालो,ठिबक सिंचन असो कि पीक कर्ज वाटप यामध्ये शेतकरी कसा भरडला जातो हे त्यांनी सांगितल्यानंतर आश्चर्य वाटले,त्यांच्या बोलण्यातून सरकार,त्यातील सत्ताधारी,प्रशासन ,लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल अपेक्षाभंगाचं दुःख दिसून आलं,सत्ता कोणाची असो शेतकर्याच्या आयुष्यात काही फरक पडत नाही त्यामुळेच आपण  मध्यंतरी सगळं सोडून देण्याचा विचार केल्याच त्यांनी बोलण्याच्या ओघात सांगितलं आणि मनात कालवा कालव झाली,महाराज लोकांना देखील दुःख ,चिंता,निराशा असते याचा अनुभव आला,
     दरम्यान आता शेती आणि शेतकरी याविषयावर  ते विचार करत असून शाश्वत शेती कशी करता येईल यासाठी पुढाकार घेण्याचं त्यांनी सांगितलं आणि मनाला बरं वाटलं .
गावगावांचा अभ्यास करून तेथील जमिनीमध्ये कोणती पीकं घेता येऊ शकतात,त्यासाठी कोणती खत आवश्यक आहेत,गटशेती केली तर काय फायदा होईल याविषयावर त्यांचा अभ्यास थक्क करणारा होता,महाराज म्हणजे लोकांना पाया पडून दक्षिणा घेऊन आशीर्वाद देणारा असा माणूस हे भय्यू जी बरोबर चर्चा केल्यानंतर खोटे वाटते.हे विश्वचि माझे घर हि ज्ञानोबा माउलींची संकलपना महाराज सत्यात आणत असल्याची जाणीव नक्कीच होते,त्यांना सर्वसामान्य माणूस,त्याच्या अडचणी  त्यावरील उपाय याबाबत किती आपुलकी चिंता आहे हे दिसत होते .
महाराज केवळ राजकीय गुरू नाहीत तर ते जगाच्या कल्याणाची चिंता वाहणारे आहेत याची त्या दिवशी खात्री पटली, म्हणजे मी काही त्यांचं मूल्यमापन करणारा नाही किंवा ती माझी पात्रता देखील नाही परंतु जे जाणवलं ते मी मांडल, "उद्योगमं, साहसम, धैर्यमं, बुद्धिहीं, शक्ती,पराक्रमः,षडेते यत्र वर्तन्ते,तत्र देव सहायकृत " ,अस जे म्हणतात ते भय्यूजींच्या सारख्या पुण्यशील व्यक्ती बद्दलच असावे यावर शिक्कामोर्तब झाले.त्यांचं हे कार्य असच अखण्डपणे सुरु राहावे यासाठी ईश्वर त्यांना बळ देतोच आहे यात शन्का नाही मात्र समाजानेही त्यांच्या या राष्ट्रबांधणीच्या कार्यात सहभाग घ्यावा एवढीच माफक अपेक्षा .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड.9422744404.

रविवार, १९ जून, २०१६

पाणी गावाला गेलं

पाणी गावाला गेलं

माझी मुलगी तिच्या काकूला दुपारच्या वेळी सहज विचारत होती,काकू आपल्या बोअर च पाणी कुठं गेलं,तिच्या काकूने जे उत्तर दिलं ते मलाच नव्हे तर आजच्या परिस्थितीला चपखल बसणारे असेच होते,"पाणी गावाला गेलं"हे तिच्या काकूंचे उत्तर माझ्या मनाला चटका लावून गेलं.
