मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०१७

देवेंद्राचा कार 'भार'..........!

देवेंद्राचा कार 'भार'


तुम्ही आम्ही देवेंद्राचा जो काही अवतार पाहिला आहे तो केवळ सिनेमा किंवा वेगवेगळ्या डेली सोपं मधूनच ,त्यात देवेंद्राचे जे दर्शन घडते त्यानुसार हा देवांचा देव ,स्वर्गाचा मालक,राजा किती हतबल,ऍडजस्ट करून घेणारा आहे हे लक्षात येते,राजाची खुर्ची दुरून साजरी दिसत असली तरी त्यावर बसून कारभार करणे किती अवघड आहे हे काल्पनिक कथांमधून का होईना लक्षात येतं, अशीच काहीशी अवस्था राज्याचा कारभार हाकणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची झाल्याचे तीन वर्षांच्या कारभारानंतर दिसते.सहकाऱ्यांच्या चुकांवर पांघरून घालत आपली इमेज जपताना फडणवीस यांना मोठी कसरत करावी लागल्याचे दिसते मात्र तरी देखील सामान्य माणसाच्या मनात एक चांगलं सरकार ही इमेज निर्माण करण्यात ते यशस्वी झाले हाच त्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा प्लस पॉईंट म्हणावा लागेल.

राज्यातील दहा वर्षांच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारभाराला जनता कंटाळली होती,त्यामुळे भाजपने लावलेला जोर आणि मोदी लाट यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या गलबताचा बुडून शेवट होणार हे निश्चित होते,त्यानंतर सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकार समोर अनेक आव्हान होती,विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जरा जास्तच होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही,काँग्रेस राष्ट्रवादी सारखे दृश्य आणि शिवसेनेसारखे अदृश्य विरोधक यांना तोंड देता देता पक्षांतर्गत संघर्षाला देखील त्यांना सामोरे जावे लागणार होते,गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला तर ते या सर्व आघाड्यावर यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल.

सत्तेत असूनही कायम फडणवीस यांच्या सरकारवर तोंडसुख घेणारे शिवसेनेचे नेते असोत की विनाकारण नको त्या गोष्टी करून किंवा बडबड करून सरकारवर नामुष्की ची वेळ आणणारे सहकारी मंत्री असोत देवेंद्र यांच्या डोक्याला कायम ताण च राहिला आहे.कुठे नेवून ठेवलाय  महाराष्ट्र माझा अस पोटतिडकीने म्हणणाऱ्या माणसाला सुखी करण्याचं खडतर काम देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर होतं. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसून येते .

सरकारने जे लोकाभिमुख निर्णय घेतले त्यात सामान्य माणसाचे किती कल्याण झाले हा संशोधनाचा भाग असला तरी चित्र निर्माण करण्यात मात्र फडणवीस यशस्वी झाले हे नक्की.दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या बळीराजाला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून संपन्न करण्याचा प्रयत्न असो की कर्जमाफीचा विषय,सरकार ने आपली इमेज निर्माण केली हे खरे आहे .

मराठा आरक्षण असो की वेगवेगळे संप,आंदोलन ,मुख्यमंत्री म्हणून ते व्यवस्थित हाताळण्याचे कसब फडणवीस यांनी दाखवले हे मान्य करावेच लागेल,एकीकडे राज्यातील स्वपक्षीय,मित्रपक्षांना खुश करण्याची सर्कस करताना दिल्लीकरांची मर्जी सांभाळणे देखील महत्वाचे होते,त्यात फडणवीस शंभर टक्के उत्तीर्ण झाल्याचे दिसते.राज्य सरकार लोकाभिमुख झाले आहे,या सरकारला सामान्य माणसाची काळजी आहे,पारदर्शक पणा दिसतो आहे अशी भावना आज तरी सामान्य मराठी माणसाच्या मनात निर्माण झाली आहे कदाचित त्यामुळेच थेट नगराध्यक्ष असोत की थेट सरपंच यामध्ये भाजपला मोठे यश मिळाल्याचे दिसून येते.

गेल्या तीन वर्षात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या सरकारचा चेहरा मोहरा हे एकटे फडनविसच आहेत,बाकी सगळे मंत्री खूप लांब आहेत,देवेंद्र फडणवीस यांची क्लीन इमेज,पंधरा अठरा तास काम करण्याची क्षमता,थेट प्रत्येक खात्यात काय चालले आहे याची इत्यंभूत माहिती देणारी यंत्रणा यामुळे आज तरी फडणवीस हे सर्वांपेक्षा उजवे ठरतात .राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर अनेकवेळा थेट हल्ला करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना मात देण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले हे नक्की.

सरकारला तीन वर्षे पूर्ण होताना शिक्षण ,सार्वजनिक आरोग्य,बांधकाम,नगरविकास,ऊर्जा या खात्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक वाटते,जनतेशी थेट संबंध असणाऱ्या या खात्यात आजही आघाडी सरकारच्या काळातीलच बजबजपुरी कायम आहे,रोज नवे नवे निघणारे जी आर,शिक्षकांच्या बदल्या असोत की बढत्या, यावरून मोठी नाराजी आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आजही सलाईनवर आहे,राज्यात एकही प्रमुख राज्य किंवा राष्ट्रीय मागमार्ग असा नाही की त्यावर खड्डा नाही,लोडशेंडिंग मुळे जनता नाराज आहे त्यामुळे येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या विभागात अधिक चांगले लक्ष देऊन रिझल्ट द्यावे लागतील,केवळ स्वच्छ कारभार,पारदर्शक पणा या गोष्टीवर पुन्हा सत्तेचा सोपान चढता येणे अवघड आहे,त्यामुळे सत्तेचा थेट लाभ ज्या विभागामार्फत जनतेपर्यंत पोहचतो त्या विभागावर जास्त लक्ष देऊन गतिमान कारभार करावा लागेल हे निश्चित .

कापूस ,सोयाबीन,मूग,उडीद यासारख्या पिकांच्या खरेदी साठी सरकारने ऑनलाईन नोंदणी चा घेतलेला निर्णय व्यापारी आणि दलालांच्या जोखडातून बळीराजाला मुक्त करणारा आहे,मात्र ही गोष्ट सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात सरकारी आणि पक्षीय यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

एकूणच काय तर आता यापुढे फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मागील सरकारवर खापर फोडून आपल्या चुका झाकता येणार नाहीत,तसेच शासन हे सामान्य माणसाची काळजी करणारे आहे हे अधिक गडद पणे दाखवून द्यावे लागेल,कारण येणाऱ्या वर्षभरात कधीही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजू शकतो त्या दृष्टीने वाटचाल भविष्यात करावी लागेल हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404



रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

लेकीनं गड राखला ......!

लेकीनं गड राखला ........!

कौन कहता है की आसमान मे छेद नही हो सकता, एक पत्थर तो तबियत से उच्छालो यारो ! अस जे म्हटलं गेलं आहे ते सार्थ ठरविणार दृश्य शनिवारी सावरगाव येथे दिसून आलं.स्व गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा वादात अडकली अन खंडित झाली,मात्र त्यामुळे न डगमगता पंकजा मुंडे यांनी अवघ्या दोन दिवसात हाच दसरा मेळावा भगवान बाबा यांच्या जन्मभूमीत यशस्वी करून दाखवला अन समाज आपल्याच पाठीशी असल्याचे दाखवत विरोधकांचे दात घशात घातले .त्याच बरोबर कितीही संकट आली तरी " बघतोस काय रागानं गड राखलाय लेकीनं " हा संदेश देण्यात त्या यशस्वी झाल्या.

