सोमवार, २५ जुलै, २०१६

स्वयमेव मृगेंद्रता .........!

स्वयमेव मृगेंद्रता.........!

साधारपणे चार पाच दिवसापूर्वी राष्ट्रसंत भय्यू महाराज यांना भेटण्याचा योग आला,नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे महाराज येणार आहेत अस कळल्यानंतर तेथे जाऊन भेट घेतली,इतक्या दिवस महाराजांबद्दल फक्त ऐकून होतो,प्रत्यक्ष भेट चार पाच वेळा झाली होती,मात्र ती जुजबी अशीच होती,मात्र कोपर्डी येथे काहीशी निवांत भेट झाली,त्यांच्या बरोबर चर्चा करण्याचा योग आला,तब्बल एक दीड तास वेगवेगळ्या विशेषतः शेती आणि शेतकरी या विषयावर चर्चा झाली,त्यानंतर मनात विचार आला महाराजांची जी प्रतिमा आहे ती म्हणजे ते राजकीय गुरू आहेत त्यापेक्षा ते कितीतरी वेगळे आहेत,त्यांचा प्रत्येक क्षेत्रात गाढा अभ्यास आहे याची जाणीव झाली,अस कोणतंच क्षेत्र नाही ज्याची माहिती महाराजांना नाही,प्रत्येक क्षेत्राचा त्यांचा अभ्यास आणि अधिकारवाणीने बोलणं पाहून एका श्लोकाची आठवण झाली "नाभिषेको न संस्कारःसिहंस्य क्रियते नने । विक्रमार्जित सत्वस्य " 'स्वयमेव मृगेंद्रता '। अर्थात सिंहाला कोणत्याही अभिषेक किंवा संस्कार करून राजा हि उपाधी घेण्याची गरज पडत नाही कारण तो जंगलाचा अनभिषिक्त सम्राट हा आपल्या कार्यकौशल्यामुळे असतो,असच काहीस मला भय्यू महाराजांबद्दल जाणवलं .
आमचे मित्र डॉ सतीश लड्डा यांनी महाराज कोपर्डी ला येणार असल्याचं सांगितलं आणि मी त्यांच्यासोबत रवाना झालो,साडेचार पाच वाजेपासून महाराजांची भेट होईल यासाठीची प्रतीक्षा तब्बल रात्री नऊ वाजता संपली, खरं तर एवढा वेळ लागल्यामुळे मी काहीसा निराश झालो होतो,कदाचित मी पत्रकार असल्यामुळे माझ्यातील इगो मला त्याची सातत्याने जाणीव करून देत असावा कारण एवढा वेळ कोणाची भेट घेण्यासाठी थांबणं आमच्या (पत्रकार )स्वभावात नाही,अगोदर आम्ही नंतर सगळे हाच आमचा आजपर्यंतचा समज त्यामुळे लागणारा वेळ असह्य होत होता,उद्विग्न करीत होता ,पण दुसर मन थांबण्यासाठी  आग्रह करीत होत, शेवटी थांबूया काही वेळ काय होईल थोडा उशीरच होईल मात्र भय्यूजींच्या भेटीचा योग् पुन्हा कधी येईल हे सांगता येणार नाही म्हणून थांबलो आणि एका विचारवंत,प्रकांड पंडित,सर्वगुणसंपन्न,माणुसकीचा झरा असणाऱ्या महान दैवी योगपुरुषाला भेटण्याची संधी मिळाली
येणारा प्रत्येक जण महाराजांना अडचण सांगत होता ते त्याच्याशी बोलतं होते,मी मात्र कुळधरन गावातील शाळेत कधी एकदा हा सगळा प्रकार थांबतो याचाच विचार करीत होतो,महाराज कर्जत येथे निवांत भेटतील अस कळल्यानंतर आम्ही कर्जत ला गेलो,मात्र तेथेही गर्दी असल्यामुळे न भेटताच जावे असा विचार केला पण डॉ लड्डा याना महाराजांशी बोलायचे होते त्यामुळे थांबावे लागले मात्र महाराजांची भेट झाली आणि थकवा ,निराशा कुठल्या कुठे दूर पळून गेली,किती लोकांना तुम्ही इंटरटेन करता,जरा तब्येतीची काळजी घ्या,लोकांना समस्या कायम राहणारच आहेत मात्र आपल्याही काही मर्यादा आहेत अस त्यांना सांगावं असा विचार एकदा मनात आला मात्र त्यांची भेट झाल्यानंतर सगळं विसरून त्यांच्याशी बोलण्यात किती आणि कसा वेळ गेला ते कळलेच नाही,महाराज कर्जत येथे एका भक्ताच्या घरी गेले तेव्हा श्रीकांत चव्हाण यांनी माझी ओळख करून दिली,महाराजांनी सहजपणे वडिलांच्या तब्येतीची चौकशी केली ते गेल्याचं सांगितल्यानंतर गंभीर होत महाराजांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.
कोपर्डीच्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत अशा घटना का घडतात त्या कशा रोखता येतील,समाजाने काय केले पाहिजे,महिलांच्या रक्षणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील या विषयावर ते भरभरून बोलत होते,महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा दल स्थापन करण्याचा त्यांचा विचार आणि तळमळ यातून ते किती कोमल मनाचे आहेत याची जाणीव झाली.
आज पर्यंत महाराजांचा एकच चेहरा जगासमोर होता तो म्हणजे ते राजकीय गुरू आहेत,राजकारणी लोकांचा,उद्योजकांचा त्यांच्याकडे मोठा राबता असतो,ते अनाथ ,निराधार मुले,महिला यांच्यासाठी सेवाव्रतीने कार्य करतात,मात्र एवढ्या सगळ्या धावपळीत ते महिलांच्या सुरक्षेबाबत इतके जागरूक असतील याची कल्पना नव्हती,कोपर्डी येथे त्यांनी दोन बस मुलींना शाळेत ने आण करण्यासाठी दिल्या,या बस मध्ये सीसीटीव्ही ,हजेरी रजिस्टर,मोबाईल,अलार्म अशा सुविधा दिल्या आहेत, दोन बस त्यांनी बीड साठी दिल्याचं देखील आवर्जून सांगितलं आणि त्यांचं बीडवर किती बारीक लक्ष आहे हे लक्षात आलं.
कोपर्डी घटनेवर  चर्चा झाल्यानंतर  मीच त्यांना शेतीचा विषय काढला,दिवसभर हजारो लोकांना भेटून ते काहीशे थकले होते,त्यांना नगर ला जाऊन आराम करायचा होता मात्र शेतीचा विषय निघाला आणि महाराजांची पावलं थबकली,बीड जिल्ह्यातील शेती,शेतकरी,त्याच जीवनमान या विषयावर ते पोटतिडकीने बोलत होते,बीडसह मराठवाड्यात रासायनिक खताचा अतिरेकी वापर झाल्याने तेथील जमीन नापीक झाली आहे,कापूस आणि ऊस या दोनच पिकांवर शेतकऱ्याचा भर असल्याने इतर पिकं तो घेत नाही,त्यामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे तो सेंद्रिय खताच्या माध्यमातून सुधारण्यासाठी पुढील नऊ वर्ष परिश्रम घ्यावे लागतील हे सांगतांना त्यांची बळीराजसाठीची तळमळ दिसून आली.
मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्याबरोबरच रासायनिक खतांचा अति वापर थांबला पाहिजे यासाठी काय करता येईल याची चिंता त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती,शासन शेतकऱ्याला ठिबक सिंचनासाठी अनुदान देत मात्र त्यात शेतकरी कसा नागवला जातो आणि बँकांचे उखळ कसे पांढरे होते हे त्यांनी उदाहरण देऊन पटवून दिले तेव्हा मी अचंबित झालो,ठिबक सिंचन असो कि पीक कर्ज वाटप यामध्ये शेतकरी कसा भरडला जातो हे त्यांनी सांगितल्यानंतर आश्चर्य वाटले,त्यांच्या बोलण्यातून सरकार,त्यातील सत्ताधारी,प्रशासन ,लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल अपेक्षाभंगाचं दुःख दिसून आलं,सत्ता कोणाची असो शेतकर्याच्या आयुष्यात काही फरक पडत नाही त्यामुळेच आपण  मध्यंतरी सगळं सोडून देण्याचा विचार केल्याच त्यांनी बोलण्याच्या ओघात सांगितलं आणि मनात कालवा कालव झाली,महाराज लोकांना देखील दुःख ,चिंता,निराशा असते याचा अनुभव आला,
     दरम्यान आता शेती आणि शेतकरी याविषयावर  ते विचार करत असून शाश्वत शेती कशी करता येईल यासाठी पुढाकार घेण्याचं त्यांनी सांगितलं आणि मनाला बरं वाटलं .
गावगावांचा अभ्यास करून तेथील जमिनीमध्ये कोणती पीकं घेता येऊ शकतात,त्यासाठी कोणती खत आवश्यक आहेत,गटशेती केली तर काय फायदा होईल याविषयावर त्यांचा अभ्यास थक्क करणारा होता,महाराज म्हणजे लोकांना पाया पडून दक्षिणा घेऊन आशीर्वाद देणारा असा माणूस हे भय्यू जी बरोबर चर्चा केल्यानंतर खोटे वाटते.हे विश्वचि माझे घर हि ज्ञानोबा माउलींची संकलपना महाराज सत्यात आणत असल्याची जाणीव नक्कीच होते,त्यांना सर्वसामान्य माणूस,त्याच्या अडचणी  त्यावरील उपाय याबाबत किती आपुलकी चिंता आहे हे दिसत होते .
महाराज केवळ राजकीय गुरू नाहीत तर ते जगाच्या कल्याणाची चिंता वाहणारे आहेत याची त्या दिवशी खात्री पटली, म्हणजे मी काही त्यांचं मूल्यमापन करणारा नाही किंवा ती माझी पात्रता देखील नाही परंतु जे जाणवलं ते मी मांडल, "उद्योगमं, साहसम, धैर्यमं, बुद्धिहीं, शक्ती,पराक्रमः,षडेते यत्र वर्तन्ते,तत्र देव सहायकृत " ,अस जे म्हणतात ते भय्यूजींच्या सारख्या पुण्यशील व्यक्ती बद्दलच असावे यावर शिक्कामोर्तब झाले.त्यांचं हे कार्य असच अखण्डपणे सुरु राहावे यासाठी ईश्वर त्यांना बळ देतोच आहे यात शन्का नाही मात्र समाजानेही त्यांच्या या राष्ट्रबांधणीच्या कार्यात सहभाग घ्यावा एवढीच माफक अपेक्षा .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड.9422744404.