आमच्या बोअर च पाणी मे च्या अखेरीस अचानक कमी झालं,कॉलनीत सगळे बोअर कोरडे पडले असताना आम्ही मात्र नशीबवान होतो कारण भीषण दुष्काळात आमच्या बोअर ला भरपूर पाणी होत,बटन दाबलं कि पाणी सुरु व्हायचं,मात्र आमच्या पाण्याला नजर लागली अन पावसाळ्याच्या तोंडावर बोअर च पाणी कमी झालं,आजूबाजूला कोणी तरी बोअर घेतला असेल त्यामुळे पाणी कमी झालं असेल,जमिनीखालच पाणी आपली जागा बदलत असे एक ना अनेक विषय मग घरात चर्चिले गेले,
खऱ्या परिस्थिती बद्दल मात्र कोणीच बोलायला तयार नव्हतं,आज भूगर्भातील पाणी पातळी जी खोल गेली आहे ती काही एका रात्रीत झालेली जादू नाही,माणूस नैसर्गिक संपत्ती चा वापर योग्य प्रमाणात करीत नसल्याने आज माणसावर पाण्यासाठी दारोदार हिंडण्याची वेळ आली आहे,पाणी म्हणजे नीर जे विवेकाने वापरावे असे म्हणतात मात्र माणूस नेमकं याच्या उलट वागत गेला ज्यामुळे आज पाण्याच्या एका थेंबासाठी तरसावे लागत आहे
इतिहासाचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल कि अगदी राम कृष्णाचा काळ असो अथवा छत्रपती शिवरायांचा काळ या काळात पाण्याचं योग्य नियोजन कस करावं याला विशेष महत्व दिल गेलं होत,आजही शिवकालीन पाणी पुरवठा योजना नावाने जी योजना कार्यरत आहे ती शिवरायांच्या काळातील संदर्भावर आधारित अशीच आहे,
राज्याच्या मराठवाडा,विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग मागील तीन चार वर्षापासून दुष्काळाचा सामना करतो आहे,सातत्यानं कमी होणारा पाऊस,पाण्याचं बिघडलेले नियोजन,भूगर्भातील घसरत चाललेली पाणी पातळी,पाण्याचा बेसुमार उपसा यामुळे या भागात दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत,हा सगळा भूभाग हा शेतीवर आधारलेला असाच आहे,आणि शेती हि लहरी पावसाच्या जीवावर केली जाते त्यामुळे पाऊसाने दगा दिला कि शेती पिकतं नाही आणि बळीराजाच्या गळ्याला फास लागतो
     मराठवाडा असो कि विदर्भ या भागात मागील दहा बारा वर्षात किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून शेतीमध्ये नगदी पिकाच्या नावाखाली शेतकरी ऊस आणि कापूस याच पिकांवर जोर देतानाचे चित्र दिसते,एक एकर ऊस लागवडीसाठी साधारणपणे जेवढे पाणी लागते तेवढे पाणी एका गावाची महिनाभराची तहान भागवू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे तरी देखील आम्ही उसाची शेती करणं सोडलेलं नाही,ते सोडावं असा अट्टहास नाही मात्र ठिबक वर उसाची शेती केली तर पाण्याची बचत होऊ शकते,दुसर म्हणजे या उसाच्या शेतीत अंतर पीक घेतल्यास चार पैसे गाठीला राहू शकतात,मात्र एवढा बारकाईनं विचार कोण करतो आज काल ज्याला त्याला आजचा आताचा विचार सुचतो,त्यामुळे आज पाणी आहे ना मग वापरा बेसुमार नसेल तेव्हा बघू हि बेफिकीर वृत्ती वाढीस लागली आहे त्यामुळे आज पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
     केवळ शेतिमध्येच पाण्याचा बेसुमार उपसा होतो अस नाही तर शहरी भागातील लोकही भविष्याचा विचार न करता पाण्याचा अतिरेकी वापर करताना दिसून येतात,आज शहरीकरण वाढू लागलं आहे,फ्लॅट संस्कृती वाढीस लागल्याने घर तिथं बोअर पद्धत रूढ झाली आहे त्यामुळे फुटाफुटावर बोअर दिसू लागले आहेत,जमिनीची अक्षरशः चाळण केली जात आहे,शंभर किंवा दोनशे फुटापर्यंत  बोअर खोदण्यास परवानगी आहे मात्र  नियम तोडण्यात धन्यता मानणाऱ्या आम्ही लोकांनी पाण्याच्या थेंबासाठी हजार फुटापर्यंत जमिनीला छिद्र पाडली, तरी देखील पाणी लागेनास झालं आहे,बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात देवी निमगाव या गावात एका शेतकऱ्याने दहा वर्षात त्याच्या शेतात 48 बोअर घेतले आहेत विशेष म्हणजे त्यातील फक्त चार ते पाच बोअर ला आज पाणी आहे,यासाठी त्याने किमान पंचवीस लाख रुपये खर्च केले असतील,हि वेळ आज मराठवाडा ,विदर्भ या भागातील लोकांवर का आली याचा कधीतरी गांभीर्यानं विचार होणार आहे कि नाही .
