गुरुवार, १४ मार्च, २०१९

राजकीय शत्रुत्व ..........!

राजकीय शत्रुत्व ...........!

राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो अस म्हंटल जातं नव्हे असे अनेकदा अनुभव आलेले आहेत ,मात्र देशाचं नेतृत्व करण्याची आस मनात बाळगणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या राजकीय धुरंधर व्यक्तीनं राजकीय शत्रुत्व किती खोल असत हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे,नगरच्या राजकारणात पवार आणि विखे कुटुंबातील कलह अवघ्या महाराष्ट्रानं 90 च्या दशकात पाहिला अन त्याचीच पुनरावृत्ती यावेळीही होणार असे दिसते आहे .

महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठी घराणी कायम सत्तेत किंवा चर्चेत राहिलेली आहेत,त्यात शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील यांचा मोठा वाटा आहे,विखे आणि पवार हे दोघेही पश्चिम महाराष्ट्रात राहणारे ,एकाच पक्षात असून देखील या दोघांमधील संघर्ष लपून राहिलेला नाही .90 च्या काळात पवार आणि विखे यांच्यातील या संघर्षाला अधिकच धार आली,बाळासाहेब विखे यांचा पराभव करण्यासाठी तेव्हा मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवार यांनी गडाख कुटुंबाला जवळ करीत नगरच्या राजकारणात भूकंप घडवला ,मात्र पराभव जिव्हारी लागलेल्या बाळासाहेब विखे यांनी गडाख आणि पवार यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित करीत आपल्या पराभवाचे उट्टे काढले .सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पवार वाचले मात्र गडाख कुटुंबाचे राजकारण सहा वर्षासाठी थांबले.

90 च्या दशकात सुरू झालेला पवार विखे कुटुंबातील संघर्ष आज 20 वर्षानंतर देखील सुरूच आहे यावरून राजकारणात शत्रुत्व कसे असू शकते हे स्पष्ट होते .देशाच्या राजकारणात एकमेकाला पाण्यात पाहणारे मायावती,अखिलेश असोत की एकेकाळी भाजपशी जवळीक साधत नंतर त्यांच्यावरच टीकास्त्र सोडणाऱ्या ममता बॅनर्जी असोत,बदलत्या राजकीय परिस्थिती नुसार प्रत्येक राजकीय नेत्याने आपल्या भूमिका कायम बदलेल्या आहेत, मात्र राज्याच्या राजकारणात विखे पवार कुटुंबातील कलह काही थांबण्याची चिन्हे नाहीत .

शरद पवार हे नेहमीच पक्षाबाहेर राजकीय संबंध ठेवणारे म्हणून परिचित आहेत,देशपातळीवर सर्वपक्षीय आघाडी उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे,मात्र असे असतानाही विखे कुटुंबाशी असलेली खानदानी दुष्मनी विसरण्यास पवार तयार नाहीत यातच सगळे काही आले .त्यातूनच पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला, हा नकार देताना पवार यांनी विखे पाटील कुटुंबाबद्दल जी वक्तव्य केली त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी च्या आघाडीवर देखील आविश्वासाचे ढग दाटले आहेत .

राजकारणात एक अधिक एक दोन न होता अकरा होतात हे न समजण्याएवढे पवार दुधखुळे निश्चितच नाहीत,मात्र ज्यांनी आपल्याला राजकारणातून हद्दपार करण्याचा प्रयत्न केला त्या विखेंबद्दल पवार दोन पावलं माघार घ्यायला तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे .पवार नेहमी जे बोलतात त्याच्या विपरीत वागतात अस म्हणलं जात मात्र नगरच्या बाबतीत ते जे बोलले त्यावर ते कायम राहणार हे स्पष्ट दिसल्याने सुजय विखे यांनी भाजपची वाट धरली .

सुजय यांच्या निर्णयामुळे नगरची लढाई प्रतिष्टेची होणार यात शंका नाही .नगर मधून राष्ट्रवादीकडून अरुण जगताप यांचे नाव निश्चित मानले जात आहे ,मात्र दुसरीकडे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये आपण राष्ट्रवादी चा प्रचार करणार नाही असे सांगून आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली आहे .त्यांच्या या निर्णयामुळे नगरमध्ये काय होणार हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यकाराची गरज नाही .