रविवार, १९ जून, २०१६

पाणी गावाला गेलं

पाणी गावाला गेलं

माझी मुलगी तिच्या काकूला दुपारच्या वेळी सहज विचारत होती,काकू आपल्या बोअर च पाणी कुठं गेलं,तिच्या काकूने जे उत्तर दिलं ते मलाच नव्हे तर आजच्या परिस्थितीला चपखल बसणारे असेच होते,"पाणी गावाला गेलं"हे तिच्या काकूंचे उत्तर माझ्या मनाला चटका लावून गेलं.
आमच्या बोअर च पाणी मे च्या अखेरीस अचानक कमी झालं,कॉलनीत सगळे बोअर कोरडे पडले असताना आम्ही मात्र नशीबवान होतो कारण भीषण दुष्काळात आमच्या बोअर ला भरपूर पाणी होत,बटन दाबलं कि पाणी सुरु व्हायचं,मात्र आमच्या पाण्याला नजर लागली अन पावसाळ्याच्या तोंडावर बोअर च पाणी कमी झालं,आजूबाजूला कोणी तरी बोअर घेतला असेल त्यामुळे पाणी कमी झालं असेल,जमिनीखालच पाणी आपली जागा बदलत असे एक ना अनेक विषय मग घरात चर्चिले गेले,
खऱ्या परिस्थिती बद्दल मात्र कोणीच बोलायला तयार नव्हतं,आज भूगर्भातील पाणी पातळी जी खोल गेली आहे ती काही एका रात्रीत झालेली जादू नाही,माणूस नैसर्गिक संपत्ती चा वापर योग्य प्रमाणात करीत नसल्याने आज माणसावर पाण्यासाठी दारोदार हिंडण्याची वेळ आली आहे,पाणी म्हणजे नीर जे विवेकाने वापरावे असे म्हणतात मात्र माणूस नेमकं याच्या उलट वागत गेला ज्यामुळे आज पाण्याच्या एका थेंबासाठी तरसावे लागत आहे
इतिहासाचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल कि अगदी राम कृष्णाचा काळ असो अथवा छत्रपती शिवरायांचा काळ या काळात पाण्याचं योग्य नियोजन कस करावं याला विशेष महत्व दिल गेलं होत,आजही शिवकालीन पाणी पुरवठा योजना नावाने जी योजना कार्यरत आहे ती शिवरायांच्या काळातील संदर्भावर आधारित अशीच आहे,
राज्याच्या मराठवाडा,विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग मागील तीन चार वर्षापासून दुष्काळाचा सामना करतो आहे,सातत्यानं कमी होणारा पाऊस,पाण्याचं बिघडलेले नियोजन,भूगर्भातील घसरत चाललेली पाणी पातळी,पाण्याचा बेसुमार उपसा यामुळे या भागात दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत,हा सगळा भूभाग हा शेतीवर आधारलेला असाच आहे,आणि शेती हि लहरी पावसाच्या जीवावर केली जाते त्यामुळे पाऊसाने दगा दिला कि शेती पिकतं नाही आणि बळीराजाच्या गळ्याला फास लागतो
     मराठवाडा असो कि विदर्भ या भागात मागील दहा बारा वर्षात किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून शेतीमध्ये नगदी पिकाच्या नावाखाली शेतकरी ऊस आणि कापूस याच पिकांवर जोर देतानाचे चित्र दिसते,एक एकर ऊस लागवडीसाठी साधारणपणे जेवढे पाणी लागते तेवढे पाणी एका गावाची महिनाभराची तहान भागवू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे तरी देखील आम्ही उसाची शेती करणं सोडलेलं नाही,ते सोडावं असा अट्टहास नाही मात्र ठिबक वर उसाची शेती केली तर पाण्याची बचत होऊ शकते,दुसर म्हणजे या उसाच्या शेतीत अंतर पीक घेतल्यास चार पैसे गाठीला राहू शकतात,मात्र एवढा बारकाईनं विचार कोण करतो आज काल ज्याला त्याला आजचा आताचा विचार सुचतो,त्यामुळे आज पाणी आहे ना मग वापरा बेसुमार नसेल तेव्हा बघू हि बेफिकीर वृत्ती वाढीस लागली आहे त्यामुळे आज पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
     केवळ शेतिमध्येच पाण्याचा बेसुमार उपसा होतो अस नाही तर शहरी भागातील लोकही भविष्याचा विचार न करता पाण्याचा अतिरेकी वापर करताना दिसून येतात,आज शहरीकरण वाढू लागलं आहे,फ्लॅट संस्कृती वाढीस लागल्याने घर तिथं बोअर पद्धत रूढ झाली आहे त्यामुळे फुटाफुटावर बोअर दिसू लागले आहेत,जमिनीची अक्षरशः चाळण केली जात आहे,शंभर किंवा दोनशे फुटापर्यंत  बोअर खोदण्यास परवानगी आहे मात्र  नियम तोडण्यात धन्यता मानणाऱ्या आम्ही लोकांनी पाण्याच्या थेंबासाठी हजार फुटापर्यंत जमिनीला छिद्र पाडली, तरी देखील पाणी लागेनास झालं आहे,बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात देवी निमगाव या गावात एका शेतकऱ्याने दहा वर्षात त्याच्या शेतात 48 बोअर घेतले आहेत विशेष म्हणजे त्यातील फक्त चार ते पाच बोअर ला आज पाणी आहे,यासाठी त्याने किमान पंचवीस लाख रुपये खर्च केले असतील,हि वेळ आज मराठवाडा ,विदर्भ या भागातील लोकांवर का आली याचा कधीतरी गांभीर्यानं विचार होणार आहे कि नाही .
वाढत्या शहरीकरणामुळे शहर बकाल होत आहेत,अवाढव्य वाढणाऱ्या शहरांना आणि शहर वासियांना मूलभूत सोयी सुविधा पुरवणे नगर परिषद प्रशासनाला कठीण होत आहे मात्र त्यांनी जो नागरिक बांधकाम परवानगी मागण्यास येईल त्याने जल पुनर्भरण अथवा पावसाच्या पाण्याचं बोअर मध्ये पुनर्भरण करण्याचं मान्य केल्यास आणि ते केलं आहे कि नाही याची खात्री करूनच परवानगी देण्याचा नियम लावल्यास काही प्रमाणात लोकांवर वचक बसेल असे वाटते.
एका पाचशे फुटाच्या गच्चीवर एका रात्रीत साधारण पाऊस झाल्यास दीड ते दोन हजार लिटर पाणी जमा होऊ शकते,हेच पाणी प्रत्येकाने आपल्या बोअर अथवा आडात किंवा जमिनीत मुरवले तर खालावत चाललेली पाणी पातळी काही प्रमाणात का होईना पण सुधारण्यास मदत होईल यात शंका नाही.शहरात बेसिन असो अथवा संडास बाथरूम सर्वत्र जे फ्लश वापरले जातात त्याद्वारे रोज हजारो लिटर पाणी नालीत वाया जात मात्र याचा विचार ना लातूर करांनी केला ना बीड करांनी मग आज हे सगळे लोक बसले आहेत बोंबा मारत,तेव्हा विनाकारण निसर्गाचा लहरीपणा ,देवाची अवकृपा या गोष्टीवर चर्चा करीत  बसण्यापेक्षा पाण्याचा योग्य वापर,शेतीमध्ये पाण्याचं योग्य नियोजन,भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी जलपुनर्भरण यासारखे प्रयोग राबवणे आवश्यक आहे,
    आज प्रत्येक गावात जलयुक्त शिवार अथवा इतर माध्यमातून पाणी साठवण्याची काम केली जात आहेत  त्यामुळे यंदाचा पावसाळा शिवारातील पाणी शिवारात साठवण्यासाठी उपयोगी ठरेल यात शंका नाही,प्रत्येक गावात जे सांडपाणी रस्त्यावर अथवा नालीमध्ये सोडलं जात ते  गावातील मोकळ्या जागेवर एक मोठा खड्डा खोदून त्यात सोडले तर  गावातील पाणी पातळी वाढण्यास मदत होऊ शकते , त्याच पद्धतीने गावातील प्रत्येक घरासमोर सांडपाण्याचा वापर करून झाडं लावली तर ती सावली बरोबरच पाऊस पाडण्यास मदत करू शकतील .
     माणसाने पाणी हे जीवन आहे ते जपून वापरावे लागते याचा धडा घेतल्यास आणि पाण्याच्या वापराचे नियम काटेकोर पणे पाळल्यास पाणी पुन्हा कधी गावाला जाण्याचा विचार करणार नाही अशी आशा करायला हरकत नाही,आज पाणी काही दिवस गावाला अथवा सुट्टीवर गेलं तर आपले हाल बेहाल सुरु आहेत विचार करा पाण्यानं जर संप अथवा बेमुदत गावाला जाण्याचा विचार केला तर आपले कसे होईल.तेव्हा पाणी गावाला जाणार नाही यासाठी सर्वजण प्रयत्न करूया आणि पाणी वाचवूया .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड

रविवार, १७ एप्रिल, २०१६

सुपारी पत्रकारिता म्हणजे काय

सुपारी पत्रकारिता म्हणजे काय?
आज काल पत्रकारांना किंवा चॅनेल ला नाव ठेवणे,त्यांच्या नावाने बोंब मारणे हि एक फॅशन झाली आहे,वर्षातील 365 दिवसांपैकी 350 दिवस ज्या नेत्यांच्या बातम्या हि वर्तमानपत्र किंवा चॅनेल लोकांपर्यंत पोहचवतात त्या नेत्यांना एखादी दुसरी बातमी विरोधात आली कि त्यांचा तिळपापड होतो,मग त्यांचे कार्यकर्ते माध्यमांच्या नावाने बोटं मोडायला सुरवात करतात,वास्तविक पाहता माध्यमं हि लोकांमध्ये जागृती करण्याचं काम करतात पण ज्या लोकांच्या जीवावर आपलं राजकारण (दुकान)सुरु आहे त्या लोकांच्या समस्या मांडून त्याबद्दल नेत्यांना जाब विचारला तर या नेत्यांची तळपायाची आग मस्तकाला जाते
काल परवा असाच प्रकार बीड मध्ये घडला,जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांची बीड ला खरीप आढावा बैठक होती,या बैठकीनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना बियर च्या कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्या बद्दल प्रश्न विचारण्यात आला,तसा हा प्रश्न काही वावगा नव्हता ,त्यांनी त्याचे उत्तर दिले,ज्यामध्ये त्यांनी कारखान्यांना लागणारे पाणी आरक्षित असते त्यामुळे ते पाणी बंद करणे योग्य होणार नाही कारण त्यामुळे अनेक लोक बेरोजगार होतील असं मत मांडल, त्यांचं मत वाईट नव्हतं,मात्र एकीकडे मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळ असताना आणि पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना रेल्वेने पाणी आणावं लागत असताना कारखान्यांना जर कोट्यवधी लिटर पाणी दिले जात असेल तर त्याबाबतीत विचार केला जाऊ शकतो,मात्र मंत्री मुंडे यांनी वेगळी भूमिका मांडली, त्यांची भूमिका माध्यमांनी दाखवली आणि मुंडे यांचा संताप झाला
माझी बदनामी करण्याचा विडा उचलला आहे,सुपारी घेऊन पत्रकारिता केली जात आहे,या पत्रकारांसमोर तुकडे फेकले कि हे शांत होतील अस आणि इतर बरच काही त्या बोलल्या,वास्तविक पाहता माध्यमांनी ज्या बातम्या दाखवल्या त्यात काय चूक होत हे त्या सांगू शकल्या नाहीत,जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पदाचा विषय असो कि शनी शिंगणापूर चा विषय असो मला विनाकारण बदनाम केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला ज्यात तथ्य काहीच नाही असं दिसत ,
पंकजा मुंडे या राज्यात संघर्ष यात्रेच्या निमित्ताने असो कि जलयुक्त शिवार च्या माध्यमातून असो फिरल्या तेव्हा याच माध्यमांनी त्यांना मोठा स्पेस दिला,भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना संबोधलं,त्या गावागावात गेल्या तेव्हा त्याची बातमी कव्हर केली अस असताना कधीच पंकजा यांना मीडिया किंवा पत्रकार सुपारी घेऊन बातम्या करतात अस वाटलं नाही,बरं त्यांच्या विरोधात सुपारी देणार कोण आणि घेणार कोण कारण केवळ त्यांची बदनामी करायचा विषयच नाही मग त्यांनी हा आरोप कशाच्या आधारावर केला,असा अनुभव त्यांना कोणत्या जिल्ह्यात किंवा माध्यमाच्या बाबतीत आला असेल तर त्यांनी तस जाहीर सांगावं,राज्यात आज अनेक समस्या आहेत,पाण्याचं संकट भीषण आहे अशा वेळी सरकार वर टीका टिप्पणी होणारच,सरकार म्हणून घेणारे मंत्री ,अधिकारी याना प्रश्न विचारले जाणारच त्यात वावगं अस काय आहे,पाण्याची समस्या आ वासून उभी असताना खडसे सारख्या मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी हेलिकॉप्टर साठी हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असेल तर त्याची बातमी होणारच,मोबाईल च बिल भरायला शेतकऱ्याकडे पैसे आहेत अस वक्तव्य खडसेंनी केल्यानंतर त्याचा समाचार घेतला जाणारच मग त्यावरून माध्यम बेजबाबदार कशी ठरवायची,
राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी टोल मुक्ती असो कि कर्जमाफी च्या घोषणा करणाऱ्या सेना भाजप च्या पुढार्यांना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडला असेल तर माध्यमांनी त्याची आठवण करून दिली तर माध्यम सुपारी घेऊन बातम्या करतात हे म्हणन कितपत योग्य आहे,माध्यमांनी केवळ सरकार,मंत्री ,अधिकारी यांचे गोडवे गावेत आणि मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करावे अस यांचं म्हणन असेल तर ते करण योग्य होणार नाही,माध्यम हि जागल्याची भूमिका करीत असतात,मग त्यात काही लोक अपवाद असू शकतात मात्र त्यामुळे सगळे एक जात चोर आहेत अस कस म्हणता येईल,पंकजा मुंडे यांच्या कामाचा झपाटा पाहिला तर थक्क व्हायला होत,त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले तेव्हा याच माध्यमांनी किंवा प्रतिनिधींनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे याचा त्यांना विसर पडला कि काय,99 चांगल्या बातम्या छापल्या नंतर कधीच त्याची दखल न घेणाऱ्या या नेत्यांना एक बातमी विरोधात आली कि जमत नाही अस का?
पंकजा मुंडे यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी जे निर्णय घेतले,किंवा ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याची दखल नेहमीच मीडिया ने घेतली आहे,बीड ला त्या जे बोलल्या तेच चॅनेल वरून दाखवलं गेलं,मात्र त्यांचं म्हणन तोडून मोडून ट्विस्ट करून दाखवल्याचा आरोप त्यांनी केला ज्यात काही तथ्य नाही,त्यांच्या विभागाने जे काम केलं,किंवा सरकार जे काम करत ते माध्यमांनी दाखवायचं नाही अस ठरवलं तर चाललं का?अस कोणी करणार नाही मात्र सुपारी घेऊन पत्रकारिता केली जात असल्याचा त्यांचा आरोप दुर्दैवी म्हणावा लागेल,बीड सारख्या जिल्ह्यात बहुतांश पत्रकार या वृत्तीचे नाहीत,बरं जे इ मीडिया प्रतिनिधी आहेत त्यांना पंकजा मुंडे यांनी कितीवेळा त्यांच्या भाषेत तुकडे टाकले,कार्यक्रम कव्हर करणे ऑफिसला पाठवणे हे काम ते बिचारे करतात,मात्र आमच्या कार्यक्रमाला या किंवा कव्हर करा अस देखील खुद्द मंत्री महोदया किंवा त्यांच्या यंत्रणेकडून कधीच सांगितलं जात नाही,मंत्र्यांना नसेल वेळ मिळत पण खालची यंत्रणा तर हे काम करू शकते ना,मग ते देखील होत नाही,बरं निरोप आलाच तर त्यांच्या कडून कधी काही मिळण्याची अपेक्षा केली जात नाही,काही लोक असतीलही ज्यांना मंत्री आले कि दारात उभं राहायची सवय आहे,ते स्वतःच्या स्वार्थासाठी असले उद्योग करीत असतीलही म्हणून सगळेच तसे आहेत हे म्हणन योग्य नाही,पत्रकार परिषदेत यायचे मंत्री,पुढारी जे सांगतील ते ऐकायचे आणि नंतर त्यांच्या कानाला लागून त्यांना हव्या तश्या बातम्या करायच्या हा उद्योग काही लोक करीत असतील,मात्र बहुतांश पत्रकार वेगळी काही बातमी मिळते का यासाठी प्रयत्नशील असतात,अशावेळी प्रश्न,उपप्रश्न विचारले जातात,मात्र त्यामुळे त्या पत्रकारांचा संबधित नेत्यांबद्दल पर्सनल काही मतभेद आहे असं नसत,केवळ प्रसंगानुरुप ते प्रश्न विचारलेले असतात पण असे प्रश्न विनाकारण बदनाम करण्यासाठी विचारले जात असल्याचा या नेत्यांचा गैरसमज होतो किंबहुना करून दिला जातो,त्यामध्ये काही तोंडपूजे कार्यकर्ते तर असतातच मात्र काही पत्रकारही आघाडीवर असतात आशा वेळी खऱ्या पत्रकारांची अडचण होते.
मागील पंधरा सोळा वर्षाच्या पत्रकरितेमध्ये मला तरी अजून सुपारी पत्रकारिता कशी करायची असते हे समजलेले नाही,माझ्यासारखा माणूस तोंडावर प्रश्न विचारून मोकळा होतो अनेक वेळा समोरच्या व्यक्तीला ते पटत नाही म्हणून मी प्रश्नच विचारायचे नाही हे कितपत योग्य आहे,प्रश्न विचारणं माझं काम आहे उत्तर द्यायचे कि नाही हे त्यांनी ठरवावं,बीड च्या पत्रकरितेमध्ये सगळेच धुतल्या तांडळासारखे आहेत असंही म्हणन नाही मात्र त्याच वेळी सगळेच चूक आहेत हे म्हणन देखील संयुक्तिक नाही अस मला वाटत,शेवटी काय हा ज्याच्या त्याच्या विवेकाचा भाग आहे,पण मीडिया ने केलेली टीका हि एवढी पर्सनल घेत नसतात हे मात्र नक्की
लक्ष्मीकांत रुईकर,झी मीडिया बीड