वाढत्या शहरीकरणामुळे शहर बकाल होत आहेत,अवाढव्य वाढणाऱ्या शहरांना आणि शहर वासियांना मूलभूत सोयी सुविधा पुरवणे नगर परिषद प्रशासनाला कठीण होत आहे मात्र त्यांनी जो नागरिक बांधकाम परवानगी मागण्यास येईल त्याने जल पुनर्भरण अथवा पावसाच्या पाण्याचं बोअर मध्ये पुनर्भरण करण्याचं मान्य केल्यास आणि ते केलं आहे कि नाही याची खात्री करूनच परवानगी देण्याचा नियम लावल्यास काही प्रमाणात लोकांवर वचक बसेल असे वाटते.
एका पाचशे फुटाच्या गच्चीवर एका रात्रीत साधारण पाऊस झाल्यास दीड ते दोन हजार लिटर पाणी जमा होऊ शकते,हेच पाणी प्रत्येकाने आपल्या बोअर अथवा आडात किंवा जमिनीत मुरवले तर खालावत चाललेली पाणी पातळी काही प्रमाणात का होईना पण सुधारण्यास मदत होईल यात शंका नाही.शहरात बेसिन असो अथवा संडास बाथरूम सर्वत्र जे फ्लश वापरले जातात त्याद्वारे रोज हजारो लिटर पाणी नालीत वाया जात मात्र याचा विचार ना लातूर करांनी केला ना बीड करांनी मग आज हे सगळे लोक बसले आहेत बोंबा मारत,तेव्हा विनाकारण निसर्गाचा लहरीपणा ,देवाची अवकृपा या गोष्टीवर चर्चा करीत  बसण्यापेक्षा पाण्याचा योग्य वापर,शेतीमध्ये पाण्याचं योग्य नियोजन,भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी जलपुनर्भरण यासारखे प्रयोग राबवणे आवश्यक आहे,
    आज प्रत्येक गावात जलयुक्त शिवार अथवा इतर माध्यमातून पाणी साठवण्याची काम केली जात आहेत  त्यामुळे यंदाचा पावसाळा शिवारातील पाणी शिवारात साठवण्यासाठी उपयोगी ठरेल यात शंका नाही,प्रत्येक गावात जे सांडपाणी रस्त्यावर अथवा नालीमध्ये सोडलं जात ते  गावातील मोकळ्या जागेवर एक मोठा खड्डा खोदून त्यात सोडले तर  गावातील पाणी पातळी वाढण्यास मदत होऊ शकते , त्याच पद्धतीने गावातील प्रत्येक घरासमोर सांडपाण्याचा वापर करून झाडं लावली तर ती सावली बरोबरच पाऊस पाडण्यास मदत करू शकतील .
     माणसाने पाणी हे जीवन आहे ते जपून वापरावे लागते याचा धडा घेतल्यास आणि पाण्याच्या वापराचे नियम काटेकोर पणे पाळल्यास पाणी पुन्हा कधी गावाला जाण्याचा विचार करणार नाही अशी आशा करायला हरकत नाही,आज पाणी काही दिवस गावाला अथवा सुट्टीवर गेलं तर आपले हाल बेहाल सुरु आहेत विचार करा पाण्यानं जर संप अथवा बेमुदत गावाला जाण्याचा विचार केला तर आपले कसे होईल.तेव्हा पाणी गावाला जाणार नाही यासाठी सर्वजण प्रयत्न करूया आणि पाणी वाचवूया .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड

रविवार, १७ एप्रिल, २०१६

सुपारी पत्रकारिता म्हणजे काय

सुपारी पत्रकारिता म्हणजे काय?