नगरच्या संघर्षामुळे कदाचित काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला देखील मोठा फटका बसू शकतो .मात्र नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे अशी भूमिका जाणत्या नेत्यांनी घेतल्यास परिणाम दुर्दैवीच होणार हे निश्चित .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

डॉन......!डॉन......!!डॉन.........!!!

डॉन..........! डॉन........!!डॉन ......!!!

काही माणसांच्या नशिबात कायम सत्तेचा लाभ असतो किंवा त्यांना कायम जे मनात आणलं ते मिळतं, ते जिथं जातील तिथं आपली वेगळी छाप सोडतात,असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आमदार सुरेश धस होय .जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ते तीन वेळा आष्टी पाटोद्याचे आमदार,महसूल राज्यमंत्री आणि पुन्हा विधानपरिषद आमदार,हा धस यांचा यशाचा आलेख चढताच आहे .गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने जी प उपाध्यक्ष झालेल्या धस यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही,त्यामुळेच सत्तेच्या सारीपाटावरील डॉन म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली
 आहे .

आष्टी तालुक्यातील जामगाव येथून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरवात करणारे सुरेश धस हे इंजिनियर आहेत यावर कोणाचा विश्वास बसणार नाही,बीडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एका सायकलवर बसून त्यांनी बजरंग सोनवणे, सतीश परभणीकर  (कुलकर्णी) सारख्या सवंगड्या सोबत शिक्षण पूर्ण केले,महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणाची आवड असणारे धस जामगाव चे सरपंच झाले,त्यानंतर साहेबराव दरेकर यांच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणात प्रवेश केला अन पुढे मुंबईसह राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले .
ज्या दरेकरांनी त्यांना राजकारणात स्थिर होण्यास मदत केली त्यांनाच या शिष्यांन 1999 साली मात देत आमदारकी मिळवली,सुरवातीला भाजपकडून आमदार झालेल्या धस यांनी सत्तेचा लाभ मिळवण्यासाठी अजित पवार यांच्याशी सलगी केली अन गोपीनाथ मुंडे सारख्या दिग्गज राजकारण्यांच्या हातातून बीड जिल्हा परिषदेची सत्ता हिसकावून घेतली,धस यांनी एवढा मोठा धक्का दिल्यानंतरही त्यांच्यात अन मुंडे साहेबांमध्ये कधी मनभेद पहायला मिळाले नाहीत,धस यांच्या पुतनीच्या लग्नात स्वतः मुंडे यांनी हजेरी लावून सुरेश धस यांच्यावर माझे विशेष प्रेम आहे हे जाहीरपणे सांगितले होते तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या,
काळाच्या ओघात धस यांनी राष्ट्रवादीची कास धरत शेवटच्या काही काळासाठी का होईना मंत्रिपद पदरात पाडून घेतलं .महसूल मंत्रिपदाची त्यांची कारकीर्द असो की महानंद च्या चेअरमन पदाचा कालावधी ते आपल्या बेधडक निर्णयामुळे कायम चर्चेत राहिले .
आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्याला ताकद भेटली तरच तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकतो या हेतूने त्यांनी अनेक कार्यकर्ते मोठे केले .भीषण दुष्काळाच्या काळात जनावरं जगली पाहिजेत म्हणून राज्यातील सर्वात मोठी 55 हजार जनावरांची छावणी उभारण्याचा विक्रम आजही त्यांच्या नावावर आहे .या छावणीतून त्यांच्या पदरात मात्र बदनामीच जास्त पडली .