महाराष्ट्राच्या राजकारणात कायम या ना त्या कारणाने चर्चेत असणाऱ्या नावांपैकी एक नाव म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे होय.बेधडक बोलणे,निर्णय घेतांनाचा बिनधास्तपणा,परिणामाची फिकीर न करता मनात आलं ते बोलणे ,सभा समारंभात लोकांना काय अपेक्षित आहे तेच बोलणे यामुळे पंकजा नेहमीच मीडियामध्ये आपलं वेगळं स्थान टिकवून आहेत.राज्याच्या राजकारणात त्यांना मानणारा एक मोठा समूह आहे,कदाचित ती स्व गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई देखील असेल मात्र त्यांच्या नंतर ती जपण्याचं काम पंकजा मुंडे यांनी केलं आहे .लाखोंच्या सभा आपल्या वक्तृत्व शैली ने कशा गाजवायच्या हे गोपीनाथ मुंडेंना कधी सांगावे लागले नाही तशीच परिस्थिती पंकजा यांच्या बाबतीत ही आहे . आजही त्यांच्या सभांचे रेकॉर्ड कोणी  तोडू शकेल असे वाटत नाही .मात्र नेता जेवढा मोठा होत जातो तेवढाच तो सत्य परिस्थिती आणि वास्तवापासून दूर जातो की काय असे वाटण्यासारखे पंकजा यांच्याबाबतीत घडू लागले ,त्यातूनच मग भगवान गडाच्या वादाचा जन्म झाला .

पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील मतभेद मागच्या वर्षी राज्याने पाहिले, मात्र तरीदेखील यावर्षी भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याचा अट्टहास पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी धरला होता,स्वतः पंकजा मुंडे मात्र याबाबत कमालीच्या शांत होत्या,अनेकांनी त्यांना याबाबत बोलत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी संयम ढळू दिला नाही.गड ही आपली श्रद्धा आहे अन भक्त ,समाज ही शक्ती आहेत हे त्यांनी वारंवार ठासून सांगितले.त्याच बरोबर महंत यांच्या नावे एक पत्र लिहून त्यांनी चेंडू महंतांच्या कोर्टात ढकलला ,मी लहान झाले मात्र ते ऐकत नाहीत हा  मॅसेज देण्यात त्या यशस्वी झाल्या.

साधारणपणे दोन  दशकांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी समाजाच्या उत्थानासाठी भगवान गडावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली,त्याचा त्यांना राजकीय आयुष्यात देखील मोठा फायदा झाला,आपल्याच नव्हे तर विरोधी पक्षात देखील त्यांनी समाजाच्या जीवावर एक दबदबा निर्माण केला होता . त्यांच्या मेळाव्यातून चेतविलेलं स्फुल्लिंग राजकीय उलथापालथी घडवून आणण्यास उपयोगी पडत असे.

मुंडे यांनी समाजाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केल्याने कोठे काय बोलायचे,कधी बोलायचे हे त्यांना पक्के माहीत होते,मात्र त्यांच्या अकाली जाण्यानंतर एकाकी पडलेल्या पंकजा यांची सुरवातीला चिडचिड झाली,त्याचा फायदा घेत विरोधकांनी त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला अन त्यात ते यशस्वी झाले,त्यातूनच मग भगवान गडाचा वाद घडवून आणला गेला अन त्यात पंकजा मुंडे यांच्या नशिबी नको तेवढी टीका आली,वास्तविक पाहता त्याला कारण पंकजा यांचा स्वभाव देखील होताच ,मात्र वडीलकीच्या नात्यानं शास्त्री यांच्याकडून समाजाला जास्त अपेक्षा होत्या,पण त्यांनी देखील उभा दावा असल्यासारखं सुरू केलं अन त्यात गड बदनाम झाला.महंत यांनी अधिकार वाणीने या वादावर पडदा टाकणे अपेक्षित होते मात्र नियतीला कदाचित ते मान्य नसावे म्हणूनच गडावर वंजारी समाजाचे दोन गट निर्माण झाले,त्यातून पंकजा यांच्या नेतृत्वावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते .पंकजा यांच्या मागे समाज आहे की नाही असा देखील सवाल उपस्थित केला गेला .

दरम्यान यावर्षी  दसरा दोन दिवसावर आला असताना पंकजा मुंडे यांनी हा मेळावा सावरगाव या भगवान बाबा यांच्या जन्मगावी घेण्याचा निर्णय घेतला अन वादावर पडदा पडल्याचे काही जणांना वाटले,मात्र हा वाद इथेच संपेल असे वाटत नाही .कारण राजकीय आकांक्षा ,अपेक्षा एकीकडे आहेत तर दुसरीकडे धार्मिक श्रेष्ठत्व आहे, त्यामुळे हा वादाचा निखारा कायमस्वरूपी धगधगत राहणार असे आज तरी दिसते .

सावरगाव येथे अवघ्या दोन दिवसात लाखो लोक येतील अन सामावतील याची पुरेपूर काळजी घेतली गेली .
नेटके नियोजन,अल्पकाळात समाजात मेळाव्याच्या नव्या स्थळाबाबत गेलेला मॅसेज यामुळे लाखो लोक याठिकाणी पंकजा काय बोलतात,कोणती भूमिका घेतात हे ऐकण्यासाठी आले होते,अगदी नाशिक,बुलढाणा,सोलापूर आशा दूरवरून लोक आले होते . मेळावा यशस्वी होणार की नाही,लोक जमतील की नाही या बाबत अनेकांच्या मनात शंका होती मात्र समाजाने पंकजा यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.

एवढ्या मोठ्या समाजासमोर काय बोलावे अशा गोंधळलेल्या अवस्थेत पंकजा यांनी जो ट्रॅक पकडला तो निश्चित पणे समाजाला दिशा देणारा असाच होता,जास्त भडक ही नाही अन जास्त मिळमिळीत ही नाही अशा पद्धतीने त्यांनी समाजाचे ब्रेन वॉश केले.संघटन कौशल्य कसे करावे हे कोणत्याही मुंडे ला कोणी सांगायची गरज नाही याची प्रचिती पुन्हा एकदा पंकजा यांच्या रूपाने दिसून  आली .आपलं अख्ख आयुष्य संघर्षात घालवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाचा सुद्धा वारसा पंकजा या समर्थपणे चालवीत आहेत नव्हे त्यासाठी त्याच योग्य आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवले .हुबेहूब गोपीनाथ मुंडे यांची स्टाईल,तसेच हावभाव,त्याच पद्धतीने भाषणाची लकब,हातवारे ही आता पंकजा मुंडे यांची सुद्धा ओळख होऊ लागली आहे.