आज काल पत्रकारांना किंवा चॅनेल ला नाव ठेवणे,त्यांच्या नावाने बोंब मारणे हि एक फॅशन झाली आहे,वर्षातील 365 दिवसांपैकी 350 दिवस ज्या नेत्यांच्या बातम्या हि वर्तमानपत्र किंवा चॅनेल लोकांपर्यंत पोहचवतात त्या नेत्यांना एखादी दुसरी बातमी विरोधात आली कि त्यांचा तिळपापड होतो,मग त्यांचे कार्यकर्ते माध्यमांच्या नावाने बोटं मोडायला सुरवात करतात,वास्तविक पाहता माध्यमं हि लोकांमध्ये जागृती करण्याचं काम करतात पण ज्या लोकांच्या जीवावर आपलं राजकारण (दुकान)सुरु आहे त्या लोकांच्या समस्या मांडून त्याबद्दल नेत्यांना जाब विचारला तर या नेत्यांची तळपायाची आग मस्तकाला जाते
काल परवा असाच प्रकार बीड मध्ये घडला,जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांची बीड ला खरीप आढावा बैठक होती,या बैठकीनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना बियर च्या कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्या बद्दल प्रश्न विचारण्यात आला,तसा हा प्रश्न काही वावगा नव्हता ,त्यांनी त्याचे उत्तर दिले,ज्यामध्ये त्यांनी कारखान्यांना लागणारे पाणी आरक्षित असते त्यामुळे ते पाणी बंद करणे योग्य होणार नाही कारण त्यामुळे अनेक लोक बेरोजगार होतील असं मत मांडल, त्यांचं मत वाईट नव्हतं,मात्र एकीकडे मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळ असताना आणि पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना रेल्वेने पाणी आणावं लागत असताना कारखान्यांना जर कोट्यवधी लिटर पाणी दिले जात असेल तर त्याबाबतीत विचार केला जाऊ शकतो,मात्र मंत्री मुंडे यांनी वेगळी भूमिका मांडली, त्यांची भूमिका माध्यमांनी दाखवली आणि मुंडे यांचा संताप झाला
माझी बदनामी करण्याचा विडा उचलला आहे,सुपारी घेऊन पत्रकारिता केली जात आहे,या पत्रकारांसमोर तुकडे फेकले कि हे शांत होतील अस आणि इतर बरच काही त्या बोलल्या,वास्तविक पाहता माध्यमांनी ज्या बातम्या दाखवल्या त्यात काय चूक होत हे त्या सांगू शकल्या नाहीत,जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पदाचा विषय असो कि शनी शिंगणापूर चा विषय असो मला विनाकारण बदनाम केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला ज्यात तथ्य काहीच नाही असं दिसत ,
पंकजा मुंडे या राज्यात संघर्ष यात्रेच्या निमित्ताने असो कि जलयुक्त शिवार च्या माध्यमातून असो फिरल्या तेव्हा याच माध्यमांनी त्यांना मोठा स्पेस दिला,भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना संबोधलं,त्या गावागावात गेल्या तेव्हा त्याची बातमी कव्हर केली अस असताना कधीच पंकजा यांना मीडिया किंवा पत्रकार सुपारी घेऊन बातम्या करतात अस वाटलं नाही,बरं त्यांच्या विरोधात सुपारी देणार कोण आणि घेणार कोण कारण केवळ त्यांची बदनामी करायचा विषयच नाही मग त्यांनी हा आरोप कशाच्या आधारावर केला,असा अनुभव त्यांना कोणत्या जिल्ह्यात किंवा माध्यमाच्या बाबतीत आला असेल तर त्यांनी तस जाहीर सांगावं,राज्यात आज अनेक समस्या आहेत,पाण्याचं संकट भीषण आहे अशा वेळी सरकार वर टीका टिप्पणी होणारच,सरकार म्हणून घेणारे मंत्री ,अधिकारी याना प्रश्न विचारले जाणारच त्यात वावगं अस काय आहे,पाण्याची समस्या आ वासून उभी असताना खडसे सारख्या मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी हेलिकॉप्टर साठी हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असेल तर त्याची बातमी होणारच,मोबाईल च बिल भरायला शेतकऱ्याकडे पैसे आहेत अस वक्तव्य खडसेंनी केल्यानंतर त्याचा समाचार घेतला जाणारच मग त्यावरून माध्यम बेजबाबदार कशी ठरवायची,
राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी टोल मुक्ती असो कि कर्जमाफी च्या घोषणा करणाऱ्या सेना भाजप च्या पुढार्यांना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडला असेल तर माध्यमांनी त्याची आठवण करून दिली तर माध्यम सुपारी घेऊन बातम्या करतात हे म्हणन कितपत योग्य आहे,माध्यमांनी केवळ सरकार,मंत्री ,अधिकारी यांचे गोडवे गावेत आणि मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करावे अस यांचं म्हणन असेल तर ते करण योग्य होणार नाही,माध्यम हि जागल्याची भूमिका करीत असतात,मग त्यात काही लोक अपवाद असू शकतात मात्र त्यामुळे सगळे एक जात चोर आहेत अस कस म्हणता येईल,पंकजा मुंडे यांच्या कामाचा झपाटा पाहिला तर थक्क व्हायला होत,त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले तेव्हा याच माध्यमांनी किंवा प्रतिनिधींनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे याचा त्यांना विसर पडला कि काय,99 चांगल्या बातम्या छापल्या नंतर कधीच त्याची दखल न घेणाऱ्या या नेत्यांना एक बातमी विरोधात आली कि जमत नाही अस का?
पंकजा मुंडे यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी जे निर्णय घेतले,किंवा ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याची दखल नेहमीच मीडिया ने घेतली आहे,बीड ला त्या जे बोलल्या तेच चॅनेल वरून दाखवलं गेलं,मात्र त्यांचं म्हणन तोडून मोडून ट्विस्ट करून दाखवल्याचा आरोप त्यांनी केला ज्यात काही तथ्य नाही,त्यांच्या विभागाने जे काम केलं,किंवा सरकार जे काम करत ते माध्यमांनी दाखवायचं नाही अस ठरवलं तर चाललं का?अस कोणी करणार नाही मात्र सुपारी घेऊन पत्रकारिता केली जात असल्याचा त्यांचा आरोप दुर्दैवी म्हणावा लागेल,बीड सारख्या जिल्ह्यात बहुतांश पत्रकार या वृत्तीचे नाहीत,बरं जे इ मीडिया प्रतिनिधी आहेत त्यांना पंकजा मुंडे यांनी कितीवेळा त्यांच्या भाषेत तुकडे टाकले,कार्यक्रम कव्हर करणे ऑफिसला पाठवणे हे काम ते बिचारे करतात,मात्र आमच्या कार्यक्रमाला या किंवा कव्हर करा अस देखील खुद्द मंत्री महोदया किंवा त्यांच्या यंत्रणेकडून कधीच सांगितलं जात नाही,मंत्र्यांना नसेल वेळ मिळत पण खालची यंत्रणा तर हे काम करू शकते ना,मग ते देखील होत नाही,बरं निरोप आलाच तर त्यांच्या कडून कधी काही मिळण्याची अपेक्षा केली जात नाही,काही लोक असतीलही ज्यांना मंत्री आले कि दारात उभं राहायची सवय आहे,ते स्वतःच्या स्वार्थासाठी असले उद्योग करीत असतीलही म्हणून सगळेच तसे आहेत हे म्हणन योग्य नाही,पत्रकार परिषदेत यायचे मंत्री,पुढारी जे सांगतील ते ऐकायचे आणि नंतर त्यांच्या कानाला लागून त्यांना हव्या तश्या बातम्या करायच्या हा उद्योग काही लोक करीत असतील,मात्र बहुतांश पत्रकार वेगळी काही बातमी मिळते का यासाठी प्रयत्नशील असतात,अशावेळी प्रश्न,उपप्रश्न विचारले जातात,मात्र त्यामुळे त्या पत्रकारांचा संबधित नेत्यांबद्दल पर्सनल काही मतभेद आहे असं नसत,केवळ प्रसंगानुरुप ते प्रश्न विचारलेले असतात पण असे प्रश्न विनाकारण बदनाम करण्यासाठी विचारले जात असल्याचा या नेत्यांचा गैरसमज होतो किंबहुना करून दिला जातो,त्यामध्ये काही तोंडपूजे कार्यकर्ते तर असतातच मात्र काही पत्रकारही आघाडीवर असतात आशा वेळी खऱ्या पत्रकारांची अडचण होते.