जिल्हा परिषद पासून काम केल्यामुळे मुंबई असो की दिल्ली विकासकामे कशी करायची,त्यासाठी निधी कसा आणायचा,प्रस्ताव कसे तयार करायचे याचा त्यांच्याएव्हढा दांडगा अभ्यास दुसऱ्या कोणाचा नसेल .
आष्टी पाटोद्याचे आमदार असतानाही कायम जिल्ह्याच्या राजकारणात आपला दबदबा कायम राहिला पाहिजे या हेतूने त्यांनी अनेकांना अंधारातून मदत अन उघडपणे विरोधही केला,त्यामुळे अनेक हितशत्रू देखील तयार झाले .मात्र या माणसाने त्यांची कधीच फिकीर केली नाही .
रात्री अपरात्री कधीही केव्हाही कोणाचाही फोन उचलून त्याच काम मार्गी लावण्याची त्यांची वेगळी हातोटी आहे .ज्या पक्षात असतील त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी कसे जुळवून घ्यायचे अन काम कशी करून घ्यायची हे खरेच धस यांच्याकडून शिकण्यासारखे आहे .
राजकारणात निर्णय घेण्यापूर्वी हजार वेळा विचार करावा लागतो,एक चुकीचा निर्णय राजकीय करियर उध्वस्त करणारा ठरू शकतो मात्र धस यांनी जेव्हा जेव्हा निर्णय घेतले तेव्हा तेव्हा परिणामाची तमा बाळगली नाही .त्यातूनच मुंडे यांच्या विरुद्धचे जिल्हा परिषद मधील बंड असो की नुकत्याच झालेल्या जी प अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय असो,प्रत्येक वेळी त्यांनी बेधडक अन बिनधास्तपणे निर्णय घेतले अन ते नेहमीच त्यांच्या पथ्यावर पडले .
राजकारणात नेत्याच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता लागू न देण्याचा गुण असावा लागतो,धस यांच्याकडे अशा गुणांची खाण आहे .पोटातील पाणी हलू न देणारा राजकारणी,समोरच्याला गोड बोलून आपलं इप्सित
साध्य करणारा माणूस म्हणून धस यांचा उल्लेख करावा लागेल .
लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य मतदार संघात त्यांनी ज्या पद्धतीने विजय मिळवला तो चांगल्या चांगल्या राजकीय धुरंधर व्यक्तींना विचार करायला लावणारा आहे .राजकारण हे व्यावसायिक पद्धतीने कसे करायचे हे धस यांच्याकडून शिकले पाहिजे .प्रचंड लोकसंग्रह ,मास लीडर म्हणून त्यांनी आपले नाव कमावले आहे.भुईवर बसून कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेणारा अन प्रसंगी कामासाठी समोरच्याच्या अंगावर जात दोन हात करणारा राजकारणी अशी त्यांची इमेज असल्यानेच त्यांना राजकारणातील डॉन म्हटलं जातं .त्यांच्या या बिनधास्त स्वभावामुळे प्रशासनातील अधिकारी देखील त्यांना टरकून राहतात,एखाद काम हाती घेतल की ते पूर्ण झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही हा त्यांचा मूळ स्वभाव ."हम हम है,बाकी सब पाणी कम है "अशा पद्धतीने ते आजपर्यंत वागत आले आहेत,कर्म कर फल की चिंता मत कर अस म्हटलं जातं मात्र धस यांच्या बाबतीत फल मिलणेवाला हो तो ही कर्म करणा चाहीये अस म्हणावं लागेल,कारण काम होणार असेल तरच हा माणूस त्यात हात घालतो नाहीतर दुसऱ्या राजकारण्यासारखं नुसतं नादी लावण्याचं काम यांना जमत नाही .
लोकसेवेचा वारसा अन वसा घेऊन बारा महिने अठरा काळ जनतेच्या कामासाठी तत्पर असणाऱ्या या सालगड्यास  मनःपूर्वक शुभेच्छा !