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

राजकारण गडाचं

राजकारण गडाचं
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या वेगळ्या कार्यशैली मुळे परिचित असलेले स्व.गोपीनाथ मुंडे यांची ओळख महाराष्ट्राला आणखी एका कारणामुळे आहे,ती म्हणजे भगवानगड.पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पाथर्डी तालुक्यात असलेला भगवानगड विशेष चर्चेत आला तो मुंडे यांच्या मुळेच,साधारण पणे 12 वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगड च्या गादीवर नामदेव शास्त्री सानप यांना बसवले,मुंडे आणि गड हे समीकरण राज्याच्या राजकारणात मागील दहा बारा वर्षात परिचित झाले होते,दरवर्षी भगवान बाबाच्या पुण्यतिथी आणि जयंती निमित्त गडावर मोठी यात्रा भरते,तसेच विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी मुंडे देशात कोठेही असले तरी गडावर येत,आणि त्या ठिकाणी त्यांची टोलेजंग सभा होई,अगदी दीड वर्षांपूर्वी मुंडे केंद्रात मंत्री झाल्यानंतर राज्यात सर्वप्रथम आले ते भगवान गडावर,या गडाने मुंडेंच्या मागे मोठी ताकद उभी केली,विशेषतः वंजारी समाजाची एकगठ्ठा मते मुंडेंच्या मागे गडामुळे राहिली ,त्यामुळेच राज्यातील सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षातील लोकही मुंडेंच्या या ताकदीपुढे नतमस्तक होत असत,
मुंडे यांच्या अकाली निधनानंतर भगवान गडावरून महंत नामदेव शास्त्री सानप यांनी पंकजा मुंडे यांना गडाची मानसकन्या जाहीर केले,मुंडेंच्या दहाव्या आणि तेराव्या दिवशी नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका मांडली होती,तेथेच गोपीनाथ गडाची मुहूर्त मेढ रोवली गेली आणि सुरु झाला भगवान गड (नामदेव शास्त्री)आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष.
गोपीनाथ गड हा येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरावा हा पंकजा यांचा उद्देश होता,त्यात वावगे असे काहीच नव्हते,मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी शास्त्री यांनी गोपीनाथ गड हा राजकीय गड असेल आणि भगवानगड हा धार्मिक गड असेल,या पुढे भगवान गडावर राजकीय भाषणे होणार नाहीत असे जाहीर केले आणि उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या,आजपर्यंत भगवान गडावरून मुंडे राजकारण करतात अशी दबक्या आवाजात होणारी चर्चा शास्रीनच्या घोषणेमुळे खुलेआम झाली,कदाचित येथेच पंकजा आणि शास्त्री यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली असावी,
राज्यामध्ये भगवानगड ला मानणारा मोठा समाज आहे,केवळ वंजारी समाजाचा गड अशी असणारी प्रतिमा आजही कायम आहे ,वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे,या गडावर सर्व जाती धर्मातील लोक श्रद्धेने येतात,परंतु मुंडे यांचा गडावरील वावर पाहता हा गड वंजारी समाजाचा असावा असा अनेकांचा समज आहे,
भगवान गडावरून यापुढे दसरा मेळाव्यात राजकीय भाषण होणार नाही असा निर्णय नुकताच नामदेव शास्त्री यांनी जाहीर केला,मध्यंतरी पंकजा आणि शास्त्री यांच्यात धुसफूस सुरु असल्याच्या बातम्या होत्या,काही कार्यक्रमानिमित्त पंकजा या गडावर गेल्या तेव्हा शास्त्री आणि त्यांच्यात विसंवाद वाढल्याच्या सुरस बातम्या आल्या होत्या,त्याचे खंडन ना पंकजा यांनी केले ना शास्रीनी केले,दसरा मेळावा होणार कि नाही यावरून शास्त्री विरुद्ध काही पुढाऱ्यांनी शेरेबाजी देखील केली होती,पंकजा यांना मानस कन्या जाहीर केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील गडावर झाला होता हे सर्वश्रुत आहे,अशा वातावरणात गड ,शास्त्री आणि पंकजा यांच्यात दुरावा आल्याचे स्पष्ट जाणवत होते,
पंकजा यांना गड ताब्यात घ्यायचा आहे तर शास्रीना कोणाची लुडबुड नको आहे अशा चर्चा जोरात सुरु आहेत, कोण चूक कोण बरोबर यावर मतमतांतरे असू शकतील मात्र सुरु असलेला वाद समाजाला देखील मान्य नसल्याचे दिसते, राज्याच्या राजकारणात आपला दबाव कायम ठेवायचा असेल तर समाजाची ताकद आपल्या मागे कायम कशी राहील यासाठी गड आपल्या ताब्यात कसा राहील यासाठी पंकजा यांचा प्रयत्न सुरु असल्यास त्यात वावगे काहीच नाही,कारण स्व गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणात दबदबा निर्माण करण्यात गडाचा सिंहाचा वाटा होता हे कोणीच अमान्य करणार नाही,त्यामुळे गडाची ताकद आपल्या मागे राहावी यासाठी पंकजा यांचा प्रयत्न असल्यास चुकीचे काहीच नाही मात्र त्यासाठी त्यांनी जो मार्ग निवडला आहे तो कदाचित चुकीचा असू शकतो,
कोणी काहीही म्हणो भगवान गडावरून एकदा आदेश मिळाला कि मग समाज कोणाचेच ऐकत नाही हे सर्वच राजकीय पक्षांना चांगलेच माहित आहे,त्यामुळे गडावर दसरा मेळावा होणारच आणि तेथे आपण भाषण करणारच असा जर पंकजा यांचा आग्रह असेल तर त्यात त्यांचा काही दोष नाही असेच म्हणावे लागेल
मात्र त्यासाठी थेट नामदेव शास्त्री सानप यांना आव्हान देणे पंकजा यांना निश्चितच न परवडणारे आहे,कारण गड कि पंकजा असा निवाडा करावयाचा झाल्यास समाज गडाच्या पाठीशी राहील यात शंका नाही,त्यामुळे पंकजा यांना सध्यातरी शांतपणेच निर्णय घ्यावा लागेल.
निवडणुकांना अद्याप साडेतीन वर्षाचा कालावधी असला तरी पंकजा यांची घाई त्यांच्या पुढील राजकारणाला मारक ठरू शकते असे राजकीय धुरिणांचे मत आहे,पंकजा यांनी गड आपल्याला सर्वोच्च आहे,त्याचे कोणी राजकारण करू नये अशीच भूमिका घेणे क्रमप्राप्त आहे असे अनेकांचे मत आहे,मात्र पंकजा यांचा एकंदर कारभार आणि राजकारण करण्याची पद्धत पाहता त्या असे वागतील याबाबत अनेकांना शंका आहे,त्यामुळे आगामी काळात गड (शास्त्री)विरुद्ध पंकजा असा संघर्ष अटळ असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे

रविवार, २४ जानेवारी, २०१६

आत्महत्येस कारण की .......