उघड्या जीप मधून कार्यक्रम स्थळी आल्यानंतर  दोन्ही हाताच्या मुठी आवळून ज्या स्टाईलने त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले त्यामुळे तेथे हजर असणाऱ्या लोकांमध्ये नवा जोश निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले ,त्या ज्या पद्धतीने जीप मधून उतरल्या ते पाहिल्यानंतर अनेकांना मुंडे साहेबांची आठवण झाली असेल .त्यानंतर जळगाव चे कोण आलेत,बुलढण्याचे आलेत ना अस म्हणून समोर बसलेल्या लोकांशी थेट संवाद साधण्याच त्यांचं कौशल्य दिसून आलं.सावरगाव या तशा दुर्गम भागाने काल मुंडे नावाच्या जादूचा अनुभव घेतला . पंकजा यांच्या या निर्णयामुळे सावरगाव हे  नवीन श्रद्धास्थान निर्माण होणार यात शंका नाही मात्र त्याचवेळी भगवान गड देखील समाजाच्या मनात कायम राहावा यासाठी पंकजा यांनी पुढील काळात प्रयत्न करायला हवेत .मात्र पंकजा मुंडे यांचा राजकीय स्वभाव पाहता ते कितपत होईल यात शंकाच आहे,पण अपेक्षा ठेवायला हरकत नाही,कारण उम्मीद पे दुनिया कायम है अस नेहमीच म्हटलं जातं .मेळावा रेकॉर्ड ब्रेक झाला यात शंका च नाही मात्र या मांडव वाऱ्यातून लवकर बाहेर पडून त्यांना जमिनीवर येत समाजासाठी कायम परिश्रम घ्यावे लागतील ,त्यांच्याकडून आता लोकांच्या,समाजाच्या अपेक्षा कितीतरी पटीने वाढल्या आहेत,त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना झटाव लागेल अन्यथा समाजाचा भ्रमनिरास व्हायला वेळ लागणार नाही .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

एका दर्शनाने देव म्हातारा होत नाही

गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा त्यांच्यानंतर खंडित होणार की सुरू राहणार हे खरं तर मागच्या वर्षीच स्पष्ट झालं आहे,दरवर्षी गडावर होणारा हा मेळावा गतवर्षी पायथ्यावर घ्यावा लागला मग पुन्हा या वर्षी त्याच विषयावर एवढा गहजब का केला जातोय हे न कळणारे आहे.पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री या दोघांनी आपल्या भूमिकेवर कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे मात्र त्यामुळे जणू काही खूप मोठं संकट कोसळणार आहे असं जे चित्र उभं केलं जातं आहे ते विनाकारण असल्याचं वाटत.एकवर्षी मेळावा घेतला नाही तर काही गड ओस पडणार नाही किंवा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये घट होणार नाही,त्यामुळे या विषयावर जो चर्चेचा फड रंगवला जात आहे तो  विनाकारण आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही.

महाराष्ट्राच्या मातीतून दिल्ली पाहणार नेतृत्व म्हणजे गोपीनाथ पांडुरंग मुंडे होय.प्रमोद महाजन यांच्या सोबत चळवळीतून पुढं आलेलं नेतृत्व म्हणून मुंडेंच नाव घेतलं जातं.संघर्ष जणू पाचवीलाच पूजल्यासारखे मुंडे शेवटपर्यंत लढत राहिले .राज्यात मुंडे यांनी आपल्या पाठीशी समाजाची मूठ बांधली ,त्यामध्ये त्यांना भगवान गडाची मोठी मदत झाली हे नाकारून चालणार नाही,मुंडे वर्षभर कुठेही असोत दरवर्षी दसरा मेळाव्याला ते न चुकता भगवान गडावर यायचे.मुंडे येणार म्हणून लाखोंच्या संख्येने समाजबांधव गडावर गर्दी करायचे,हा करिश्मा मुंडेंचा होता यात शंकाच नाही मात्र गडाच्या गादीचा देखील होता हे विसरता येणार नाही .मुंडे यांनी गडावरून आणीबाणीच्या राजकीय परिस्थिती मध्ये आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रत्येक वर्षी गडावरील दसरा मेळावा हा मुंडेंच्या भूमिकेमुळे चर्चेत असायचा,त्यांनी गडावर भुजबळापासून ते अगदी सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांना आणले.गडाचा आज जो विकास झाला आहे त्यात मुंडे यांच्या नावाचा मोठा वाटा आहे,मात्र त्याचवेळी गडाने देखील त्यांच्या मागे समाजाची जी ताकद उभी केली ती देखील दुर्लक्षित करून चालणार नाही.

मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देखील व्यस्त वेळेत त्यांनी गडाचे दर्शन घेतले त्यावेळीच त्यांनी यावेळी मला गडावरून पंकजा दिसते आहे असे सांगून यापुढे समाजाने पंकजा यांच्या पाठीशी रहावे हेच अप्रत्यक्षपणे सांगितले होते .त्यांच्या निधनानंतर नामदेवशास्त्री यांनी पंकजा याना गडाची लेक असल्याचं जाहीर केलं होतं तेव्हा समाजाने त्यांच जाहीर कौतुक केलं होतं,मात्र अवघ्या वर्षभराच्या काळात अस काय झालं की ज्यामुळे हीच लेक माहेरपणाला दुरावली गेली.पंकजा मुंडे आणि शास्त्री यांच्यात नेमकं काय घडलं हे आजही एक कोडंच आहे,कदाचित त्याला गोपीनाथ गडाची झालेली निर्मिती देखील कारणीभूत असेल कारण त्याच वेळी शास्त्री यांनी यापुढे भगवान गडावरून राजकीय भाष्य होणार नाही हे स्पष्ट केलं होतं,मग त्यानंतर ही गडावर मेळावा घेण्याचा अट्टहास पंकजा मुंडे यांनी का केला असेल,आणि लेक मेळावा घेणार आहे तर काय फरक पडतो असा विचार शास्त्रींनी का केला नसेल हे प्रश्न अनुत्तरित आहेत.खरंतर गडावर मेळावा घेतल्याने गडाची महती कमी होणार नव्हती किंवा पंकजा यांना त्याचा फार मोठा राजकीय फायदा होणार नव्हता,दरवर्षी सारखा हा कार्यक्रम होता मात्र नेमका कोणाचा इगो जागा झाला आणि मेळावा न घेण्याचा निर्णय घेतला गेला हे न कळणारे आहे.

गडाच्या गादीवर असणारे नामदेव शास्त्री हे न्यायाचार्य आहेत,त्यांनीच पंकजा ही गडाची लेक असल्याचे जाहीर केलं होतं असं असताना नेमकी माशी शिंकली कुठं ? पंकजा यांचा स्वभाव बघता त्यांनी शास्त्री बाबत काही वक्तव्य केले असेल तर हे चार भिंतीतले मतभेद बसून मिटवता आले असते मात्र ते चव्हाट्यावर आणून काय हाशील झाले तर काहीच नाही.