लक्ष्मीकांत रुईकर, बीड

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

लोकनेत्याचे वारसदार ..............!


लोकनेत्याचे वारसदार .............!
राजकारण असो की समाजकारण कोणतंही नेतृत्व घडायला किंवा तयार व्हायला एक कालावधी जावा लागतो,टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण मिळत नाही तर माणसाला मान ,मरातब,जगन्मान्यता कशी मिळेल .कोणतंही नेतृत्व हे वारसा हक्कानं मिळण्यासारखं नसत,ती काही वडिलोपार्जित संपत्ती नाही की जी मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आपोआप येईल मात्र काही लोकांना नेतृत्व देखील वारसा हक्कांनच मिळत आणि ते त्यासाठी लायक असतात असं म्हणावं लागेल ,असच एक वारसाहक्काने तयार झालेलं नेतृत्व म्हणजे पंकजा मुंडे .वडिलांच्या वाट्याला आलेला संघर्षाचा असो अथवा रंजल्या गांजल्या लोकांची सेवा करण्याचा वारसा असो , पंकजा यांना हा वारसा वडील गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनच मिळाला आहे हे मात्र खरं .
राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर लोकनेते म्हणून मान्यता मिळालेले किंवा जनतेने ज्यांना लोकनेता म्हणून स्वीकारले असे फार थोडे लोक आहेत ज्यात स्व गोपीनाथ मुंडे यांच नाव सर्वोच्च शिखरावर आहे .महाविद्यालयीन जीवना पासून ते शेवटच्या श्वासापर्यंत गोपीनाथ मुंडे यांच्या नशिबी संघर्षच आला ,त्यानंतर तो संघर्ष पंकजा मुंडे यांच्या वाट्याला आला .सुखाचे अन सत्तेचे दिवस आलेले असताना अचानक पितृछत्र हरपल्यानंतर कोलमडून न पडता पंकजा यांनी स्वतःसह जनतेला देखील सावरलं आणि संघर्षाची वाट यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला .
आजच्या राजकारणी मंडळींमध्ये संघर्ष करण्याची तयारी फार कमी दिसून येते,आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारांची संख्या वाढत असताना पंकजा यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे .ज्या जनतेनं गोपीनाथ मुंडे यांना लोकनेते हे बिरुद लावलं त्याच लोकांनी पंकजा यांना देखील ताईसाहेब ही नवी ओळख दिली आहे .
राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्याचा वारसा पंकजा मुंडे सक्षमपणे चालवताना दिसतात .मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पंकजा यांनी त्यांचं नाव लोकांच्या कायम लक्षात राहील पाहिजे यासाठी गोपीनाथ गडाची निर्मिती केली .
एरव्ही कितीही मोठा नेता असला तरी दोन चार ठिकाणी पुतळे,दोन चार शाळा कोलेजना नावं या पलीकडे त्या नेत्याचं अस्तित्व दिसत नाही .मात्र माझे बाबा जरी हे जग सोडून गेले असले तरी मी त्यांनी दाखवून दिलेली वाट सोडणार नाही अन त्यांचा विसर लोकांना पडू देणार नाही असं सांगत पंकजा यांनी आपल मार्गक्रमण सुरू ठेवल आहे .
गोपीनाथ मुंडे यांची स्मृती कायम राहावी म्हणून परळी येथे भव्यदिव्य अशा गोपीनाथ गडाची निर्मिती करण्यात आली,अवघ्या वर्षभरात हा गड उभा राहिला,गड ऊर्जेचा गड प्रेरणेचा म्हणून आज या गडावर लाखो लोक नतमस्तक होतात .

पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या प्रमाणे पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे हे नाव जनमानसात कायम राहील यासाठी गेल्या तीन वर्षात सातत्याने धडपड केली आहे .गडाची निर्मिती केली म्हणजे झालं असं न मानता त्यांनी या गडाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांना सक्षम करण्याबरोबरच शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जाण्यासाठी शेकडो गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे .
गोपीनाथ रावांच्या पुण्यतिथी आणि जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर लाखो लोक एकत्र येतातच मात्र एरव्ही सुद्धा त्यांचं नाव कायम लक्षात रहावं यासाठी पंकजा मुंडे यांचा मदतीचा यज्ञ कायम सुरू आहे .
 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा '
या उक्ती प्रमाणे पंकजा यांनी लोकनेत्याचा वारसा चालवला आहे .
पंकजा यांची चालण्याची,बोलण्याची लगबग पाहिल्यानंतर अनेकांना गोपीनाथ मुंडे हेच समोर असल्याचा भास होतो,निर्णय घेण्याचे क्षण असोत की लोकांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची वेळ असो पंकजा यांच्यात लोकांना कायम साहेब दिसतात .ग्रामीण भाग आणि या भागातील लोकांचा विकास हेच मुंडे यांच स्वप्न होतं, त्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला त्यांचं हे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच पंकजा यांनी राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून प्रयत्न चालवल्याचे दिसून येते .
अंगणवाडी असो की महिला बचत गट अथवा ग्रामीण भागातील बालकांच्या कुपोषणाचा विषय प्रत्येक विषयात खोलवर अभ्यास करून उपाय योजना करण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षात पंकजा यांनी केल्यानेच खुद्द पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा गौरव केला .
राजकारणात मी पैसा कमविण्यासाठी आलेले नाही तर माझ्या बाबांचं कार्य आणि त्यांचं नाव लोकांच्या मनात कायम रहावं यासाठी आलेले आहे हे पंकजा मुंडे सातत्याने सांगत असतात ते किती खरं आहे हे त्यांच्या काम करण्याच्या स्टाईल वरून लक्षात येत .
ज्याचं जेवढं नाव मोठं त्याच्या नशिबी संघर्षही तेवढाच मोठा हा निसर्गाचा नियमच आहे,त्यामुळे लोकनेते पदाचा वारसा मिळाल्यानंतर त्यासोबत येणारा संघर्षही पंकजा यांना सहन करावा लागला आणि त्यांनी तो केला हे विशेष .
मुंडे यांची पोरगी म्हणून त्यांना राज्याच्या सत्तेत मानाचं पान मिळालं असत यात शंका नाही मात्र आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यातला आपला स्वभाव नाही हे दाखवून देत विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी संघर्ष यात्रा काढली आणि त्या माध्यमातून आपलं नेतृत्व सिद्ध केलं .राज्याच्या राजकारणात आज जे काही बोटावर मोजण्याएव्हढे ओबीसी नेते आहेत त्यात पंकजा यांचा क्रमांक सर्वात वरचा आहे .ओघवत्या अन तेवढ्याच कडव्या शब्दात आपलं म्हणणं जनतेला पटवून देत लाखोंच्या सभा गाजवण्याचं कसब त्यांना वारश्याने मिळालं आहे हे त्यांनी नेहमी सिद्ध केलं आहे .
केवळ राज्यातच नव्हे तर मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश,कर्नाटक,तेलंगणा या भागात जाऊन पंकजा मुंडे जेव्हा लाखोंच्या सभा गाजवतात तेव्हा गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही .
'गुरू ने दिला ज्ञानरुपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा 'या प्रमाणे आपल्या वडिलांना च आपले राजकारणातील गुरू मानणाऱ्या पंकजा मुंडे यांनी त्यांचा संघर्ष अन जनसेवेचा वारसा पुढे चालवला आहे त्यामुळेच त्यांना आज लोकनेत्याची वारसदार ओळखले जाऊ लागले आहे .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

शक्तींप्रदर्शनातून ओबीसींची वज्रमुठ ............!


शक्ती प्रदर्शनातून ओबीसींची वज्रमुठ !


बीड

राजकारणात आपला दबदबा कायम ठेवायचा असेल तर जनशक्ती सोबतच नेतृत्व गुण देखील आवश्यक असतात,आपण मास लीडर आहोत हे ओरडून सांगण्याऐवजी थेट दाखवून देण्यावर नेहमीच राजकारण्यांचा भर असतो,याचा प्रत्यय सावरगाव येथील दसरा मेळाव्यातून आला.साळी ,माळी ,कोळी,लिंगायत,ब्राम्हण ,शीख,मराठा  अशा सर्व संत महंतांची व्यासपीठावरील उपस्थिती आणि वंजारी पट्यातून निवडणूक लढवणाऱ्या आमदार,मंत्र्यांची हजेरी ही पंकजा मुंडे यांचे शक्तीप्रदर्शनाची झलक दाखवून गेली.हा मेळावा शक्तिप्रदर्शन नव्हे तर शक्तीचे दर्शन घडवण्यासाठी होता असा दावा पंकजा यांनी केला असला तरी मेळाव्याचे व्यासपीठ हे ओबीसींची वज्रमुठ आवळण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून गेले .

भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यावरून वाद झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या स्वभावाला काहीशी मुरड घालत दोन पावलं माग सरकत सावरगाव हे भगवान बाबांचं जन्मस्थळ आपल्या शक्तीप्रदर्शनाच ठिकाण निश्चित केलं .मात्र गतवर्षीचा मेळावा यशस्वी करून दाखवत त्यांनी आपण दोन पावलं माग सरकलो म्हणजे हार मानली नव्हती तर पुढे झेपावण्यासाठीची ती आपली रणनीती होती असाच संदेश  दिला होता .गतवर्षी घाई गडबडीत घेतलेल्या दसरा मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पंकजा मुंडे यांना उभारी देऊन गेला .त्यामुळे यावर्षीच्या दसरा मेळाव्याची तयारी महिना दीड महिन्यापासूनच सुरू होती .या ठिकाणी भगवान बाबांची भव्य 25 फुटाची मूर्ती आणि स्मारक तयार करून त्याचे लोकार्पण त्यांनी या मेळाव्यात केले .