झी 24 तास ने काही महिन्यांपूर्वी मराठवाड्यातील अल्प भू धारक ,गरीब शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला,आम्हा रिपोर्टर लोकांना असे शेतकरी कुटुंब शोधण्याचं काम सोपवलं,संपादकांचा आदेश शिरसावंद्य मानून आम्ही कामाला लागलो,पण मनात शंका होती,खरोखर गरज असणारे शेतकरी कुटुंब शोधायचे कसे,कारण आत्महत्या केलेल्या कुटुंबांचा समावेश टाळावा अस सांगितलं होत,तेव्हा मी बीड जिल्ह्यातील सहा कुटुंब शोधून काढली ,मात्र त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली,कारण कोणता क्रायटेरिया लावणार,बरं काम सोप वाटत असलं तरी महा कठीण होत,कारण त्या कुटुंबाला दोन तीन एकर जमीन असावी,ती पडीक किंवा नापीक असावी,आर्थिक बाजू कमकुवत असावी,असे काहीसे निकष होते,असे लोक शोधणं तस अवघड होत मात्र सहा कुटुंब शोधली किंवा सापडली म्हणा,त्या कुटुंबांची पार्श्वभूमी पाहिली तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या,मात्र त्या नजरेआड करून निवड करावी लागली,याचा अर्थ निवड चुकीची करावी लागली असा नाही मात्र कुठं तरी मनात अनेक प्रश्नाचं काहूर माजलं होत,आर्थिक बाजू कमकुवत असताना देखील एकाही कुटुंबाची सदस्य संख्या मर्यादित म्हणजे दोन मुलं, आई वडील अशी नव्हती,सहा कुटुंबात किमान चार मुलं, मुली आई वडील,सासू सासरे अशी परिस्थिती होती,एक कुटुंब तर 11 मुलं, मुली ,आई वडील,कुडाच घर,अस होत.
हि सगळी स्थिती पाहिल्यानंतर काही प्रश्न पडले,या लोकांची आर्थिक बाजू कमकुवत होती तर कुटुंब नियोजन किंवा मर्यादित कुटुंब का नाही,बरं कुटुंब मर्यादित नाही तर नसू दे मात्र पिकांचं नियोजनही दिसलं नाही,दोन तीन एकर जमिनीवर कापूस किंवा ऊस हि दोनच पीक दहा वर्षापासून घेतली जात असल्याचं दिसून आलं.अशा वेळी जर नियोजन कोलमडून पडलं तर दोष कोणाला द्यायचा ,अरे बाबांनो जमिनीत जर नियोजन करून पीक घेतलं तर आर्थिक परिस्थिती डबघाईला येणार नाही,दहा पंधरा वर्षांपूर्वी शेतात ज्वारी ,बाजरी,मूग,उडीद,तूर,भुईमूग अशी पीक घेतली जायची,वर्षातून दोन पीक घेतली जायची,त्यातील चार पाच क्विंटल माल विकून उरलेला माल वर्षभर घरी खायला पुरवायचा अस ठरलेलं गणित असायचं,त्या काळात ग्रामीण भागात पै पाहुणा आला तरच गव्हाची पोळी ताटात दिसायची,पुरण पोळी तर सण वाराला पहायला मिळायची,आज रोज गव्हाची पोळी ताटात दिसते,काही जण म्हणतील कि तुम्हाला शेतकऱ्यांनी पोळ्या खाऊ नयेत अस वाटत का?तर निश्चित नाही,त्यांनीही पोळ्या खाव्यात वावगं काहीच नाही मात्र सांगण्याचा उद्देश एवढाच कि पूर्वी शेतात पिकलेल धान्य,डाळी दुळी वर्षभर घरात पुरतील एवढ्या व्हायच्या आज मात्र प्रत्येक गोष्ट विकत आणावी लागते,पूर्वी शेतात बांधावर वांगी,मेथी,करडी,कांदा,आळू ,बटाटे अशा भाज्या लावल्या जायच्या,रोज जेवणात त्याचा वापर केला जायचा,वाण्याच्या दुकानात तेल,तूप,साखर पत्ती यासाठी जावं लागायचं,त्याला खर्चही कमी लागायचा,आज मात्र शेतकर्याच्या हातात भाजी ची पिशवी आणि किराणा सामानाची यादी सोबतच असते मग पैसा पुरणार कोठून.
शेतकरी आत्महत्या हा अत्यन्त संवेदनशील विषय आज झाला आहे,दहा पंधरा वर्षांपूर्वी शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताना दिसत नव्हते आज मात्र रोज कोठे ना कोठे आत्महत्या केल्याची बातमी वाचायला,ऐकायला मिळते,एखादा माणूस एवढ्या सहजपणे आपलं जीवन कस संपवू शकतो ?हा न उलगडणारा प्रश्न आहे, आत्महत्या करण्यामागे अनेक कारण असतात,नापिकी,कर्जबाजारी पणा, सावकाराच कर्ज इथपासून ते अगदी व्यसनाधीनता इथपर्यन्त अनेक कारण आहेत,मात्र त्याला शेतकरी आत्महत्या हे गोंडस नाव देऊन त्या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतानाचे चित्र दिसते.
ग्रामीण भागात आजही शेतकरी असो कि शेतमजूर लग्न सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्याचे फॅड दिसून येते,मुलीच्या लग्नात ऋण काढून सण साजरा करण्याचे प्रकार सर्रास दिसून येतात याला काय म्हणायचं.दोन तीन एकर जमीन सावकाराकडे गहाण टाकायची आणि मुलीच लग्न थाटात लावायचं,कारण पै पाहुण्या मध्ये आपला रुबाब कायम राहावा यासाठी हा सगळा थाट माट असल्याचं दिसत.येणारा माणूस खुश झाला पाहिजे ,पाहुण्या रावळ्यानी आपलं नाव घेतलं पाहिजे या साठी केलेला हा सगळा खटाटोप शेवटी वधुपित्याच्या गळयाला फास देऊन जातो.एक लग्न शेतकऱ्याला चार पाच वर्ष मागं घेऊन जात,पाहुण्यांचे आहेर,नवरदेवाच्या घरच्यांचा मानपान,जेवणावळी,यावर लाखो रुपये खर्च होतात,जेवणारे जेवून जातात,हे कमी पडलं,ते जास्त झालं अशा चर्चा करतात,ग्रामीण भाषेत सांगायचं तर खातात पितात अन टेरी ला हात पुसून जातात अशी अवस्था असते मात्र तरी देखील मागील पाच पंन्नास वर्षात लग्नावरील खर्च कमी झालेला नाही.
कर्ज काढून लग्न सोहळे उरकायचे अन ते फेडताना नाकीनऊ आले कि गळ्याला फास लावायचा असा कार्यक्रम ठरलेला दिसतो,गळफास लावताना कोणीही नंतर काय होईल याचा विचार करताना दिसून येत नाही,लग्न करू नयेत अस नाही मात्र ते करताना आपलं अंथरून पाहून पाय पसरावेत हे नक्की.सामूहिक विवाह हा देखील एक चांगला पर्याय आहे किंवा एक गाव एक लग्नतिथी हा देखील उपाय होऊ शकतो.यावर सर्वानीच गांभीर्याने विचार करायला हवा,
ग्रामीण भागाचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते कि जमीन खरेदी किंवा विक्री चे व्यवहार झालेच नाहीत अस एकही गाव आढळणार नाही,ज्याच्याकडे दहा पंधरा एकर जमीन आहे तो वर्ष दोन वर्षात एक एकर का होईना जमीन विक्री करतो,बरं हि जमीन कोणी मुंबई पुण्यावाले विकत घेतात अस नाही तर गावातीलच दोन तीन एकर शेती असलेला माणूस हि जमीन विकत घेतो,त्याला ते कसे शक्य आहे याचा अभ्यास केल्यास लक्षात येईल कि त्याच्याकडे काम करण्याची इच्छा शक्ती आहे अन 24 तास तो घाम गाळण्यात घालवतो,काम करील त्याला दाम मिळतील किंवा करा काम गाळा घाम मिळवा दाम असा सृष्टीचा नियम आहे आज अनेकांना त्याचा विसर पडल्याचे चित्र दिसते .
शेतकरी आत्महत्या करताना परिवाराचा विचार करीत नाही असही दिसून येत,बरं ग्रामीण भागात काम करणारे भटके ,विमुक्त ,सालगडी,मजूर कधीही अशा वाटेने जाण्याचा विचार करीत नाहीत अस दिसत मग शेतकरीच का असा विचार करतो,त्याला अनेक कारण आहेत, असतील मात्र शेतकऱ्यांनी जर ठराविक पिकाचा अट्टहास सोडून शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर शेती आतबट्याची होण्याऐवजी फायद्याची होऊ शकते ,अनेक जण सांगतात शेतीसाठी पाणी मुबलक मिळत नाही म्हणून शेती परवडत नाही ,मान्य आहे मात्र पाण्याचं योग्य नियोजन करन कोणाच्या हातात आहे,आहे पाणी म्हणून चोवीस तास उपसा करायचा आणि संपलं कि बोंबा मारायच्या हे कस मान्य होईल,ठिबक सिंचन सारखा प्रयोग केल्यास कमी पाण्यात हि शेती पिकवता येते परंतु शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतो,
आज काल एक हजार फुटापर्यंत बोअर घेण्याचा नवा नाद अनेकांना लागला आहे मात्र आडातच नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार अशी स्थिती आहे,जमिनीतील पाणी पातळी कमालीची घटत चालली आहे अशा वेळी किती खोल खोदायच याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
शेती पूरक उद्योग धंदे फारसे होत नसल्याचं चित्र देखील प्रकर्षाने दिसून येत,फार फार तर दुधाचा धंदा दिसतो मात्र शेळी पालन ,कुक्कुट पालन,वराह पालन,खत बी बियाणांची दुकान असा व्यवसाय करताना शेतकरी दिसत नाहीत.बहुतांश ग्रामीण भागात लोक सकाळी तीन चार भाकरीचा मुडपा पाडून गाडीला किक मारून शहरात येतात तिथं येऊन एखाद्या नेत्याच्या माग पुढं फिरायचं,चार दोन कप चहा प्यायचा ,गावगप्पा मारायच्या ,फार तर तहसील किंवा कलेक्टर कचेरीत चक्कर मारायची अन दिवस मावळतीला गावाकडचा रस्ता धरायचा असा नित्यक्रम दिसतो,गावात गेल्यावरही शहरात काय झालं,दिल्लीत काय चालू आहे,सी एम च कस चुकलं यावर गप्पांचा फड रंगवायचा अन झोपायचं अस चित्र दिसत.
दिवस भरात हाच वेळ जर शेतात दिला तर काही चांगलं होऊ शकत मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असताना दिसत, आज ग्रामीण भागात कापूस वेचणी असो कि तण काढणी अथवा पीक कापणी यासाठी मजूर मिळत नाहीत,शहरातून मजूर न्यावे लागतात ,मनरेगा च्या कामावर हि मजूर मिळत नाहीत असे चित्र आहे,एकीकडे काम नाही म्हणून बोंब मारायची अन दुसरीकडे असलेल्या कामावर जायचं नाही अशी परिस्थिती दिसते,शेतीत जर वेळ दिला तर पोटापुरत पिकत अन कुटुंबाच भागत अस गणित आहे मात्र शेती परवडत नाही म्हणायचं अन काहीच न करता मरणाला कवटाळायच हे काही बरोबर नाही.
शेती हि परवडत नाही अस म्हणून नोकरीच्या मागे लागणारे अनेक जण दिसतात मात्र दहा पाच हजाराची चाकरी करण्यापेक्षा शेतीत कष्ट केले तर मालक बनता येत याची अनेक उदाहरण आहेत त्यांचा आदर्श सर्वांनी घेणं गरजेचं आहे.शेतकर्याच्या पोरानं शेतीच करावी असा काही नियम नाही हे मान्य आहे मात्र ती केली त्यात नवनवीन प्रयोग केले तर काही बिघडत नाही पण हे करणार कोण.
शेत मालाला योग्य भाव मिळत नाही हा देखील एक गहन विषय। आहे मात्र तो मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी मार्केटचा अभ्यास करून शेतीत ,तिच्या तंत्रात बदल करन अपेक्षित आहे,पण ते होताना दिसून येत नाही.कापूस आणि ऊस याशिवाय अनेक पीक आहेत मात्र त्याकडे कानाडोळा केला जातो.
एकंदरच काय तर शेतकरी आत्महत्या का करतो याकडे त्याने स्वतः देखील गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे,प्रत्येक गोष्ट सरकारच्या माथी मारायची अन मोकळं व्हायचं हे काही बरोबर नाही,थाटात लग्न करा,कर्ज काढून घर बांधा, कापूस अन ऊस च लावा,हजार हजार फूट बोअर खोदा, अस सरकार म्हणत नाही मग हे का करता ,जरा विचार करा जीवन हे अमूल्य आहे,एवढ्या सहज संपवू नका,पीक,पाणी,कुटुंब याच नियोजन करा,एवढंच सांगण आहे.

गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

मुंडे म्हणजे बातमी आणि बातमी म्हणजे मुंडे




गोपीनाथ मुंडे सिर्फ नाम हि काफी है ,अस म्हणायला हरकत नाही,पत्रकारिता करताना मागील दहा पंधरा वर्षात मुंडे साहेब आणि माझ्या अनेक वेळा भेटी गाठी झाल्या,चर्चा झाली,अनेक वेळा म्हणजे बहुतांश वेळा त्यांच्यात आणि माझ्यात खटके च जास्त उडायचे,कारण माझा स्वभाव हा थेट प्रश्न विचारायचा आणि मुंडे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारायला आम्ही दोन चार जण असायचो फक्त बाकी सगळे असायचे मात्र ते त्यांच्या पद्धतीने विचारायचे आम्ही थेट मुद्यावर बोलायचो,त्यामुळे अनेक वेळा मुंडे नाराज व्हायचे मात्र त्यांनी ते कधी जाहीर सांगितले नाही किंवा मनात कधी अढी ठेवली नाही,माणूस मोठा होता,भला होता,ग्रेट होता,बिनधास्त होता,मात्र तब्येतीच्या बाबतीत तेवढाच बेफिकीर किंवा बिनधास्त होता म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गोपीनाथ मुंडे नावाच्या वादळाचा प्रवास हा आणीबाणीच्या काळापासून सुरु झालेला,परळी सारख्या ग्रामीण भागातून थेट दिल्ली पर्यंत धडक मारणारा हा माणूस वाघाच्या काळजाचा होता यात शंका नाही,1995 ते 1999 हा युती सरकार चा काळ दोन व्यक्तीमुळे कायम स्मरणात राहिला,एक बाळासाहेब ठाकरे यांचा रोखठोक स्वभाव आणि रिमोट कंट्रोल तर दुसरे गोपीनाथ मुंडे यांचे मेनगेट टू रामटेक हे वाक्य.त्यांच्या बंगल्यावर गेल्यावर बीड च्या माणसाला हे वाक्य पाठच झाले होत,त्या काळात आणि पुढील पाच दहावर्ष पोलीस असो कि प्रशासन एम एच 23 नंबर ची गाडी पहिली किंवा जरा उगरट भाषा ऐकली कि विचारायचे मुंडे साहेबांच्या जिल्ह्यातले आहात का? हि ओळख मुंडे यांनी कष्टातून कमावली होती,प्रमोद महाजन यांच्यासारखा दिलदार मित्र सहकारी नेता सोबत आणि विलासराव देशमुख यांच्या सारखा सख्खा शेजारी ,त्यामुळे मुंडे यांच्या नेतृत्वाला चार चांद लागले,

मुंडे जेव्हा जेव्हा बीड ला यायचे तेव्हा तेव्हा वेगळी बातमी मिळणार हे नक्की असायचे,जस आज हि म्हटलं जात कि ठाकरे म्हणजे बातमी तसा माझा अनुभव होता ,मुंडे म्हटलं कि बातमी मिळणार हे ठरलेलं असायचं,त्यांनी कधीच कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला नाही,बर विषयाची मर्यादा नव्हती,कोणताही विषय असो गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत थेट बोलणारा माणूस म्हणून मुंडे मीडिया मध्ये लोकप्रिय होते,

मला आठवत सुरेश धस ,रमेश आडसकर,अशोक डक यांनी अचानक जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याचा डाव टाकला तेव्हा मुंडे साहेब कमालीचे अस्वस्थ होते,नितीन कोटेचा यांच्या घरी प्रेस होती,त्यांना मी थेट विचारलं,निवडणूक कोणतेही असो ग्रामपंचायत किंवा लोकसभा तुम्हाला बीड मध्ये आठ दिवस तळ का ठोकावा लागतो,त्यांनी उसळून माझ्या प्रश्नाला उत्तर दिले,त्यानंतर त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवत तुला काही अडचण आहे का असे विचारत एवढं थेट विचारत जाऊ नकोस असा सल्ला दिला,मात्र मनात काही नव्हते.