आज मेळावा होणार की नाही यावरून वादंग माजले आहे,मात्र नाही घेतला मेळावा तर काही बिघडणार आहे का,बरं मेळावा घेतल्यानंदेखील काही आगळंवेगळं घडण्याची शक्यता नाही मग का हा अट्टहास ,मेळावा घ्यायचा की नाही हा जसा पंकजा मुंडे यांचा प्रश्न आहे तसा तो गडावर घेऊ द्यायचा की नाही हा अधिकार आज तरी विश्वस्त यांचा आहे.मात्र या सगळ्यामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचा काही लोक  प्रयत्न करीत आहेत . मेळावा घ्यावा म्हणत काहींनी पंकजा यांच्या पुढे पुढे करण्याचा जो प्रयत्न चालविला आहे तो केविलवाणा असल्याचं दिसत आहे .मुंडे यांनी कोणाच्या सांगण्यावरून कधी मेळावा सुरू केला नव्हता,त्यांना समाजाची वज्रमुठ बांधायची होती,त्यासाठी गडावरील मेळावा हे निमित्त योग्य होत म्हणून त्यांनी मेळावा सुरू केला, आज मेळावा झाला तरच पंकजा यांच्या पाठीशी जनाधार कायम राहणार आहे अन्यथा त्यांचं नेतृत्व संपेल अशी परिस्थिती नाही मग का विनाकारण हे केलं जातंय.

पंकजा मुंडे यांचा राज्याच्या राजकारणात एक वेगळा दबदबा आहे,ग्रामविकास च्या माध्यमातून त्यांना राज्यातील जनतेचा विकास करण्याची मोठी संधी आहे,कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवले आहे,केवळ दसरा मेळावा त्या घेतात म्हणून त्यांच्यावर समाज प्रेम करतो,त्यांचं नेतृत्व मान्य करतो अस काही नाही.त्या गडावर आल्या नाहीत,मेळावा घेतला नाही तर सगळं काही संपणार आहे असंही नाही.

त्या गडावर आल्या नाहीत तर गड ओस पडेल असंही काही नाही,गडावर लोक भगवान बाबा यांच्या समाधीच्या दर्शनाला येतात,शास्त्री हे गडाचे महंत आहेत त्यामुळे त्यांना लोक सन्मान देतात याचा अर्थ तर गडावरून पायउतार झाले तर गडावर भक्त येणार नाहीत असाही काही नाही.हे सगळं समजत असतानादेखील आज वाद घातला जात आहे.

मेळावा भगवान गडावर घेतला तरच समाजाला संदेश देता येतो अस काही नाही,पंकजा मुंडे यांनी त्यांच्या संकल्पनेतून गोपीनाथ गडाचा जी वेगळी ओळख निर्माण केली आहे  ती पाहता मेळाव्यासाठी आज तरी त्यांना भगवान गडाची गरज आहे असे वाटत नाही.गोपीनाथ मुंडे यांनी आपली हयात समाजाच्या उत्थानासाठी घालवली मग हा समाज भगवान गडावर एकत्र आला काय अन गोपीनाथ गडावर एकत्र आला काय काहीच फरक पडत नाही. खरंतर गोपीनाथ गड हा मेळावा,सभा ,संमेलन यासाठी योग्य आहे .लोकभावना विचारात घेता आज पंकजा यांचं नेतृत्व एवढं मोठं नक्कीच आहे की त्यांनी आदेश दिला तर समाज खडकावर देखील एकत्र येऊ शकतो .
तरीदेखील हा वाद वाढवून त्या आपल्याच नेतृत्वाविषयी संभ्रम निर्माण करीत आहेत .एका वर्षी नाही घेतला मेळावा तर समाजात त्यांची प्रतिष्ठा कमी होईल अशी परिस्थिती नक्कीच नाही .मात्र हे त्यांना अधिकार वाणीने सांगणार कोणीच नाही.वडिलांच्या मागे आपणच समाजाची माता असल्याचं त्यांनी मागच्या वेळी पायथ्याच्या मेळाव्यात स्पष्ट केलं होतं,त्यामुळे मातेला कोण सांगणार,बाप म्हणणारे शास्त्री आज लेकीला माहेरी मेळावा घेण्यापासून  रोखत आहेत अशा वेळी दुसरं कोणी पंकजा यांना सांगेल अशी स्थिती नाही अन शास्त्री हे तर स्वतःच न्यायाचार्य असल्याने त्यांना कोण बोलणार तेव्हा सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेवून पंकजा यांनीच दोन पावलं मागे आल्यास त्यांना त्याचा फायदा होईल असं दिसतं कारण राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते हे त्यांनी लक्षात घ्यावे .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

राजकारणातील धगधगती मशाल

राजकारणातील धगधगती मशाल -

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या काळात जी काही नावं प्रकर्षाने चर्चिली जातात किंवा प्रकाश झोतात आहेत त्यामध्ये आघाडीवर असणार नाव म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे होय,देशाच्या राजकारणावर आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवण्याची जबाबदारी पंकजा यांच्यावर नियतीने अचानक टाकली नव्हे लादली,मनिध्यानी नसताना मुंडेंचा झालेला दुर्दैवी मृत्यू आणि त्यानंतर पंकजा यांच्यामध्ये साहेबांना पाहण्याचा जनतेचा कौल,आशा परिस्थितीत पंकजा यांनी  जो आपला वेगळा ठसा उमटवला आहे त्याला तोड नाही.

विदेशात शिक्षण घेतलेल्या पंकजा यांनी कधी विचारही केला नसेल की त्यांना परत आपल्या भागात यावं लागेल,एवढ्या मोठ्या घरची लेक,लग्न ,संसार यात रममाण झालेली असताना आठ वर्षांपूर्वी अचानक त्यांच्यावर पक्षाने विधान सभेची जबाबदारी टाकली अन त्यांचा राजकारणात प्रवेश झाला,त्या अगोदर काही वर्षे त्यांनी आपल्या बाबांसाठी या भागात प्रचाराच्या माध्यमातून राजकारण प्रवेश केला होता मात्र त्यावेळी त्यांनाही याची कल्पना नसावी की भविष्यात त्यांच्यावरच एवढी मोठी जिमेदारी येईल म्हणून.

एकीकडे धनंजय मुंडे यांच्यासारख्या सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या भावाने साथ सोडलेली असताना आणि वडिलांचे छञ हरपले असताना पंकजा यांनी लोकमताच्या आशीर्वादावर राजकारणाच्या आखाड्यात आपले पाय घट्ट रोवायला सुरवात केली होती.नशिबानेच जर ही जबाबदारी दिली असेल तर आलेल्या परिस्थितीला तोंड देत संघर्ष करायचा हे बाळकडू वडिलांकडून मिळाल्याने पंकजा यांनी न डगमगता हे शिवधनुष्य पेलले.वडीलांपासून मिळालेला संघर्षाचा वारसा त्यांनी पुढेही यशस्वी पणे पेलला.महाराष्ट्रात संघर्ष यात्रेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांचाच उल्लेख असेल हे कोणीही नाकारू शकणार नाही.

ऊबड़ खाबड़ रस्ते भी, समतल हो सकते हैं,
कोशिश की जाए तो मुद्दे हल हो सकते हैं.

शर्त यही है कोई प्यासा हार न माने तो,
हर प्यासे की मुट्ठी मेँ बादल हो सकते है.
 अस काहीसं पंकजा यांच्याबाबतीत म्हटल्यास ते वावग ठरणार नाही.