या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार,कोणावर वार करणार,कोणाला इशारा देणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते .या मेळाव्यात कोणाकोणाला आमंत्रित करायचे,व्यासपीठ कसे असेल,स्मारक कसे असेल,कोण केव्हा ,कधी भाषण करेल या सगळ्या गोष्टीवर पंकजा मुंडे स्वतः लक्ष ठेवून होत्या,एवढंच नाही तर मेळाव्यातून नेमका कोणावर निशाणा साधायचा हे देखील त्यांनी आधीच ठरवलं होतं की काय असं कार्यक्रमानंतर वाटून गेलं .

वाघाच्या पोटी वाघीणच जन्म घेणार ना असं लोकांना विचारत त्यांनी हो मी वाघीणच आहे अशी ललकारी देत आपल्या भाषणात विरोधी पक्षासोबतच स्वपक्षीयाना देखील आपली ताकद दाखवून दिली

"तू दबे पाव चोरी छुपे ना आणा,सामने से वार कर फिर मुझे आजमाना "असे म्हणत त्यांनी एकीकडे आपल्या विरोधकांना आव्हान दिलं तर दुसरीकडे कागदी सर्व्हे करून तिकीट दिल जात नसत तर माणसं पाहून तिकीट दिलं जात असे म्हणत स्वपक्षीयाना देखील इशारा दिला आहे .सावरगाव च्या मेळाव्याच वैशिष्ठ म्हणजे या मेळाव्यात व्यासपीठावर संत महंत आणि राजकारणी मोठ्या प्रमाणात दिसून आले .साळी, माळी, ब्राम्हण,लिंगायत अशा सगळ्या छोट्या छोट्या जाती समूहातील महाराज आणि संतांना व्यासपीठावर विशेष स्थान देण्यात आलं होतं .

राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार पंकजा मुंडे यांचा हा मास्टरस्ट्रोक आहे .कारण राज्यात भारतीय जनता पक्षात सध्या ओबीसी समाजाच नेतृत्व करण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याशिवाय दुसरं कोणतंच नाव नाही,त्यामुळेच की काय त्यांनी मी कोणत्याही पदाची लालसा ठेवत नाही तर मी किंगमेकर आहे आणि राहू इच्छिते अस सांगत आपल्या भविष्यातील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .

गोपीनाथ मुंडे यांनी भाजप मध्ये असताना देखील छगन भुजबळ यांच्यासोबत मैत्री कायम ठेवत ओबीसींची ताकद आपल्या पाठीशी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता ,आता पंकजा यांनी देखील हाच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न चालविला आहे .सावरगाव येथे केवळ वंजारी समाजातीलच लोक हजर होते असे नाही तर विविध जातीचे लोक उपस्थित होते, नव्हे ते येतील याची देखील काळजी घेतली होती असे म्हणायला हरकत नाही .

मंत्री राम शिंदे असोत की आमदार कर्डीले,राजळे,मुरकुटे अथवा बीड जिल्ह्यातील धोंडे,धस,ठोंबरे,पवार या सगळ्याच आमदारांची उपस्थिती हेच दाखवून देत होती की आगामी लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून सावरगावातून पंकजा यांनी ओबीसींची वज्रमुठ आवळत आपल्या ताकदीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करीत शंखनाद केला आहे .

दरवर्षी गोपीनाथ मुंडे यांना भगवान गडावरून मुंबई आणि दिल्ली दिसायची आणि ते स्पष्टपणे याची जाहीर कबुली द्यायचे ,त्याच प्रमाणे पंकजा यांना सावरगाव च्या मेळाव्यातून काही न काही तरी  दिसलं असेलच मात्र  हे त्यांनी सांगितलं नसलं तरी कुठं ना कुठं निश्चितच त्यांना सावरगावातून 'वर्षा' दिसलं असेल हे नक्की .

विशेष म्हणजे या मेळाव्यातील त्यांचा वावर हा प्रचंड आत्मविश्वास असल्यासारखा होता.सभेत घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना मध्येच दरडावून बोलणे असो की सभेला व्यासपीठावर आल्याबरोबर उपस्थित जनसमुदायाचे घेतलेले दर्शन असेल पंकजा मुंडे यांनी निवडणुका जवळ आल्या आहेत आणि जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हेच दाखवून दिले .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404 .