त्यानंतर अनेक वेळा त्यांच्या प्रेस मध्ये मी ,महेश वाघमारे सर,खिस्ती सर,उदय जोशी,नरेंद्र कांकरिया काका यांनी साहेबाना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले मात्र त्याचा त्यांनी कधीच राग मनात ठेवला नाही,

धनंजय मुंडे आणि त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर मीडिया ने मुंडेंच्या घरातील महाभारत असे विषय रंगवले ,ते अनेक वेळा व्यथित झाले खाजगीत बोलताना हळहळले मात्र मीडियावर कधी खापर फोडले नाही,मी वैद्यनाथ कारखान्यावर धनंजय मुंडे यांनी काढलेला मोर्चा कव्हर केला तेव्हा ते प्रचंड नाराज झाले,मला अनेक दिवस ते बोलत नव्हते,जे एवढे महत्वाचे नव्हते ते तू मोठे करून दाखवले ,तू माझ्या विरोधकांच्या सांगण्यावरून बातम्या करतो असं ते बोलले मात्र त्याचा त्यांनी कधी अतिरेक केला नाही,विरोधात बातमी आली तरी सहज पणे हाताळण्याची हातोटी त्यांच्याकडे होती ती कोणत्याच नेत्याकडे नव्हती,

मध्यंतरी गडकरी आणि मुंडे वाद देशात गाजत असताना मी थेट या प्रश्नाला हात घातला तेव्हा त्यांनी उत्तर दिले मात्र नंतर मला त्यांची पक्षातील होणारी घुसमट सांगितली.एकूण थक्क झालो मी,मुंडे सारख्या मोठ्या माणसाला देखील या अडचणी येतात हे तेव्हा कळले,मुंडे काही वर्षांपूर्वी पक्ष सोडणार अशा चर्चा सुरु होत्या तेव्हा त्यांनी थेट फोन करून अरे काय चालवत आहात तुम्ही सगळ्या मनाच्या बातम्या लावत जाऊ नका जरा बोलत जा असं बोलून दाखवलं होत.

लोकसभा निवडणूक सुरु असताना त्यांचा दिनक्रम तरुणालाही लाजवणाराअसा होता,पहाटे उठून सुरु झालेला त्यांचा प्रवास उत्तर रात्री संपायचा,जिल्ह्यात कोठेही असले तरी ते मुक्कामाला परळी येथेच असायचे,

कितीही उशीर झाला तरी शेवटचा माणूस भेटल्याशिवाय ते कधीच विश्रांती साठी गेल्याचे ऐकिवात नाही,वैद्यनाथ कारखाना असो अथवा यशश्री बंगला मुंडे मीडिया साठी नेहमी अव्हेलेबल असायचे ,

मागील निवडणुकीत जी आश्वासने दिली त्यातील काहीच पूर्ण झाले नाही असा प्रश्न वाघमारे सरांनी विचारल्यानंतर मुंडे यांनी तुला नंतर त्याचा हिशोब देतो आपण बोलू असे म्हणून वेळ मारून नेली होती,अमोल गलधर सारखा कार्यकर्ता रेल्वे प्रश्नावर अटक झाल्यानंतर थेट मुंबई वरून बीड शहर पोलीस ठाण्यात येणार एकच नेता बघितला आणि तो म्हणजे गोपीनाथ मुंडे,केज विधानसभा पोट निवडणुकीच्या वेळी एक दिवस अगोदर आम्ही अन्विता होटेल मध्ये मुंडे साहेबाना भेटलो होतो त्यावेळी त्यांना खिस्ती सरानी आणि मी आपली पोझिशन अवघड आहे अस सांगितलं होत तेव्हा हसून ते म्हणले अरे उन्हात पांढरे नाही झाले माझे केस तुमचं जेव्हढ वय आहे तेव्हढा अनुभव माझा आहे बघा जादूची कांडी काय करते ते,मात्र निकाल लागल्यानंतर आवर्जून त्यांनी आम्हाला फोन करून आमचे अंदाज खरे निघाल्याबद्दल आणि त्यांना खर सांगितल्याबद्दल अभिनंदन केलं होत

या लोकसभेच्या वेळी पुन्हा त्यांचा आणि माझा वाद झाला होता निकाल लागल्यानंतर त्यांनी आणि पंकजा मुंडे यांनी पॉलिटेक्निक च्या आवारात मला बोलले होते मात्र त्यानंतर लोकप्रश्न मध्ये भेट झाल्यानंतर त्यांनी तो विषय सोडून दिला,लोकप्रश्न मधील त्यांची भेटशेवटची ठरली,मी पॉलिटेक्निक मध्ये भेटल्यामुळे मी लोकप्रश्न मध्ये गर्दीत घुसलो नाही मात्र त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले होते,ते अभिनंदन आणि ती भेट आजही आठवली कि डोळ्यात पाणी येत,खूप स्वप्न घेऊन दिल्लीला गेलेला हा निधड्या छातीचा माणूस अचानक काळाने हिरावून नेला आणि  मनातून रडू आलं,एवढ्या अचानक त्यांची अशा पद्धतीने एक्झिट अपेक्षित नव्हती मात्र काळापुढे कोणाचे काही चालत नाही म्हणतात तेच खरे .

मुंडे साहेब आपल्यातून जाऊन आज सहा
वर्ष होत आहे मात्र आज हि त्यांचं ते कार्यक्रमाला उशिरा येणं, आल्या नंतर सभा सुरु होण्यापूर्वी किंवा भाषणाला उभं राहण्यापूर्वी स्टाईल मध्ये भांग पाडणं, सगळं सगळं आठवतं, बाईट देताना जमला ना रे अस विचारणं किंवा एखादी सभा झाल्यानंतर  भेट झाल्यास कशी झाली सभा अस विचारणं,भेटत जा रे तुम्ही लोक ,फोन करीत जा,बातम्या व्यतिरिक्त बोलत जा कधी कधी अस  हक्कानं म्हणणं सगळं काही आठवत,

परळीतील सुदाम मुंडे यांचं प्रकरण सुरु असताना अजित पवार यांनी नेकनूर च्या सभेत मुंडे आणि डॉ मुंडे यांचे फोटो दाखवल्या नंतर अरे माझा माझ्या मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीशी घरगुती संबध आहे याचा अर्थ त्याच्या प्रत्येक कामात मी दोषी कसा असू शकतो अस म्हंणत त्यांनी चांगलीच आगपाखड केली होती,अगदी माझी ऑफिस ला तक्रार केली होती मात्र नंतर पत्की सरांच्या घरी भेटल्यानंतर आणि त्या अगोदर मोमीनपुर्यातील मोर्चा दरम्यान त्यांनी अनेक गोष्टी खाजगीत सांगितल्या होत्या,मात्र त्यांनी आज कालच्या उथळ पोस्टरबाज नेत्यांसारखं धमकावन किंवा डूख धरण्याचा उद्योग कधी केल्याचं माझ्या तरी आठवणीत नाही,

अनेक गोष्टी आज जशा च्या तशा आठवत आहेत सगळं लिहायला बसलं तर पानभरल तरी जागा पुरणार नाही,कदाचित हा माझा अनुभव वाचून अनेक जण म्हणतील हि बाळासाहेब हि मुंडे ची माहिती होती कि आत्मस्तुती मात्र जे आठवलं ते लिहिलं इतकंच ,धन्यवाद.
लक्ष्मीकांत रुईकर, बीड 9422744404

मुंडे म्हणजे बातमी अन बातमी म्हणजे मुंडे


गोपीनाथ मुंडे सिर्फ नाम हि काफी है ,अस म्हणायला हरकत नाही,पत्रकारिता करताना मागील दहा पंधरा वर्षात मुंडे साहेब आणि माझ्या अनेक वेळा भेटी गाठी झाल्या,चर्चा झाली,अनेक वेळा म्हणजे बहुतांश वेळा त्यांच्यात आणि माझ्यात खटके च जास्त उडायचे,कारण माझा स्वभाव हा थेट प्रश्न विचारायचा आणि मुंडे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारायला आम्ही दोन चार जण असायचो फक्त बाकी सगळे असायचे मात्र ते त्यांच्या पद्धतीने विचारायचे आम्ही थेट मुद्यावर बोलायचो,त्यामुळे अनेक वेळा मुंडे नाराज व्हायचे मात्र त्यांनी ते कधी जाहीर सांगितले नाही किंवा मनात कधी अढी ठेवली नाही,माणूस मोठा होता,भला होता,ग्रेट होता,बिनधास्त होता,मात्र तब्येतीच्या बाबतीत तेवढाच बेफिकीर किंवा बिनधास्त होता म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गोपीनाथ मुंडे नावाच्या वादळाचा प्रवास हा आणीबाणीच्या काळापासून सुरु झालेला,परळी सारख्या ग्रामीण भागातून थेट दिल्ली पर्यंत धडक मारणारा हा माणूस वाघाच्या काळजाचा होता यात शंका नाही,1995 ते 1999 हा युती सरकार चा काळ दोन व्यक्तीमुळे कायम स्मरणात राहिला,एक बाळासाहेब ठाकरे यांचा रोखठोक स्वभाव आणि रिमोट कंट्रोल तर दुसरे गोपीनाथ मुंडे यांचे मेनगेट टू रामटेक हे वाक्य.त्यांच्या बंगल्यावर गेल्यावर बीड च्या माणसाला हे वाक्य पाठच झाले होत,त्या काळात आणि पुढील पाच दहावर्ष पोलीस असो कि प्रशासन एम एच 23 नंबर ची गाडी पहिली किंवा जरा उगरट भाषा ऐकली कि विचारायचे मुंडे साहेबांच्या जिल्ह्यातले आहात का? हि ओळख मुंडे यांनी कष्टातून कमावली होती,प्रमोद महाजन यांच्यासारखा दिलदार मित्र सहकारी नेता सोबत आणि विलासराव देशमुख यांच्या सारखा सख्खा शेजारी ,त्यामुळे मुंडे यांच्या नेतृत्वाला चार चांद लागले,