पंकजा मुंडे यांना जे लोक जवळून ओळखतात ते दुसरे साहेब म्हणूनच सांगतात,वागण्या,बोलण्याची तीच पद्धत,भाषणातील चढ उतार सारखेच,डोळे बंद करून जर कोणी पंकजा यांचे भाषण ऐकले तर त्याला मुंडे साहेबांची आठवण येणार हे नक्की.त्यांनी मुंडे साहेबांचा फक्त एकच गुण घेतला नाही तो म्हणजे शेवटच्या कार्यकर्त्यालादेखील एंटरटेन करण्याचा.एवढ्या बाबतीत त्या थोड्या वेगळ्या वाटतात,नव्हे आहेतच.विनाकारण नको ती काम आणत जाऊ नका,बदल्या,नोकऱ्या,गुत्तेदारी ही माझी काम नाहीत,गावाचा विकास,गावचे प्रश्न,समस्या याबाबत माझ्याकडे या एवढं थेटपणे बोलणारा राजकारणी आजकाल पहावयास मिळत नाही.कदाचित अनेकांना त्यांचा हा स्वभाव खटकतो मात्र त्याला इलाज नाही.
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले ज्यामुळे ग्रामविकास सारख्या खात्याला देखील नवे आयाम मिळाले. बीड जिल्ह्यात तर त्यांनी रस्ते,आरोग्य, वीज यासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला.राजकारण हे निवडणुकीपूरत करायचं नंतर विकास हे एकच लक्ष डोक्यात ठेवायचे हा मंत्र त्यांनी जपला आहे.

बिनधास्त,बेधडक,जे आहे ते तोंडावर,पुढे एक मागे एक,असा पंकजा यांचा स्वभाव दिसत नाही.त्यांच्या थेट बोलण्यामुळे अनेकवेळा जवळचे लोक देखील दुखावतात मात्र त्यांना स्वभाव माहीत असल्याने ते समजून घेतात.ग्रामविकास बरोबरच त्यांनी जलयुक्त शिवरच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शिवारात जे हिरवं सपान फुलवण्याचा प्रयत्न केला तो विशेष म्हणावा लागेल,सरकारी योजना लालफितीत अडकतात हा आजवरचा अनुभव मात्र पंकजा मुंडे यांनी जलयुक्त सारखी योजना थेट बांधावर जाऊन राबवण्यास लावली.बिडकरांच्या जिव्हाळ्याच्या नगर बीड परळी रेल्वेचा प्रश्न त्यांनी दोन वर्षात मार्गी लावला.

फडणवीस सरकारमधील जे काही चार दोन चेहरे चर्चेत असतात त्यातील एक म्हणजे पंकजा मुंडे होय.तथाकथित चिक्की घोटाळ्याच्या माध्यमातून विरोधकांनी त्यांना घेरण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता मात्र त्यांनी त्यावर मात केली, मंत्री पदावर असतानाही कुटुंबाला वेळ देण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असतो . राज्यात त्या कोठेही असल्या तरी मतदार संघावर नेहमी लक्ष असतं हे ही तेवढंच खरं, अर्थात राजकारणाच्या आणि विशेष म्हणजे निवडणुकीच्या बदलत्या तंत्राबाबत त्या तितक्याश्या माहीर नाहीत हे देखील वेळोवेळी जाणवतं, मुंडे साहेब ज्या पद्धतीने जुगाड करून विजय मिळवायचे ती पद्धत कदाचित अद्याप पंकजा यांच्या अंगी यायला वेळ लागेल,मात्र त्याची चुणूक त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दाखवून दिली.

पंकजा मुंडे या जर राजकारणा ऐवजी एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या मालक असत्या तर ती कंपनी त्यांनी सर्वोच्च शिखरावर नेली असती हे नक्की,अर्थात त्या आज ज्या क्षेत्रात आहेत तेथेही त्यांचे काम आभाळाएव्हढे मोठे आहे यात शंका नाही.राजकारणी माणसं नेहमी खोटं बोलतात,वेळकाढू पणा करतात,तोंडपूरत बोलतात असा अनेकांचा अनुभव आहे मात्र पंकजा मुंडे याला अपवाद आहेत.काम होत असेल तर हो म्हणणार नाहीतर नाही म्हणून तोंडावर सांगायला सुद्धा धमक लागते ती पंकजा यांच्यामध्ये दिसते. अलीकडच्या काळात त्या बऱ्याच वेळा कठोर शब्दात बोलायचे टाळू लागल्याचं दिसतं, कदाचित राजकारणातील अनुभवाचा तो भाग असावा,मात्र हा बदल अनेकांना सुखावणारा आहे. रात्री अपरात्री आपले फोन घेतले जावेत,आपली अडचण ऐकून घेतली जावी ही कार्यकर्त्यांची ईच्छा असते मात्र एक महिला म्हणून त्यांनाही काही बंधन आहे याचा विचार करायला हवा.

गोपीनाथ मुंडे यांनी जनकल्याणाचा जो वसा त्यांना सुपूर्द केला आहे तो त्या पूर्ण करतील यात काही शंका नाही.त्यांच्या हातून जनसेवेच हे यज्ञकुंड अखंड धगधगत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,पंकजा ताई आपणाला दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा!

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

सवत रंडकी झाली .....!

सवत रंडकी झाली .......!

एखादा माणूस जर ऐकत नसेल तर त्याचा नाद सोडून आपली वाटचाल करावी हा साधा संकेत आहे,बिहार मध्येही काहीसे असेच घडले,भ्रष्टाचाराच्या आरोपावरून लालूपुत्र तेजस्वी यादव हे स्वतःहून राजीनामा देतील अशी नितेश कुमार यांची अटकल होती मात्र तेजस्वी काही मागे हटत नाहीत हे स्पष्ट झाल्यावर नितीश यांनीच पुढाकार घेतला अन तेजस्वी यांना मंत्रिमंडळातून काढण्याची रिस्क घेण्याऐवजी त्यांनी स्वतःहून राजीनामा देणे पसंत केले.या माध्यमातून त्यांनी एका फटक्यात सगळं चित्रच पालटून टाकलं.आपलं ऐकलं जात नाही म्हटल्यावर त्यांनी राजीनामा देऊन " हम तो डुबेंगे सनम पर तुमको भी लेके " असा कारभार करत नवरा मेल्याच दुःख न करता सवत रंडकी करून मोकळे झाले.

2014 मध्ये गुजरात चे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांचा राष्ट्रीय स्तरावर उदय झाला अन नितीश यांच्यासारखे अनेक काजवे अचानक लुप्त झाले,मोदी यांच्या सुनामी मध्ये 70 वर्ष देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेस ची पाळंमुळं हलली नव्हे मुळापासून उपटली गेली,लालू,ममता,पवार यांच्यासारखे दिगग्ज भुईसपाट झाले.मोदी सुनामी एवढी मोठी होती की तीन वर्षानंतर ही आज देखील विरोधी पक्ष सुन्न आहे.

मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने तीन वर्षात तब्बल अठरा राज्यात आपली घोडदौड कायम ठेवली.जिथे स्वबळावर शक्य आहे तिथे स्वबळावर नाहीतर मित्रपक्षांना सोबत घेत भाजप ने म्हणजेच मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने देश पादाक्रांत करण्याचा विडा यशस्वी करून दाखवला.मोदी यांना टक्कर देऊ शकेल असा नेता विरोधकांकडे नसताना सगळेच नितीश कुमार यांच्याकडे कडवे मोदी विरोधक म्हणून पाहत होते.
बिहार मध्ये झालेल्या निवडणुकीत नितीश यांनी मोदींचा चौखूर उधळलेल्या वारू रोखला आणि विरोधकांच्या स्वप्नांना बळ मिळाले.नितीश हे देशाच्या राजकीय पटलावर मोदींना विरोध करू शकतात अशी आशा निर्माण झाली.नितीश यांच्या डीएनए मध्ये काहीतरी वेगळं आहे याचा साक्षात्कार विरोधकांना झाला,मात्र वर्षभरापूर्वी विरोधकांच्या फुग्यातील हवा नितीश यांनी नोटबंदी,सर्जिकल स्ट्राईक यासारख्या मुद्यावर मोदींना साथ देत काढून घेतली,तेव्हापासून च नितीश हे मोदी यांच्या जवळ जात असल्याचे दिसत होते मात्र मरता क्या न करता या पद्धतीने विरोधकांना अजूनही नितीश यांच्याकडून आशा होती.

दरम्यान लालुचे दिवटे चिरंजीव तेजस्वी यांचा असा काही प्रकाश भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पडला की समाजवादी विचारधारा असणारे नितीश कुमार अस्वस्थ झाले.लालू पुत्र स्वतःहून राजीनामा देतील अशी भाबडी आशा नितीश यांना होती मात्र संधीच एऑन सोनं करतील तर लालू कसले त्यांनी नितीश यांच्यावरच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.तेजस्वी यांच्यावरील आरोप खोटे असून ते राजीनामा देणार नाहीत नितीश यांनीच काय तो निर्णय घ्यावा अशी भूमिका लालू यांनी घेतली.त्यानंतर मात्र नितीश यांनी  डाव टाकला,तेजस्वी हर राजीनामा देत नाहीत त्यांना काढले तर सरकार अल्पमतात जाऊ शकते या सर्व शक्यता पडताळून पहात त्यांनी स्वतःहून राजीनामा देत सगळ्यांनाच धक्का दिला.या राजकीय भूकंपाचा धक्का एवढा तीव्र होता की त्यात लालू राज तर उध्वस्त झालेच पण काँग्रेस अजूनही कोमातून बाहेर येऊ शकलेली नाही.

नितीश असा काही निर्णय घेतली अशी कोणालाच अपेक्षा नव्हती मात्र या सगळ्या खेळीचे जे जनक होते ते मोदी शहा मात्र पडद्याआडून सगळं शांत पणे पहात होते,गेल्या वीस महिन्यापासून जो डाव मोदी शहा जोडीने टाकला होता त्यात त्यांना यश आले.शिकारी खुद् यांहा शिकार बन गया अशी काहीशी अवस्था नितीश यांची झाली.

वर्षभरापासून मोदी यांच्याशी नितीश यांची वाढलेली जवळीक अखेर फळाला आली,एका रात्रीत राजीनामा आणि पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ हे फक्त बिहार मध्येच होऊ शकते,राजीनामा देताना किंवा भाजपशी हातमिळवणी करताना नितीश कुमार यांनी स्वपक्षीय लोकांना देखील विश्वासात घेतले नाही.अवघ्या पंधरा तासात नितीश यांनी हिट विकेट होत लालूपुत्र तेजस्वी यांची विकेट घेतली,तसेच काँग्रेस ला मैदानाबाहेर फेकले आणि वीस महिन्यापासून बौन्ड्रीवर असणाऱ्या भाजपला टीम मध्ये घेत सगळी गणित बिघडवून टाकली.

नितीश यांनी बिहार मध्ये जो भूकंप घडविला त्याचे धक्के महाराष्ट्रात देखील बसल्याचे चित्र आहे,नितीश यांच्या धक्क्या अगोदर दोन दिवस देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खुर्चीला अदृश्य हात मदत करतील असे सांगितले होते यावरूनच सगळे लक्षात येते.मोदी शहा यांची जोडगोळी किती चाणाक्ष आहे याचा नमुना बिहारमुळे सगळ्यांनाच लक्षात आला असेल त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची भाषा करणारे आणि राजीनामे खिशात घेऊन फिरणारे काही दिवस तरी शांत होतील हे नक्की.

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

रविवार, ११ डिसेंबर, २०१६

अन प्रिडिक्टेबल पवार

अनप्रिडिक्टेबल पवार !