मागील पंधरा सोळा वर्षाच्या पत्रकरितेमध्ये मला तरी अजून सुपारी पत्रकारिता कशी करायची असते हे समजलेले नाही,माझ्यासारखा माणूस तोंडावर प्रश्न विचारून मोकळा होतो अनेक वेळा समोरच्या व्यक्तीला ते पटत नाही म्हणून मी प्रश्नच विचारायचे नाही हे कितपत योग्य आहे,प्रश्न विचारणं माझं काम आहे उत्तर द्यायचे कि नाही हे त्यांनी ठरवावं,बीड च्या पत्रकरितेमध्ये सगळेच धुतल्या तांडळासारखे आहेत असंही म्हणन नाही मात्र त्याच वेळी सगळेच चूक आहेत हे म्हणन देखील संयुक्तिक नाही अस मला वाटत,शेवटी काय हा ज्याच्या त्याच्या विवेकाचा भाग आहे,पण मीडिया ने केलेली टीका हि एवढी पर्सनल घेत नसतात हे मात्र नक्की
लक्ष्मीकांत रुईकर,झी मीडिया बीड

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

राजकारण गडाचं

राजकारण गडाचं
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या वेगळ्या कार्यशैली मुळे परिचित असलेले स्व.गोपीनाथ मुंडे यांची ओळख महाराष्ट्राला आणखी एका कारणामुळे आहे,ती म्हणजे भगवानगड.पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पाथर्डी तालुक्यात असलेला भगवानगड विशेष चर्चेत आला तो मुंडे यांच्या मुळेच,साधारण पणे 12 वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगड च्या गादीवर नामदेव शास्त्री सानप यांना बसवले,मुंडे आणि गड हे समीकरण राज्याच्या राजकारणात मागील दहा बारा वर्षात परिचित झाले होते,दरवर्षी भगवान बाबाच्या पुण्यतिथी आणि जयंती निमित्त गडावर मोठी यात्रा भरते,तसेच विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी मुंडे देशात कोठेही असले तरी गडावर येत,आणि त्या ठिकाणी त्यांची टोलेजंग सभा होई,अगदी दीड वर्षांपूर्वी मुंडे केंद्रात मंत्री झाल्यानंतर राज्यात सर्वप्रथम आले ते भगवान गडावर,या गडाने मुंडेंच्या मागे मोठी ताकद उभी केली,विशेषतः वंजारी समाजाची एकगठ्ठा मते मुंडेंच्या मागे गडामुळे राहिली ,त्यामुळेच राज्यातील सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षातील लोकही मुंडेंच्या या ताकदीपुढे नतमस्तक होत असत,
मुंडे यांच्या अकाली निधनानंतर भगवान गडावरून महंत नामदेव शास्त्री सानप यांनी पंकजा मुंडे यांना गडाची मानसकन्या जाहीर केले,मुंडेंच्या दहाव्या आणि तेराव्या दिवशी नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका मांडली होती,तेथेच गोपीनाथ गडाची मुहूर्त मेढ रोवली गेली आणि सुरु झाला भगवान गड (नामदेव शास्त्री)आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष.