रविवार, १५ जुलै, २०१८


 फायरब्रॅंड .........!

"खुदी को कर बुलंद इतना की खुदा बंदे से पुछे के बता 'तेरी रजा क्या है "या प्रमाणे गेल्या साडेतीन चार वर्षात राज्याचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचे नेतृत्व भरारी घेत असल्याचे दिसून आले आहे .  गोपीनाथ मुंडे विरोधीपक्ष नेते असताना त्यांचा जो दबदबा होता त्याचीच आठवण आज धनंजय यांच्या कार्यशैलीकडे पाहिल्यावर येते .मुंडेंच्या घरात महाभारत सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्यांचा अधिकार होता पण कर्णाप्रमाणे येथेही ज्यांच्यावर अन्यायच झाला ते नाव होतं धनंजय मुंडे .मात्र त्यावेळी खचून न जाता धनंजय यांनी संघर्षाच्या माध्यमातून आपलं नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध केलं.त्यामुळेच आज ते फायरब्रॅंड नेते म्हणून नावारूपाला आले आहेत .

ज्या सरकारच्या कारभाराला साडेतीन वर्षाचा काळ लोटत आला असतांना राष्ट्रवादी काँग्रेस ने सरकार विरोधात रान पेटवायला सुरवात केली आहे,कर्जमाफी असो की अच्छे दिन या विषयावरून सरकार किती खोटारडे आहे हे रस्त्यावर उतरून सांगण्यासाठी राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे आणि या सगळ्यांसाठी राष्ट्रवादीने हल्लाबोल चा मार्ग निवडला आहे .विदर्भ ,मराठवाड्यानंतर, उत्तर महाराष्ट्र्र आणि शेवटचा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात नुकताच झाला .या सगळ्यामध्ये आकर्षण ठरले आहेत ते विधान परिषद चे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे.राष्ट्रवादी काँग्रेस चा नवा ओबीसी चेहरा म्हणून महाराष्ट्रानं धनंजय मुंडेंना स्वीकारलंय अस म्हणल्यास वावग ठरणार नाही .

हुबेहूब प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची छाप आपल्या भाषणातून सोडणाऱ्या धनंजय यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब हल्लाबोलच्या माध्यमातून झालं आहे हे नक्की .

गोपीनाथ मुंडे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर अवघ्या तीन साडेतीन वर्षाच्या काळात धनंजय यांनी आपली वेगळी ओळख राज्यात निर्माण केली आहे,विधान परिषदेत ते बोलायला उभे राहिले की सत्ताधाऱ्यांना धडकी भरते हे राज्यानं पाहिलं आहे ,अनुभवलं आहे.राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे असोत की सरकारची शेतकरी विरोधी धोरणं यावर भरभरून बोलणारा नेता म्हणून आज धनंजय यांच्याकडे पाहिलं जातं आहे.

भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ हे दोघेच ओबीसीचे नेते म्हणून राज्याला परिचित होते,ओबीसींच्या प्रश्नावर दिल्लीपर्यंत धडक या दोघांनी मारली होती,मात्र मुंडे यांच्या अकाली निधनानंतर आणि भुजबळांवरील आरोपानंतर राज्यातील ओबीसीला चेहरा राहिला नव्हता,मुंडेंची जागा पंकजा मुंडे यांनी भरून काढली मात्र राष्ट्रवाडीकडं ती जागा रिकामीच होती,मात्र धनंजय यांच्या रुपानं आता राष्ट्रवादीला नवा भिडू मिळाला आहे .

अवघ्या साडेतीन वर्षात धनंजय यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केल्यानं आज अजित पवार यांना सुद्धा त्यांची दखल घ्यावी लागली आहे.हल्लाबोल यात्रेदरम्यान धनंजय मुंडे हे एका सभेच्या ठिकाणी उशिरा पोहचले,तेव्हा अजित पवार यांचे भाषण सुरू होते,ते बोलल्यानंतर लोकांमधून धनंजय मुंडे यांच्या नावाचा आग्रह झाला तेव्हा आपण हरभजनसिंग आहोत आपण दादांच्या बॅटिंग नंतर काय बोलणार असं धनंजय म्हणताच  "अरे धनंजय हरभजन सुद्धा मॅच जिंकून देतो "असं मिश्किल उत्तर देत अजित पवारांनी धनंजय यांना बोलण्यास लावले,यावरूनच धनंजय मुंडे हे सर्वमान्य नेते झाल्याचं सिद्ध होतं .