मागील पन्नास वर्षापेक्षा जास्त राजकारणाचा अनुभव असलेले राज्यातील जे थोडे बहुत राजकारणी आहेत त्यात सर्वात जेष्ठ असा मान असणारे आहेत ते म्हणजे शरद पवार,1967 सालापासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले नाव म्हणजे शरद पवार.आमदार पदापासून ते केंद्रात मंत्रीपदापर्यंत सर्व पदांचा अनुभव घेणाऱ्या या लोकनेत्याला आजही एकच सल असेल ती म्हणजे देशाचे पंतप्रधान पद त्यांना मिळू शकले नाही.अडीच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींचा देशपातळीवर उदय झाल्यानंतर पासून काहीशे अस्वस्थ असणाऱ्या पवारांनी सध्या राज्याच्या राजकारणात विशेष लक्ष घातले असल्याचे दिसते,सध्याचे राजकीय वातावरण पाहता पवारांनी बुद्धिबळाचा डाव मांडून ठेवलाय यात त्यांची चाल यशस्वी होते की पुन्हा एकदा त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.एक मात्र नक्की आहे की पवारांनी डाव टाकला असून ते सत्ताधार्यांना चितपट करण्यासाठी कामाला लागले आहेत.
 घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी अशा पद्धतीने शरद पवार 1985 ते 2014 पर्यंत अनेकवेळा केंद्रीय राजकारणात गेले मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक वेळा ते राज्यात परत आल्याचा इतिहास आहे,वसंत दादांच्या सरकारला हादरा देऊन पवारांनी केलेला पुलोद चा प्रयोग असो की 1987 मध्ये केलेले बंड असो शरद पवार इज ए अन प्रिडिक्टेबल पॉलिटीशियन असं आजही म्हटलं जातं.
पवारांना जे अगदी जवळून ओळखतात ते आजही त्यांच्या मनात काय सुरु आहे,ते कधी काय करतील,कधी कोणाचा गेम (राजकीय) हे सांगता येत नाही असं म्हणतात. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर तिनपेक्षा अधिक वेळा विराजमान होण्याचा मान जसा पवारांना आहे तसाच काँग्रेस ला देखील अनेकवेळा आस्मान दाखवण्याचा मान हि त्यांनाच आहे.पवारांनी वेळोवेळी काँग्रेस विरुद्ध बंड करून आपलेच हित साधल्याचा त्यांच्यावर आरोप होतो तो काही अंशी खरा देखील आहे.1978 चा पुलोद चा प्रयोग असो की 1987 मधील एस काँग्रेस चा विषय,पवारांनी प्रत्येक वेळी आपल्या पदरात काय पडते याकडेच लक्ष दिल्याचे दिसते .
1999 साली पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादीची स्थापना केली मात्र लगेच राज्यात काँग्रेस बरोबर आघाडी करीत  सत्तेचा सोपान चढला,लगोलग त्यांनी केंद्रात देखील आपल्याकडे मंत्रिपद घेण्यात यश मिळवले.
शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात अनेकांना पद दिली,मानसन्मान दिला,लक्ष्मण माने असोत कि लक्ष्मण ढोबळे किंवा ना धो महानोर अथवा जनार्दन वाघमारे अशा कितीतरी अभ्यासू,हुशार लोकांना त्यांनी सभागृहाचा मार्ग दाखवला,शेती असो की सहकार या क्षेत्रात पवारांनी आभाळाएव्हढं काम करून ठेवल आहे हे नक्की .सहकार चळवळीचा पाया भक्कमपणे राज्यात विस्तार करण्यात पवारांचा सिंहाचा वाटा आहे याबाबत कोणी शंका घेणार नाही,दीर्घकाळ सत्तेत राहिल्याचाही हा परिपाक असू शकतो मात्र त्यालाही दानत लागते जी पवारांमध्ये निश्चित आहे हे नक्की .
शरद पवार यांनी एखाद्याचे तोंड भरून कौतुक केले किंवा एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला तर त्याचा कार्यक्रम झाला असे लोक चेष्टेने म्हणतात ,कदाचित ते पवार यांच्या न समजणाऱ्या स्वभावामुळे असावं .कारण पवार कधी  कोठे कसा कोणाचा गेम करतील ते सांगणे कठीण आहे .एकीकडे भाजप च्या विरोधात दंड थोपटणारे पवार बारामती मध्ये नरेंद्र मोदींना पायघड्या घालताना बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या ,अनेकांनी तेव्हा पवार यांचा आता थेट राष्ट्रपती पदावर डोळा असल्याचं म्हटलं होत . पवार सत्तेत असोत कि नसोत त्यांचा शब्द अंतिम असतो हे अनेकांनी अनुभवले आहे .मात्र हेच पवार फार काळ सत्तेबाहेर राहू शकत नाहीत असा देखील अनेकांचा अनुभव आहे .
शरद पवार हे अजातशत्रू नेतृत्व आहेत हे त्यांनी अनेकवेळा दाखवून दिले आहे,राज्याच्या बाहेर हि त्यांनी देवेगौडा असोत कि ममता अथवा लालू प्रसाद यादव किंवा नितीशकुमार यांच्याशी कायम सख्य ठेवले आहे त्यामुळेच केंद्राच्या राजकारणात त्यांचा कायम दबदबा राहिलेला आहे,पवार यांनी राज्यात देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मैत्रीचे बंध कायम जपले आहेत हे सर्वश्रुत आहे .एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी स्नेह जपणारे पवार हे त्याचं वेळी नागपुरात जाऊन नितीन गडकरी यांच्याशी देखील मैत्री जपताना महाराष्ट्राने पाहिले आहे .त्यामुळे पवार कोणाशी कधी कसे वागतील आणि कोणाशी त्यांची मैत्री जमेल याबाबत सांगणे कठीण आहे . " एक बार उपर वाले के दिल में क्या है यह बताया जा सकता है किंतु पवार साहब के दिल में क्या है यह बताना मुश्किल है  " असं जाणकार म्हणतात .ते अगदी खरं आहे .
गेल्या दोन वर्षात राज्यातील देवेंद्र सरकार चा कारभार पाहता काय करावे हा यक्ष प्रश्न पडलेले पवार मध्येच पेशवे आणि छत्रपती यांच्याबाबत बोलून राजकारणात काही घडते का याचा अंदाज घेताना दिसतात तर मध्येच राज्यभर निघणारे मराठा मोर्चे हे सरकार विरोधातील असंतोष असल्याचे सांगून सरकार ला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात .
पाऊणशे वयोमान पार केलेल्या पवारांना हे बोलण्याची किंवा राज्यात पुन्हा लक्ष घालण्याची काय गरज असा प्रश्न अनेकांना पडू शकतो मात्र उत्तर एकच आहे की  " पवार पावर कर बिना नही रह सकते ".ऍट्रॉसिटी रद्द करा म्हणून बोलणारे पवार दुसऱ्याच दिवशी त्यात सुधारणा करण्याचा यू टर्न घेताना दलित समाज आपल्यापासून दूर जाणार नाही याची काळजी घेताना दिसतात . पूर्वी छत्रपती पेशव्यांना जहागिऱ्या वाटायचे आज उलटे होत आहे हे त्यांचे भाष्य असो की  भाजप हा शेटजी भटजींचा पक्ष आहे हे वक्तव्य यातून पवारांना राज्यातील सत्तेवरून देवेंद्र फडणवीस यांना हटवायचे आहे हेच दिसून येते.
कोपर्डी च्या घटनेच्या पार्षवभूमीवर निघणाऱ्या मराठा मोर्चाचे पवारांनी समर्थन करताना सरकार अडचणीत कसे सापडेल याची पुरेपूर काळजी घेतली मात्र त्याच वेळी दलित आणि ओबीसी समाजाने देखील आपल्या अस्तित्वासाठी मोर्चे काढल्याने पवारांचा प्लॅन (राजकीय लाभ घेण्याचा ) फसल्याचे चित्र आहे .
राज्यात पूर्वीपासून मराठा समाजाचे स्व शंकरराव चव्हाण यांच्यापासून ते   विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेक मराठा नेते झाले ,आहेत मात्र महाराष्ट्र आणि मराठा समाज म्हटलं की शरद पवार यांचेच नाव समोर येते .त्याच शरद पवार यांनी यावेळी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात लक्ष घातले आहे,सारीपाटाचा डाव टाकला आहे आता त्यात ते कोणत्या प्याद्याचा वापर करून कोणत्या नेत्याला अडचणीत आणतात कि पुन्हा एकदा नवा डाव मांडतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे .
एकवेळ सागराचा तळ समजू शकतो किंवा आभाळाची उंची मोजता येईल मात्र शरद पवार यांच्या मनाचा थांग पत्ता लागणे कठीण आहे अशा या  महान व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
लक्ष्मीकांत रुईकर,झी मीडिया रिपोर्टर ,बीड
9422744404

बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

अम्मा..........!

अम्मा.........!