गोपीनाथ गड हा येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरावा हा पंकजा यांचा उद्देश होता,त्यात वावगे असे काहीच नव्हते,मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी शास्त्री यांनी गोपीनाथ गड हा राजकीय गड असेल आणि भगवानगड हा धार्मिक गड असेल,या पुढे भगवान गडावर राजकीय भाषणे होणार नाहीत असे जाहीर केले आणि उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या,आजपर्यंत भगवान गडावरून मुंडे राजकारण करतात अशी दबक्या आवाजात होणारी चर्चा शास्रीनच्या घोषणेमुळे खुलेआम झाली,कदाचित येथेच पंकजा आणि शास्त्री यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली असावी,
राज्यामध्ये भगवानगड ला मानणारा मोठा समाज आहे,केवळ वंजारी समाजाचा गड अशी असणारी प्रतिमा आजही कायम आहे ,वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे,या गडावर सर्व जाती धर्मातील लोक श्रद्धेने येतात,परंतु मुंडे यांचा गडावरील वावर पाहता हा गड वंजारी समाजाचा असावा असा अनेकांचा समज आहे,
भगवान गडावरून यापुढे दसरा मेळाव्यात राजकीय भाषण होणार नाही असा निर्णय नुकताच नामदेव शास्त्री यांनी जाहीर केला,मध्यंतरी पंकजा आणि शास्त्री यांच्यात धुसफूस सुरु असल्याच्या बातम्या होत्या,काही कार्यक्रमानिमित्त पंकजा या गडावर गेल्या तेव्हा शास्त्री आणि त्यांच्यात विसंवाद वाढल्याच्या सुरस बातम्या आल्या होत्या,त्याचे खंडन ना पंकजा यांनी केले ना शास्रीनी केले,दसरा मेळावा होणार कि नाही यावरून शास्त्री विरुद्ध काही पुढाऱ्यांनी शेरेबाजी देखील केली होती,पंकजा यांना मानस कन्या जाहीर केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील गडावर झाला होता हे सर्वश्रुत आहे,अशा वातावरणात गड ,शास्त्री आणि पंकजा यांच्यात दुरावा आल्याचे स्पष्ट जाणवत होते,
पंकजा यांना गड ताब्यात घ्यायचा आहे तर शास्रीना कोणाची लुडबुड नको आहे अशा चर्चा जोरात सुरु आहेत, कोण चूक कोण बरोबर यावर मतमतांतरे असू शकतील मात्र सुरु असलेला वाद समाजाला देखील मान्य नसल्याचे दिसते, राज्याच्या राजकारणात आपला दबाव कायम ठेवायचा असेल तर समाजाची ताकद आपल्या मागे कायम कशी राहील यासाठी गड आपल्या ताब्यात कसा राहील यासाठी पंकजा यांचा प्रयत्न सुरु असल्यास त्यात वावगे काहीच नाही,कारण स्व गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणात दबदबा निर्माण करण्यात गडाचा सिंहाचा वाटा होता हे कोणीच अमान्य करणार नाही,त्यामुळे गडाची ताकद आपल्या मागे राहावी यासाठी पंकजा यांचा प्रयत्न असल्यास चुकीचे काहीच नाही मात्र त्यासाठी त्यांनी जो मार्ग निवडला आहे तो कदाचित चुकीचा असू शकतो,
कोणी काहीही म्हणो भगवान गडावरून एकदा आदेश मिळाला कि मग समाज कोणाचेच ऐकत नाही हे सर्वच राजकीय पक्षांना चांगलेच माहित आहे,त्यामुळे गडावर दसरा मेळावा होणारच आणि तेथे आपण भाषण करणारच असा जर पंकजा यांचा आग्रह असेल तर त्यात त्यांचा काही दोष नाही असेच म्हणावे लागेल
मात्र त्यासाठी थेट नामदेव शास्त्री सानप यांना आव्हान देणे पंकजा यांना निश्चितच न परवडणारे आहे,कारण गड कि पंकजा असा निवाडा करावयाचा झाल्यास समाज गडाच्या पाठीशी राहील यात शंका नाही,त्यामुळे पंकजा यांना सध्यातरी शांतपणेच निर्णय घ्यावा लागेल.
निवडणुकांना अद्याप साडेतीन वर्षाचा कालावधी असला तरी पंकजा यांची घाई त्यांच्या पुढील राजकारणाला मारक ठरू शकते असे राजकीय धुरिणांचे मत आहे,पंकजा यांनी गड आपल्याला सर्वोच्च आहे,त्याचे कोणी राजकारण करू नये अशीच भूमिका घेणे क्रमप्राप्त आहे असे अनेकांचे मत आहे,मात्र पंकजा यांचा एकंदर कारभार आणि राजकारण करण्याची पद्धत पाहता त्या असे वागतील याबाबत अनेकांना शंका आहे,त्यामुळे आगामी काळात गड (शास्त्री)विरुद्ध पंकजा असा संघर्ष अटळ असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...