गोपीनाथ मुंडे यांना सोडून पवारांच्या साथीला बसल्यानंतर राज्यातील ओबीसी विशेषतः वंजारी समाजात धनंजय मुंडेंबद्दल प्रचंड रोष होता,मात्र गेल्या साडेतीन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे,आपण गोपीनाथ मुंडे यांना सोडण्यामागे काही कारणं होती हे आता लोकांना पटवून देण्यात ते यशस्वी होत असल्याचं चित्र आहे.धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ अशी त्यांची प्रतिमा तयार होऊ लागली आहे, ठाकरे कुटुंबातील राजकीय महाभारतानंतर राज्यात गाजलं ते मुंडेंच्या घरातील महाभारत.यात कोण कौरव आणि कोण पांडव हे जनता वेळ आल्यानंतर ठरवेल मात्र आजतरी राष्ट्रवादी काँग्रेसला धनंजय यांच्या रुपानं एक फायरब्रँड नेता मिळाला आहे हे दिसू लागलं आहे.

कोणत्याही कार्यक्रमात असो किंवा मुंबईमध्ये धनंजय ज्या सहजतेने लोकांना भेटतात ,त्यांचं ऐकून घेतात त्यामुळे ते तरुणांचे आकर्षण ठरू लागले आहेत .विषय कोणताही असो त्यावर सखोल माहिती घेऊन अभ्यासपूर्ण बोलणारा नेता म्हणून मीडियामध्ये सुद्धा ते परिचित होऊ लागले आहेत,एका एका दिवसात शेकडो किलोमीटर चा प्रवास केल्यानंतरही शेवटच्या कार्यकर्त्याला भेटल्याशिवाय या माणसाचा दिवस संपत नाही .मतदारसंघातील लोक असोत की राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक प्रत्येकाला भेटून त्याच्याशी संवाद साधून,त्याची अडचण समजून घेऊन त्याला आश्वस्त करणारा नेता म्हणून त्यांची इमेज डेव्हलप होऊ लागली आहे .

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील हाडवैर अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे,पंकजा या त्यांच्या पक्षात मास लीडर म्हणून पुढे आल्या आहेत तर धनंजय यांनी देखील हम भी किसिसे कम नही हे सिद्ध करून दाखवलं आहे .गोपीनाथ मुंडे ज्या प्रमाणे लोकांना सभांमधून बोलत करायचे,त्यांच्याशी संवाद साधायचे त्याच पद्धतीने सध्या धनंजय मुंडे हे लोकांना आपलंसं करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

प्रत्येक सभेत बोलायला उभं राहिल्यानंतर आले का अच्छे दिन,खात्यात पंधरा लाख जमा झाले का म्हणताच लोकांचा मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे .राज्य सरकारवर टीका करतांना धनंजय यांच्याकडून केले जाणारे हावभाव,चालू घडामोडीचा संदर्भ यावरून ते पक्के राजकारणी झाले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .

हल्लाबोल यात्रेचा नुकताच समारोप झाला आहे ,या सर्व ठिकाणी तरुण,वृद्ध,महिला यांच्या आकर्षणाचे केंद्र धनंजय मुंडे झाले आहेत.राष्ट्रवादीने सुरू केलेला हल्लाबोल सरकारवर किती परिणाम करील हे येणारा काळच ठरवेल मात्र या माध्यमातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चार्ज झाले आणि मुख्य म्हणजे धनंजय मुंडे यांच्या रुपानं राष्ट्रवादीला एक नवा ओबीसी चेहरा मिळाला हे मात्र नक्की .

येणाऱ्या निवडणुकानंतर सत्ता कोणाची येणार हे आज तरी सांगणे अवघड असले तरी धनंजय मुंडे यांच्या रुपानं राज्याला एक नवा ओबीसी चेहरा मिळाला आहे हे मात्र विसरून चालणार नाही .त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, राज्याचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना प्रभू वैद्यनाथ देवो याच सदिच्छा !

लक्ष्मीकांत रुईकर,बीड .9422744404 .

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...