भारत हा लोकशाही प्रधान देश आहे हे खरे असले तरी या देशात व्यक्तिपूजा देखील मोठ्या प्रमाणात केली जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत,देशातील जनतेने आपल्या लाडक्या नेत्यांना एक सन्मान म्हणून टोपणनावाने उपाधी दिल्याचे अनेक वेळा दिसून आले,मोहनदास करमचंद गांधी यांना बापू हि उपाधी देणे असो की बाळ गंगाधर टिळक यांचे लोकमान्य हे नाव असो अथवा विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्यवीर असो तेव्हा पासून सुरु झालेला हा सिलसिला आजही कायम आहे .महाराष्ट्रात सुद्धा अनेकांना जाणता राजा,दादा,भैय्या,अण्णा,तात्या,साहेब अशा नावाने संबोधले जाते मात्र त्यांचा आवाका हा त्या त्या राज्यापुरता किंवा पक्षा पुरता लिमिटेड राहिल्याचे आपण सर्वांनीच पाहिले आहे मात्र याला अपवाद ठरल्या आहेत त्या जे . जयललिता अर्थात अम्मा.1983 पासून ते 2016 पर्यंत आपल्या राजकीय प्रवासात जयललिता यांची ओळख देशभर अम्मा या नावानेच झाली.
रील लाईफपासून ते रियल लाईफपर्यंत चा अम्मा चा प्रवास थक्क करणारा असाच आहे,वयाच्या सोळाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या जयललिता यांनी तब्बल 140 पेक्षा अधिक तामिळ चित्रपटातून काम केलं,तामिळनाडू जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जयललिता या एमजी रामचंद्रन यांच्या मुळेच चित्रपट क्षेत्रात आणि नंतर राजकारणात यशस्वी झाल्या.
1984 साली सर्वात प्रथम राज्यसभेवर निवड झालेल्या जयललिता या कधी तामिळनाडू च्या जनतेच्या अम्मा झाल्या हे त्यांनाही कळले नाही,एमजीआर यांच्या निधनावेळी अपमानित व्हावे लागलेल्या जयललिता यांनी आपल्या आयुष्यात एमजीआर यांनाच आपले गुरु मानले.
एमजीआर यांच्या नंतर एआएडिएमके ची सूत्र जयललिता यांच्याकडे आली मात्र त्यांना तामिळनाडू विधानसभेत अपमानित करून बाहेर काढले गेले तेव्हाच या महिलेने शपथ घेतली की आता येथे मुख्यमंत्री म्हणूनच प्रवेश करायचा आणि अवघ्या काही वर्षात त्या मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्या,आपल्या 37 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री पद भूषवल .
तामिळनाडू च्या जयललिता यांचा जन्म ब्राह्मण अय्यर कुटुंबात झाला होता,तामिळनाडू राज्याला द्रविड  संस्कृती ची पार्श्वभूमी आहे म्हणजे येथे नास्तिक लोकांचा प्रभाव जास्त होता मात्र अशा परिस्थितीत जयललिता यांनी या भागात आपला प्रभाव वाढवला नव्हे चार दशकं कायम ठेवला,मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी ज्या योजना तयार केल्या त्या लोककल्याणकारी होत्या,अम्मा मिनरल वॉटर,अम्मा कँटीन,अम्मा मोबाईल अशा एक ना अनेक योजना मधून त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात घर केलं . जनतेच्या मनावर आपल्या व्यक्तिमत्वाचे गारुड कायम करणाऱ्या अम्मा यांना उत्पनापेक्षा जास्त संपत्ती जमविल्याच्या आरोपावरून कारागृहात देखील जावे लागले ,त्यावेळी जयललिता यांच्याकडे पडलेल्या छाप्यात एक दोन नव्हे तर दहा हजार साड्या, पंचवीस किलो सोने,हिरे,जवाहिर सापडले होते मात्र  यावर मात करीत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर कब्जा केला,
आज देशात अनेक मोठे नेते आहेत,अनेक राज्यात मोठं मोठे पक्ष आहेत मात्र अम्मा एकमेवाद्वितीय म्हणाव्या लागतील,38 लोकसभा जागा पैकी तब्बल 36 जागा जिंकत त्यांनी मोदी लाटेत देखील आपला गड 2014 मध्ये कायम ठेवला होता,त्याला कारण त्यांचे जनतेप्रति असलेलं प्रेम आहे हे नक्की.जयललिता या कारागृहात असताना तत्कालीन मुख्यमंत्री पनिरसेलवम यांनी त्यांच्या खुर्चीवर न बसता कारभार पाहिला होता.
एक विशेष बाब म्हणजे आजपासून तीस वर्षांपूर्वी जेव्हा एमजीआर हे अपोलो रुग्णालयात होते तेव्हा जयललिता यांनी केंद्राला साकडे घालून उपचारवर लक्ष देण्याची मागणी केली होती,"हिस्ट्री रिपीट अगेन्स्ट"असं जे म्हणतात ते अम्मा च्या बाबतीत तंतोतंत खरं ठरलं आहे,सप्टेंबर महिन्यात जेव्हा अम्मा अपोलो रुग्णालयात दाखल झाल्या तेव्हा त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक वावड्या उठल्या तेव्हा जयललिता यांच्या विश्वासू शशिकला यांनी केंद्राला साकडे घातले आणि केंद्राने या प्रकरणात लक्ष घातले.
एकीकडे देशात भाजप,काँग्रेस या सारख्या पक्षांचा बोलबाला असताना तामिळनाडू मध्ये मात्र जयललिता यांनी आपली पकड मजबूत केली होती,देशात आजपर्यंत कोणत्याही पक्षात एवढी व्यक्तिपूजा पाहायला मिळाली नसेल जेवढी तामिळनाडू मध्ये दिसते.इथं सरकार अम्मा,प्रशासन अम्मा,जनजीवन अम्मा असच चित्र पाहायला मिळतं. आपला लाडका नेता रुग्णालयात असताना लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उत्तरल्याचे चित्र फक्त तामिळनाडू मध्येच दिसू शकते,तामिळनाडू मधील लोक कोणत्याही बाबतीत खुपचं इमोशनल आहेत हे दिसून येते मग तो सुपरस्टार रजनीकांत असो की जया अम्मा, जनतेने आपले आयकॉन कोण असावेत आणि ते कसे असावेत हे दाखवून दिलं आहे,
"कौण कहता है के आस्मान में छेद नही हो सकता एक पत्थर तो तबियत से उच्छलो यारो " या प्रमाणे जयललिता यांच्या साठी कोणतीही गोष्ट अशक्य नव्हती,शिकून वकील व्हायचं ठरवणाऱ्या जयललिता यांना अचानक सगळं सोडून सिनेक्षेत्रात यावं लागलं त्यानंतर राजकारणातील त्यांचा प्रवेश देखील इच्छेविरुद्ध असाच होता मात्र त्यांनी येथेही आपली छाप सोडली, राजकारणात महिला यशस्वी होत नाहीत ,त्यांना पुरुषांच्या कुबड्यांचा आधार घ्यावाच लागतो हा इतिहास आहे मात्र हा इतिहास जयललिता यांनी खोटा ठरविला, एक महिला असतानाही त्यांनी तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री पद भूषवल आणि एवढंच नव्हे तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या पासून ते नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत सगळ्यांशी त्यांनी सलोख्याचे संबंध कायम ठेवले,वाजपेयी सरकारला पाठिंबा देण्यावरून वादात सापडलेल्या जयललिता यांनी अचानक पाठिंबा काढून घेत सर्वानाच धक्का दिला,
राजकारण हे चांगल्या माणसाचं काम नाही असं म्हणत नाकं मुरडनाऱ्या व्हाईट कॉलर लोकांसाठी जयललिता यांनी एक आदर्श निर्माण केला आहे,जनकल्याण करायचे असेल तर माध्यम म्हणून राजकारण सुद्धा चालू शकते हे त्यांनी दाखवून दिलं.लोकनेता हा एका दिवसात तयार होत नसतो तर त्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या करावी लागते,त्याग करावा लागतो,समर्पण करावे लागते आणि त्यानंतरच एखादीच जया शतकात तयार होत असते आणि त्यामुळेच रुपेरी पडद्यावरील हि जया करोडो लोकांची अम्मा होऊ शकते.

लक्ष्मीकांत रुईकर,बीड 9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...