मुंडे जेव्हा जेव्हा बीड ला यायचे तेव्हा तेव्हा वेगळी बातमी मिळणार हे नक्की असायचे,जस आज हि म्हटलं जात कि ठाकरे म्हणजे बातमी तसा माझा अनुभव होता ,मुंडे म्हटलं कि बातमी मिळणार हे ठरलेलं असायचं,त्यांनी कधीच कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला नाही,बर विषयाची मर्यादा नव्हती,कोणताही विषय असो गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत थेट बोलणारा माणूस म्हणून मुंडे मीडिया मध्ये लोकप्रिय होते,

मला आठवत सुरेश धस ,रमेश आडसकर,अशोक डक यांनी अचानक जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याचा डाव टाकला तेव्हा मुंडे साहेब कमालीचे अस्वस्थ होते,नितीन कोटेचा यांच्या घरी प्रेस होती,त्यांना मी थेट विचारलं,निवडणूक कोणतेही असो ग्रामपंचायत किंवा लोकसभा तुम्हाला बीड मध्ये आठ दिवस तळ का ठोकावा लागतो,त्यांनी उसळून माझ्या प्रश्नाला उत्तर दिले,त्यानंतर त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवत तुला काही अडचण आहे का असे विचारत एवढं थेट विचारत जाऊ नकोस असा सल्ला दिला,मात्र मनात काही नव्हते.

त्यानंतर अनेक वेळा त्यांच्या प्रेस मध्ये मी ,महेश वाघमारे सर,खिस्ती सर,उदय जोशी,नरेंद्र कांकरिया काका यांनी साहेबाना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले मात्र त्याचा त्यांनी कधीच राग मनात ठेवला नाही,

धनंजय मुंडे आणि त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर मीडिया ने मुंडेंच्या घरातील महाभारत असे विषय रंगवले ,ते अनेक वेळा व्यथित झाले खाजगीत बोलताना हळहळले मात्र मीडियावर कधी खापर फोडले नाही,मी वैद्यनाथ कारखान्यावर धनंजय मुंडे यांनी काढलेला मोर्चा कव्हर केला तेव्हा ते प्रचंड नाराज झाले,मला अनेक दिवस ते बोलत नव्हते,जे एवढे महत्वाचे नव्हते ते तू मोठे करून दाखवले ,तू माझ्या विरोधकांच्या सांगण्यावरून बातम्या करतो असं ते बोलले मात्र त्याचा त्यांनी कधी अतिरेक केला नाही,विरोधात बातमी आली तरी सहज पणे हाताळण्याची हातोटी त्यांच्याकडे होती ती कोणत्याच नेत्याकडे नव्हती,

मध्यंतरी गडकरी आणि मुंडे वाद देशात गाजत असताना मी थेट या प्रश्नाला हात घातला तेव्हा त्यांनी उत्तर दिले मात्र नंतर मला त्यांची पक्षातील होणारी घुसमट सांगितली.एकूण थक्क झालो मी,मुंडे सारख्या मोठ्या माणसाला देखील या अडचणी येतात हे तेव्हा कळले,मुंडे काही वर्षांपूर्वी पक्ष सोडणार अशा चर्चा सुरु होत्या तेव्हा त्यांनी थेट फोन करून अरे काय चालवत आहात तुम्ही सगळ्या मनाच्या बातम्या लावत जाऊ नका जरा बोलत जा असं बोलून दाखवलं होत.

लोकसभा निवडणूक सुरु असताना त्यांचा दिनक्रम तरुणालाही लाजवणाराअसा होता,पहाटे उठून सुरु झालेला त्यांचा प्रवास उत्तर रात्री संपायचा,जिल्ह्यात कोठेही असले तरी ते मुक्कामाला परळी येथेच असायचे,

कितीही उशीर झाला तरी शेवटचा माणूस भेटल्याशिवाय ते कधीच विश्रांती साठी गेल्याचे ऐकिवात नाही,वैद्यनाथ कारखाना असो अथवा यशश्री बंगला मुंडे मीडिया साठी नेहमी अव्हेलेबल असायचे ,

मागील निवडणुकीत जी आश्वासने दिली त्यातील काहीच पूर्ण झाले नाही असा प्रश्न वाघमारे सरांनी विचारल्यानंतर मुंडे यांनी तुला नंतर त्याचा हिशोब देतो आपण बोलू असे म्हणून वेळ मारून नेली होती,अमोल गलधर सारखा कार्यकर्ता रेल्वे प्रश्नावर अटक झाल्यानंतर थेट मुंबई वरून बीड शहर पोलीस ठाण्यात येणार एकच नेता बघितला आणि तो म्हणजे गोपीनाथ मुंडे,केज विधानसभा पोट निवडणुकीच्या वेळी एक दिवस अगोदर आम्ही अन्विता होटेल मध्ये मुंडे साहेबाना भेटलो होतो त्यावेळी त्यांना खिस्ती सरानी आणि मी आपली पोझिशन अवघड आहे अस सांगितलं होत तेव्हा हसून ते म्हणले अरे उन्हात पांढरे नाही झाले माझे केस तुमचं जेव्हढ वय आहे तेव्हढा अनुभव माझा आहे बघा जादूची कांडी काय करते ते,मात्र निकाल लागल्यानंतर आवर्जून त्यांनी आम्हाला फोन करून आमचे अंदाज खरे निघाल्याबद्दल आणि त्यांना खर सांगितल्याबद्दल अभिनंदन केलं होत

या लोकसभेच्या वेळी पुन्हा त्यांचा आणि माझा वाद झाला होता निकाल लागल्यानंतर त्यांनी आणि पंकजा मुंडे यांनी पॉलिटेक्निक च्या आवारात मला बोलले होते मात्र त्यानंतर लोकप्रश्न मध्ये भेट झाल्यानंतर त्यांनी तो विषय सोडून दिला,लोकप्रश्न मधील त्यांची भेटशेवटची ठरली,मी पॉलिटेक्निक मध्ये भेटल्यामुळे मी लोकप्रश्न मध्ये गर्दीत घुसलो नाही मात्र त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले होते,ते अभिनंदन आणि ती भेट आजही आठवली कि डोळ्यात पाणी येत,खूप स्वप्न घेऊन दिल्लीला गेलेला हा निधड्या छातीचा माणूस अचानक काळाने हिरावून नेला आणि  मनातून रडू आलं,एवढ्या अचानक त्यांची अशा पद्धतीने एक्झिट अपेक्षित नव्हती मात्र काळापुढे कोणाचे काही चालत नाही म्हणतात तेच खरे .

मुंडे साहेब आपल्यातून जाऊन आज दीड वर्ष होत आहे मात्र आज हि त्यांचं ते कार्यक्रमाला उशिरा येणं, आल्या नंतर सभा सुरु होण्यापूर्वी किंवा भाषणाला उभं राहण्यापूर्वी स्टाईल मध्ये भांग पाडणं, सगळं सगळं आठवतं, बाईट देताना जमला ना रे अस विचारणं किंवा एखादी सभा झाल्यानंतर  भेट झाल्यास कशी झाली सभा अस विचारणं,भेटत जा रे तुम्ही लोक ,फोन करीत जा,बातम्या व्यतिरिक्त बोलत जा कधी कधी अस  हक्कानं म्हणणं सगळं काही आठवत,

परळीतील सुदाम मुंडे यांचं प्रकरण सुरु असताना अजित पवार यांनी नेकनूर च्या सभेत मुंडे आणि डॉ मुंडे यांचे फोटो दाखवल्या नंतर अरे माझा माझ्या मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीशी घरगुती संबध आहे याचा अर्थ त्याच्या प्रत्येक कामात मी दोषी कसा असू शकतो अस म्हंणत त्यांनी चांगलीच आगपाखड केली होती,अगदी माझी ऑफिस ला तक्रार केली होती मात्र नंतर पत्की सरांच्या घरी भेटल्यानंतर आणि त्या अगोदर मोमीनपुर्यातील मोर्चा दरम्यान त्यांनी अनेक गोष्टी खाजगीत सांगितल्या होत्या,मात्र त्यांनी आज कालच्या उथळ पोस्टरबाज नेत्यांसारखं धमकावन किंवा डूख धरण्याचा उद्योग कधी केल्याचं माझ्या तरी आठवणीत नाही,

अनेक गोष्टी आज जशा च्या तशा आठवत आहेत सगळं लिहायला बसलं तर पानभरल तरी जागा पुरणार नाही,कदाचित हा माझा अनुभव वाचून अनेक जण म्हणतील हि बाळासाहेब हि मुंडे ची माहिती होती कि आत्मस्तुती मात्र जे आठवलं ते लिहिलं इतकंच ,धन्यवाद.

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...